घरफिचर्सचारीत्र्यावर शिंतोडे उडवण्याचे कुसंस्कार!

चारीत्र्यावर शिंतोडे उडवण्याचे कुसंस्कार!

Subscribe

कोणताही धर्म, पंथ किंवा जात असो, त्यामध्ये एक सामायिक संस्कार शिकवला जातो. आपल्या घरातील आणि समाजातील वडीलधार्‍या माणसांचा मानसन्मान करावा, आपल्या स्वत:च्या आणि इतरांच्या आई-वडिलांचा आदर करावा. लहान वयापासून हा संस्कार प्रत्येक घरातील लहान मुलांवर होत असतो. हा संस्कार मनावर इतका कोरला जातो की, कोणत्याही पातळीवर वादविवाद झाले तरी कोणी कुणाच्या आई-वडिलांचा अनादर करत नाही. मात्र नुकत्याच पार पडलेल्या मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दुर्दैवी चित्र पहायला मिळाले. ज्यांनी समाजासमोर आदर्श उभा करायचा त्या राजकारण्यांकडून एकमेकांच्या आई-वडिलांचा जाहीर सभांमध्ये अनादर केला जात आहे. यात भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष आघाडीवर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे विद्वान, चारित्र्यसंपन्न, कार्यक्षम, कार्यकुशल अशा विविध वैशिष्ठ्यांनी ओळखले जातात, मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी यांनी देशभरात काँग्रेस पक्षाचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी त्यावेळी प्रचारात प्रतिस्पर्धी राहुल गांधी यांच्या पिढ्यांचा उद्धार करणे सुरू केले होते. मोदी यांना देशातील जनतेवर स्वत:ची छाप पाडायची होती, त्यासाठी त्यांनी ६ दशकांपासून देशातील जनतेच्या मनात घर करून असलेल्या गांधी परिवाराप्रती अविश्वास निर्माण करायचा होता. त्यामुळे त्यांनी प्रचारसभांमधून विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून राहुल गांधी यांना ‘शाहजादा’ असे संबोधित करून त्यांच्या पिढ्यांचा ‘उद्धार’ करण्याचा सपाटा लावला होता. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी या सर्वांवर त्यांनी निष्क्रियतेचा ठपका लावताना त्यांचा अनादर केला, त्यांची थट्टा केली, काहीच दिवसांमध्ये गांधी परिवारातील ही सर्व सदस्य विनोदाची पात्रे बनली, सोशल मीडियातूनही त्याला हवा देण्यात आली.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत असे काहीतरी आक्षेपार्ह चित्र निर्माण झाले होते. आधीच सलग १५ वर्षे सत्ता भोगल्यानंतर जनमानसात काँग्रेसप्रती निर्माण झालेली नकारात्मकतेची लाट याचा पुरेपूर फायदा घेत मोदी यांनी या संधीचा फायदा घेत ६ दशकांपासून या देशावर गारुड घालणार्‍या गांधी परिवाराची प्रतिमा जनमानसाच्या मनातून उद्ध्वस्त करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी त्यावेळी त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून गांधी परिवाराची चौथी पिढी राहुल गांधी हे होते, जे राजकारण आणि समाजकारणात मोदींच्या तुलनेत अगदीच बाल्यावस्थेत वाटत होते, त्याचा त्यांनी पुरेपूर वापर केला. पंडित नेहरूंपासून ते राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यापर्यंत झालेल्या चुकांबाबत मोदी वारंवार राहुल गांधी प्रचारसभांमधून जाब विचारत राहिले, त्यावेळी काँग्रेसच्या पिढ्यांकडून झालेल्या चुकांची जंत्री जोरकसपणे वाचत राहिले. अशा प्रकारे भारतीय राजकारणात नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा नवा पायंडा पाडला.

- Advertisement -

पुढच्या वर्षी याला पाच वर्षे पूर्ण होतील. मागील दोन महिन्यांपासूनच २०१९च्या लोकसभा निवडणुकीचे वारे देशाला लागले आहेत. यावेळीही मोदी यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच असणार आहेत. त्याआधी मागच्या महिन्यात मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांची विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीकडे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे या निवडणुकांमधील प्रचारही त्याच दृष्टीकोनातून झाला. प्रचारातील मुद्देही राज्यापेक्षा देशाचे अधिक होते. २०१४ च्या निवडणूक प्रचारकाळातील मोदी देशाने पुन्हा एकदा मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत पाहिले. या निवडणुकांच्या प्रचारात मात्र काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई-वडिलांचा उद्धार केला.

काँग्रेसचे नेते राज बब्बर आणि सी.पी.जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईवर टीप्पणी केली. रुपया इतका घसरला आहे की तो तुमच्या पूज्य आईच्या वयाच्या जवळ पोहोचलाय, असे विधान राज बब्बर यांनी केले होते. तर काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनण्यापूर्वी कोणीही ओळखत नव्हते. त्यांच्या वडिलांचे नावही कोणाला ठाऊक नव्हते. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी, राजीव गांधी यांच्या आई इंदिरा गांधी, इंदिरा यांचे वडील पं.जवाहरलाल नेहरू यांची नावे देशातील प्रत्येकाला माहिती आहेत, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू असले तरी त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीच माहीत नाही. गीतेत काय म्हटले आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण मोदींना हिंदुत्वाबद्दल माहिती नाही. ते नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत?, असा सवाल तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींच्या जन्मावरच अप्रत्यक्ष प्रश्नचिन्ह निर्माण केला.

- Advertisement -

याला प्रत्युत्तर म्हणून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, देशभरात नरेंद मोदी यांचा प्रभाव इतका वाढला आहे की, राहुल गांधी यांना त्यांचा धर्म आणि जात कोणती? याबद्दल ते स्वत: आणि काँग्रेस पक्ष गोंधळलेला आहे. त्यामुळे पंतप्रधानांना हिंदू असण्याचा अर्थ कळत नाही असे ते म्हणतात. अनेक वर्षे काँग्रेसने राहुल गांधींना धर्मनिरपेक्ष नेता म्हणून सादर केले; पण निवडणुका जवळ आल्यानंतर हिंदू बहुसंख्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प्रतिमा बदलली. राहुल गांधी जानवेधारी ब्राह्मण असल्याचे मला समजले. पण या जानवेधारी ब्राह्मणाचे ज्ञान इतके वाढले आहे की, आता आम्हाला हिंदू असण्याचा अर्थ त्यांच्याकडून समजून घ्यावा लागेल हे मला माहीत नव्हते. अशा प्रकारे सुषमा स्वराज यांनी राहुल गांधी यांच्या जन्मावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. विशेष म्हणजे याही परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ‘मी कोणाच्याही परिवारासंदर्भात वैयक्तिक स्वरुपातील कोणतेही टीका-टीप्पणी करत नाही. जर माझे आई-वडील राजकारणात असते तर काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार होता. माझ्या वडिलांचे 30 वर्षांपूर्वी निधन झाले. माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.

मग त्यांना राजकारणात खेचण्याचे कारण काय?, असा सवाल करत स्वत:चे रक्षण करून घेण्याचा प्रयत्न केला. परवा जेएनयुमधील विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने तर ‘नोटाबंदीच्या वेळी आपल्या ९० वर्षांच्या आईला एटीएमच्या लाईनला उभे करायला लावणारा मुलगा नरेंद्र मोदी नालायक आहेत’, अशी हीनपातळीवर टीका केली. ही बाब अधिक गंभीर आहे. कारण कन्हैय्या कुमार ही पिढी राजकारणातील पुढची पिढी आहे. मावळत्या पिढीकडून ही पिढी असा आदर्श घेत आहे. राजकारणात एकमेकांवर टीका करताना प्रतिस्पर्धाच्या कार्यकर्तृत्त्वाला धरून टिकाटिपण्णी न करता त्याच्या आई-वडिलांचा घृणास्पद उल्लेख करून त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे शिंपडण्याचा कुसंस्कार राजकारणातील नव्या पिढीवर होत असल्याचे धक्कादायक वास्तव कन्हैय्या कुमार याच्या वक्तव्यावरून दिसून आले. त्यामुळे ‘मातृ-पितृ देवो भव’ ही शिकवण आता राजकारण्यांना देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा भारतीय राजकारणाचा दर्जा इतका खालावेल की, उद्या जाहीर सभांमधून आई-बहिणींवरून शिव्या देणे सुरू झाले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण त्या दृष्टीने ही सुरुवात आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -