घरफिचर्सअभिनय ही सहजवृत्ती!

अभिनय ही सहजवृत्ती!

Subscribe

अभिनयामध्ये करिअर करण्याचा निर्णय माझ्यासाठी अत्यंत सहज होता. कारण वयाच्या दहाव्या वर्षांपासून मी अभिनयाशी जोडलेली आहे. त्यामुळे हे माझ्यासाठी अचानक अंगावर आलेलं करिअर नक्कीच नाही. अभिनय, फॅशन या ग्लॅमरस क्षेत्राशी संबंधित असूनही मला वेगळेपण आवडतं. मला इतरांनी निवडलेल्या सरधोपट मार्गावरून जाणं रुचत नाही. त्यामुळे अभिनय असो वा फॅशन, माझा नेहमीच वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न असतो.

प्रत्येक माणसाचं मन वेगळ्या पध्दतीने रिअ‍ॅक्ट करत असतं. दर वेळी वेगवेगळ्या भावछटांमध्ये ते आपलं अस्तित्व दाखवत असतं. त्याच्यामुळेच तर दर वेळी आपल्यातल्या ‘मी’चा वेगळा आविष्कार बघायला मिळत असतो. अभिनयाचं आणि माझं समीकरण असंच काहिसं जुळलं. लहानपणापासून माझा या क्षेत्राशी अगदी जवळचा संबंध आहे. मी दहा वर्षांची असल्यापासून अभिनय करत आहे. त्यामुळे हे करिअर अचानक अंगावर आल्यासारखं कधी वाटलंच नाही. मी लहानपणी अबोल, आतल्या गाठीची होते. कुणाच्यात फारसं मिसळणं, मनमोकळेपणानं बोलणं मला जमायचं नाही. याशिवाय मी फारशी हुशार विद्यार्थिनी नसल्याने करिअरच्या वेगळ्या पर्यायाचा विचार केलाच नाही. पण केवळ अभ्यासात हुशार नाही म्हणून अभिनयक्षेत्र निवडलं असंही नाही. कारण अभिनय करणं मला मनापासून आवडायचं. मी इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अभिनयात जास्त रमते हे माझ्या पालकांच्या लक्षात आलं. त्यामुळे एरवी अबोल असणारी मुलगी व्यक्तिरेखेत शिरल्यावर पूर्णत: समर्पित असते हे त्यांना कुठे तरी जाणवलं. त्यामुळे त्यांनी मला या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. इतर वेळी शांत असले तरी कॅमेऱ्यासमोर वावरताना माझ्या ठायी एखाद्या अनामिक शक्तीने संचार केल्यासारखं व्हायचं आणि बुजरेपणा कुठल्या कुठे पळून जायचा!

लहानपणापासून काम करताना कॅमेऱ्यासमोर एक प्रकारचा बिनधास्तपणा आला होता. याचा उपयोग मला करिअर उभं करताना झाला. एरवी अबोल पण कॅमेऱ्यासमोर बिनधास्त ही दुहेरी व्यक्तिमत्त्वाची सवय वयाच्या बावीस वर्षांपर्यंत टिकून होती. पण कामात विविध टप्पे येत गेले तसा माझ्या सार्वजनिक जीवनातही मोकळेपणा येण्यास मदत झाली. आता मी लोकांमध्ये बऱ्यापैकी मिसळून नवे मित्र-मैत्रिणी बनवू लागले आहे. पण माझ्यात हा बदल एकाएकी झालेला नाही. मला अभिनयाने प्रगल्भ बनवलं हे ठामपणाने सांगू शकतेे. मी मुळातच अबोल असल्याने मनातील भावना अभिनयाद्वारे मांडणं सहज शक्य झालं. खलनायिका साकारताना, हळवी नायिका साकारताना माझ्यातील भावना खुलेपणाने बाहेर येऊ लागल्या. लहानपणी भूमिकांमधील वैविध्याशी जवळून ओळख झाल्याने प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया देणं सहजशक्य झालं. आयुष्यातील एखादी काल्पनिक घटना वास्तवदर्शी पद्धतीने मांडणं सहज जमत गेलं. त्यामुळेच कोणतीही नवी भूमिका साकारताना मला दडपण येत नाही किंवा वेगळ्या पठडीतील भूमिका साकारताना कॅमेऱ्यासमोर सावध व्हायला लागत नाही. कारण त्या व्यक्तिरेखेतील काही खुबी आधीपासूनच माझ्या आत असतात. मी केवळ त्या कॅमेऱ्यासमोर सादर करत असते. उदाहरणच द्यायचं झालं तर मी अबोल असले तरी खोडकर मुलीची व्यक्तिरेखा सहज साकारू शकते. याला कारण म्हणजे माझ्या आत कुठे तरी तो खोडकरपणा लपला आहे. संधी मिळताच तो बाहेर येतो इतकंच.

- Advertisement -

मोठ्या समुदायासमोर आत्मविश्वासाने वागण्या-बोलण्यातली सहजता मला अभिनयाने दिली आहे. मला इथपर्यंत पोहोचवण्यात पालकांचा वाटा खूप मोठा आहे, असं आत्मविश्वासपूर्वक सांगू शकते. कारण माझ्यातलं अभिनयाचं वेड त्यांनी वेळीच ओळखलं आणि या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरणा दिली. अभिनयामुळे अनेक अतर्क्य बाबी जवळून अनुभवता आल्या. माझ्या आयुष्यातील अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांवर त्याचा परिणाम झाला. अनेकदा याच्या उलटही घडलं आहे. वैयक्तिक आयुष्यातील घटनांचा परिणाम माझ्या मनावर झाला. त्यामुळे एखादं वेगळं पात्रं साकारताना मी त्याला सहजतेने सामोरं जाऊ शकले. त्यामुळे मला कामातून मिळणारं समाधान अनुभवता आलं. खरं पाहता आपल्याकडे प्रत्येक गोष्टीच्या चौकटी ठरलेल्या आहेत. जसं की, अभिनेत्रीने असंच वागावं किंवा सदैव छानच दिसावं ही चौकट आपणच कलाकारांना आखून दिली आहे. यामुळे पडद्यावरचा कलाकार वैयक्तिक आयुष्यात खूप वेगळा असतो. आपल्याकडे अभिनेत्रीने फॅशनेबल असावं ही चौकटदेखील आपणच कुठे तरी आखून दिली आहे. त्यामुळे एअरपोर्टवरदेखील प्रेक्षणीयच दिसलं पाहिजे हा सेलिब्रिटींचा अट्टाहास असतो. अर्थात ही चूक सेलिब्रिटी आणि प्रेक्षक या दोघांचीही नसते. कारण एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीने घातलेला पेहराव तिची वैयक्तिक आवड असेलच असं नाही. त्यामुळे केवळ ट्रेंड आहे किंवा लोकांना आवडते अशीच फॅशन करणं हे मला मुळीच पटत नाही.

फॅशनची संकल्पनाच ट्रायल आणि एअरवर अवलंबून आहे. अनेकदा तुम्हालाही माहीत नसतं की कोणता पेहराव जास्त खुलून दिसेल. त्यामुळे फॅशन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असं मला नेहमी वाटत राहतं. फॅशनशी माझा खूप जवळचा संबंध आहे. मी काही काळ फॅशनशी संबंधित शिक्षणही घेतलं आहे. मी एनआयएफटी या संस्थेत प्रवेशही घेतला होता. काही महिने मी ते वर्ग अटेंड केले. पण अभिनय आणि क्लास यांना एकत्र वेळ देणं शक्य होत नव्हतं. तो आयुष्याचा असा काळ होता जेव्हा मला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, फॅशनच फॅशन दिसायची. पण कालांतराने हा कोर्स मला अर्धवट सोडावा लागला आणि या फॅशन एक्सप्रेसला तिथेच ब्रेक लागला. पण त्या काळात माझा फॅशनविषयीचा दृष्टिकोन खèया अर्थाने विकसित झाला. फॅशन ही व्यक्तिमत्वाला उठाव देणारी असावी हे माझं स्पष्ट मत आहे. एखादी फॅशन ट्रेंडमध्ये आहे म्हणून ट्राय केली पण मनात त्याविषयी किंतू असेल तर त्या पोषाखात तुम्ही तितक्या खुलून दिसणार नाही. तुमचा पेहराव आरामदायी आहेे असं मनोमन वाटत असेल तर तो आत्मविश्वास चेहèयावर दिसून येतो. कोणतीही फॅशन ट्राय करताना सगळ्यात महत्त्वाचा असतो तो आत्मविश्वास. कोणतंही प्रावरण परिधान केल्यानंतर कॉन्फिडंट नसाल तर प्रावरण कितीही सुरेख असलं तरी तुमच्यावर उठून दिसणार नाही. अशा वेळी साधा टी शर्ट घातला तरी आत्मविश्वासपूर्वक वागवल्यामुळे तो जास्त चांगला दिसेल.

- Advertisement -

मी ट्रेंड फॉलोवर नक्कीच नाहिये. पण मला चांगली दिसतात, आत्मविश्वास देतात अशी प्रावरणं विशेषत्वाने आवडतात. अनेकजण सेलिब्रिटी वापरतात तोच ब्रँड वापरण्याचा अट्टाहास करतात. पण कोणताही ब्रँड वापरण्यापूर्वी त्या ब्रँडचं वैशिष्ट्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक ब्रँडचं वैशिष्ट्य वेगळं असतं. त्यामुळे काय घालावं याच्याआधी काय घ्यावं याचा विचार करणं गरजेचं आहे. अंधानुकरण करण्यापूर्वी विचार करणं गरजेचं आहे. फॅशन आणि व्यक्तिमत्त्वाची गल्लत अनेकजण करत असतात. फॅशन व्यक्तिमत्त्वाला ग्रुम अप करते. फॅशनमुळे व्यक्तिमत्त्वाला धार येते. त्यामुळे फॅशन म्हणजे कुठलीही जगावेगळी किंवा विशिष्ट वर्गासाठीची संकल्पना नाही. ती आपल्या सर्वांमध्ये उपजतच असते. अवडंबर न माजवता किंवा अवघडलेपण जाणवू न देता ती खुल्या मनाने आपलीशी करणंं गरजेचं आहे.


नेहा पेंडसे, अभिनेत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -