अखेर ‘त्या’ प्रकरणी नाना पाटेकरांना क्लीन चीट

तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या अत्याचाराबाबत आता सात महिन्यानंतरही ठोस पुरावे न सापडल्याने ओशिवरा पोलिसांनी अभिनेता नाना पाटेकर यांना क्लीन चीट दिली आहे.

tanushri datta and nana patekar
तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर

महिलांवरील अत्याचार आणि छळाला वाचा फोडणारी मीटू चळवळ सुरु करणाऱ्या तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या केसमध्ये वेगळं वळण आलं आहे. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या अत्याचाराबाबत आता सात महिन्यानंतरही ठोस पुरावे न सापडल्याने ओशिवरा पोलिसांनी अभिनेता नाना पाटेकर यांना क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे तनुश्री दत्ताचा लैंगिक छळ केल्याच्या कथित प्रकरणाला पूर्णविराम मिळाला की काय असंच म्हणावं लागेल. नाना पाटेकर यांच्या विरोधात आरोप सिद्ध करणारा एकही साक्षीदार पोलिसांना मिळालेला नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्या कारणाने पोलिसांनी नाना पाटेकर यांना क्लीन चीट दिली आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरोधात ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. यासंबंधीचे वृत्त बॉलिवूडलाईफ.कॉमने दिलं आहे.

असा केला प्रकरणाचा तपास 

तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलिसांनी त्यावेळी उपस्थित असणाऱ्या १५ साक्षीदारांची चौकशी केली होती. तनुश्री दत्ताने केलेले आरोप सिद्ध करणारा एकही साक्षीदार आम्हाला सापडलेला नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. एकाही साक्षीदाराने लैंगिक छळाला दुजोरा दिला नसल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी ज्या १५ साक्षीदारांची चौकशी केली त्यामध्ये अभिनेत्री डेजी शाहचाही समावेश होता.