प्रसिद्ध विधिज्ञ भुलाभाई देसाई

भुलाभाई देसाई हे भारतातील एक प्रसिद्ध विधिज्ञ व राष्ट्रीय पुढारी. त्यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1877 रोजी गुजरातमधील बलसाड येथे झाला. भुलाभाईंचे वडील जीवनजी सरकारी वकील (मुख्तियार) होते. त्यांची आई रमाबाई निरक्षर व धार्मिक वृत्तीची होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण बलसाड येथे झाले. १८९५ मध्ये मॅट्रिक झाल्यावर त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून एम. ए. ही पदवी घेतली (१९०१) व अहमदाबाद येथील गुजरात महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी पत्करली. अहमदाबादला असतानाच भुलाभाई एल.एल. बी. झाले व त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाची वकिली परीक्षा दिली (१९०५). त्यांनी मुंबईस वकिलीस सुरुवात केली व अल्पावधीतच तज्ञ वकील म्हणून नाव मिळविले.

पुढे मुंबई राज्यात ते अ‍ॅडव्होकेट जनरल झाले. त्यांनी पुढे होमरूलच्या चळवळीत भाग घेतला. गांधीजींच्या असहकारीतेच्या चळवळीपासून ते बदलू लागले. १९२५ साली ते ब्रूमफिल्ड समितीपुढे बार्डोलीच्या शेतकर्‍यांतर्फे उभे राहिले. १९३१ साली गांधी-आयर्विन कराराप्रमाणे बार्डोलीच्या शेतकर्‍यांची बाजू मांडली. १९३२ साली त्यांना कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल एक वर्ष शिक्षा व १० हजार रुपये दंड झाला. तुरुंगात त्यांची प्रकृती ढासळली व सुटका झाल्यावर ते वकिलीच्या काही कामानिमित्त इंग्लंडला गेले. तेथून परत आल्यावर त्यांनी काँग्रेसतर्फे पार्लमेंटरी बोर्ड स्थापण्याचा प्रयत्न केला. ते त्या बोर्डाचे सचिव व पुढे अध्यक्ष झाले. ते मध्यवर्ती कायदे मंडळात गुजरातमधून निवडून आले व विरोधी पक्षाचे नेते झाले. ते काँग्रेस वर्किंग कमिटीचे काही वर्षे सभासद होते. दुसरे महायुद्ध संपल्यावर आझाद हिंद सेनेच्या नेत्यांवर दिल्लीच्या लाल किल्ल्यात जे खटले झाले, ते भुलाभाईंनी अत्यंत काळजीपूर्वक हाताळले. त्यात त्यांना पूर्ण यश आले.

भुलाभाईंनी लियाकत अलींबरोबर जातीय प्रश्नांबाबत एक करारही केला होता. हा देसाई-लियाकत करार अंमलात आला नाही. काँग्रेस वर्किंग कमिटीने भुलाभाईंवर गांधीजींचा विचार न घेता हा करार केला, असा आरोप ठेवला. इंग्रजीवरील त्यांचे प्रभुत्व, अस्खलित वक्तव्य आणि वकिलीतील अशिलाची बाजू मांडण्याची हातोटी यामुळे ते अत्यंत लोकप्रिय होते. केंद्रीय विधान सभेतील काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांनी केलेले काम ऐतिहासिक आहे. त्यांचे तीक्ष्ण, तथ्यपूर्ण भाषण सरकारी पक्षाला हतबल करायचे. त्याला विवेकाची जोड असायची.

भुलाभाई देसाईंनी ज्या कौशल्याने आणि क्षमतेने ‘आझाद हिंद फौज’, श्री शाहनवाज, ढिल्लन आणि सहगल यांच्याविरुद्ध देशद्रोहाच्या खटल्यात सैनिकांना पाठिंबा दिला, त्यामुळे देशातच नव्हे तर परदेशातही त्यांची कीर्ती पसरली. प्रतिस्पर्ध्यावर जोरदार प्रहार करून त्याला नि:शस्त्र करण्याची एक विलक्षण आणि आश्चर्यकारक क्षमता त्यांच्यात होती. याच कारणामुळे त्यांच्याकडे खूप गंभीर कायदेशीर गुंतागुंतीची प्रकरणे वारंवार येत. देशातील प्रख्यात विधिज्ञांमध्ये त्यांचे प्रमुख स्थान होते. त्यांच्याकडे संसदीय नेतृत्वाचे अद्वितीय गुण होते. अशा या महान विधिज्ञाचे ६ मे १९४६ रोजी निधन झाले.