आपल्यातला पॅरासाईट शोधणारा सिनेमा

कोरियन दिग्दर्शक बाँग जोनहून दिग्दर्शित पॅरासाईट हे त्या सिनेमाचं नाव. ब्लॅक कॉमेडी प्रकारात मोडणारा थोडा व्यावसायिक आणि अधिक सामाजिक असा हा सिनेमा आहे. हा त्या काही मोजक्या चित्रपटांपैकी आहे ज्यांना येणार्‍या 7 पिढ्यादेखील विसरू शकणार नाही, सिनेमा किमान 3 वेळा पाहिल्यानंतरही मला आपण अजून काही तरी मिस केलं नाही ना? असा सवाल पडतोय. प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शाळेत नवीन आलेल्या मुलांना बाराखडी शिकवावी आणि तीच बाराखडी पुढे साहित्य, संस्कार अन् अनुभव म्हणून तर कधी अभ्यास म्हणून मुलांना आयुष्यभर लक्षात राहावी असा हा सिनेमा आहे.

कला कुठलीही असो, आपल्या सभोवताली असलेल्या समस्यांवर भाष्य करणारी असेल तर तिच्याबद्दलच आकर्षण आपसूकच वाढतं. त्यातल्या त्यात जर कलाकृती अतिउत्तम असेल तर प्रतिसाददेखील तसाच मिळतो, सिनेमा ही अशीच एक प्रभावी कला आहे. याच कलेतील मास्टरपीस म्हणून ओळखता येईल असा एक सिनेमा मागच्या वर्षी प्रदर्शित झाला. लोकांनी त्याला खूप जास्त पसंद केले, कांस फेस्टिव्हलमध्ये तर सिनेमा संपल्यानंतर तेथील प्रेक्षकांनी 8 मिनिटे उभे राहून त्याचं कौतुक केलं असं ऐकण्यात आहे. त्या सिनेमाला शेकडो पुरस्कार मिळालेत आणि 92 व्या अकॅडमी अवॉर्डमध्ये त्या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमासह 4 ऑस्कर पुरस्कार मिळाले. कोरियन दिग्दर्शक बाँग जोनहून दिग्दर्शित पॅरासाईट हे त्या सिनेमाचं नाव.

ब्लॅक कॉमेडी प्रकारात मोडणारा थोडा व्यावसायिक आणि अधिक सामाजिक असा हा सिनेमा आहे. हा त्या काही मोजक्या चित्रपटांपैकी आहे ज्यांना येणार्‍या 7 पिढ्यादेखील विसरू शकणार नाही, सिनेमा किमान 3 वेळा पाहिल्यानंतरही मला आपण अजून काही तरी मिस केलं नाही ना? असा सवाल पडतोय. प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शाळेत नवीन आलेल्या मुलांना बाराखडी शिकवावी आणि तीच बाराखडी पुढे साहित्य, संस्कार अन् अनुभव म्हणून तर कधी अभ्यास म्हणून मुलांना आयुष्यभर लक्षात राहावी असा हा सिनेमा आहे. प्रत्येक बारीक गोष्ट हेरून तिला अतिशय साध्या पद्धतीने दर्शकांसमोर मांडण्याचं जे कौशल्य दिग्दर्शकाला आहे ते तर निव्वळ अप्रतिम, पटकथा असो किंवा कॅमेरा कुठेही थोडी फारदेखील कुचराई केलेली दिसत नाही. म्हणूनच पॅरासाईट हा सामाजिक विषयावर भाष्य करणारा एक उत्तम मनोरंजक सिनेमा आहे.

सिनेमाची कथा मी जशास तशी इथे मांडली तरी तो सिनेमा पाहताना तुम्हाला बोअर होणार नाही. कारण कथा अगदीच सोपी आणि साधी आहे, पण दिसते तितकी सरळ नाही. कोरियातील एका शहरात समाय बेसमेंटमध्ये राहणार्‍या किम आणि त्याच शहरातील अती श्रीमंत अशा पार्क कुटुंबाची ही कहाणी, दोन्ही कुटुंब परस्परांची प्रतिमाच जणू, आई-वडील, मुलगा-मुलगी. एकीकडे टोकाची श्रीमंती आणि दुसरीकडे टोकाच्या आशा, ज्यावर किम कुटुंब आधारलेलं आहे. पैसे कमावण्यासाठी नोकरीच्या शोधात असणार्‍या किम कुटुंबाला एक संधी मिळते, किमच्या मुलाचा मित्र एक लकी दगड आणि मुलाला शिकवणीच्या जॉबची ऑफर देतो. किम कुटुंबात एक जण नोकरीला लागतो पण, बाकी बेरोजगार असतात.

तेव्हा प्लॅन बनतो प्रत्येक किम कुटुंबातील सदस्याला पार्क कुटुंबात आणण्याचा. ज्यावेळी माणसाचं पोट रिकामं असतं त्यावेळी मानवी मूल्य, सिद्धांत सारेच गौण ठरतात. अगदी तसंच किम कुटुंबात आपले मुलं, मुली नोकरी मिळविण्यासाठी फ्रॉड करत आहेत, हे पाहिल्यानंतर ही त्यांचे आईवडील त्यांच कौतुक करत असतात, कारण त्या नोकरीमुळेच त्यांच पोट भरणार असते. आपल्या घरात काम करणारे सगळे नोकर हे एकच कुटुंब आहे, यापासून मात्र मिस्टर पार्क हे अनभिज्ञ आहेत, आता ही दोन टोकांची कुटुंब समोरासमोर भिडतात ही सिनेमाची कथा. पण मग यात वेगळं काय ? खरे पॅरासाईट्स कोण ? यासाठी सिनेमा पाहावा लागेल. आणि या कथेसोबतच सिनेमात अजून एक ट्विस्ट आहे जो सिनेमा पाहिल्यावरच लक्षात येईल.

दिग्दर्शक बोंग जोन हून याने ज्याप्रकारे पटकथा लिहिली आहे, त्यामुळे तुमची क्षणभरही नजर कुठे फिरकत नाही. संपूर्ण चित्रपटभर आपल्याला खिळवून ठेवण्याच काम दिग्दर्शक करतो. हा सिनेमा किमान 2 वेळा तरी पाहावा लागतो तेव्हा कुठे आपल्याला तो थोडा फार लक्षात राहतो. आहे रे वर्ग विरुद्ध नाही रे वर्ग हा सामाजिक लढा दाखवताना कुठेही ओव्हर होणार नाही आणि मनोरंजन या मुख्य हेतुला धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. मिस्टर पार्क अतिश्रीमंत तर आहेच पण गरिबांनी त्यांची सीमारेषा ओलांडू नये असंही त्यांचं मत आहे. गरिबांच्या अंगाचा त्यांना वास येतो, पण गरिबांच्या मुलींची अंतर्वस्त्रे मात्र त्यांना कामुक करतात.

या कुटुंबाचं आलिशान घर आहे,गार्डन आहे, घरात कुत्री आहेत, पण देखरेखीसाठी फक्त एक हाऊसकीपर आणि एक ड्राइव्हर जो घरात नसतो. गरीबांची गर्दी नको म्हणून एवढ्या मोठ्या घरात ही मोजकीच लोकं दिसतात. दुसरीकडं काम मिळाल्याने आनंदी कुटुंबाला मात्र पार्क कुटुंब फारच प्रेमळ आणि दयावान वाटायला लागतं. मिस्टर किमला, पार्क एवढे श्रीमंत असूनही प्रेमळ आहे असं वाटतं तर मिसेस किमला ते श्रीमंत आहेत म्हणून प्रेमळ आहेत असं वाटतं. आता गरीब विरुद्ध श्रीमंत हा लढा सिनेमात पुढे गरीब विरुद्ध अति गरीब असं ही रूप घेतो, जे अतिशय वास्तवदर्शी पद्धतीने दिग्दर्शकाने मांडले आहे. जगभरात आजही हा लढा असाच सुरू आहे. लढणारा, मरणारा, सहन करणारा सगळे हेच सगळे गरीब लोक आहेत. ज्या मूठभर लोकांच्या हातात संपत्ती आहे ते केवळ याचा आनंद लुटताना दिसतात.

सिनेमात पायर्‍या एका कलाकाराची भूमिका करत आहेत, या पायर्‍या त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात वेगळं महत्व ठेवतात. समाय बेसमेंट राहणार्‍या किम कुटुंबासाठी सूर्य संपूर्ण पाहायला पायर्‍या लागतात, तर पार्क कुटुंबात याच पायर्‍या एका वेगळ्या कथानकाकडे घेऊन जातात. या दोन कुटुंबातील वैविध्य दाखविण्यासाठी दिग्दर्शकाने प्रतीकांचा वापर केलाय, एकीकडे रात्री पडणारा मुसळधार पाऊस किम कुटुंबाला रस्त्यावर आणतो तर दुसरीकडे तोच पाऊस पार्क कुटुंबाला सुखावणारा वाटतो. हीच या सिनेमाची विशेषत: आहे, जे दिग्दर्शकाला सांगायचंय तो ते प्रतीकांचा रूपाने का होईना, पण ते दाखवतो. किमची मुलगी मरत असताना स्वतच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची ऑर्डर देणारा मिस्टर पार्क दिग्दर्शकाने दाखवला आहेच, पण त्याचवेळी जखमी कीमच्या मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन जाणारी पार्कची मुलगी दाखवायलासुद्धा दिग्दर्शक मागे राहिला नाही हे विशेष. अजून एक सिन म्हणजे सिनेमात किमची मुलगी ,जी श्रीमंत कुटुंबात एकदम फिट बसते, श्रीमंतांशी कसं बोलायचं हे तिला माहिती असतं, शेवटी तिलाच आपला जीव गमवावा लागतो. आपल्याला फिटेस्ट कॅन सर्व्हाइव्ह असं सांगितलं जातं, पण गरीब श्रीमंतीच्या या लढ्यात त्या फिटेस्टला सुद्धा जागा नाही हे दिग्दर्शकाने उत्तम मांडलं आहे.

पॅरासाईट्स म्हणजे परावलंबी जे इतरांवर अवलंबून असतात, इतरांच शोषण करून आपलं जीवन जगतात. जे धोकादायक असतात ते पॅरासाईट्स. पार्क कुटुंबाच्या पैशांवर जगणारे त्यांचं मीठ खाणारे किम कुटुंब म्हणजे पॅरासाईट्स असं आपल्याला वाटतं, पण किम कुटुंबाचं शोषण करून, स्वतच्या गरजा भागविणारे पार्क कुटुंब कोण ? मुसळधार पावसानंतर शहर उध्वस्त झाले असताना आपल्या मुलाची बर्थ डे पार्टी साजरे करणारे, मरत असलेल्या मुलीकडे बघणार्‍या बापाला, मुलीला सोडून गाडी काढ सांगणारे , की अजून कोणी ? हे आपण ठरवायचं. प्रतिकांच्या रुपात जे जे दिग्दर्शकाला मांडता येतं होत ते ते सर्वकाही त्याने मांडले आहे. तेव्हा आपल्यातला पॅरासाईट ओळखण्यासाठी सिनेमा एकदा तरी पाहावा.

-अनिकेत म्हस्के