घरCORONA UPDATEपरदेशींपेक्षा चहल सरसच, तरीही …

परदेशींपेक्षा चहल सरसच, तरीही …

Subscribe

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पदभार स्वीकारुन एक महिना होत आला. यापूर्वीच आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना एक वर्ष पूर्ण होत असतानाच कोरेानाच्या आजारांबाबत नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठेवल्याचा ठपका ठेवत बाजुला केले होते

मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे. काही भागात कमी आणि काही भागात जास्त एवढाच काय तो फ़रक आहे. पण परिस्थिती बदललेली नाही. आजही सरासरी १३०० ते १४०० बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे म्हणावं तशी परिस्थिती बदलली गेलीय असं चित्र नाहीए. पूर्वी महापालिका आयुक्त प्रविण सिंह परदेशी होते. त्यांना बदलुन त्यांच्या जागी इकबाल सिंह चहल यांना आणले. म्हणून मुंबईची परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा बाळगणं हेही चुकीचच ठरेल. कोरोनाचा एवढा जोर वाढलाय की यावेळी कुणीही जरी हाती सुत्रे घेतली तरी पूर्णपणे कोरोनामुक्त मुंबई या घडीला करू शकत नाही. मुळात प्रविणसिंह परदेशी काय किंवा इक्बाल सिंह चहल काय. दोन्हीही अधिकारी त्यांच्या क्षमतेने काम करत असले तरी मुख्य काम करणारी टिमही डॉक्टर्स, नर्सेस तसेच इतर फ्रंटलाईनला काम करणारे आहेत. जर तेच या कोविडच्या युध्दात बाधित होवून धारातिर्थ पडू लागले तर हे आयुक्त काय करणार? केवळ निर्णय घेवून किंवा आदेश देवून काम होत नाही. तर त्यांची योग्यप्रकारे अंमलबजावणी आणि त्यासाठी असणारे कामगार,कर्मचारी नसेल तर अशा निर्णयांना आणि आदेशांचा काहीही उपयोग होत नाही. सध्या ज्याप्रकारे महापालिकेचे डॉक्टर्स, नर्सेससह इतर कामगार आणि कर्मचारी बाधित होत आहे, त्याचाच परिणाम कोरोनाच्या उपाययोजना राबवताना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाला जर हरवायचे असेल तर कोविडच्या या योध्दयांचेही संरक्षण करणे आवश्यक आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढवतानाच त्यांना प्रवासातील कमीत कमी ताण कमी करणे हेही तेवढेच आवश्यक आहे. परंतु नेमक्या याच गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. याचेच उदाहरण यापूर्वी कोरेानामुळे पहिले मृत्यू पावलेले करनिर्धारण व संकलन विभागातील अधिकारी हरियाण असो वा विशेष अभियांत्रिकी विभागाचे प्रभारी उपायुक्त शिरीष दिक्षित असो. आतापर्यंत जे ४० हून अधिक कामगार,कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचे जे मृत्यू झाले ते महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच आणि कर्मचाऱ्यांची त्यांनी काळजी न घेतल्यानेच.

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पदभार स्वीकारुन एक महिना होत आला. यापूर्वीच आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना एक वर्ष पूर्ण होत असतानाच कोरेानाच्या आजारांबाबत नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठेवल्याचा ठपका ठेवत बाजुला केले होते. प्रविणसिंह परदेशी यांनी सुरुवातीपासून  या आजारांकडे तेवढे गंभीरपणे पाहिलेले नाही किंवा प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावले नाही. त्यामुळे वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेनुसार घरातून अथवा कार्यालयात बसूनच व्हिडीओ कॉन्फ्ररन्सीद्वारे किंवा झुम द्वारे संवाद साधत संपूर्ण दिवसभर अधिकाऱ्यांना खोळंबून ठेवण्याचे काम केले होते. परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अधिकारी मात्र,आयुक्तांच्या व्हिडीओ  कॉन्फ्ररन्सीवर खिळून बसल्याने सुरुवातीला सहायक आयुक्तांना विभागात कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या व्यहरचना आखता आल्या नाही. त्यातच यापूर्वीच्या आयुक्तांनी घातलेला घोळ म्हणजे परिपत्रकांचा.एक आदेश निघत नाही, तोवर दुसरा आदेश काढला जातो. त्यात बदल करून परिपत्रक जारी केले जाते. तेही हाती नाही पडत तेच तिसरे परिपत्रक हाती पडते. त्यामुळे एकप्रकारे गोंधळाची परिस्थिती मुंबईत आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली. निर्णय क्षमता कमी असल्यानेच कोरेानाचा घोळ वाढला. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मुंबईची पूर्णपणे सुत्रे हाती घेवून परदेशी यांच्याकडून त्यांची अंमलबजावणी करून घ्यावी,अशीच मागणी होत होती.

- Advertisement -

परदेशी यांना बदला अशी मागणी नसली तरी अजोय मेहता यांच्याशी त्यांचे जुळत नसल्याने त्यांना बदलण्यात आले. परंतु त्यांना बदलल्यानंतर महापालिकेचे पूर्ण ज्ञान असलेले आणि मुंबईची भौगोलिक परिस्थिती माहित असलेल्या आर.ए.राजीव, मनिषा म्हैसकर, मनुकुमार श्रीवास्तव, राजीव जलोटा, श्रीकांत सिंह आदींपैकी कुणाचीही तरी वर्णी लागावी,हीच अपेक्षा होती. परंतु त्यांना डावलून चहल यांची वर्णी लावली. महापालिकेच्या कामकाजाचे ज्ञान नसले तरी पदाची सुत्रे हाती घेताच उशिरापर्यंत अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन आढावा घेत कोरोनाची परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नायर रुग्णालयात कोरेाना उपचार कक्षात भेट देवून रुग्णांची विचारपूस तसेच डॉक्टर्स तसेच निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्याचे काम केले. एवढेच नाहीतर धारावीतील मुकुंद नगरमधील कंटेन्मेंट झोनमध्ये जावून लोकांशी संवाद साधत धारावीसाठी जी मदत लागेल ती मिळेल पण येथील आजार नियंत्रणात आणा असे सहायक आयुक्तांना सांगत त्यांचेही मनोबल वाढवले. आज त्यांचा परिणाम दिसून येत आहे. धारावीतील रुग्णांची संख्या दरदिवशी आता १० ते १५ वर आली आहे. त्यामुळे आज एकतर आयुक्तांची निर्णय क्षमता महत्वाची आहे आणि काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे हेच त्यांच्या हाती आहे. त्यामुळे एका महिन्यात चहल यांनी काही अंशी कर्मचाऱ्यांची मने जिंकली. चहल यांच्यातील  निडर पणा आणि निर्णय घेण्याची क्षमता (अर्थात पडद्यामागून अजोय मेहता जे आपल्याला अपेक्षित आहे, ते त्यांच्याकडून करून घेत आहेत.) यामुळे कोरोना विरोधातील लढ्यात आता फ्रंटलाईनवरील कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे. कोरेानाग्रस्ताचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर नोकरी तसेच मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत हाही निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक आहे. केवळ महापालिकेच्याच नाही तर सर्वच कर्मचाऱ्यांसाठी हे लागू असल्याने कोरोनाच्या युध्दात शहिद होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संसार उघड्यावर येणार नाही.

असो,चहल यांच्याकडून एक महिन्यात खूप अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. परंतु महापालिकेच्या कामकाजाचे जास्त ज्ञान नसतानाही तसेच कोरोनाच्या काळात सध्या चहल ज्याप्रकारे महापालिकेची धुरा वाहतात, ती परदेशी यांच्यापेक्षा थोडी सरसच आहे. परंतु चहल  यांच्यापुढे भविष्यात एक मोठे आव्हान आहे. चहल यांनी सध्या कोरोनाशिवाय अन्य ठिकाणी न पाहण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे कोरोना वगळता अन्य कुठलीही फाईल हाताळायला तयार  नसतात. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच जनसंपर्क विभाग असो वा महापालिका चिटणीस असो, आपत्कालिन व्यवस्थापन विभाग असो वा सुरक्षा खाते असो. यांचे प्रमुख अधिकारी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी आठ दिवसांनी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. परंतु भविष्यात चहल यांच्यासमोर मोठे आव्हान  उभे राहणार आहे ते आर्थिक संकटाचे. कोरोनाच्या उपाययोजनावर आतापर्यंत जे काही कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. तो आकडा वाढून साडेतीन ते चार हजार कोटींच्या घरात जाईल. परंतु एकाबाजुला कोरोनावर कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी मालमत्ता कर, विकास शुल्क, पाण्याची देयके यासह महसुल उत्पनाचे जे स्त्रोत आहेत, त्यातून काही महसूल तिजोरीत जमा होताना दिसत नाही. आयुक्तांचे याकडे लक्ष  दिसत नाही. जर आपण बिगीन अगेनच्या दृष्टीकोनात पुढे वाटचाल करत असू तर महापालिकेची आर्थिक स्थिती कमजोर होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. पण तिथे चहल यांचे लक्ष नाही. त्यामुळे चहल यांचे एकमेव मिशन कोरोनाच हेच असून आपण कोरोनाचे युध्द यशस्वीपणे जिंकून पुन्हा मंत्रालयात जावू हिच जर चहल यांची धारणा असेल तर ती महापालिकेसाठी खूपच मारक आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे मुंबई महापालिका विकासकामांमध्ये मागे गेलेली पाहायला मिळेल. त्यामुळे कोरोनाचा लढा लढतानाच चहल यांनी महापालिकेच्या इतर कारभाराकडेही लक्ष देवून ते कशाप्रकारे सुरळीत राखता येईल याचाही विचार केला तरच मुंबई खऱ्या अर्थाने तरलेली दिसेल. अन्यथा चहल भी परदेशीही निकला असेच ऐकायला मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -