घरफिचर्सदुःखानुभूतीचा आत्मशोध

दुःखानुभूतीचा आत्मशोध

Subscribe

अनुराधा पाटलांच्या काव्यप्रवासाचा विचार करता काही काळ नियतकालिकांतून त्यांची कविता अवतरली. त्यानंतर ‘दिगंत’ (1981) या पहिल्या संग्रहाच्या रूपाने वाचकांच्या, जाणकारांच्या पसंतीस उतरली. त्या नंतरच्या ‘तरीही’ (1985) या द्वितीय संग्रहाने तर स्त्री दुःखाच्या आदिम तत्वांचा शोध घेत संयतपणे मानवी मनाचा तळ गाठला. अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजनूही’ या कवितासंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यानिमित्त त्यांच्या विविध काव्यसंग्रहांचा घेतलेला आढावा.

अनुराधा पाटील हे मराठी कवितेत गेली तीन/साडेतीन दशके चर्चेत असणारे आश्वासक नाव आहे. एकूण भारतीय
भाषेतील वर्तमान स्त्रियांच्या कवितेच्या पातळीवर विचार करता स्त्रीनिष्ठ अनुभवांचे बहुपदरी दुःखाचे प्रतिमांकन आणि
लयबद्ध भाषिक प्रकटीकरण अव्याहतपणे व अगदी तरल भावोत्कटपणे येणारी कविता म्हणून अनुराधा पाटलांची कविता
वेगळी ठरते किंवा चर्चेत असते. ‘कविता’ हेच आपलं सर्वस्व किंवा तिच्याशी हृदयस्थ नातं निर्माण करून स्त्रीनिष्ठ संवेदना आणि स्त्रीच्या अस्तित्वभानाचे असंख्य पदर बेमालूपणे उकलत जाणारी अनुराधा पाटलांची कविता उच्च पातळीवरचा कलात्मक अविष्कार आहे.

अनुराधा पाटलांच्या काव्यप्रवासाचा विचार करता काही काळ नियतकालिकांतून त्यांची कविता अवतरली. त्यानंतर ‘दिगंत’ (1981) या पहिल्या संग्रहाच्या रूपाने वाचकांच्या, जाणकारांच्या पसंतीस उतरली. त्या नंतरच्या ‘तरीही’ (1985) या द्वितीय संग्रहाने तर स्त्री दुःखाच्या आदिम तत्वांचा शोध घेत संयतपणे मानवी मनाचा तळ गाठला. लयबद्ध रचना आणि तरल भावस्पर्शी संवेदन व प्रवाही ग्रामीण प्रतिमांची भाषाशैली त्यामुळे यातील कविता मनाला भावली.

- Advertisement -

‘दिवसेंदिवस’ (1992) या कवितेचा पोत आणखी प्रगल्भ होत गेला. ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ (2005) मराठी
भाषेतील कविकुळात त्यांची कविता स्वतंत्र प्रतिभेची कविता आहे हे सिद्ध करून गेला. अनुराधा बाईंच्या तिन्ही कविता
संग्रहातील कवितांमध्ये काही एक अंतस्थ समानसूत्र, प्रतिमांची प्रभावी वापर पण तितकीच सहज सुंदर भाषा, आशयाचे
साधर्म्य असले तरी इतर मराठी कवयित्रींप्रमाणे कोणत्याही प्रकारचा अनुकरणाचा लवलेश शोधून सापडत नाही. त्यांची
कविता ‘स्वतंत्र’ चेहर्‍यांची आहे. हे या संग्रहाने सिद्ध केले.

परंतु मध्यंतरी पुन्हा दशकभर वाचकांना कवितेची वाट पाहायला लावल्यानंतर आता ‘कदाचित अजूनही’
(2017) बरीच कविता बाकी आहे हा आशावाद त्या निर्माणकर्त्या झाल्या. आणि पुन्हा एकदा एक श्रेष्ठत्तर काव्यसंग्रहाची भर त्यांनी मराठी कवितेत घातली गेली. गेली तीन दशकं मराठी कवितेच्या केंद्राभोवती स्थिरावलेले हे नाव या संग्रहातील कवितेत आणखी बराच काळ चर्चेला परीघ व्यापून राहील व आजच्या मराठीच्या कवितेच्या केंद्रस्थानी अनुराधा पाटलांची कविता आणण्याचे कार्य हा नवा संग्रह येत्या काळात करेल यात शंका नाही.

- Advertisement -

‘कदाचित अजूनही’ या 51 आशयघन कवितांच्या संग्रहात अंत:करणात खोलवर रूतलेल्या बाईंपणाच्या दुःखाच्या कविता आहेत. या कवितेत ‘स्त्रीवादी’ धाटणीचा अभिनिवेश, आक्रोश, अथवा बंडखोरीची भाषा नाही, तर
अंतर्मनाला पडलेले ‘चर’ व ‘बाई’ पणाच्या दुःखाची बोचत असणारी ‘सल’ यांचा संयत आविष्कार आहे. यातील कविता
अजिंठ्याच्या डोंगर रांगेतील रूपदृष्ठ्या सुंदर कोरीव लेणी आहे. ती तशी चेतनच परंतु निर्जीवपणे ती त्या डोंगरातील
पाषणाशी ‘तादाम्य’ पावून पचवत राहते निसर्ग बदलेल तसे दुःखाचे ‘कड’, तिला माहीत असते. आपण आहोत मूर्तीमंत
सौदर्यांचा आणि नवसृजनाचा कलात्मक आविष्कार, बाह्य शरीरधर्माने; पण अंतर्मनात जाणीव असते की आपणही आहोत.

निखळ ‘माणूस’; पण हाच माणूसधर्म पडत नाही लागू जेव्हा ‘बाई’ म्हणून वाट्याला येतो ‘भोगवटा’ निरंतर. मग सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते आजतागायत फक्त वाहवत जावं लागत ‘ओझ’ बाई असण्याचे, पण भेटत नाही ‘माणूस’ म्हणून वागणूक तेव्हा ‘कविता’च बनते अस्तित्वाची ‘रेषा’ शेवटची आणि प्राकत्ताने पदरात घातलेल्या दुःखाची ‘परिभाषा’. आपल्याच करूण दुःखावर एक एक सूक्त रचवित तसे शब्द येतात आतून, तयार होते एक कवितेचे ‘चित्रशिल्प’ आखीव, रेखीव अर्थवाही व दुःखाची नवी प्रतिमांकित ‘परिभाषा’ घेते आकार. चित्राची आणि दुःखाची भाषा अवगत करूनच तपासावे लागतात ‘बाईपणाचे’ अदिबंध, जैविक गरजांच्या पलिकडे शिल्लक नसते तिचे ‘माणूस’ म्हणून अस्तित्व म्हणून कवितेतूनच घ्यावा लागतो दुःखाच्या कारणांचा शोध.

भुकेला लाज नसते
अन् बाईच्या चमड्याला
जात म्हणत
तू वावरलीस मुकाट
गायीच्या करूण डोळ्यांनी
हयातभर
जिथं चुलीतल्या जाळाच्या
उजेडात दिसेल
तेवढंच जग तुझं होतं

या अनादी काळाच्या दुःखाची भाषा बोलते कविता हा प्रवास असतो आत्मशोधाचा पण हा ‘आत्मशोध’ स्वकडून समष्टीकडे जातो. कविता ‘स्व’ केंद्रीत जाणिवांचे वर्तुळ स्वतःभोवती आखताना दिसत असली तरी या कवितेचे ‘समूहभान’ व्यापक आहे. आत्मशोधाच्या या प्रवासाचे माध्यम आहे ‘कविता’, शब्दांच्या पलिकडच्या जगात स्थानच नाही बाईच्या दुःखाला. फक्त कवितेची भुई इतकेच शिल्लक उरलेले अस्तित्व. ही प्रगल्भ जाणीव व्यक्त करताना कवयित्री म्हणते.

आता तुझा पैस ओलांडून
मला नुसतं
कवितेत तरी राहू दे
निदान तळटीप बनून राहता येईल
एवढी तरी भुई
माझ्या वाट्याला येवू दे

अनुराधा पाटलांच्या कवितेला विशेष असा की निवेदनाच्या पातळीवर एक ‘नायिका’ स्वतःशी दीर्घ आत्मसंवाद साधते. तर कधी आपल्याच दुःखभोगाचा आलेख चितारत कल्पनेतल्या पुरुषाशी संवाद साधीत व्यक्त होते. याच भावात्म पातळीवरून पुरूषसत्ताक व्यवस्था आणि बाईच्या बहुपदरी शोषणाचे संदर्भ प्रकट होतात. कोणतेही अपत्य जन्मतः ‘माणूस’ म्हणून जन्म घेते. परंतु लिंगधिष्ठीत जाणिवेतून जेव्हा त्याकडे पाहिले जाते. तेव्हापासून समाजाची दृष्टी बदलते. दृष्टीदोष झाल्याप्रमाणे माणसं बाईकडे ‘माणूस’ म्हणून न पाहता ‘वस्तू’ म्हणून पाहू लागले की समुहात बाईची घुसमट सुरू होते. अगदी अनादी काळापासून पुरूषप्रधान संस्कृतीकडून होणारा हा अन्याय, अत्याचार काळ बदलला तरी नित्याचाच. ‘बाई’च्या जातीला मूकपणे हे सहन करणे या पलिकडे पर्याय नाही. म्हणून कवयित्री म्हणते.

आपल्याला नव्हती लिपी
आपली भाषाही नव्हती
नव्हता कसला उच्चार
आपल्या तोंडी इतरांसाठी
आणि अजूनही आपल्या भूर्जपत्रांवर
पसरून आहे काळोख
नशिबासारखा

‘स्त्री’ जातीच्या अस्तित्वाची यातनामय व तितकेच धारदार दुःखद अनुभूतीचे अविष्करण हाच अनुराधाबाईंच्या कवितेचा स्थायीभाव आहे. या संग्रहात 51 कविता आहेत. प्रत्येक कवितेचे स्वयंभू अस्तित्व आहे. मात्र सर्व कविता एका अंतःसूत्रात एकसंध आहेत. हे अंतःस्थ सूत्र कोणते तर ‘बाई’ पणाचे अंतहीन दुःख. त्यामुळे संपूर्ण संग्रह एक दीर्घ कविता वाटतो. आपल्याला हवे असणारे जगणे आपल्या नशिबी न आल्यामुळे वाट्याला आलेले अनिवार्य दुःख कवटाळीत मनात आवंढा गिळीत क्षणोक्षणी झुरत राहणे हेच ‘संचित’ ज्या बाईच्या वाट्याला येते त्या स्त्रीजीवनाचा उद्गार या संग्रहातील कविता होतात. आणि म्हणूनच ही कविता व्यक्तिगत जाणिवेची अधिक वाटते.

एकूणच भाषिक सौंदर्य आशयाची सकसता, स्त्री दुःखाचे बहुविध पदर, त्याचे सनातन सांस्कृतिक बंध, कवितेविषयी मनात दाटून असणारी आस्था, उत्पत्ती-स्थिती-लय या अवस्थांपासूनचे चिंतनशील संवेदन या संग्रहातून तरल व लयबद्धरित्या व त्या भावस्पर्शीपणे प्रकटते. म्हणूनच स्वतःशी आत्मसंवाद साधीत घेतलेला आत्मशोध म्हणून ‘कदाचित अजूनही’ या संग्रहाकडे पाहता येईल.

नकाशावर न सापडणार्‍या
गावांच्या वाटा तुडवत
चालीत म्हणत होते
जिथं हरवलेली असते
कुणाची शाळा/कुणाची भाषा
तर कुठं मुलंच हरवलेली
ज्याचीं पाटी
फुटलेलीच असते अटळ
ही हरवणारी लढाई
लढताना …….
या मलपृष्ठावरील ओळी आपणास याची साक्ष देण्यास पुरेशा आहेत!

-प्रा. डॉ. गणेश मोहिते
-बलभीम महाविद्यालय, बीड
-वी.सरोहळींशऽसारळश्र.लेा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -