रेल्वेसाठी ऐतिहासिक आणि आव्हानात्मक ठरले २०२०

2020 has become a historic and challenging of the railways
रेल्वेसाठी ऐतिहासिक आणि आव्हानात्मक ठरले २०२०

भारतीय रेल्वेसाठी २०२० हे वर्ष मोठे आव्हानाचे होते. कोरोनामुळे रेल्वे प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वेचे कोट्यवधींचे नुकसान झाले. तसेच टाळेबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये, म्हणून रेल्वेची मालवाहतूक कोरोना काळात रात्रंदिवस सुरू होती. कोरोना रुग्णाच्या उपचारांसाठी आयसोलेशन कोचची निर्मितीसुध्दा भारतीय रेल्वेने केली होती. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातून किसान रेल धावल्याने राज्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच कधीही न थांबणारी मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय लोकल सेवा कोरोना संसर्गामुळे ठप्प झाली होती. मात्र कोरोनाशी दोन हात करत आपले कर्तव्य बजावत असताना अनेक रेल्वे कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे २०२० हे वर्ष भारतीय रेल्वेसाठी ऐतिहासिक आणि आव्हानात्मक ठरले आहे.

लोकल संबंधित सर्वात मोठा निर्णय

देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांची संख्या असलेल्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये कोरोना रोखण्यासाठी मुंबईची लोकल २२ मार्चपासून बंद करण्यात आली होती. मुंबईची लोकल १९९३ मध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट असो, २००५ मध्ये २६ जुलै रोजी आलेला पूर असो, अथवा २००६ मध्य रेल्वेत घडलेले बॉम्बस्फोट असो, कधीच थांबलेली नाही. मात्र कोरोना संसर्गामुळे स्तब्ध झाली. कोरोना पसरु नये, म्हणून घेण्यात आलेला हा सर्वात मोठा निर्णय होता.

३२७६ धावल्या श्रमिक ट्रेन

लॉकडाउनमुळे विविध भागात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्यासाठी भारतीय रेल्वेतर्फे १ मेपासून देशभरात श्रमिक ट्रेन चालविण्यात आल्या होत्या. भारतीय रेल्वेने देशातल्या विविध राज्यांत आतापर्यंत ३ हजार २६७ विशेष श्रमिक ट्रेन चालविण्यात आलेल्या आहे. या श्रमिक स्पेशल गाड्यांमधून तब्बल ३५.५५ लाखांपेक्षा जास्त श्रमिकांना आपापल्या राज्यात सुखरुप पोहोचवले आहे. एकट्या महाराष्ट्रातून ५९० श्रमिक ट्रेन चालविण्यात आलेल्या होत्या.
लॉकडाऊन व अनलॉक कालावधीत मध्य रेल्वेने ७.७१ लाख वॅगन्समधून ४०.८५ दशलक्ष टन मालवाहतूक व १.७६ लाख टन पार्सल भार लोडींग केले आहे.

४०.८५ दशलक्ष टन मालवाहतूक

कोरोनामुळे रेल्वे वाहतुकीचेे तीनतेरा वाजवले असताना लॉकडाउन काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून रेल्वे गुड्स आणि पार्सल रेल्वे गाड्या रेल्वे रुळावर धावत होत्या.२३ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२० या कालावधीत मध्य रेल्वेने ७.७१ लाख वॅगनच्या माध्यमातून ४०.८५ दशलक्ष टन मालवाहतुकीची यशस्वीपणे वाहतूक केली आहे.

१.७६ लाख टन पार्सल वाहतूक

मध्य रेल्वेने या संकटकाळात १.७६ लाख टन पार्सल वाहतूक केली आहे, ज्यात औषधे आणि फार्मा उत्पादने, ई-कॉमर्स वस्तू, मेल आणि इतर हार्ड पार्सल, दूध इत्यादी आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. लॉकडाऊनपासून चालत असलेल्या ७०३ टाइमटेबल पार्सल गाड्यांमधून १.०४ लाख टन लोडींग व वाहतूक झाली आहे तसेच विशेष गाड्यांच्या पार्सल व्हॅनमधून ६८,५३३ टन मालवाहतूक तसेच ३,४४९ टन दूध रेल्वे दुधाच्या टँकर्समधून वाहतूक करण्यात आली.

प्रथमचं किसान रेल

भारतीय रेल्वेने बळीराजाच्या शेती मालाच्या वाहतुकीसाठी प्रथमच 7 ऑगस्टपासून किसान रेल्वे सुरू केली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिली किसान रेल ही देवळाली ते मुझफ्फरपूर महाराष्ट्रातून धावली होती. गेल्या तीन महिन्यांत शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद किसान रेलला मिळत आहे. त्यामुळेचे आज या किसान रेलच्या शंभर फेर्‍या पूर्ण होत आहेत. आठवड्यातून तीन वेळा शेतकर्‍यांच्या माल वाहतुकीसाठी किसान रेल उपलब्ध असल्याने शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे.त्यामुळे किसान रेल ही महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी मोठा आधार आहे.

२५०० डब्यांचे आयसोलेशन कक्ष

देशावर आलेल्या संकटात नेहमीच भारतीय रेल्वे आपले महत्वपूर्ण योगदान देत आली आहे. २०२० मध्ये आलेल्या जागतिक आरोग्य संकटकाळात भारतीय रेल्वेने आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. कोरोना काळात अपुर्‍या पडत असलेल्या वैद्यकीय सुविधा बघता कोरोना रुग्णांसाठी भारतीय रेल्वेने एकूण २ हजार ५०० डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात केले होते. यातून ४० हजार खाटा तयार करण्यात आलेेल्या होत्या. प्रत्येक दिवसाला ३७५ डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात करण्याचे काम रेल्वेचे कर्मचारी करीत होते. त्यामुळे संपूर्ण विश्वात कोरोना काळात सर्वाधिक आयसोलेशन कोचची निर्मिती करण्यात भारतीय रेल्वे एकमेव ठरली आहे.

मध्य रेल्वेने उभे केले 33 पुल

लॉकडाऊन दरम्यान रेल्वे प्रवासी वाहतूक बंद असताना याकालावधीचा उपयोग करून भारतीय रेल्वेने पुलांच्या पायाभूत सुविधांची महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली. मध्य रेल्वेने एकट्या महाराष्ट्रात ३३ ठिकाणी पुल बांधले. मुंबई विभागात ६, भुसावळ विभागात ४, नागपूर विभागात ३, पुणे विभागात ९ आणि सोलापूर विभागात ११ कामे झाली. अशी ३३ ठिकाणी पुलांची बांधणी केली आहे. तर पाण्याचा निचरा होण्याच्या क्षमता वाढीसाठी, जलवाहिनी वाढविण्यासह पुलांच्या पुनर्बांधणीचीही कामे लॉकडाऊन काळात करण्यात आली.

रेल्वेचे रुग्णालय अव्वल

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी विविध आघाड्यांवर काम करताना पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालय कोरोना बाधीतांसाठी राखीव ठेवण्यात आले. गेल्या आठ महिन्यात जगजीवन राम रुग्णालयाने भारतीय रेल्वेच्या इतर रुग्णालयांपेक्षा उत्कृष्ट कामगिरी करुन अव्वल स्थान पटकावले आहे. येथून कोरोनावर मात करुन तब्बल २ हजार ५७० रेल्वे कर्मचारी घरी परतले आहेत. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के असून रेल्वेच्या सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये हे सर्वाधिक आहे.

२०७ रेल्वे कर्मचार्‍यांचा मृत्यू

लॉकडाउन काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालगाड्या रेल्वे रुळावर धावत होत्या. रेल्वे कर्मचारी कोरोनाशी लढण्यात आपले पूर्ण योगदान देत असल्याने शेकडो कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली. त्यात २०७ रेल्वे कर्मचार्‍यांच्या मृत्यू झाला.

कर्करोगाच्या मदतीसाठी रेल्वे

लॉकडाऊन काळात गावखेड्यात असलेल्या कर्करोगाच्या रुग्णांची औषधे संपली होती. त्यामुळे औषधांची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी ट्विटरवरून रेल्वेकडे मदत मागितली होती. या संकटकाळात मध्य रेल्वेने आपल्या मालवाहतुकीच्या सहाय्याने अशा रुग्णांना औषधांचा पुरवठा घरपोच करून आतापर्यंत आठ कर्करोगाच्या रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.

निन्जा यूएव्ही ड्रोन

रेल्वे अपघात, रेल्वे सुरक्षा, रेल्वे मार्गावरील मालमत्ता यावर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कोरोना काळात दोन ‘निन्जा यूएव्ही’ हे हायटेक ड्रोन खरेदी केले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षेत वाढ झाली असून मनुष्यबळाची बचत होणार आहे. अलीकडेच रेल्वे यार्डामध्ये रेल्वेच्या कोच/वॅगनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन चोरट्यांना या ड्रोनच्या माध्यमातून वाडीबंदर यार्ड आणि कळंबोली येथे पकडण्यात आले