घरफिचर्सचंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा 'आर्मस्ट्राँग'

चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा ‘आर्मस्ट्राँग’

Subscribe

चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल उमटवणारे अमेरिकेचे सुप्रसिद्ध अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांचे ८२व्या वर्षी ओहिओ प्रांतातील सिनसिनाटी येथे निधन झाले. ५ ऑगस्ट रोजी झालेल्या वाढदिवसानंतर नील आर्मस्ट्राँग यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. २० जुलै १९६९ या दिवशी नील यांच्या रूपाने मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. अपोलो ११ नावाच्या यानातून आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरले, तेव्हा ते ३८ वर्षाचे होते.

बझ अल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या सहका-यांसोबत चार लाख किलोमीटरचा प्रवास तीन दिवसांत नील आर्मस्ट्राँग यांनी केला. या तीन दिवसांत काय होणार याच्या उत्सुकतेने तमाम पृथ्वीवासीयांच्या हृदयाचे ठोके चुकत होते. १९६१ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी याच दशकात अमेरिका माणसाला चंद्रावर उतरवून सुखरूप परत आणेल, असे आश्वासन दिले होते. रशियाबरोबर सुरू असलेल्या शीतयुद्धात त्यामुळे अमेरिकेचा हा मोठा विजय ठरला. नील यांच्यानंतर सुमारे १५ मिनिटांनी त्यांचा सहकारी अल्ड्रिनही चंद्रावर उतरला. नील यांनी चंद्रावर सुमारे २ तास ३२ मिनिटांचा काळ व्यतित केला होता. चंद्रावर अमेरिकी झेंडा फडकावून, काही दगड सोबत घेऊन आणि शास्त्रीय प्रयोगांची सुरुवात करून हे दोघे अंतराळवीर यानात परतले होते. परतल्यानंतर रेडिओद्वारे नील आर्मस्ट्राँग यांनी म्हटलेले ‘‘हे एका माणसाचे छोटेसे पाऊल आहे. पण अखिल मानवजातीसाठी खूप मोठी झेप आहे,’’ हे वाक्य अजरामर झाले आहे.

- Advertisement -

चांद्रमोहीम आणि अंतराळवीर असे वलय असूनही नंतर ते अत्यंत साधेपणानेच आयुष्य जगले. त्यांच्यासाठी काय करू, असा प्रश्न अनेकांना पडेल. त्यांना एकच सांगणे आहे.. सेवा, नम्रता आणि कामातील नैपुण्य या गुणांसाठी नेहमीच ते लक्षात राहतील. आपले आत्मचरित्र लिहावेसे त्यांना कधीच वाटत नव्हते. मात्र, अभ्यासक व लेखक जेम्स हॅन्सेन यांनी खूप पाठपुरावा केल्यानंतर आर्मस्ट्राँग यांनी आपले चरित्र लिहिण्याची परवानगी हॅन्सेन यांना दिली. या चरित्राची प्रक्रिया १९९९ च्या ऑक्टोबरमध्ये सुरु झाली. हॅन्सेन यांनी पहिल्यावेळी जेव्हा आर्मस्ट्राँग यांना पत्र लिहिले तेव्हा आपल्याला वेळ नाही सांगत आर्मस्ट्राँग यांनी त्यांना टाळले. पण हॅन्सेन यांनी आपण लिहिलेली पुस्तके आर्मस्ट्राँग यांना पाठवण्याचा सपाटा सुरु ठेवला. त्यातले एक पुस्तक आर्मस्ट्राँग यांना आवडले आणि मग त्यांनी हॅन्सेन यांना आपले चरित्र लिहिण्याची परवानगी दिली. त्यापूर्वी ही मोहिम व आर्मस्ट्राँग यांचे जीवन याच्यावर अनेक लेखकांनी लिहिले होते. मात्र, हॅन्सेन यांनी लिहिलेले हे पुस्तक चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या मानवाचे अधिकृत चरित्र ठरले. नील आर्मस्ट्राँग यांच्या या चरित्राचे नाव आहे ‘फर्स्ट मॅन : द लाईफ ऑफ नील ए. आर्मस्ट्राँग’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -