घरफिचर्सअभिनेत्री कमलाबाई कामत-गोखले

अभिनेत्री कमलाबाई कामत-गोखले

Subscribe

कमला कामत नावाच्या लहान मुलीचं नाव दादासाहेब फाळकेंना सुचवलं. फाळकेंच्या मोहिनी भस्मासूर या मूकपटात मोहिनीच्या व्यक्तिरेखेसाठी कमलाबाईंची निवड झाली आणि त्यांच्या रूपाने रूपेरी पडद्याला एका स्त्री अभिनेत्रीचा, स्त्री कलाकाराचा चेहरा मिळाला.

कमलाबाई कामत-गोखले या स्त्री भूमिका पुरुषांनीच करण्याच्या काळात स्त्रीची भूमिका स्त्रीनेच करणार्‍या पहिल्या अभिनेत्री. त्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९०१ रोजी झाला. कमलाबाई यांचे वडील उत्तम कीर्तनकार होते, तर आई दुर्गाबाई कामत आवडीने सतार वाजवत. त्यामुळे कानावर सतत सुरेल स्वर आणि मंजुळ स्वर ऐकतच कमलाबाई लहानाच्या मोठ्या होत होत्या; पण घरची स्थिती हलाखीची असल्याने अवघ्या पाचव्या वर्षांपासून कमलाबाईंनी मेळा, तसंच जत्रांमधून कामं करायला सुरुवात केली. याच मेळ्याच्या माध्यमातून संवाद, संगीत आणि अभिनयाचे धडे त्यांनी गिरवायला सुरुवात केली. याचा उपयोग कमलाबाईंना पुढे मूकपट, तसेच संगीत नाटकांसाठी झाला. आपल्या समाजात प्रबोधन आणि मनोरंजनाचं महत्वपूर्ण साधन म्हणजेच संगीत नाटक. वैविध्यपूर्ण विषय, सजीव अभिनय, सामान्य माणसाच्या काळजाला भिडणार्‍या कथानकांमुळे, नाटकं मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनली होती; पण त्या काळी या नाटकांमध्ये स्त्री भूमिकाही पुरुष साकारत असत. याच काळात म्हणजे १९१३ साली चित्रपट युग सुरू झाले ते राजा हरिश्चंद्रपासून.

त्या बोलपटाच्या यशानंतर दादासाहेब फाळकेंच्या ‘मोहिनी भस्मासूर’ या मूकपटाचा प्रयोग सुरू झाला होता. आपल्या आगामी बोलपटांमध्ये स्त्री पात्रे ही स्त्री कलाकारांनी साकारावीत या मताचे दादासाहेब फाळके होते. त्याच वेळी कोणीतरी कमला कामत नावाच्या लहान मुलीचं नाव दादासाहेब फाळकेंना सुचवलं. फाळकेंच्या मोहिनी भस्मासूर या मूकपटात मोहिनीच्या व्यक्तिरेखेसाठी कमलाबाईंची निवड झाली आणि त्यांच्या रूपाने रूपेरी पडद्याला एका स्त्री अभिनेत्रीचा, स्त्री कलाकाराचा चेहरा मिळाला. पुढे कमलाबाईंच्या अभिनयाची कमान चढतीच राहिली. पुढे अनेक मूकपटांमधून परिपूर्ण भूमिका साकारून त्यांनी स्त्री कलाकारांना एकाअर्थी या क्षेत्रात येण्यासाठी हे उदाहरण आपल्या रूपानं ठेवलं असंही म्हणता येईल. चित्रपटांपेक्षाही तो काळ नाटकांचाच होता. पण अशा वेळी संगीत नाटकांतील महत्वपूर्ण अशी किर्लोस्कर कंपनी बंद पडल्यानं, रघुनाथराव गोखले यांनी चित्ताकर्षक नाटक मंडळीची स्थापना केली आणि गद्य नाटके रंगभूमीवर सादर होऊ लागली. या नाटकांमधून कमलाबाईंनी भूमिका साकारल्या.

- Advertisement -

पुंडलिक, तसेच मृच्छकटिक ही नाटकं ‘चित्ताकर्षक’तर्फे सादर होऊ लागली होती. या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रमुख भूमिका केल्या. त्यामुळे नाट्यसंगीतालाही सुरेल बाज लाभला. पुढे त्यांनी मनोहर स्त्री संगीत मंडळी नावाची संस्था स्थापन केली. या काळात फक्त स्त्रियांची नाट्यकंपनी असणं हे कला आणि मनोरंजन सृष्टीसाठी सूचक असं पाऊल होतं आणि या नाट्यकंपनीचं वैशिष्ठ्य हेच की स्त्री आणि पुरुषांची पात्रं स्त्रियाच सादर करत. तब्बल २०० हून अधिक नाटकं, मूकपट, त्यासोबतच कारकिर्दीत ३५ पेक्षाही अधिक चित्रपटांतून नायिका, तसेच स्त्रीप्रधान भूमिकांमुळे कमलाबाई कायमच लक्षात राहतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आणि चाळीस वर्षं या क्षेत्रासाठी योगदान दिल्याबद्दल, त्यांचा दिलीपकुमार यांच्या हस्ते सत्कार झाला होता. अशा या महान अभिनेत्रीचे १८ मे १९९७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -