तुमचे नेतृत्व अनुकरणीय…मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर उर्मिला मातोंडकरांची प्रतिक्रिया

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली आहे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार यांनी बंड केल्यामुळे राज्यात गेल्या अनेक दिवसापासून राजकीय पेच निर्माण झाली होती. महाविकास आघाडी सरकारकडे पुरेसं पाठबळ नसल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा जाहीर केला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते सेलिब्रेशन करत आहेत. या सर्व प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारही आपलं मत मांडत आहेत.

याचं संदर्भात आता अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर ट्वीट केली आहे. उर्मिला मातोंडकर नेहमीच सामाजिक आणि राजकीय यांसारख्या विविध मुद्यांवर आपलं मत मांडत असतात. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, “धन्यवाद उद्धव ठाकरेजी. तुमच्या नेतृत्वामुळे आपलं राज्य कोरोनासारख्या कठीण काळातही जातीयवाद आणि द्वेषापासून दूर राहिले. तुमचे नेतृत्व अनुकरणीय, पूराग्रहरहित , धाडसी, प्रतिक्रियात्मक, पारदर्शी , संवादप्रिय होते. जय महाराष्ट्र !”

दरम्यान महाविकास आघाडीमधील ४८ आमदारांनी बंड केल्यानंतर सरकार अल्पमतात आले, त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते.या बहुमत चाचणीला शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. रात्री नऊच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळली. त्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाइव्ह येऊन राजीनामा जाहीर केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला. मात्र महाविकास आघाडीमधील ४८ आमदारांनी बंड केल्यानंतर सरकार अल्पमतात आले, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला.

 


हेही वाचा :Karma! जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं…आरोह वेलणकरची पोस्ट चर्चेत