घरफिचर्सकृषितज्ञ पांडुरंग चिमणाजी पाटील

कृषितज्ञ पांडुरंग चिमणाजी पाटील

Subscribe

पांडुरंग चिमणाजी पाटील हे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कृषितज्ञ. जुन्या मुंबई राज्याचे पहिले भारतीय कृषी संचालक व पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य. त्यांनी कृषी अर्थशास्त्र या विषयात महत्त्वाचे कार्य केलेले आहे. त्यांचा जन्म १९ जून १८७७ रोजी कोल्हापूर संस्थानातील वडगाव येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले. १९०५ साली शेतकीची एल.एजी ही पदवी परीक्षा ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुण्याच्या कृषी महाविद्यालयात त्यांची कृषिक्षेत्र अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. पुढे १९०८ साली ते डेक्कन विभागाचे कृषी निरीक्षक झाले. १९१२ मध्ये इंग्लंड, डेन्मार्क इ. देशांतील शेतीची पाहणी व अभ्यास करण्यासाठी त्यांना सरकारतर्फे पाठविण्यात आले.

१९१४ साली कृषी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनतर कृषी अर्थशास्त्र या विषयाचा अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात अभ्यास करून त्यांनी १९२२ मध्ये एम.एस्सी. पदवी मिळविली. ब्रिटिश सरकारने १९२४ मध्ये त्यांना रावबहादूर हा किताब दिला. १९२५ साली पुण्याच्या कृषी महाविद्यालयात कृषी अर्थशास्त्र या विषयाची स्वतंत्र शाखा सुरू करण्यात येऊन पाटील यांची या विषयाचे पहिले प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच वेळी ते कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही काम करीत होते व या महविद्यालयाला कृषी संशोधन संस्थेचे स्वरूप देण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. त्यांनी कृषी अर्थशास्त्राविषयी लिहिलेल्या संशोधनात्मक प्रबंधाला मान्यता देऊन मुंबई विद्यापीठाने त्यांना डी. एस्सी. ही पदवी व मूल सुवर्णपदक सन्मानपूर्वक दिले. १९३२ साली सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी ग्वाल्हेर संस्थानात कृषी, सहकार व विकास यांच्या पाहणीसाठी नेमलेल्या आयोगावर काम केले.

- Advertisement -

पाटील यांनी १९०८ मध्ये कृषी निरीक्षक म्हणून नेमणूक झाल्यावर शेतीच्या नव्या अवजारांच्या व शेतीविषयक नव्या संशोधनाच्या प्रचारकार्यास प्रारंभ केला. त्यांनी नव्या अवजारांच्या बरोबरच नव्या खतांचा व बियाणांचाही प्रचार केला. लोखंडी नांगर व इतर औतांच्या प्रत्यक्ष चाचण्या घेऊन त्यांत आवश्यक त्या सुधारणा सुचवून व त्याप्रमाणे किर्लोस्कर आदी कारखान्यांकडून सुधारित औते तयार करवून घेऊन त्यांचा शेतकर्‍यांमध्ये त्यांनी प्रसार केला. त्यांनी ‘रुंद सरीची मांजरी पद्धत’ ही उसाच्या लागवडीची नवीन पद्धत शोधून काढली व आज जवळजवळ सर्व महाराष्ट्रात हीच पद्धत वापरात आहे.

किफायतशीरपणे मोठ्या प्रमाणावर गूळ तयार करण्यासाठी यांत्रिक चरकांचा व एकत्रित असलेल्या अनेक चुलाणांचा वापर त्यांनी सुरू केला. मराठा समाजाची संघटना व्हावी व त्याचात शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरिता त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सत्यशोधक समाज, शिवाजी मराठा सोसायटी, डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी, रयत शिक्षण संस्था इ. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले. त्यांचे थोरले पुत्र मेजर जनरल शंकरराव थोरात यांनी भारतीय लष्करात बहुमोल कामगिरी केलेली आहे. अशा या महान कृषीतज्ञाचे 7 सप्टेंबर 1978 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -