घरफिचर्सएका श्वासातलं गाणं...

एका श्वासातलं गाणं…

Subscribe

महंमद रफींनी जयकिशनची ती अट मान्य केली. चांगला कसून सराव केला आणि त्या गाण्याचा तो मुखडा एका श्वासात गायला. पण ह्या गाण्याच्या रेकॉडिर्ंंगनंतर रफी जयकिशनना म्हणाले, ‘असं गाणं तू माझ्याकडून आज गाऊन घेतलंस, पुन्हा असं गाणं गाऊन घेऊ नकोस, अशी दहा गाणी जर तू माझ्याकडून गाऊन घेतलीस तर अकराव्या गाण्याला मी जिवंत असणार नाही इतका ह्या गाण्यात तू माझा श्वास बंद करून ठेवला होतास.’

…तोपर्यंत गाण्यात ब्रेदलेस नावाचा श्वास कोंडून गाण्याचा प्रकार आला नव्हता. श्वास कोंडून काही जलतरणपटू पाण्यात पोहत असतात हे सगळ्यांना माहीत होतं, पण श्वास कोंडून कुणी गानपटू तीन फुल स्केप पेपर भरून गाणं गाऊ शकेल हे कुणाच्या गावी नव्हतं. गाण्यातली एखादी तान, एखादा आलाप ह्यापुरता श्वास रोखून धरण्याचं कसब गायकाकडे कालही होतं, आजही आहे, वर्षानुवर्षं होतं, वर्षानुवर्ष राहणार आहे. पण गीतलेखकाने सुरळी करून आणलेलं कुठलं तरी गद्यातलं लांबलचक गाणं गाताना गाणं गाण्यापेक्षा श्वास न घेण्याची सर्कस करून दाखवायची ह्याला त्या काळच्या संगीतात मान्यता नव्हती. अधेमधे अनुप जलोटांनी त्यांची ती भजनांची लाट आणताना गाण्यातल्या एखाद्या जागी श्वास लांबवून प्रेक्षकांतून सरसरून टाळ्या घेतल्याची उदाहरणं देता येतील, पण त्या गाण्यांचं ‘ब्रेदलेस’ असं बारसं करता येणार नाही.

पण ब्रम्हचारी सिनेमाच्या वेळेस जरा थोडी वेगळी गोष्ट घडली. शंकर-जयकिशननी ह्या गाण्याची चाल बांधली होती. खरं तर ती चाल पूर्णपणे जयकिशनची म्हणजे जयकिशन डाह्याभाई पांचालांच्या डोक्यातली होती. एखाद्या नाटक-सिनेमातली मध्यवर्ती भूमिका ज्याप्रमाणे एखादा लेखक एखाद्या ताकदीच्या कलाकाराला आपल्या नजरेसमोर ठेवून लिहितो त्याप्रमाणे जयकिशननी एका नायकाला नजरेसमोर ठेवून ‘ब्रम्हचारी’मधल्या एका गाण्याची चाल केली होती…आणि तो नायक दुसरातिसरा कुणी नव्हता तर ‘ब्रम्हचारी’चा नायक शम्मी कपूर होता. शम्मी कपूरची तोपर्यंत पडद्यावर धसमुसळ्या, रांगड्या गड्याची प्रतिमा निर्माण झाली होती. त्याच्यावर चित्रित झालेली गाणी बेसुमार चंचल, अवखळतेचा वेगवान आविष्कार असायची. त्याची पडद्यावरची नृत्य म्हणजे वार्‍यासारखी सुसाट असायची, त्याचा पदन्यास म्हणजे अंगातल्या चपळतेचं मुक्त प्रदर्शन असायचं. जयकिशनना शम्मी कपूरवर हे गाणं असणार आहे असं सांगितलं गेलं तेव्हा आधी त्यांना अशासाठी आनंद झाला की आपल्याला आता आपल्या आवडत्या शम्मीसाठी गाणं करायला मिळणार आणि ते त्याच्या पडद्यावरच्या प्रतिमेप्रमाणेच सुसाट असणार!

- Advertisement -

पण ह्या गाण्याचा प्रस्ताव मांडून झाल्यानंतर एखाद्या जाहिरातीच्या खाली जशा अटी व शर्ती असाव्यात त्याप्रमाणे ह्या गाण्यासाठी अट व शर्त सांगण्यात आली. ती अशी होती की हे गाणं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शम्मीच्या पडद्यावरच्या आजवरच्या प्रतिमेला धरून रोमँटिक केलंत तरी ते दु:खी गाणं असणार आहे, त्याला एक शोकात्म किनार असणार आहे हे लक्षात घ्या. बरं, ही अट इथेच थांबणार नव्हती तर त्या अटीचा पुढचा भाग असा होता की शम्मी कपूर कोणतंही एखादं वाद्य घेऊन आणि एकाच जागी बसून ते गाणं पडद्यावर गाणार आहे. ह्याचा अर्थ शम्मीला आपले हातपाय हलवून पडद्यावर नेहमीची कोणतीही दांडगाई करता येणार नव्हती की आपली कोणतीही धसमुसळी हालचाल करता येणार नव्हती.

जयकिशननी ही अट व शर्त ऐकल्यानंतर त्यांचा आधी हिरमोड झाला. कारण आपण जे गाणं करणार आहोत ते शम्मी कपूरवर खास शम्मीमय गाणं असणार आहे असं ते गृहित धरून चालले होते. त्या गाण्यासाठी नंतर हे अटी व शर्तीचं त्रांगडं येईल हे त्यांना संपूर्णपणे अनपेक्षित होतं. जयकिशनपुढे त्या अटी व शर्ती मान्य करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. पण तो पर्याय जयकिशननी अपरिहार्यपणे स्वीकारला तरी शम्मीवरचं दु:खीकष्टी गाणं करतानाही त्याच्यावरच्या गाण्यातलं धसमुसळेपण त्यांच्या डोक्यातून त्यांनी अजिबात वजा केलं नाही.

- Advertisement -

एके दिवशी हार्मोनियमवर बसलेले असताना जयकिशनना ह्या गाण्याची चाल सुचली. त्या चालीच्या वेगात त्यांना शम्मी कपूर स्टाइल दिसली. तशीच धसमुसळी, तशीच रांगडी, पण जलदगतीने वाटेवरची वळणांमागून येणारी वळणं पार करावी अशी. जयकिशननी हसरत जयपुरींना ती चाल ऐकवली आणि त्यानुसार शब्द लिहायला सांगितले.
हसरत जयपुरींनी शब्द लिहिले –

दिल के झरोको मे तुझ को बिठा कर,
यादों को तेरी मैं दुल्हन बना कर,
रख दुंगा मैं दिल के पास,
मत हो जाँ मेरी उदास.

हे शब्द जयकिशनच्या त्या चालीला अगदी साजेसे होते. जयकिशनच्या चालीतला तो वेग आणि आवेग हसरतजींनी आपल्या त्या शब्दांत अगदी सहज पकडला होता. गाणं जयकिशनच्या मनाप्रमाणे झालं होतं. आता ह्या गाण्याला महंमद रफीच न्याय देऊ शकतील हे जयकिशननी पक्कं करून टाकलं होतं.

आता महंमद रफींपुढे आपलं हे गाणं ठेवताना ह्या गाण्याबद्दलची अट व शर्त ठेवण्याची पाळी होती ती दस्तुखुद्द जयकिशनची.

‘कोणती अट?’ महंमद रफींनी जयकिशनना विचारलं.
‘अट इतकीच की ह्या गाण्याचा मुखडा तुम्ही एका श्वासात गायचा आहे,’ जयकिशन म्हणाले.

महंमद रफींनी ती अट मान्य केली. चांगला कसून सराव केला आणि त्या गाण्याचा तो मुखडा एका श्वासात गायला. पण ह्या गाण्याच्या रेकॉडिर्ंंगनंतर रफी जयकिशनना म्हणाले, ‘असं गाणं तू माझ्याकडून आज गाऊन घेतलंस, पुन्हा असं गाणं गाऊन घेऊ नकोस, अशी दहा गाणी जर तू माझ्याकडून गाऊन घेतलीस तर अकराव्या गाण्याला मी जिवंत असणार नाही इतका ह्या गाण्यात तू माझा श्वास बंद करून ठेवला होतास.’

असो, हे संपूर्ण गाणं शम्मी कपूर पियानोवर बसून गातो असं सिनेमात दृष्य आहे…आणि हा पियानो गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी शंकर-जयकिशनमधल्या शंकरनी वाजवला आहे, हा एक गाण्याचा विशेष सांगायलाच हवा.

-सुशील सुर्वे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -