लहानग्यांची मोठी गोष्ट सांगणारा ‘ये रे ये रे पावसा’ लवकरच, टिझर प्रदर्शित

कधी कधी मोठयांनासुद्धा जे जमत नाही ते लहान मुलं त्यांच्या निरागसतेने आणि कल्पकतेने करतात. मोठ्यांनी लहानांकडून शिकावं अश्या आशयाचा हा चित्रपट आहे. सगळ्यांना आपलासा आणि हवा हवासा वाटणारा पाऊस सगळ्यांनाच आवडतो पण जेव्हा तो रुसतो तेव्हा मात्र अक्षरशः डोळ्यात पाणी आणतो.

‘हाफ तिकीट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेला विनायक पोतदार आणि ‘दशक्रिया’ चित्रपटातील आर्य आढाव या दोघांचीही जोडी ये रे ये रे पावसा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लहानग्यांची मोठी गोष्ट सांगणारा ये रे ये रे पावसा या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि या दोन बालकलाकारांच्या भूमिकांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतले. हा चित्रपट १७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

कधी कधी मोठयांनासुद्धा जे जमत नाही ते लहान मुलं त्यांच्या निरागसतेने आणि कल्पकतेने करतात. मोठ्यांनी लहानांकडून शिकावं अश्या आशयाचा हा चित्रपट आहे. सगळ्यांना आपलासा आणि हवा हवासा वाटणारा पाऊस सगळ्यांनाच आवडतो पण जेव्हा तो रुसतो तेव्हा मात्र अक्षरशः डोळ्यात पाणी आणतो. पण अशा बिकट परिस्थितीवर मात कशी करावी हे या चित्रपटातून बालकलाकार सांगतात. या चित्रपटाचं दिग्दर्शन शफल खान यांनी केलं आहे तर या सिनेमात विनायकने ‘रघु’ तर आर्यने ‘सलमान’ या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. कोणत्याही जातीपलीकडे जाऊन समाजाचा विचार पहिला करावा हे हा चित्रपट शिकवतो. छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, प्रदीप नवले, चिन्मयी साळवी, प्राजक्ता वाड्ये, वैभव पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ प्रज्ञा गोपाले या कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.

14 देशातल्या 31 चित्रपट महोत्सवांमध्ये अधिकृत निवड झालेल्या या सिनेमाने 22 नामांकन आणि 16 पुरस्कार आतापर्यंत पटकावले आहेत. हि बाब विशेष उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर ‘जीफोनी’, ‘हॉलीवूड नॉर्थ फिल्म’, ‘टोकियो इंडी फिल्म’ अशा अनेक चित्रपट महोत्सवांत या चित्रपटाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ह्या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं.