प्रजाहितदक्ष राजमाता अहिल्यादेवी होळकर

अहिल्यादेवी होळकर

भारताच्या ‘कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट’ म्हणून इंग्रजी लेखकाने प्रशंसा केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज २९४ वी जयंती. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दाम्पत्यापोटी झाला. त्यावेळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही अहिल्यादेवींच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते.

बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षांच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्यादेवींना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्यादेवी मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. अहिल्यादेवी या भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या ‘तत्त्वज्ञानी राणी’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेले होते. अहिल्यादेवींनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने उद्ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच शंकराचे एक देऊळ बांधले.

सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्यादेवींना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ठ्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे, परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला. अहिल्यादेवींनी जनतेच्या, रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्यादेवींनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीसुद्धा सुरू केली. वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत निमाली.‘अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संतांचा दर्जा दिला.’