घरफिचर्सकर्तृत्ववान राजकर्ती अहिल्याबाई होळकर

कर्तृत्ववान राजकर्ती अहिल्याबाई होळकर

Subscribe

धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते. अहिल्याबाईंनी सासर्‍यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासर्‍यांचा मोठा विश्वास होता.

अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती. एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी त्यांचे नाव लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी ३१ मे १७२५ रोजी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते. अहिल्याबाईंनी सासर्‍यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासर्‍यांचा मोठा विश्वास होता. महत्वाचा पत्रव्यवहार त्या सांभाळत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्य आले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे. आपल्या सासर्‍यांच्या इच्छेचा अहिल्याबाईंनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले.

मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. अहिल्याबाई आता खर्‍या अर्थाने राज्यकर्त्या झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणार्‍यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी. शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने बाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली. अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात न पाहता त्यांनी तशी कृतीही केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला. अहिल्याबाईंचे महेश्वर येथे १३ ऑगस्ट १७९५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -