घरमनोरंजनट्रान्सजेंडर म्हणजे वेश्या व्यवसाय करणारे ही संकल्पना बदलायची आहे!

ट्रान्सजेंडर म्हणजे वेश्या व्यवसाय करणारे ही संकल्पना बदलायची आहे!

Subscribe

झी युवा डान्सिंग क्वीनच्या निमित्ताने एक नाव घराघरात पोहचले. हे नाव म्हणजे ‘गंगा’. तिचं खरं नाव प्रणीत हाटे आहे. खरतर गंगाही एक ट्रान्सजेंडर आहे. डान्सिंग क्वीनच्या निमित्ताने जरी गंगा प्रेक्षकांनापर्यंत पोहचली असली तरी तीचा प्रणीत ते गंगा हा प्रवास खडतर होता. गंगाला आज या मंचापर्यंत पोहचण्यासाठी अनेक अव्हानांना तोंड द्यावे लागले. अनेक अपमान सहन करावे लागले.

हाटे कुटुंबात पहिला मुलगा जन्माला आला. संपूर्ण हाटे कुंटूंबाला आनंद झाला. माझ्या आई- वडिलांनी मोठ्या आनंदात माझं नाव प्रणीत असं ठेवलं. मी जन्माला मुलगा म्हणून आले पण माझ्यात आत्मा एका मुलीचा होता. पण माझ्यात आत एक मुलगी दडलीये हे मला कळायला फार उशीर लागला. खरतर गंगा आणि प्रणीत या दोन टोकं असलेल्या व्यक्ती आहे. प्रणीत हा अतिशय लाजरा, शांत, कधीच कोणात मिसळत नव्हता. मुळात माझ्यात तो आत्मविश्वासच नव्हता. याला कारणीभूत ठरला तो माझ्या अजूबाजूला असलेला समाज.

- Advertisement -

प्रणीत असताना अनेक वाईट बोलणी मी खाल्ली पण कधीच कोणाला उलट उत्तर दिले नाही. मी खूप घाबरायचे याचाच फायदा सगळ्यांनी घेतला. खूप लोकांनी मला छळलं, येता जाता वाईट कमेंट्स ऐकण्याची तर मला सवयच झाली होती. शाळेत असताना देखील अनेकदा मला शारीरीक छेडछाडीला सामोरं जावं लागलं. शाळेत मागच्या बेंचवर बसले की मुलं ठरवायची आज प्रणीत कोणाचा, मग ते माझ्या प्रायव्हेट पार्टला टच करायचे. पण तो पर्यंत मला हे नेमकं का घडतयं हेच समजलं नव्हतं. मला फक्त एकच गोष्ट कळत होती की माझ्या आत एक मुलगी आहे. मला कायम एक सुंदर मुलगी व्हायचं होतं. माझ्या घराजवळ कधी कोणाचं लग्न असेल तर त्या लग्नातील नवरी कडे मी एकटक बघत बसायचे. तीच्या हातावरची मेंदी, तीचं चालणं, नटणं या सगळ्याकडे मी आकर्षित व्हायचे. पण हे उघडपणे कधीच कोणालाच सांगू शकत नव्हते. कारण जर मी लोकांना सांगितले तर ते कदाचीत मला आणखी छळतील, त्रास देतील ही एकच गोष्ट मनात यायची. कारण मला एलजीबीटी, गे संकल्पनाच मला माहिती नव्हती.

- Advertisement -

पण एक दिवस या सगळ्याला मी कंटाळले आणि माझंच मला समाजलं  नाही की माझ्या अचानक कुठून बळ आलं. मी त्या दिवशी मला त्रास द्यायला आलेल्या मुलाच्या सणसणीत कानाखाली वाजवली. सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटलं पण त्या दिवशी खऱ्या अर्थाने मला माझ्यातली गंगा सापडली होती. आता माझी खरी लढाई सुरू झाली होती.

२०१५ ला मी एका नाटकात काम केलं होतं. त्या नाटकात मी ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. त्यात माझं नाव गंगा होता. ते नाटक खूप गाजलं, माझी भूमीका खूप गाजली. त्यामुळे मी ठरवलं आज पासून मी प्रणीत नाही तर गंगा म्हणून जगणार होते. या दरम्यान व्यक्ती माझ्या आयुष्यात आला त्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्याच नाव होतं मोहित. त्याने मला हे सगळं नीट समजावलं. त्यानंतर मी स्वत:ला ट्रान्सजेंडर म्हणून स्वीकारलं.

मी स्वत:ला स्वीकारलं होतं पण माझ्या घरचे आणि समाजाने मला स्विकारणं आवश्यक होतं. कारण भारतात एखादी मुलगी मुलासारखी वागली तर आपण तीचं कौतूक करतो की ती किती स्ट्रॉंग आहे. पण एखादा मुलगा मुली सारखा वागला तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलतो. असाच एक प्रसंग मला आजही आठवतो, एख दिवशी मी मेंदी काढून घरी आले माझ्या काकांनी ते बघितलं त्याने माझा हात घेतला आणि माझ्या तोंडाला फासला. मला खूप वाईट वाटलं. पण मला माहित होतं की आपला समाज अजून एवढा शिकलेलाच नाहीये. पण या सगळ्यात माझ्या आईने मला खूप मदत केली. कारण मला जन्म देणाऱ्या आईने माझ्या आतल्या गंगाला आधीच ओळखलं होतं आणि स्विकारलं देखील होतं.

कारण आज ट्रान्सजेंडर म्हटलं की ट्रेनमध्ये फिरणारे किंवा वेश्या व्यवसाय करणारे एवढंच सगळ्यांना माहित आहे. पण मला स्वत:च अस्वित्व तयार करायचं होतं आणि मी ते केलं. आज मी झी युवावर डान्सिंग क्वीनचं निवेदन करत आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

आज मी या सगळ्याच्या खूप पुढे गेले आहे. आज मागे वळून बघितलं की काही कमेंटस अजूनही आठवतात, एकदा, ‘तू फक्त साडी घालण्याच्या लायकीचा आहे अशा कमेंट करण्यात आली होती’ पण आज मला त्या व्यक्तीला उत्तर द्यावसं वाटतं की, मी साडी नेसण्यास तयार आहे. माझ्यात तेवढी हिंमत आहे, हीच साडी नेसून मी आज इथपर्यंत पोहचले आहे, आणि तुम्ही अजून तीथेच आहात.

आज महिला दिना निमित्त मी सगळ्या ट्रान्सजेंडर यांना एकच सांगेन, आपल्या आतला आवाज आधी ओळखायला शिका. आधी स्वत:ला स्विकारा आणि घरच्यांशी शांतपणे याविषयी बोला. कदाचीत तुमच्या घरचे तुम्हाला लगेच स्विकारणार नाही पण त्यांना थोडा वेळ द्या. तुम्हाला गरज असेल तर माझ्याशी संपर्क साधा. कारण ट्रान्सजेंडर म्हणजे वेश्या व्यवसाय करणारे ही संकल्पना आता आपल्याला बदलायची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -