घरमनोरंजनयू मस्ट डाय - लेखक-दिग्दर्शकांच्या चष्म्यातून

यू मस्ट डाय – लेखक-दिग्दर्शकांच्या चष्म्यातून

Subscribe

समोरच्याला उत्कंठावर्दी नाटकात गुंतवून ठेवायचं असेल तर थोडं जास्त करावा लागतं तरच त्याला गंमत येते.

आजपासून रंगभूमीवर एक नवे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गूढ- रहस्यप्रधान धाटणीचे हे नाटक नीरज शिरवईकर या नव्या दमाच्या नाटककाराने लिहिले आहे. त्याचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. नीरज ने आत्तापर्यंत खरं खरं सांग, आमने-सामने, अ परफेक्ट मर्डर अशी नाटके लिहिली आहेत. यातील ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाच्या यशानंतर पुन्हा एकदा ही लेखक-दिग्दर्शकाची जोडगोळी प्रेक्षकांसाठी ‘यू मस्ट डाय’ हे नाटक घेऊन आली आहे.मुळातच या लेखक दिग्दर्शकाच्या जोडगोळीची गंमत अशी की, रहस्यमय गूढ कथांचे जॉनर दोघांनाही खूप आवडते. नाटक जेवढे त्यात काम करणार्‍या कलाकारांचे असते तेवढेच ते लेखक आणि दिग्दर्शकाचे असते. म्हणूनच या लेखक दिग्दर्शकाच्या जोडीसोबत ‘आपलं महानगर’ ने खास संवाद साधला.

‘यू मस्ट डाय’ ची कथा अगाथा ख्रिस्ती यांच्या ‘दि अनएस्पेक्टेड गेस्ट’ या नॉव्हेलवर आधारित आहे. या नाटकाचा लेखक नीरज सांगतो की, “ अगाथा ख्रिस्तीची ही कथा त्याला विजय केंकरे यांनी २०१४ साली वाचायला सांगितली होती. त्यातून प्रेरित होऊन यू मस्ट डायची निर्मिती झाली. यात एक खून झालेला आहे आणि तो कोणी केलेला आहे याचा तपास चालू होतो. परंतु त्याचा शोध घेत असताना अशा काही छोट्या छोट्या घटना घडू लागतात की, त्यातून अधिक गुढ निर्माण होते आणि अंतिमतः हा खून कोणी केला आहे हेच कळत नाही.”

- Advertisement -

नीरज मुंबई युनिव्हर्सिटीच्या थिएटर डिपार्टमेंटमध्ये असताना विजय केंकरे त्याचे सर होते. म्हणजे तसे पाहता हे गुरू-शिष्याचं नाटक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नीरज स्वतःही नाटकाचे दिग्दर्शन करतो. ‘आमने सामने’ हे त्याचं नाटक त्याने स्वतःच दिग्दर्शित केले होते. परंतू नीरज सांगतो की, “मी दिग्दर्शन मुळात विजय सरांकडून शिकलेलो आहे. त्यामुळे त्यांची जी प्रोसेस आहे, ते ज्याप्रमाणे नाटकाकडे पाहतात, ते ज्या पद्धतीने कलाकारांबरोबर काम करतात त्याचा माझ्यावर खूप जास्त इन्फ्ल्यूएन्स आहे. नाटकाची प्रोसेस सरांबरोबर एन्जॉय करण्यासारखे असते. त्यांच्या तालमीमध्ये जे खेळीमेळीचं वातावरण असतं ते मला खूप आवडतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरांनी ही जी काही ही टीम बिल्ड केलेली आहे, त्यांच्यातली केमिस्ट्री आपल्याला नाटक बघत असताना अगदी सहज जाणवते !”

- Advertisement -

एक सस्पेंस थ्रिलर नाटक बनवत असताना दिग्दर्शकाचा समोर नेमकी कोणती आव्हानं असतात याबद्दल दिग्दर्शक विजय केंकरे सांगतात, “ आपल्याकडे नाटक हा फॉर्म पकडला तर असं दिसतं की, खूप जास्त रहस्यप्रधान नाटक लिहिली गेली नाहीत. बऱ्याचदा आधारित असतात आणि आधारित असायला काहीच हरकत नाही. कारण माझ्या मते जगातलं नाटक एकच आहे. जगातील नाटकाची भाषा एकच आहे. सध्याची मोठी समस्या काय तर सीसीटीव्ही मुळे सगळं सोपं झालेलं आहे. त्यामुळे बहुतेक सारी नाटकं काळात मागे न्यावी लागतात. त्यानंतर नक्की कोणत्या प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलतोय, हे दाखवणं चॅलेंजिंग असतं. दुसरं म्हणजे खरेपणा… आपण थिएट्रिकल, लिबर्टी घेतोच पण शक्य तितकं ते खरं असावं. मेलोड्रामा मध्ये तुम्ही भरल्या मापट्यावर थोडसं अधिक करता तसंच सस्पेन्स थ्रिलर मध्ये पकडायला थोडेसे हिस्टरीओनिक्स वापरायला लागतात.

 एरवी साध्या वास्तववादी नाटकांमध्ये आपण कदाचित वापरणार नाही. समोरच्याला तुम्हाला उत्कंठावर्दी नाटकात गुंतवून ठेवायचं असेल तर थोडं जास्त करावा लागतं तरच त्याला गंमत येते. आणि तो त्याच्यात गुंतायला लागतो. पूर्वी एवढी पटापटा थ्रिलर्स येत नव्हती पण आता ओटीटी मुळे ते शक्य झालंय. त्यामुळे ते आपल्याला अधिक चांगलं करायलाच लागतं. असे अनेक चॅलेंजेस आता वाढायला लागले आहेत… आणि सोबतच तुमचं जे कथानक आहे त्यात कुठलाही लूपहोल राहू नये याची खूप काळजी घ्यावी लागते. सगळ्यात महत्वाचं आव्हान असतं, ते म्हणजे कायदे बदलतात… म्हणजे कायद्यातील 302 कलम काय सांगत, तसंच 378 कलम काय सांगत, या सगळ्यांची काळजी घ्यावी लागते असे असंख्य मजेदार चॅलेंजेस असतात ”

नाटकातील कलाकारांच्या निवडीमध्ये लेखक म्हणून तुझादेखील सहभाग होता का असे नीरजला विचारले असता नीरज म्हणाला, “ नाही, खरंतर असं असत नाही. नाटकामध्ये कोणते कलाकार असावेत याचा पूर्ण निर्णय हा दिग्दर्शकाचा आणि निर्मात्यांचा असतो. परंतु या नाटकांमध्ये शर्वरीने काम करावे अशी माझी इच्छा होती. माझं एक हिडन कॅमेरा या नावाचं एक सस्पेंस थ्रिलर ऑडिओबुक आहे. शर्वरीने ते वाचलं होतं म्हणूनच माझी अशी इच्छा होती की या नाटकातलं मालती हे पात्र शर्वरीने करावं. अर्थात बाकीचे कॅरेक्टर मी सुचवले नव्हते पण जेव्हा मला कळलं यामध्ये सौरभ गोखले आहे, संदेश जाधव आहे तेव्हा मला निश्चितच आनंद झाला.”

सध्या नाटकाच्या निर्मितीखर्चाचा विचार करता नाटकामध्ये कमीत कमी दोन पात्र किंवा फार तर चार ते पाच पात्र अशी मर्यादित कलाकारांची संख्या असते. परंतु या नाटकामध्ये मात्र अशी कुठलीही मर्यादा विचारात न घेता, कथेच्या गरजेला अनुसरुन तब्बल नऊ पात्रांची निवड करण्यात आली आहे. या सर्व पात्रांच्या निवडीचा निकष काय याबद्दल विजय केंकरे सांगतात. “ या नाटकामध्ये मेगास्टार असं कोणी नाही. त्या भूमिकेला जी पटकन योग्य वाटली ती माणसं मी घेतली. याचं कारण असं की हे निश्चित रहस्य प्रधान नाटक आहे पण ते एका विशिष्ट कुटुंबाविषयी आहे. ती माणसे त्या प्रकारची वाटणे गरजेचे आहे. त्यानुसार त्यांची निवड झाली.”

अशाप्रकारे या रहस्य प्रधान नाटकाचा आज शुभारंभ होतोय. आपण लेखकाच्या आणि दिग्दर्शकाच्या चष्म्यातून त्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु हे रहस्यप्रधान नाटक प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात कितपत यशस्वी ठरते हे काळच ठरवेल.


हे ही वाचा – ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी नाव बदललं आणि नशीब घडवलं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -