घरफिचर्सनिसटलेल्या प्रयोगांचा शोध !

निसटलेल्या प्रयोगांचा शोध !

Subscribe

भारतात सर्वदूर अगदी देशाच्या कानाकोपर्‍यात नाटक खेळले जाते. पाहिले जाते. त्यावर चर्चा केल्या जातात. अभिप्रायांचे आदानप्रदान होते. त्याच्या शिफारशी देशभरातल्या नाट्यवर्तुळात केल्या जातात. पण बर्‍याचदा ते नाट्यवर्तुळात असलेल्या लोकांपुरते सीमित राहते. नाटकाचा प्रेक्षक जो या वर्तुळाच्या बाहेरचा असतो, त्याच्यापर्यंत या सगळ्या घडामोडी नेहमीच पोहचतात असे नाही. म्हणजे बंगाल आणि ओदिशामध्ये खेळले गेलेले नाटक महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचले असेलच असे नाही. या सदरलेखनाच्या मालिकेत, आपण या निसटून जाऊ शकणार्‍या घडामोडींचा, नाटकाच्या प्रयोगांचा आढावा म्हणा, बित्तंबातमी म्हणा, गोषवारा म्हणा वा विश्लेषण म्हणा...करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

1 जानेवारी 2020 या दिवशी आपण सगळ्यांनी नव्या दशकाच्या उंबरठ्यावर पाय ठेवले. त्यावेळी साहजिकच आपण सारे सरत्या दशकातल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणातल्या घडून गेलेल्या घटनांचा आपल्यावर झालेल्या साधकबाधक परिणामांचा विचार करण्यात आणि आढावा घेण्यात मग्न असू. त्याचवेळेस, येणारे दशक आपल्यासाठी काय नवे घेऊन येणार आहे याची उत्सुकता आणि कुतूहलही आपल्या मनात नक्कीच चाळवले असेल. या पर्यावरणांतले एक अंग म्हणजे आपण राहत असलेलं आणि आपल्या सभोवतालचं सांस्कृतिक विश्व होय. आणि या सांस्कृतिक विश्वाचा एक अविभाज्य घटक म्हणजे नाटक. असं म्हटलं जातं की नाटकासारख्या दृकश्राव्य कलेचा माणसाच्या सांस्कृतिक वाढीत आणि भरणपोषणात कायमच महत्वाचा वाटा राहिलेला आहे. त्यातही भारतासारख्या खंडप्राय आणि प्राचीन संस्कृतीचा अमूल्य वारसा लाभलेल्या देशात नाटकाविषयीचे दाखले आणि इथल्या माणसांचे पिढ्यानपिढ्या या कलेवरील असलेले प्रेम, नाटक या इथल्या जनमानसात किती खोल रूजलेले आहे, हेच दाखवून देते.

भारतात सर्वदूर अगदी देशाच्या कानाकोप-यात नाटक खेळले जाते. पाहिले जाते. त्यावर चर्चा केल्या जातात. अभिप्रायांचे आदानप्रदान होते. त्याच्या शिफारशी देशभरातल्या नाट्यवर्तुळात केल्या जातात. ठिकठिकाणच्या प्रतिष्ठित नाट्यमहोत्सवांत नाटकांचे प्रयोग केले जातात. पण ब-याचदा ते नाट्यवर्तुळात असलेल्या लोकांपुरते सीमित राहते. नाटकाचा प्रेक्षक जो या वर्तुळाच्या बाहेरचा असतो, परंतु या कलेचा मूळातच एक अविभाज्य घटक असतो, त्याच्यापर्यंत या सगळ्या घडामोडी नेहमीच पोहचतात असे नाही. म्हणजे बंगाल आणि ओदिशामध्ये खेळले गेलेले नाटक महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचले असेलच असे नाही. या सदरलेखनाच्या मालिकेत, आपण या निसटून जाऊ शकणा-या घडामोडींचा, नाटकाच्या प्रयोगांचा आढावा म्हणा, बित्तंबातमी म्हणा, गोषवारा म्हणा वा विश्लेषण म्हणा…करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

- Advertisement -

समीक्षेच्या अंगाने हे लिखाण करायचे नसले तरी, नाटक या कलेतल्या सौंदर्यस्थळांचा वेध घेण्याचा प्रयत्न हा या सदरलेखनाचा प्रमुख हेतू आहे. असा वेध घेण्याचे प्रमुख माध्यम असेल ते अर्थातच सद्य:काळात देशभरातल्या रंगभूमीवर केले जाणारे विविध भाषांमधले विविध नाटकांचे प्रयोग. त्यात उत्तरेपासून दिल्ली ते दक्षिणेपर्यंत तंजावूर आणि पूर्वेपासून बंगाल ते पश्चिमेपर्यंत महाराष्ट्र अशा एकमेकांना छेदत जाणा-या भौगोलिक पट्ट्यात खेळली जाणारे नाटके तर असतीलच. शिवाय, सद्य:काळी मराठीतल्या व्यावसायिक तसंच प्रायोगिक अथवा समांतर रंगभूमीवर सुरू असलेल्या नाटकांचाही समावेश तितकाच प्रामुख्याने असेल. या प्रयत्नातून मला लाभेल तो लिखाणाचा आनंद तुम्हा वाचकांसोबत वाटून घेण्यासाठी दैनिक ‘आपलं महानगर’ने ही संधी आणि या सदरासाठी जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे पहिल्याप्रथम आणि मन:पूर्वक आभार मानतो.

या सदरात जे लिखाण होईल त्याचा एक साधारणसा अंदाज वाचकांच्या ध्यानात यावा, याकरता प्रसिद्ध हिंदी साहित्यिक दिवंगत डॉ. धर्मवीर भारतींच्या ‘अंधा युग’ या कालत्रयी नाटकाच्या त्यांनीच लिहिलेल्या प्रस्तावनेतला एक वेचा इथे उद्धृत करावासा वाटतो आहे. नाट्यलेखनाच्या प्रक्रियेतलं त्यांना नाटककार म्हणून जाणवलेलं मर्म आणि ते कागदावर उतरून काढतानाची त्यांची वेदना ते अगदी नेमक्या शब्दांत मांडतात. डॉ. भारती म्हणतात, ‘एक नशा असते. अंधाराच्या उधाणलेल्या समुद्राचे आव्हान स्वीकारण्यात. पर्वताकार लाटांशी झुंजण्यात. समुद्राचा मोजता न येणारा तळ गाठण्यात…आणि मग हे सगळे धोके पत्करत आस्थेचे, प्रकाशाचे, सत्य आणि मर्यादेचे काही कण गोळा करून त्यांना लाटांत वाहू जाऊ न देता जमिनीवर आणून पसरून ठेवण्यात. या नशेत इतकी तीव्र वेदना आणि इतके तिखटजाळ सुख मिसळलेलं असतं की त्याच्या आस्वादनासाठी मन ताब्यात राहत नाही. या वेदने आणि सुखाची उपलब्धी होण्याकरताच हे नाटक माझ्याकडून लिहिले गेले. हे एक व्यापक सत्य आहे ज्याची वैयक्तिक उपलब्धी मी केलीय. ती पुन्हा व्यापक व्हावी यातच तिची मर्यादा आहे.’

- Advertisement -

नाटककार म्हणून डॉ. धर्मवीर भारतींना नाटकाच्या लेखनप्रक्रियेविषयी जे वाटते ते त्यांनी खूप नेमक्या शब्दांत मांडले आहे. नाट्यकलेतल्या ‘लेखन’ या विधेचे सौंदर्यस्थळ त्यांनी किती अनुरूप शब्दांत मांडले आहे, हे वरील वेचा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. या नाटकाचे प्रयोग सध्या कुठे होत असले किंवा नसले तरी, कुठल्या ना कुठल्या नाट्यप्रशिक्षण केंद्रातले विद्यार्थी असोत वा देशभरातील कुठलीही व्यावसायिक किंवा हौशी नाट्यसंस्था असो…त्यांनी ‘अंधा युग’ला आपल्या कारकीर्दीत रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न कधी ना कधी केला आहे. या नाटकाची लिखित संहिता मात्र उपलब्ध आहे. या लेखाच्या निमित्ताने आपल्यापैकी जिज्ञासू वाचकांनी ‘अंधा युग’ची संहिता मिळवून तिचे आपल्यापुरते वाचन केले, तर एका सशक्त काव्यनाट्याचा अनुभव घेचल्यावाचून ते राहणार नाहीत, याबद्दल मला खात्री आहे. मराठीतील श्रेष्ठ नाटककार चिं. त्र्यं. खानोलकरांनीही या नाटकाचा ‘अंध युग’ या नावाने मराठीत अनुवाद केला आहे.

मी वर उल्लेख केला आहे ते नाटकातली सौंदर्यस्थळे शोधण्याचा, त्यांचा वेध घेण्याचा जो प्रयत्न आपण या सदरातून करणार आहोत, त्याची दिशा स्पष्ट होण्यासाठी मला ‘अंधा युग’च्या प्रस्तावनेतल्या या वेच्यापेक्षा अधिक समर्पक काही दिसत नाही. फरक झालाच तर तो नाटकाच्या वेगवेगळ्या विधांचा परामर्श घेताना जी नाटके आणि त्यांचे प्रयोग तसेच ज्या नाट्यविषयक घडामोडी आपण लक्षात घेऊ त्यांचा असेल. या सदरलेखनाचे साधारण स्वरूप हे असे असले तरी त्यात वैविध्य आणण्याचाही आपला प्रयत्न असेल.

तूर्तास, नाटकातल्याच एका श्लोकाचा उल्लेख करत या सदराचा प्रारंभ करूया,

नारायणम नमस्कृत्य नरम चैव नरोत्तमम ।
देवीम सरस्वतीम व्यासम ततो जयमुदीयरेत ॥

पुन्हा एकदा सगळ्या वाचकांना नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

-समीर दळवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -