घरफिचर्सभारतीय सैन्याची दुहेरी कसरत

भारतीय सैन्याची दुहेरी कसरत

Subscribe

करोनाचा जगभरात प्रादुर्भाव वाढत असतानाही पाकिस्तान वारंवार नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून घुसखोरांना काश्मीरमध्ये घुसविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी नियंत्रण रेषेवर विविध ठिकाणांना भेटी दिल्या. लष्कराला दक्ष राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. मात्र, तरीही पाक पुरस्कृत दहशतवादी आक्रमणे करत आहेत. एका बाजूला भारत करोनाशी लढत आहे, पाकिस्तानातही अशीच परिस्थिती आहे. मात्र, पाकिस्तान करोनाला नियंत्रणात आणण्यापेक्षा भारतात घुसखोरांना पाठवून दहशतवादी कारवाया करण्यात मग्न आहे. या दहतवाद्यांशी चार हात करताना भारतीय सैनिक शहीद होत आहेत. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर रियाझ नायकू याला ठार करून सैनिकांनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांची नांगी ठेचली आहे.

१ जानेवारीला जम्मू काश्मीरमधील नौगम सेक्टरमधील ताबारेषेवर सीमा कृती पथकाने (बॅट) दहशतवाद्यांचा हल्ला करण्याचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी झालेल्या चकमकीत दोन घुसखोर ठार झाले. ‘ते दोघेही पाकिस्तानी सौनिक असावेत,’ असा अंदाज लष्कराने व्यक्त केला. २ एप्रिलला कुपवाडा जिल्ह्यातील केरान सेक्टरजवळून काही दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच बलिदान परम धर्म या घोषवाक्याला सार्थ ठरवत हे जवान संघर्षासाठी सज्ज झाले. ३ एप्रिलच्या दिवशी त्या ठिकाणी काही हाचलाची झाल्या. गुज्जर ढोक या भागातील हालचाल निरीक्षणात आली होती. लगेचच हल्ल्याची आखणी झाली. शमशाबरी पर्वतरांगांवर ४ पॅराशूट रेजिमेंटचे हे जवान पोहोचले. तिथूनच दहशतवाद्यांवर चाल करण्याची रणनीती त्यांनी आखली. ‘धोक’मध्ये असणार्‍या दहशतवाद्यांनी शमशाबरी पर्वतरांगांवरून ४ एप्रिलला स्पेशल फोर्सच्या या जवानांच्या येण्याची गती पाहिली आणि लगेचच त्यांनी गोळीबारास सुरुवात केली. सुभेदार संजीव कुमार (हिमाचल प्रदेश), हवलदार देवेंद्र सिंह (उत्तराखंड), पॅरा ट्रूपर बाल क्रिष्णन (हिमाचल प्रदेश), अमित कुमार (उत्तराखंड) आणि छतरपाल सिंह (राजस्थान) यांनी अखेर दहशतवाद्यांवर हल्ला चढवला. त्यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्येच गोळीबारादरम्यान, सुभेदार यांना वीरमरण आलं. तर, उर्वरित चार लढवय्यांना रुग्णालयात नेत असताना आणि काहींना रुग्णालयात दाखल केल्यावर वीरमरण आले.

रियाझ नायकू गेली ८ वर्षे काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत होता. २०१२ मध्ये तो हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला आणि बुरहान वानीच्या टोळीत सामील झाला. २०१६ मध्ये बुरहान वानी ठार झाला आणि २०१८ पर्यंत त्यांची संपूर्ण गँग संपवण्यात आली. यानंतर रियाझ नायकूने हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये आपली टोळी तयार केली होती, पण नायकू ठार झाल्यानंतर गँगचेही अस्तित्व संपले आहे. पुलवामा येथील त्यांच्या गावात रियाझ नायकूची आज सुरक्षा दलाने हत्या केली. ही खूप कठीण चकमक होती. कारण रियाझ नायकू याचे स्वतःचे नेटवर्क होते, जेणेकरून त्याला सुरक्षा दलांच्या प्रत्येक हालचालींची माहिती आधीच मिळायची. म्हणूनच तो तीन वर्षे सतत वाचत आला. याशिवाय दक्षिण काश्मीरच्या भागात रियाझ नायकू याची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. सैन्य दलाचा कुठलाही खबरी सापडला की, तो त्याला आयसिसच्या पद्धतीने ठार मारत असे. सुरक्षा दले आणि जम्मू-काश्मीर पोलीस त्याच्या निशाण्यावर होते.

- Advertisement -

रियाझ नायकू भारताला बरबाद करण्याचे स्वप्न पाहत असत. परंतु, भारतातील शूर सैनिकांनी त्याला आधीच ठार केले. रियाझ नायकूच्या हत्येमुळे सैन्याने काश्मीरमधील हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कणाच मोडला आहे. कारण या दहशतवादी संघटना चालवण्याइतके आता मोठे कुणी राहिले नाही. रियाझ नायकूच्या मृत्यूमुळे काश्मीरमधील नवीन दहशतवाद्यांची भरती कमी होईल आणि गेल्या काही दिवसांपासून सैन्यावर मोठे हल्ले झाले, त्यातून सैन्याचे कमी झालेले मनोबल वाढेल. रियाझ नायकूसारखे दहशतवादी हे भारताचे शत्रू आहेत. हे अतिरेकी शहीद सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाचे गुन्हेगार आहेत. परंतु, आपल्याकडे अशा दहशतवाद्यांप्रती सहानुभूती व्यक्त करण्याचे फॅड निर्माण झाले आहे, जे मोहंमद अफझल गुरुपासून कसाब आणि बुरान वाणीपर्यंत या सर्व दहशतवादाचे गुणगान गाण्यात आले, ज्यात आता रियाझ नायकूच्या नावाचा समावेश झाला आहे, पण हे फार दुर्दैवी आहे. रियाझ नायकूच्या याबाबतीतही ही मंडळी त्याच्याप्रती सहानुभूती मिळेल अशी माहिती देत आहेत. तो गरीब टेलरचा मुलगा आहे, तर काही जण रियाझ नायकूला चित्रकलेचा छंद होता असे सांगत आहेत, कुणी त्याचा उल्लेख शिक्षक म्हणून करत आहेत.

रियाझ नायकू याला मारणे हे सुरक्षा दलासाठी मोठे आव्हान होते. कारण किमान चार वेळा तो सैन्याला चकवा देऊन निसटून गेला होता. एकदा तर सुरुंग फोडून तो सुरक्षा दलामधून निसटला होता. त्यामुळे यावेळी सुरक्षा दलाने त्याला कोणतीही संधी द्यायची नाही असा निश्चय केला. या कारणासाठी सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीरचे वरिष्ठ अधिकारी या कारवाईवर नजर ठेवून होते. वास्तविक, गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा एजन्सी रियाझ नायकूचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होती. दरम्यान, आपल्या आईला भेटण्यासाठी तो बेगपुरा गावात येऊ शकतो अशी माहिती मिळाली. मंगळवारी संध्याकाळी सुरक्षा एजन्सींना नायकू त्याच्या गावात आहे याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर घेरला.

- Advertisement -

पण सुरक्षा दलासमोर वेगळेच आव्हान होते, रियाझ भुयारी मार्ग वापरायचा. त्यातून तो पळून जाऊ नये यासाठी सुरक्षा दलाने खबरदारी घेतली होती. तो वापरणारा बोगदा शोधण्यासाठी रात्री जेसीबीच्या तीन मशीन मागवल्या आणि त्या भागातील वेगवेगळ्या ठिकाणी खोदल्या गेल्या. दरम्यान, सकाळपर्यंत सुरक्षा दल नायकू लपलेल्या घराच्या जवळ पोहोचले होते. परंतु, सुरक्षा दलाच्या घराच्या जवळ पोहोचताच रियाझ नायकू आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी हे घर स्वतःच पाडले. तरीही रियाझ नायकू बचावला आणि त्याने पळ काढला आणि दुसर्‍या घरात लपला, पण इथेच सुरक्षा दलांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला ठार मारले.

आपत्काळातही भारतीय सैन्याला दहशतवाद्यांना शोधून त्यांना ठार करावे लागत आहे. पाक पुरस्कृत हे दहशतवादी करोनाच्या संकटात वेढलेल्या भारताचे लचके तोडण्याच्या तयारीत आहेत, ज्याला पाकिस्तान खतपाणी घालत असते. मात्र, हिजबुलचा म्होरक्या रियाझ नायकूला ठार करणार्‍या भारतीय सैन्याने त्यांचे शौर्य दाखवून दिले आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -