पराभूत समकाळाचे आत्मवृत्त !

संजय चौधरी यांचा ‘कविताच... माझी कबर’ हा कविता संग्रह वाचत असताना कवीचा आंतरिक जीवनप्रवास अधोरेखित करावासा वाटतोच; पण त्यासोबत या कवितेचे सार्वकालिक आवाहनही ठळकपणे नोंदवावेसे वाटते. ही कविता एका अपरिहार्य पडझडीची दीर्घ शोकांत कहाणी आहे. ही पडझड सार्वत्रिक आहे आणि सामाजिक मूल्यसारणीचा हा शोकांत आहे. ‘कविताच माझी कबर’ या संग्रहात एकूण शंभर कविता आहेत.

‘कविता हे कवीचे आत्मचरित्र असते’ असे दिलीप पुरुषोत्तम चित्रे म्हणत असत. कवी कविता लिहीत असतो म्हणजे स्वतःचीच मांडणी करत असतो. कवितेतील प्रत्येक शब्द त्याच्या आत्म्याचा शब्द असतो, शब्दाशब्दात आणि दोन शब्दातील मोकळ्या जागेतदेखील कवी उभा असतो. कवीचे हे अस्तित्व दृश्य वास्तवातले असत नाही. हे आत्मचरित्र लौकिक जीवनचरित्र असत नाही. कवीचे जे अंतरमन आहे, त्यातील कोलाहल, आनंद आणि दु:ख, व्याधी आणि विकृतीही कवितेच्या रुपात व्यक्त होत असतात. जाणिवा आणि नेणिवा यांचा झगडा कविता मांडत जात असते. कविता व्यक्त होत असताना ती कवीचा संबंध भूतकाळ, इच्छा, आकांक्षा, स्वप्ने आणि भीती अशा प्रतिमेत चिन्हांकित करते की तिला अनेकार्थ प्राप्त होत जातात. कवीचे आत्मचरित्र त्याचे एकट्याचे राहात नाही ते समकालीनांचे, उत्तराकालीनांचेही आत्मचरित्र होऊन जाते. कवितेतून व्यक्त काळ, भूप्रदेश आणि संवेदनविश्व आपल्या मर्यादा ओलांडून सार्वत्रिक होत जातात.

संजय चौधरी यांचा ‘कविताच… माझी कबर’ हा कविता संग्रह वाचत असताना कवीचा आंतरिक जीवनप्रवास अधोरेखित करावासा वाटतोच; पण त्यासोबत या कवितेचे सार्वकालिक आवाहनही ठळकपणे नोंदवावेसे वाटते. ही कविता एका अपरिहार्य पडझडीची दीर्घ शोकांत कहाणी आहे. ही पडझड सार्वत्रिक आहे आणि सामाजिक मूल्यसारणीचा हा शोकांत आहे. ‘कविताच माझी कबर’ या संग्रहात एकूण शंभर कविता आहेत. त्यातील ‘भिक्खुची कविता’ या विभागातील आठ आणि ‘पसायदान’ मागणार्‍या ‘दोन’ कविता सोडल्या तर उर्वरित नव्वद कवितांचा ‘टोन’ हा एकच आहे. तुटलेपण, एकाकीपण, हताशा, पराभूताचे वाट्याला आलेले जीणे, अविश्वास आणि संभ्रम यांच्या बीजसूत्रात या कवितांचा उगम आहे.

ही अस्वस्थ करणारी बीजसूत्रे आली कुठून? वसंत आबाजी डहाके यांनी म्हटल्याप्रमाणे ‘स्थलांतर आणि कायांतर’ यात या कवितांचे जननस्थळ आहे. ही कविता कुरूप दु:खाची अश्रुंनी ओथंबलेली उदास कविता आहे. पहिल्या ओळीपासून ही उदासी वाचकांना कवेत घेते आणि पुढे या निराशेचीच राखाडी वादळे भेटत राहतात. स्वतःला उद्ध्वस्त करत सुटलेल्या सगळ्या किनार्‍यांशी आपला परिचय होत राहतो. मदतीची हाक मारावी अशी माणसे, नाती, घरे, गावे, आप्त एकेक करत दूर, खूप दूर जात आहेत. किंबहुना, आपणही आपल्या देहापासून विलग होत जात आहोत याचा विषण्ण अनुभव संजय चौधरी यांची कविता देते. मेंदूची शकले शकले होतील अशा संभ्रमित जगात आपण जगत आहोत आणि तरी जिवंत आहोत, हे मोठे विस्मयकारक आहे याचा बोधही या कवितांमुळे होतो.

सुभाष अवचट यांनी रेखाटलेल्या मुखपृष्ठापासून आयुष्याच्या अंताचे आणि उद्ध्वस्तपणाचे संवेदनविश्व खुले होते. ‘हरवलेल्या माणसांच्या कविता’, ‘प्रत्येकाच्या छातीत दु:खाचंच बाड’, ‘जमत नाही माझे माझ्याशीच’, ‘आम्ही सारेजण एकाच अनाथाश्रमात’, ‘आतल्या तगमगीची कविता’, ‘उडत चाललाय विश्वास श्वासघेण्यावरचा’, ‘माझे मुके दिवस मला परत कर’, ‘फक्त बातमी गेली वार्‍यावर’ ही ‘कबर’मधील उपशीर्षके पाहिली तरी सर्वत्र साचून राहिलेले मळभ कसे गडद काळे आहे याची प्रचिती येते.

‘घर म्हणजे…/ ज्यातलं पाणी पार आटून गेलंय / असं कोरडंखट्ट तळं’ (१४) किंवा ‘आग लागलेल्या जंगलासारखं आहे हे शहर (७) किंवा ‘जखमा ओल्या असताना / होत नाही आपल्या माणसांची भेट/ इतकं पडत चाललंय अंतर दुधाच्या नात्यातदेखील’ (१५) अशा काही संदर्भांनी माणसाचे एकाकीपण संजय चौधरी यांनी व्यक्त केले आहे. घराचा आदिबंध चौधरी यांनी बेमालूम पलटवला आहे. घर आपली सुरक्षा, आपुलकी, ओल आणि ओढ गमावून बसले आहे याचे दु:ख त्यांनी सूक्ष्मपणे टिपले आहे.

बाजार हा अवघ्या अस्तित्वाला कसा व्यापून उरला आहे त्यामुळे जपावं असं मूल्य कुठेच कसं शिल्लक नाही हेही ते सांगतात, ‘सगळ्यांचीच घरं हळूहळू/ येत आहेत बाजारात/ प्रत्येकाच्याच कमरेला लटकतोय/ एक अदृश्य प्राईस टॅग’ (२७), ‘जो तो वापरून घेण्याच्या प्रयत्नात / अवघ्या जगण्याचंच झालंय/ बाजारात रुपांतर’ (३४) अशी वर्तमानाची मीमांसा ‘कबर’मधील कविता करते.

गाव सुटलेले हात नोकरीच्या शोधात शहरात तर आले; पण पुन्हा परतणे विसरून गेले. गाव, तेथील माणसे यांच्याही आठवणी पुसट होत गेल्या. बालपणीचे खेळ, बकर्‍यांमागची भटकंती, कडब्याच्या पेंढ्यांचे ढीग, आईच्या हाताच्या खरपूस भाकर्‍या अशा गोष्टी आता केवळ स्वप्नात येतात. शहराने, बाजाराने माणसाचे निर्जीव यंत्र बनवून ठेवले आहे. अशा आगापिछा गमावलेल्या माणसाचे आत्मचरित्र ही कविता सांगते.

स्मशान, आजारपण, व्याधी, हॉस्पिटल, रक्त, राख यांचे उल्लेख कवितांमध्ये जागोजागी येतात. आयसीयू ते मानसोपचार असा प्रवास ती घडवते. संतुलन सुटलेली निरर्थक बडबड किंवा भयातून निपजलेली चुप्पी या बिंदूवर वाचकाला घेऊन जाते. सरंजामी भांडवली अर्थव्यवस्थेची अपत्ये किती ओंगळ असतात याचा सज्जड पुरावा म्हणून ‘कविताच माझी कबर’चा उल्लेख करावा लागेल. ‘जन्माला येताना प्रेतच यावं जन्माला, तसं हे जगणं.’ (४८), ‘मी झोपतो… शेवटचंच झोपल्यासारखं’ (८५), ‘खोदून पाहाल माझी कोणतीही कविता तर / आत मीच निजलेला/ कविताच… माझी कबर.’(१४६) या ओळी याची साक्ष नोंदवतात.

संजय चौधरी यांची ही कविता मुक्तछंदात आणि प्रसंगी गद्यात व्यक्त झाली आहे. नीरसपणा आणि आयुष्यातील गेयतेचा झालेला लोप यामुळे प्रखरपणे लक्षात येतो. २००५ साली त्यांचा ‘माझं इवलं हस्ताक्षर’ हा संग्रह प्रकाशित झाला होता, त्यानंतर तेरा चौदा वर्षांनी ‘कविताच माझी कबर’ हा दुसरा संग्रह आला. त्यामुळेच पराभूत समकाळाचे आत्मवृत्त कथन करणारा हा संग्रह संजय चौधरी यांच्या कवितेच्या विकासाचा पुढचा टप्पा म्हणूनही महत्त्वाचा आहे.

-(कविताच… माझी कबर/ संजय चौधरी/ ग्रंथाली, मुंबई / पहिली आवृत्ती – मे २०१८ / पृष्ट्ये १४८, मूल्य १५० रुपये)
-[प्रा. विद्या सुर्वे बोरसे, मराठी विभागप्रमुख, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक. संपर्क ९४०५५४७००२ ]
.