घरमहाराष्ट्रनाशिकसमाजमन गहिवरणारी अव्यक्ततेतील व्यक्तता

समाजमन गहिवरणारी अव्यक्ततेतील व्यक्तता

Subscribe

जगात हिंदी चित्रपटांइतका.कुठल्याही भाषेतला चित्रपट आपणांस इतका प्रिय नाही, या चित्रपटाइतका योग्य विषयाचा अभ्यास आपल्यासह समस्त भारतातल्या आताच्याही मुलांचा असता तर तेही आयएएस, आयपीएस, आयआयएम, आयआयटी झाले असते.

हिंदी चित्रपट कशाशी खातात हे जाणून घ्यायचे असेल तर याला पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. जगातल्या कुठल्याही भाषेतला चित्रपट आपणांस इतका प्रिय नाही, इतर सगळे सिनेमे (शोले)पुढे झूठ वाटतात आपल्याला.या चित्रपटाइतका योग्य विषयाचा अभ्यास आपल्यासह समस्त भारतातल्या आताच्याही मुलांचा असता तर आपल्यासह तेही आयएएस, आयपीएस, आयआयएम, आयआयटी झाले असते. त्यातील संवादांचे हजारो म्हणीत रूपांतर होऊन त्या आपल्या दैनंदिन संभाषणात बिनचूक वापरल्या जाताहेत… आपल्याही नकळत. हेमामालिनीची प्रत्यक्ष जीवनात पहिल्यांदा इतक्या उत्कटतेने घेतली नसेल, त्याहून जास्त प्रेमाने डाकूला टिपल्यावर रिव्हॉल्व्हरची पप्पी घेतली आहे धर्मेंद्रने यात.डाकूंशी झालेल्या यशस्वी चकमकींमुळे त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झालेली ती जेव्हा त्याला जखमी अवस्थेत येताना बघते तेव्हा, भान हरपून डोईवरचा पदर ढासाळत ती त्याला सावरायला म्हणून धावत सुटते. सासर्‍याला पाहून थबकते, आपल्या सामाजीक स्थानाची जाणीव होऊन पुन्हा परदानशील होते. तिच्या लगबगीने सुखावलेल्या त्याच्या माऊथ ऑर्गनच्या सुप्रसिद्ध सुरावटीच्या सादेला दरवाजाने शांतपणे बंद करून टाकते… तरीही ते सूर तिच्या अंतर्मनापर्यंत पोचायचे थोडीना थांबतात. पण तोवर त्यांच्यातले अव्यक्त मोहरलेले बंध तिच्या सासर्‍याच्या लक्षात आलेले असतात. जब हाथोंके मेहेंदीका रंग आँसूओंसे धूल जाए तो कौन रंग बचेगा जीवनमे? असे रामलाल त्याला तिच्याबद्दल विचारतो तेव्हा त्याचा त्याच गांवात राहण्याचा निश्चय पक्का होतो. सांजवेळ उलटून गेलेली असते, अतिशय अस्थिर अशा जीवनाच्या वाटेवरचे ते दोन आसक्त वाटसरू आपल्या मूक प्रेम भावनांना काबूत ठेऊन, अंधुकशा प्रकाशात वावरत असतात. हार्मोनिकेतून सारंगीपेक्षाही जास्त कासावीस करणारे सूर निघू शकतात? ती वेळ केवळ त्या दोघांचीच आपापसातील असते, अबोल राहून व्यक्त होणारी भाषा त्यांची त्यांनाच कळते. मुघल-ए-आझम मधील बडे गुलाम अलींच्या भारदस्त रागदारीच्या सुरांवर दिलीप कुमार मधुबालेच्या चेहर्‍यावर मोरपीस फिरवतानाचा अद्भुत आणि अमिताभ-रेखाचा कोणताही उत्कट प्रणय प्रसंग इथे फिका पडतो. हे विधान मी मोठ्या जबाबदारीने करतोय. सलीम-अनारकलीच्या प्रेमभावना त्यादृष्या अगोदर वेगवेगळ्या अलंकारिक शब्दांत व्यक्त झालेल्या असतात. भर मध्यरात्री व्यक्त झालेल्या शाब्दीक भावना बर्‍याचदा खोट्या, ऐय्याशी असू शकतात… पण अव्यक्त भावना तशा नसतात, तिथे फक्त खरी असणारी डोळ्यांची भाषा बोलली जाते. तिच्या हातून पळालेल्या कोकरूला परतवताना त्या भावना दृष्यमान होतात, म्हशीवर बसूनही राजबिंडा दिसणार्‍या त्याच्याकडे पाहून आणि त्यानंतर तीने त्याला तसे बघीतले म्हणून लज्जीत झालेल्या त्याच्या चेहर्‍याकडे पाहून तिला फुटलेल्या हास्यातून त्या उमलतात. सायंकाळोत्तर कातर, पिंगळावेळी साध्याशा ऑर्गन मधून त्या कारंजासारख्या मोठ्या आसुशीने उंचच उंच वर उसळतात. त्यातून एकमेकांप्रती असणारी खोलवरची काळजी, आदर, विश्वास देतात त्या. तिच्यापासून तिमीरातून वाट काढत त्याच्यापर्यंत पोचणार्‍या सांजेच्या हळव्या दिप-प्रभेला आणि त्याच्यापासून तिच्यापर्यंत पोचणार्‍या माऊथ ऑर्गनच्या अस्सल सुरांना त्यांच्या निष्ठेचा परीमळ असतो, जो दोन मनांना उजळवून एकरूप करून टाकतो. चित्तवृत्तींना अथांग, आश्वस्थ तृप्ती देऊन जातो तो त्यांचा लांबून टाकलेला एकच कटाक्ष. भावनोत्कठता गाठली जाते, प्रणय तिथेच पूर्णत्वास पोचतो प्रत्यक्ष मिलन झाले नाही तरी. अखंड मनःशांतीच वास करत असते त्या ठिकाणी!! तेवढा काळ जगात ते एकटेच असतात… असे त्यांना वाटते. पण कुणाच्याही प्रेम भावना अदृश्य, अव्यक्त असल्या तरी त्या इतरांपासून लपून राहू शकतात? त्या आपल्यापर्यंतही अशा प्रकारे विनासायास पोचतात की त्यांचा कसलाही दृश्य उच्चार केलेला नसताना, तिचा सासरा त्याला न विचारता त्यांच्या लग्नाचा ठराव तिच्या वडिलांच्या संमतीसाठी मांडतो, तेव्हा ही गोष्ट त्याला माहित नसल्याच्या वस्तु:स्थितीचाही आपल्याला विसर पडतो इतक्या स्वाभाविकपणे ते पटते. खरोखरच ती तिजोरी चावी द्यायला येते तेव्हा जे बोलते ते दोघांना उद्देशून आणि फक्त अमिताभ बोलतो ते चावी आणि कोकरू परतावयाला येतो तेव्हा. याव्यतिरीक्त संवाद म्हणून त्यांचे दोघांचे (तीन वेळा हार्मोनिकेद्वारे झालेल्या संवादा (?) शिवाय) एकही वाक्य नाही. संपूर्ण चित्रपटभर ती एकदाही फक्त अमिताभशी बोललेली नाहीए.आय लव्ह यू, आय वाँट यू, मिस यू, माझ्या आयुष्यातला तूच एकमेव वगैरे धर्तीचे कुठचेही छचोरे संभाषण नाही. पण त्यातून व्यक्त होणार्‍या त्यांच्या प्रेमाचा आपल्यावर होणारा परीणाम कुठच्या परीमाणात मोजणार?या चित्रपटातला खलनायक, नायक, गाणी, हेलन, हिंसा, क्रौर्य, विनोदी प्रसंग, घोडे, आगगाडी, संवाद असे असंख्य घटक आपल्या अनुभूतींवर, मनावर, ह्रदयावर जोरकसपणे आदळतात… खरं तर ही अव्यक्त प्रेमकहाणी त्यात पार वाहून जायला हवी होती. पण अंगभूत कलात्मकता आणि अभिजाततेच्या बळावर ती काँक्रीटच्या फटीतून तरारलेल्या पिंपळाच्या कोवळ्या कोंबासारखी वर उठून बहरून येते. असली आर्त भावना, जीवघेणी करूणा, नियतीचा निष्ठूर खेळ मांडणारी अधुरी प्रेमकथा दुसरी कोणती असू शकेल? त्यांच्या त्या अतिशय वैयक्तिक क्षणाचे चित्र माऊथ ऑर्गनच्या सुरांच्या साथीने आलेखाद्वारे चितारताना, त्या चित्रकाराच्या मनात त्या क्षणाबद्दल कोणते भाव असावे किंवा मुळात त्या दोघांच्या मनाचा कसा थांगपत्ता लावावा आणि आपण ते सारे कसे शब्दांत पकडावे? सुरांच्या त्या आरोह अवरोहांसह भावनांच्या लाटे गणिक ब्रशचे फटकारेही सौम्य, तीव्र होत चित्र साकारले जाते. रंग फिके, गडद होत लखलखत राहतात… कलात्मकतेची निव्वळ परिसीमा गाठत चित्र कॅनव्हासवर उतरते. छायाचित्रकार, दिग्दर्शकाने ते त्यांच्या माध्यमातून आपणांसमोर यथार्थपणे मांडलेच आहेत. पण ते सूर आणि ते दृष्य, त्या चित्रासमोर तो क्षण मांडू पाहणारे आपले शब्द मात्र बापुडे, केविलवाणे, निःशब्द होऊन जातात. माझ्या तोकड्या भाषा सौष्ठव्यावर कसे पेलावेत त्यांना? जाऊ देत, हात टेकून मी त्या चित्रफितीचा URL सोबत जोडतो. मिळालेल्या आपापल्या जाणीवा, अनुभूतींनुसार तिला बघा. शेवटी निजधामास जातानाही तो असाच अव्यक्त राहून, ऑर्गनच्या सुरांनिशी, सरसावत आलेल्या तिच्याकडे पाहत, तिच्या समक्षच, आपल्या मित्राच्या हातात त्याची प्राणज्योत मालवतो… त्यांच्या मैत्रीच्या गाण्याच्या धुनेसह!! त्यांच्या त्या खोट्या शिक्यांच्याच जोरावर. पण त्याद्वारे त्याने दाखवलेली इन्सानियत मात्र आपल्याला सध्याच्या या प्रलयंकारी कालावधीतही लक्षात राहते, राहील, त्या खोट्या शिक्क्यासारखीच. यावेळी मात्र ती मुक्तपणे पुन्हा नव्याने विधवा झाल्यासारखी वृद्ध सासर्‍याच्या छातीवर असहाय्यपणे कोसळते. मावळत्या दिनकराच्या सायंप्रकाशात त्या हवेलीच्या आवारातच त्याला डाग देण्यात येतो, त्याच्याच आवडत्या सुरावटीत. कॅमेरा १८० कोनातून फिरून ती उभी असलेल्या तिच्या पहिल्या मजल्यावरील कोपर्‍यातल्या खोलीच्या खिडकीवर स्थिरावतो. मनावर दगड ठेऊन, त्याच्या विझण्याची वाट न बघता भडाग्नीकडे शेवटचा दृष्टिक्षेप टाकून ती खिडकी बंद करून टाकते… त्याच्या स्मृतींसह आपल्या मनाच्या अतिशय खाजगी विधवाश्रमात ती प्रवेश करते. शीर्षक धुनेसह रेल्वे फलाटावर सुरु झालेला हा चित्रपट, सूडाचा प्रवास संपल्यावर त्याच ललकारीसह रेल्वे फलाटावरच संपतो. त्यांच्या प्रेमाचा धागा बनलेली त्या ऑर्गनची अविस्मरणीय सुरावट आणि मैत्रीचे राष्ट्रगीत बनलेले त्या चोर मित्रांचे गाणे हयातभर आपल्या कानात गुंजत राहणार असते हे मात्र नक्की. (समाप्त)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -