घरफिचर्सतिचं काय, घरीच तर असते! (?)

तिचं काय, घरीच तर असते! (?)

Subscribe

कर्नाटक उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान नुकतेच गृहिणीसुद्धा नोकरदार महिलांइतक्याच व्यस्त असतात, त्यामुळे त्यांना योग्य सुविधा, सन्मानही मिळायलाच हवा.ङ्क असे खडे बोल समाजाला सुनावलेत. त्या औचित्याने मुंबईतल्या काही स्त्रियांचे मानस जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न

तू दिवसभर घरात बसून नक्की काय करतेस? काय, काम काय असतं गं तुला? हे वाक्य कदाचित बऱ्याच गृहिणींच्या सवयीचं असेल. कधी चिडून, कधी ओरडून, कधी ‘गंमतीत,कधी हेटाळणी म्हणून हा प्रश्न बाईला सामोरा येतो. मग बाई कधी निमूट बसते, कधी उद्वेगानं आपल्या अखंड चालणाऱ्या अदृश्य कामांचा पाढा वाचते, कधी नेमक्या शब्दांत प्रत्युत्तर देते. पण शेवटी ‘घरी बसलेली बाई, म्हणजे काम नसलेली बाई’ हा समाजपुरुषाच्या मनातला घट्ट समज काही निवळत नाही. अजूनच गंभीर विरोधाभास काय, तर एखाद्या गृहिणीला ‘तुम्ही काय करता? असं विचारल्यावर उत्तर येतं, ‘काही नाही, घरीच असते मी!

- Advertisement -

तसा एरवी चुकूनही ऐरणीवर न येणारा हा विषय मागच्या काही आठवड्यात थोडाफार चर्चेत आला. झालं काय? तर कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकतेच ‘गृहिणीसुद्धा नोकरदार महिलांइतक्याच व्यस्त असतात. असे खडे बोल समाजाला सुनावलेत. निमित्त झालं ते एका खटल्याच्या सुनावणीचं. मिरतमधील गौरव आणि श्वेतानं २००९ साली विवाह केला. श्वेता गृहिणी आहे. दोघांमध्ये वाढलेल्या विसंवादातून गौरवने घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यावेळी गौरव बेंगळुरमध्ये तर श्वेता यूपीत मुजफ्फरनगरला राहायची. तिला कौटुंबिक न्यायालयात चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीसाठी सतत बंगळूरला यावं लागायचं. तिनं न्यायालयाकडे ‘गौरवने मला विमानप्रवासासाठी आवश्यक ती रक्कम द्यावी अशी मागणी केली. त्यावर ‘ही मागणी अनाठायी असून गृहिणींना पुष्कळ फावला वेळ असतो असे म्हणत गौरवने विमानाचे भाडे द्यायला असहमती दर्शवली. त्यावर न्यायालयाने गौरवला विमानभाडे द्यायला बाध्य करत वर सांगितलेले खडे बोल सुनावले. ते केवळ गौरवला नाही, तर पुरुषी चष्म्यातून भारतीय गृहिणींना जोखणाऱ्या प्रत्येकाला आरसा दाखवणारे आहेत.

आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या या काळातही बिनमोल श्रम करणाऱ्या गृहिणींना किमान आदर मिळत नाही. तिच्या बिनमोल श्रमांची चर्चा अधूनमधून काही स्वयंसेवी संस्था किंवा एखादी महिला लोकप्रतिनिधी करते. ‘गृहिणींनाही पगार मिळायला हवा अशा मागण्या जोर धरतात. पण पुढं काहीच घडत नाही.

- Advertisement -

खरं तर पुरुष असो वा स्त्री, प्रत्येकाला सन्मान प्रिय असतो. प्रत्येकाच्या कामाला सन्मान मिळणं हा त्याचा हक्कच आहे. बाई नोकरदार असो, की गृहिणी, तिच्या वरील संसारिक जबाबदाऱ्या काही फार भिन्न नाहीत. नोकरदार बाईची घरातील पारंपरिक भूमिका आजही तशीच आहे. तिने नवरा, मुलगा, सासू-सासऱ्यांची देखभाल करावी, घरकाम करावे, आर्थिक अडचण असली तरच नोकरी करावी, घरच्यांची गैरसोय होत असली तर किंवा बाळाच्या जन्मानंतर झटक्यात नोकरी सोडून द्यावी. व्यावसायिक जगात जरी तिच्या जबाबदाऱ्या वाढल्या तरी तिने घरकामालाच प्राधान्य द्यावे असा दृष्टीकोन बऱ्याच लोकांचा असतो. अजूनही संसार का करिअर? असे पर्याय म्हणूनच स्त्रियांसमोर ठेवले जातात. बाईच्या करियरिस्टिक असण्याकडे व्यक्तिगत प्रगतीचा स्वाभाविक भाग म्हणून बघितले जात नाही. त्यातल्या त्यात ती गृहिणी असेल तर तिला मिळणाऱ्या आदराचा स्तर अजूनही खाली घसरतो. याला अपवाद असतीलच, पण ते केवळ नियम सिद्ध करण्यापुरते. काही प्रातिनिधिक मनोगतं त्यासंदर्भाने पुरेशी बोलकी आहेत.

सिंगल मदर असलेल्या डॉ. विनया कुलकर्णी म्हणतात, अनेकदा समाज गृहिणीला आदर देत नाही. पण सोबतच ज्या पोटच्या मुलांसाठी तुम्ही धावपळ करता त्यांना त्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही. एका आईची, संसारी स्त्रीची भूमिका निभावताना कुटुंबातल्या सदस्यांनी पुरेशी प्रतिष्ठा दिली तरच त्या स्त्रीला कार्यरत राहण्याची ऊर्जा मिळते. निधी कुडाळकर यांची भावनाही काही वेगळी नाही. त्या म्हणतात, ‘लग्न करून आल्यानंतर अगदी माहेरच्या नावापासून सगळ्याच गोष्टी बदलतात. तो बदल नंतर कळत-नकळत अंगवळणी पाडून घेतला जातो. ‘मी घेतलेल्या शिक्षणाचा काय फायदा? असं बऱ्याचदा मला गृहिणी म्हणून वाटतं. पण मी नोकरी न करता घरात जे काही करते, संसार सुरळीत चालावा म्हणून झटते त्याची जाणीव माहेरच्या आणि सासरच्या लोकांना असावी, आदर असायला हवा ही अपेक्षा अगदीच रास्त आहे. नाहीतर अस्वस्थता, उद्विग्नता येते. आपण इतकी मेहनत करतोय त्याचा काय फायदा? असं मनोमन वाटतं. जर मी घरात नीट सगळं नाही सावरलं तर माझा नवरा बिनधास्त बाहेर जाऊन काम करू शकेल का? त्यामुळे मी जरी गृहिणी असेन तरी प्रत्येकाने माझ्या कष्टांचा आदर केलाच पाहिजे. नोकरी आणि संसार अशी तारेवरची कसरत लीलया करणाऱ्या श्रद्धा मेश्राम यांच्याशी बोलताना मी भारतातल्या सशक्त, यशस्वी महिलांविषयी बोलताना ज्यांचे चेहरे लगोलग नजरेसमोर येतात त्यापैकी एक म्हणजे इंद्रा नुयी. इंद्राजींनी एका मुलाखतीत शेअर केलेला एक खासगी अनुभव मी श्रद्धाला सांगितला. इंद्राजींची निवड ‘पेप्सिकोच्या सीइओपदी झाली तेव्हा कार्यालयात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाल्या. त्या स्वीकारून काम आटपल्यावर त्या घरी पोचल्या. दारात उभ्या असलेल्या आईला त्यांनी उत्साहात आनंदाची बातमी सांगितली. त्यावर अगदीच थंड प्रतिसाद देत आईनं त्यांना ‘घरात येण्याआधी दुधाची पिशवी आण, असं सांगितलं. वर बजावलं, ‘हे बघ, तू घराबाहेर कितीही मोठं पद, सन्मान मिळव, पण घरात येण्याआधी तो मिरवत असलेला मुकुट खाली गॅरेजमध्येच ठेऊन येत जा. कारण घरात आल्यावर तू फक्त एक मुलगी, एक पत्नी किंवा एक आई असतेस.‘ यावर श्रद्धा म्हणाल्या, ‘आयकॉन बनलेल्या ‘करियर वूमन’सकट एखाद्या बिनचेहऱ्याच्या नोकरदार स्त्रीपर्यंत सगळ्याजणींना हे ऐकावच लागत. आता माझ्यासारख्या काहीजणींना माहेर आणि सासर या दोघांचाही पाठिंबा आणि सन्मानही मिळतो. घरच्यांसाठी सगळ्या गोष्टी करून डोंबिवलीवरून मुंबईत कामाला यायची रोजची तारांबळ खरंच दमछाक करणारी असते. पण घर आणि कार्यालयातही समजून घेणारी माणसं असतील तर या गोष्टी कितीही त्रासदायक असल्या तरीही उत्साहाने केल्या जातात. काम करणं आवश्यक आहे, त्यामुळे नोकरी सोडून घरात बसता येत नाही. त्यामुळे समाजाचा दृष्टिकोन बदलायलाच पाहिजे.

काय असतो मुंबईतल्या स्त्रियांचा दिनक्रम?

मुंबई हे रात्रंदिवस धावतं शहर आहे. इथल्या महिला सर्वार्थाने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. यापैकी बऱ्याच गृहिणींचा दिवस सुरु होतो तो पहाटे ४ ला येणाऱ्या पालिकेने सोडलेल्या पाण्याचा साठा करण्याने. केवळ एक तासात येणाऱ्या या पाण्यामध्ये घरातील सर्व भांडी पाण्याने भरणे, नळात कपडे धुणे, स्वतःची आन्हिकं आटपून घेणे. त्यानंतर नवरा कामासाठी निघणार म्हणून त्याच्यासकट सगळ्यांचं जेवण बनवणे, डबे भरून देणे, घरात जर मूल असेल तर त्यांच्या शाळेची तयारी करणे, घरातील थोरामोठ्यांना हवा-नको बघणे यामध्ये तिला तब्येतीत नाश्ता करायलादेखील वेळ नसतो. सर्व आटपेपर्यंत मूलं शाळेतून येण्याची वेळ होते. त्यांचं दुपारचं जेवण, अभ्यास, त्यांना क्लासला सोडणे – आणणे, त्यांना रोज वेगवेगळा संध्याकाळचा नाश्ता बनवणे, परत रात्रीचं गरमागरम जेवण बनवणे, भांडी घासून आवरणे आणि हे सगळं करताना तिचा दिवस संपेपर्यंत साधारण रात्रीचे १२ वाजलेले असतातच. जमिनीला पाठ टेकण्याआधी दुसèया दिवशीची पूर्वतयारी असतेच! तर बऱ्याच गृहिणी हे सगळं करतानाच घराला हातभार लागावा म्हणून घरातूनच काही वेगवेगळी कामं, लघुउद्योगही करत असतात. त्यामुळे त्यामध्ये जाणारा वेळ वेगळाच. तर यामध्ये महिलांना त्यांचा स्वतःचा-स्वात:साठी असा कोणता वेळ नक्की मिळतो?

नोकरदार महिलेचा दिनक्रम तर याहून जास्त तारांबळीचा. घरातलं सगळं आटोपून मुंबईच्या धकाधकीच्या लोकलमध्ये सेकंदांचे हिशेब करत वेळेत नोकरीच्या ठिकाणी पोचणं. झालेली दमछाक चेहऱ्यावर दिसू न देता ८ ते ९ तास सतत कार्यालयात काम करणं, त्यानंतर विशिष्ट लोकल पकडून परत घरी येणं, परत रात्रीचं जेवण बनवणं, मुलांचा अभ्यास, घरात काय संपलं आहे काय हवं आहे हे सगळं बघणं. पावसाळ्याच्या तुंबलेल्या दिवसात हे सगळं सावरताना होणारी धावाधाव अजूनच परीक्षा पाहणारी. या सगळ्यातून एखादी लोकल सुटली तर डोक्याला होणारा ताप. कार्यालयात वरिष्ठांशी झालेली बाचाबाची आणि हे सगळं सावरून परत हसत प्रत्येक गोष्टीला सामोरं जाणं… या सगळ्या चक्रात खंड नसतो.

तर, आपल्या भवतालात हा सगळा दिनक्रम आनंदानं स्वीकारत मूकपणे राबणाऱ्या स्त्रियांशी जरा बोला. तिच्या आत साचलेलं स्वगत जरा समजून घ्या. उद्या तिच्याविषयी बोलताना, काही नाही, घरीच असते! हा वाक्यप्रयोग जरी टाळता आला तरी खूप काही साध्य होईल. दोन हात दोन पाय असलेल्या साध्यासुध्या बाईला दहा हात असलेली ‘सूपरवूमन’म्हणून सादर करत तिचं शोषण करणं सगळ्यात आधी बंद झालं पाहिजे. एक गृहिणी म्हणून नाही तर माणूस म्हणून तिला जोखत समाजाने तिच्या शारीरिक-मानसिक मर्यादा समजून घेतल्या तरी आपण समाज म्हणून नक्कीच एका वरच्या इयत्तेत गेलेलो असू!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -