Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स निसर्गसौंदर्य लाभलेले हरिहर

निसर्गसौंदर्य लाभलेले हरिहर

हरिहर म्हणजे केवळ खडकात कोरलेल्या पायर्‍या नव्हे, तर हरिहर म्हणजे प्राचीन स्थापत्यकलेचा अद्भुत आणि एकमेवाद्वितीय नमुना होय याची मला आता खात्री पटली होती. या स्थळाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा हा संपूर्ण लेख...

Related Story

- Advertisement -

शनिवारी मध्यरात्री आम्ही कसारा गाठले. बाहेर किर्र अंधार होता. नेहमीप्रमाणे बाबा-दा-ढाबा येथे चहाचा कार्यक्रम उरकुन आम्ही गाडी निरगुडपाड्याच्या दिशेने हाकली. सुमारे तासाभराच्या कालांतराने गाडी मुख्य महामार्गापासून विलग झाली आणि निर्जन रस्त्याने निरगुडपाड्याच्या दिशेने सुसाट धावू लागली. जुन्या आठवणींच्या गर्द जंगलात हरवलेले गाडीतील निम्मे गिर्यारोहक नंतर मात्र प्रवासातील थकव्याने झोपी गेले होते. गाडी चालक-मालक मनोज यांनी चालकासोबत मार्गदर्शकाची भूमिका देखील उत्तमपणे पार पाडताना वाटेत येणार्‍या प्रत्येक स्थळाची माहिती दिली.

निरगुडपाड्यावरील “टोकमवाडी” मध्ये आमच्या गाडीने तळ ठोकला. पहाटेच्या धुंद आणि प्रसन्न वातावरणात निरगुडपाडा अगदी शांत झोपला होता. विजेरीच्या साहाय्याने (टॉर्च)गाडीतून आम्ही खाली उतरलो. एवढ्यात पाड्यावरच्या भयाण शांततेला कुत्र्याच्या भुंकण्याने गालबोट लावले व आजुबाजूच्या एक-दोन कुत्र्यांनी देखील त्याला तोलामोलाची साथ दिली. हातातील काठया व पाठीवरील बॅगा आवरून पुढील काही क्षणांतच आम्ही “हरिहरच्या” दिशेने आमचा मोर्चा वळविला. हेडलाईटच्या सहाय्याने गडाच्या नेमक्या दिशेचा अंदाज घेतला व पुढील वाटचालीला सुरुवात केली.

- Advertisement -

मजल-दरमजल करीत आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. पहाटेच्या अंधुक प्रकाशात एक दोन वेळा वाट चुकण्याचा बाका प्रसंग सुद्धा ओढवला. मात्र, असा प्रसंग येण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. गडाच्या दिशेने कूच करीत असताना बाहेर प्रकाश बर्‍यापैकी पसरला व नेमक्या दिशेचा अंदाज घेत आम्ही झपझप पावले उचलली. सुमारे एक-दीड तासांच्या पदयात्रेअंती आम्ही हरिहरच्या पायथ्याशी पोहोचलो.

हरिहर म्हणजे केवळ खडकात कोरलेल्या पायर्‍या नव्हे, तर हरिहर म्हणजे प्राचीन स्थापत्यकलेचा अद्भुत आणि एकमेवाद्वितीय नमुना होय याची मला आता खात्री पटली होती. उत्तम वास्तुशास्त्र, कल्पक बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर ऐतिहासिक कालखंडात अनेक वास्तू उभारल्या गेल्या, हरिहर त्यापैकीच एक…!!

- Advertisement -

पाहताक्षणी मनाला भुरळ घालणारे रेखीव सौंदर्य न्याहाळत आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलो. मध्य भागावर असणारे प्रवेशद्वार, कातळात कोरलेल्या पायर्‍या आणि सुरक्षेसाठी बाजूला असलेल्या खोबण्या तर अप्रतिमच. गडाच्या माथ्यावर हनुमानाचे मंदिर आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची पद्धतीने केलेली रचना आणि गडावरील भक्कम भुयारी मार्ग यावरून शिवकालीन वास्तुशास्त्राचा दर्जा दिसून येतो.

गडावरील मंदिरात पारंपरिक प्रथेप्रमाणे नारळ देऊन पूजा केली. सोबत आणलेला अल्पोपहार उरकून आम्ही गडफेरी मारण्यास निघालो. किल्ल्याच्या पठारावर पाण्याच्या टाक्या आहेत. यापैकी एका टाकीच्या कातळात बाजूला शिवलिंग कोरलेले आढळते. बाजुलाच शंकराचे एक मंदिर देखील आहे. गडाच्या दक्षिणेला उंचावर ध्वजस्तंभ आहे. येथून वैतरणेचा विस्तीर्ण परिसर नजरेत सामावून घेण्याचा मी केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, निसर्गाच्या अफाट विस्तारापुढे माझी नजरसुद्धा फिकी पडत होती. नैऋत्येला दूरवर दिसणारा त्र्यम्बकेश्वराचा परिसर आणि आसपासच्या विस्तीर्ण डोंगररांगा पाहून सह्याद्रीपुढे कैकदा नतमस्तक झालो.

परतीच्या प्रवासाची वेळ होत आली होती. गडाच्या जिवंत आठवणी नजरेत आणि कॅमेर्‍यामध्ये साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. धकधकीच्या जीवनातून काही क्षणांची उसंत मिळाल्यावर केलेल्या या भटकंतीच्या आठवणींची शिदोरी आयुष्यभर माझ्यासोबत राहील…!!


संदेश कुडतरकर

(पाऊलखुणा ट्रेकर्स)

- Advertisement -