घरफिचर्समानवाला सक्तीची रजा की सजा!

मानवाला सक्तीची रजा की सजा!

Subscribe

एखादी व्यक्ती जेव्हा उपद्रव करू लागते किंवा काही अपराध करते तेव्हा त्याला स्थानबद्ध केले जाते किंवा सक्तीच्या रजेवर पाठवले जाते. तशीच परिस्थिती सध्या करोना विषाणूच्या प्रसारामुळे जगभरातील मानव समूहाची झालेली आहे. आपल्या बुद्धीच्या बळावर मानवाने जी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे, त्याचा उपयोग करून तो सुसाट चाललेला आहे. त्याचा भार निसर्गाला असह्य झाला आहे, त्यामुळे निसर्गाने मानवाला सक्तीच्या रजेवर पाठवले असावे. या सक्तीच्या स्थानबद्धतेमुळे मानवेतर जीवसृष्टी मात्र आनंदाने बागडताना दिसत आहे.

करोना विषाणूने सध्या जगभरात धुमाकूळ घातला असून त्याला आवरताना जगभरातील अनेक देशांची सरकारे आणि डॉक्टर्स प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. अनेक देशातील जीवशास्त्रज्ञ या विषाणूला आळा घालणारी लस शोधण्यासाठी रात्रंदिवस संशोधन करत आहेत. पण अजून तशी लस काही मिळलेली नाही, लशीबद्दल सध्या तरी शक्यताच व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे पुढील काळात प्रतिबंधात्मक उपायावरच बहुतांश भिस्त राहणार आहे, असे दिसते. आजवरचा मानवी समाजाचा इतिहास पाहिला तर यापूर्वीही विविध प्रकारच्या विषाणूंनी, रोगांनी, दुष्काळांनी मानवावर आक्रमण केलेले आहे. त्यात अनेकांचा बळी गेला आहे. त्यातून जे वाचले त्यांनी पुढचा प्रवास सुरू ठेवला. अशा प्रकारच्या आघातांना सोसत आणि त्यांचा सामना करत मानव आजवरची वाटचाल करत आलेला आहे. पण संकट अस्मानी असो अथवा सुलतानी असो, त्यात काहीजणांना आपले जीव गमवावे लागत असतात. गेलेल्यांच्या आप्तस्वकियांना त्या दु:खाचे चटके सोसावे लागत असतात.

जगात ज्यावेळी एखादी घटना म्हणजेच कार्य घडते त्यावेळी त्यामागे काही कार्यकारणभाव असतो. त्याशिवाय ते घडत नाही. जेव्हा काही गोष्टींचे आघात मानवावर होतात. त्याचा आपल्याला त्रास होतो, त्यात अनेकांचा बळी जातो, त्यावेळी त्या गोष्टी म्हणजे निसर्गाचा किंवा देवाचा कोप असाच बहुसंख्य लोकांचा समज असतो. पण तो कोप वगैरे काही नसतो, त्या मागे काहीना काही नैसर्गिक कारण असते. जसे जेव्हा आकाशात ग्रहण लागते तेव्हा ग्रहण कालावधीत देवळे बंद ठेवण्यात येतात. त्यावेळी राहू केतू त्यांनी देवांवरच अरिष्ट आणलेले आहे, असे मानले जाते. त्यामुळे देवळे बंद ठेऊन देवांना झाकले जाते. पण त्या ग्रहणामागे नैसर्गिक कारण असते. अलीकडच्या काळात एड्स, झिका, एबोला, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, सार्स, मर्स असे विविध प्रकारचे आजार आले. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ज्यावेळी एड्सचे आगमन झालेले होते, तेव्हाही अनेकांची भंबेरी उडाली होती. तो आजार हा मानवाच्या लैंगिक जीवनाशी संबंधित होता. जशी पोटाची भूक असते, तशीच लैंगिक भूक असते. ती शमवणे ही मानसिक गरज असते. त्यामुळे जेव्हा एड्स आला तेव्हा अनेकांची भलतीच कोंडी झाली. अनेकांना प्रचंड मानसिक धक्का बसला. कारण हा आजार केवळ शरीरसंबंधातूनच नव्हे तर ज्याला या रोगांची लागण झाली आहे, अशा व्यक्तींच्या रक्तांशी आपला संबंध आला तरी त्यातून आपल्याला लागण होईल, अशी भीती माणसांना वाटत होती. प्रामुख्याने या रोगांची लागण विवाहबाह्य लैंगिक संबंधातून होत असला तरी केवळ हे एकमेव कारण नव्हते. एड्स रुग्णाशी संबंध आलेली इंन्जेक्शनची सुई सामान्य व्यक्तीसाठी वापरली गेली तरी त्यातून एड्सची लागण होऊ शकते. त्यावेळी एड्सबद्दल लोकांचे अनेक गैरसमज झाले होते, तेव्हा जागृती करण्यासाठी आणि भीती घालवण्यासाठी अनेक जाहिराती आणि उपक्रम घेण्यात आले. बलबीर पाशा को एड्स क्यो हुआ, क्योंकी ओ मंजुळा के पास जाता हैं. यापासून एड्स छुने से नही फैलता, अशा जाहिराती त्यावेळी टीव्हीवर झळकत असत. आजही एड्सवर कुठेलीही प्रभावी लस निघालेली नाही, तरीही लोक आता इतक्या वर्षांनंतर त्या रोगाच्या धक्क्यातून सावरले आहेत. थोडक्यात, काय तर परिस्थितीमधील कठीणता कमी झालेली नाही, पण त्या कठीण परिस्थितीत कशी वाटचाल करायची यासाठी लोकांची मानसिकता आता तयार झाली आहे. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेऊन एड्स या आजाराला लोक सामोरे जात आहेत. एड्सनेही अनेकांचे बळी घेतले आहेत.

- Advertisement -

पण या पूर्वीच्या विषाणूंनी आणि आजारांनी जगामध्ये हाहा:कार उडवला असला तरी करोनाने जो काही उडवला आहे, तो मात्र भयंकर आहे. कारण असा अनुभव जग पहिल्यांदाच घेत आहे. कारण या आजारापुढे जगातील अनेक प्रगत देश हतबल होताना दिसत आहेत. या देशांची लोकसंख्या फार मोठी नाही. तिथे शंभर टक्के साक्षरता आहे. साधनांची मुबलकता आहे. पायाभूत सुविधा सुसज्ज आहेत. आरोग्यसेवा उच्च दर्जाची आहे. कुठल्याही आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय केले जातात. तरीही चीन, अमेरिका, इटली, स्पेन, जर्मनी, इस्त्राईल या प्रगत देशांमधील अनेकांना करोना विषाणूने ग्रासले आहे, तर अनेकांचे बळी घेतले आहेत. अजूनही हा विषाणू आवाक्यात यायला तयार नाही. भारतामध्येही या विषाणूचा प्रभाव वाढत आहे, पण अन्य प्रगत देशांच्या तुलनेत भारताने या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे, त्यात बर्‍यापैकी यश येताना दिसत आहे. भारतात लोकशाही आहे, त्यामुळे लोकांना व्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्यांची सवय आहे. चीनसारखी हम करेसो कायदा, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे लोकांच्या कलाने घ्यावे लागते. तसेच भारतामध्ये प्रामुख्याने हा आजार शहरांमध्ये पसरताना दिसत आहे. शहरांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त असते. त्यामुळे तिथे लागण होण्याचे प्रमाण जास्त असते. या रोगाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे गर्दी टाळणे हा आहे, पण जिथे लोकसंख्या मोठ्या टॉवर्समध्ये खच्चून भरलेली आहे, तिथे लोक नेहमीच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खाली उतरतात, त्यामुळे गर्दी होते. त्याचसोबत ज्या बाहेरील देशांमध्ये करोनाचा फैलाव झालेला आहे, तेथून येणारे लोक हे विमानांमधून शहरांमध्येच उतरतात, त्यामुळे पहिली लागण ही शहरांमध्ये होते. मुंबईमध्ये प्रामुख्याने विविध देशांतून लोक विमानांमधून आले. त्यामुळे इथे त्याची लागण झाली. मुंबईतील काही भाग या विषाणूचे व्हॉटस्पॉट झालेले आहेत. त्यामुळे ते बंद करण्यात आलेले आहेत. तिथे फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने काही वेळ खुली ठेवण्यात येतात.

जगभरात फैलावत असलेल्या या विषाणूच्या प्रभावाचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की, ज्या ठिकाणी मानवी जीवनाची गती जास्त आहे, त्या प्रदेशांमध्ये या विषाणूचा जास्त फटका बसताना दिसत आहे. गेल्या सव्वाशे वर्षांचा विचार केला तर मानवाने विकसित केलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानामुळे जीवनाची गती प्रचंड वाढली आहे. अत्याधुनिक संपर्क माध्यमे आणि वाहतुकीची साधने यामुळे जीवन फार गतीमान झाले आहे. इथे थांबायला कुणाला वेळ नाही, अशी परिस्थिती आहे. आपल्याकडे सर्व काही आहे, पण वेळ नाही. विशेषत: अशी स्थिती प्रगत प्रदेशांमध्ये झालेली होती. या एकूणच गतीचा भार निसर्गचक्रावर पडत आहे. या गतीमुळेच प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. करोना विषाणूची लागण होऊन अवघी मानव जात हादरून गेली आहे. हा प्रभाव असाच वाढत गेला तर आपले काय होणार याचे भीती त्यांना वाटत आहे. पण मानवेतर प्राणी मात्र जगभरातील लॉकडाऊनमुळे खूश असल्याचे दिसत आहे. माणसे, त्यांच्या वेगाने धावणार्‍या गाड्या, त्यांचे प्रचंड आवाज, सतत धडधडणारे कारखाने, त्याच्यातून निघणारा धूर, वायू, रासायनिक सांडपाणी यामुळे नद्या, समुद्र, आकाश प्रदूषित झाले आहे. अवकाशातून येणारे हानीकारक अतिनिल किरण रोखणारा ओझोनचा थर विरळ झाला आहे. पण या सगळ्याची चिंता पृथ्वीवर अतिवेगाने जीवन जगणार्‍या मानवाला नव्हती. ये दिल मांगे मोअर, असाच त्याचा हेका आहे. महात्मा गांधीजी म्हणाले होेते, निसर्ग तुमची गरज पुरवू शकतो, पण हव्यास नाही. करोना हा घातक आहे, पण निसर्गाने मानवाला वेगळ्या पद्धतीने स्थानबद्ध करून दिलेली ही शिक्षा आहे, असेच म्हणावे लागेल. त्याच्या गतीमानतेच्या अतिरेकाला लावलेला हा चाप आहे. त्याला दिलेली सक्तीची रजा आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक नद्यांचे प्रदूषण कमी झाले आहे. हवा स्वच्छ झाली आहे. लोकांना आकाशातले चंद्र, तारे स्पष्टपणे दिसू लागले आहेत. या करोनाने मानवाला खरे तर नवी दृष्टी दिली आहे, असे म्हणण्यापेक्षा मानवाचे डोळे उघडले आहेत, असे म्हणाव लागेल. कारण मानवाला निसर्गानेच निर्माण केले असले तरी त्याच्या बुद्धीचा वापर करून तो निसर्गाला डोईजड होत असेल तर मानवाला तो एका झटक्यात कसा स्थानबद्ध करू शकतो हे निसर्गाने दाखवून दिले आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -