घरफिचर्सलॉकडाऊनचा तमाशा आणि जनतेचा आक्रोश!

लॉकडाऊनचा तमाशा आणि जनतेचा आक्रोश!

Subscribe

करोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन असह्य होत असल्याने जीवाच्या आकांताने गरीब सरीब, श्रमिक मजूर, कष्टकरी, कामगार गावाकडे निघाले आहेत. त्यांना आता या सत्तेत राहायचे नाही. चालताना मेलो तरी बेहत्तर, पण मी आता शहरांमध्ये थांबणार नाही, असा निर्धार करून बायका पोरे घेऊन ते निघाले आहेत. डोक्यावर बोजा, पाठीवर बॅग, हाताला पोरे घेऊन भर उन्हातून ते जाताना पाहणे हे अंगावर काटा येण्याचा प्रकार आहे. मी स्वतः दहिसर चेक नाक्यावर हे जथ्ये पाहिले आहेत. यांचे काय होणार? १५०० ते २००० किलोमीटर पार करून ते आपल्या गावाला जिवंत जातील का? या प्रश्नाने जीव कासावीस होत असताना बोरीवलीला एक दहा मजुरांचा उत्तर प्रदेशला निघालेला एक समूह मला मिळाला. अरे बाबांनो का सोडता मुंबई, थोडा वेळ धीर धरा... त्यावर ते म्हणाले, आम्ही दोन महिने धीर धरला. आणखी किती धीर धरायचा. हाताला काम नाही, थोडे बचत केले होते ते पैसे संपले, सरकार मदत करते म्हणते पण ती नीट पोहचत नाही. खिचडी देतात, पण ती कुत्रे मांजरी खाणार नाहीत. आम्ही तर माणसे आहोत. आता आणखी धीर धरला तर उपासाने आम्ही मरू. मग येथे मरण्यापेक्षा आमच्या गावाला जाऊन मरू, चालताना मरू, पण आता येथे राहणार नाही. ते रडत नव्हते, आक्रोश करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या लॉकडाऊनविषयीची घोषणा १७ मे रोजी म्हणजे रविवारी संध्याकाळी करतील. ते आता नव्याने टाळेबंदीचा विचार करणार आहेत. आधी प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख टाकण्याची घोषणा त्यांनी केली होती आणि आता मार्च, एप्रिल आणि आता मे अशा तीन महिन्यांनंतर ते भारतीय जनतेला आत्मनिर्भर होण्यास सांगत आहेत. आत्मनिर्भर वैगरे सोडा या घटकेला लोकांचा मोदी आणि उद्धव ठाकरे सरकारवरचा विश्वास उडाला असून लोकांनी शहरे सोडायला कधीची सुरुवात केली आहे. सरकारने विशेष रेल्वे गाड्या आणि एसटी, खासगी बस सोडण्यापूर्वी लोकांनी पायी आणि मिळेल त्या वाहनांनी मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आदी शहरे सोडली आहेत. जीवाच्या आकांताने गरीब सरीब, श्रमिक मजूर, कष्टकरी, कामगार गावाकडे निघाले आहेत. त्यांना आता या सत्तेत राहायचे नाही. चालताना मेलो तरी बेहत्तर, पण मी आता शहरांमध्ये थांबणार नाही, असा निर्धार करून बायका पोरे घेऊन ते निघाले आहेत. डोक्यावर बोजा, पाठीवर बॅग, हाताला पोरे घेऊन भर उन्हातून ते जाताना पाहणे हे अंगावर काटा येण्याचा प्रकार आहे. मी स्वतः दहिसर चेक नाक्यावर हे जथ्ये पाहिले आहेत. यांचे काय होणार? १५०० ते २००० किलोमीटर पार करून ते आपल्या गावाला जिवंत जातील का? या प्रश्नाने जीव कासावीस होत असताना बोरीवलीला एक दहा मजुरांचा उत्तर प्रदेशाला निघालेला एक समूह मला मिळाला. अरे बाबांनो का सोडता मुंबई, थोडा वेळ धीर धरा… त्यावर ते म्हणाले, आम्ही दोन महिने धीर धरला. आणखी किती धीर धरायचा. हाताला काम नाही, थोडे बचत केले होते ते पैसे संपले, सरकार मदत करते म्हणते पण ती नीट पोहचत नाही. खिचडी देतात, पण ती कुत्रे मांजरी खाणार नाहीत. आम्ही तर माणसे आहोत. आता आणखी धीर धरला तर उपासाने आम्ही मरू. मग येथे मरण्यापेक्षा आमच्या गावाला जाऊन मरू, चालताना मरू, पण आता येथे राहणार नाही. ते रडत नव्हते, आक्रोश करत होते. माझे समजावणे त्यांना मान्य नव्हते. त्यांना बोरीवलीला पोलिसांनी अडवले म्हणून ते आडमार्गाने जायचे होते म्हणून त्यांना आतल्या रस्त्याने जात दहिसर चेक नाका क्रॉस करायचा होता. मी एक क्षण निशब्द झालो… तरी जाताना त्यातला एक तरुण मुलगा म्हणाला, शॉर्टकट बता दो, हमे निकलना है. मी त्यांच्याबरोबर काही वेळ चालत चाळीतील एक वाट दाखवली. ते जाताना पाहताना तुमच्या आमच्यासारख्या हाडामासाच्या माणसांची ही फरफट मला माणूस म्हणून घ्यायला लाज वाटत होती…

मोदी यांनी करोनातून देशाला सावरण्यासाठी मंगळवारी रात्री घोषणा केल्यावर २० लाख कोटींच्या आत्मनिर्भर योजनेची घोषणा केल्यावर टेलीग्राफ या वर्तमानपत्राने मार्मिक हेडिंग दिले : २० लाख कोटींचे शून्य दाखवले आणि त्या खाली रिकामी भांडी दाखवली… हे २० लाख कोटी सगळे ठीक आहे, आता आम्ही जगायचे कसे ते सांगा. एक नंबर! भाजप हे आत्मनिर्भरसारखे कुठून शब्द शोधून काढते, त्याचा आता लोकांना मोठा धक्का बसतोय. विकास, आत्मसन्मान, राष्ट्रप्रेम, देशद्रोही हे शब्द आणून जनमानसात आपणच किती राष्ट्रभक्त आहोत, याचा इव्हेंट करण्यात हे भाजपाई पटाईत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंतन शिबिरात हे शब्द त्यांनी पाठ केलेले असतात, राजकारणात येऊन त्यांना फक्त लोकांच्या तोंडावर फेकायचे असतात. माणसे आधी गरगरली पाहिजेत. दोन दिवस अर्थ शोधण्यात गेला पाहिजे आणि मग त्याचा नक्की उपयोग काय याचा विचार करत पाच वर्षे गेल्यावर पुन्हा निवडणुका आल्या की : मित्रो म्हणत लोकांच्या मेंदूचा ताबा घ्यायला हे तयार. यांना परदेशातील काळा पैसा भारतात कधी आणणार याचे उत्तर द्यायचे नसते. ना यांना नोटाबंदीचा नक्की कोणाला फायदा झाला, यावर मिठाची गुळणी घेऊन बसायचे असते, १५ लाख लोकांच्या खात्यावर कधी येणार हे सांगायचे नसते, विकास हरवला असून कधी सापडणार याची माहिती द्यायची नसते, याच्या नजरेसमोर देशाला अब्जो रुपयांचा चुना लावून पळून गेलेल्या उद्योगपतींना खेचून भारतात आणायचे नसते, रामदेव बाबा हजारो कोटींची कर्जे बुडवणार, मात्र तो आपला स्वदेशी बाबा आहे म्हणून त्याला सर्व माफ करायचे असते, फक्त फेकाफेकी करायची असते, लोकांना मूर्ख बनवायचे असते आणि मग सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी दिवे पेटवायचे असतात, घंटानाद करायचा असतो… वाजवा टाळ्या… इतका भंपकपणा देश स्वतंत्र झाल्यानंतर बघायला कधी मिळाला नव्हता. तो आपले डोळे उघडे असताना बघायला मिळतोय… लावा दिवे… घालवा अंधार. सगळ्या थापा! या थापा बघून आता नेपाळी लोक म्हणे थापा नाव काढून टाकण्याचा विचार करत आहेत.

- Advertisement -

इकडे मोदी आणि तिकडे उद्धव ठाकरे सरकार, अशी हालत झाली आहे. दोन महिने झाले तरी ठाकरे सांगतायत संयम ठेवा. मातोश्रीची संयमी छबीचे थोडे दिवस कौतुक वाटले, पण नव्याची नवलाई संपली आहे. मुख्य म्हणजे ठाकरे सरकारचे काहीच नियोजित दिसत नाही. कोणाचा पायपोस कोणाला नाही, हे दिसून आले आहे. इतकी वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवली, पण आज महापालिका हॉस्पिटल व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. या ठिकाणी डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी वर्ग निष्णात आहे, पण सोयी सुविधा नाहीत. कामाचा प्रचंड ताण आहे. अपुरे मनुष्यबळ असून आहे ती माणसे परिस्थिती खेचणार तरी किती? मग करोनाने मेलेल्या माणसांच्या बॉड्या पडून राहिल्या तर दोष यंत्रणेला नाही तर महापालिका चालवणार्‍या शिवसेनेच्या माथी जातो. काळ्या यादीतील कंत्राटदारांना वर्षानुवर्षे कंत्राटे द्यायची आणि मलिदा खायचा, हाच इतकी वर्षे धंदा चालला आहे. लोकांनी ओरड केली की थोडे दिवस डोळे मिटून राहायचे आणि मग पुन्हा तेच करायचे. पैसा खाणे हाच आमचा धंदा आहे. या धंद्यामुळे करोडो रुपयांच्या ठेवी लोक प्रतिनिधींच्या खात्यावर दिसणारच. ते कुठे तुमच्या आमच्यासारखे कष्ट करायला गेलेत. एक मात्र त्यांना तुम्हाला वश करता येते. तुमच्या भावनेशी खेळ करता येतो. १९८२ च्या मिल संपात मराठी माणूस देशोधडीला लागला. उरलेला बंद कारखान्यांनी नष्ट केला. आता आमची मराठी पोरं मॉलमध्ये काम करणार, सेवा क्षेत्रात जीव जगवण्याचा आटापिटा करणार. पार तिकडे विरार, नालासोपारा, बदलापूर आणि दिव्याला चाळींमध्ये राहणार. ट्रेनला लोंबकळणार आणि पडून मरणार. जय महाराष्ट्र… करा कष्ट, व्हा नष्ट! ३२ हजार कोटींचे वार्षिक बजेट आहे मुंबई महापालिकेचे. एखाद्या छोट्या राज्याएवढे हे बजेट आहे.

पण, मुंबईकरांना काय मिळाले… उखडलेले रस्ते, आजारी आरोग्य व्यवस्था, उघडी गटारे, दुर्गंधीमय स्वच्छतागृह आणि वाढत जाणार्‍या झोपड्या. दहीसरचे गणपत पाटील नगर ही धारावीनंतरची सर्वात मोठी झोपडपट्टी शिवसेनेच्या काळातच उभी राहिली आहे. विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आणखी एक झोपडपट्टी उभी राहतेय. तिवरांची कत्तल करून आणि खाडी बुजवून. या ठिकाणी आमदार शिवसेनेचे, नगरसेवक शिवसेनेचे, मग झोपड्या आभाळातून खाली आल्या आहेत का? बस झाला हा भंपकपणा!राज्य चालवायला घेतले, तिथेही आज सावळा गोंधळ. दारूची दुकाने सुरू होतात, पुन्हा बंद करतात, पुन्हा ऑनलाईन सुरू करतात, पुन्हा तारीख वाढवतात. हे काय जादूचे प्रयोग सुरू आहेत का. बंद, चालूचे. तीच गोष्ट फुकट एसटी प्रवासाची. आज महाराष्ट्रातल्या लोकांना आपल्या गावी जाता येत नाही. आम्ही एसटी दुसर्‍या राज्यांमधील लोकांना सोडायला सुरू करणार आहोत, हे लोकांना नीट सांगायला नको. कोकणासह इतर जिल्ह्यातील हजारो लोकांना यामुळे निराश व्हावे लागले आहे. पालकमंत्रीही हताश होऊन बसले असून मुंबई, ठाणे, पुणे येथून येणार्‍या आपल्या जिल्ह्यातील लोकांची कशी व्यवस्था करायची हे त्यांना अजून समजलेले नाही. सगळा सावळा गोंधळ आहे. तरी लोकांनी संयम ठेवायचा… बोला उठा सरकार की जय!

- Advertisement -

मोदी आणि ठाकरे सरकारच्या या उफराठ्या कारभारामुळे त्या रेल्वे रुळात पसरलेल्या चपात्या डोळ्यांसमोरून हलता हलत नाहीत. तिथे सतरा मजुरांचे रक्तही सांडलय. पण, रक्त सांडण्याची आम्हाला सवय आहे. गावाकडून शहरात पोट जाळाया आलेल्या श्रमिकांनी मोठ्या आशेने गावची वाट धरलीय. मात्र गावा गावाच्या वेशीवर काट्या कुंपणांनी परतीच्या वाटा रोखल्या गेल्यात हे त्यांना सांगूनही पटत नाही. मजूर आणि श्रमिक सोडा आता निम्न आणि मध्यम वर्गातल्या लोकांचे शिल्लक असलेले पैसे आता संपत आलेत. जेव्हा हात काम करायचे थांबतील तेव्हा गाठीशी असलेले पीपीएफचे पैसेही काढायला सुरुवात केलीय. या नोकरी करणार्‍या वर्गाची तोंडे दाबून मुक्के खायची वेळ आली आहे. खिचडीच्या रांगेत उभे राहू शकत नाही आणि आणखी काही महिने बसून खाऊ शकतील, अशी परिस्थिती नाही. रेशन संपलंय. पगार तर केव्हाच संपलाय आणि पुढचा पगार मिळण्याची आशा पण संपलीय. टाळ्या आणि थाळ्या वाजवणारे हात आता कोणापुढे कसे पसरायचे म्हणून संकोचू लागलेत. पुढचा महिना की महिने कसे जातील म्हणून रातभर डोळ्याला डोळा लागेनासा झालाय. मानसिक तणाव वाढलाय. दिवे चालू बंद करण्याचा देशप्रेमी खेळ आठवून मनातला अंधार अधिकच गडद होऊ लागलाय. कुठे काही बोलायची सोय राहिली नाही. गावात शेतकरी पावसाळा तोंडावर आल्याने हवालदिल झालाय. सर्वत्र अस्वस्थता, अनिश्चितता आणि निराशेची एक लाट पसरलीय. या लाटेला वेळीच वाट करून दिली नाही तर देशाची वाट लागेल.

पण, मोदी आणि ठाकरे सरकारचे. दर १५-२० दिवसांनी लॉकडाऊन वाढवतात. सिक्युरिटी टाईट करतात. घरातले घरात आणि रस्त्यावरचे रस्त्यात. नित्यनेमाने करोनाबाधितांचे आकडे सांगतात. मदतीचे आकडे फुगवतात. टीव्हीवर चर्चा करतात. कधी पंतप्रधान, कधी मुख्यमंत्री तर कधी आरोग्यमंत्री येतात आणि आमच्या आरोग्याची काळजी वाहून जातात. मग टीव्हीवाले २४ तास तोच रतीब घालतात आणि भेदरलेले भारतीय पुन्हा गपगुमान घरात जाऊन बसतात. नाही म्हणायला नवे नवे अधिकारी येऊन आमची करमणूक करतात. रोज नवे नवे नियम सांगतात. भारतीयांसाठी एक गाडी सोडतात. मात्र, फॉरेनमध्ये अडकलेल्यांना जहाजाने, विमानाने आणले जात असून ताप बिप आहे का हे फक्त तपासून त्यांना घरी सोडले जातंय. गरिबाला फक्त १४ दिवस डांबून ठेवले जात आहे.

डॉक्टर्स, तज्ज्ञ सांगू लागलेत की करोना हा इतर कोणत्याही आजारासारखा एक आजार आहे. दोन तीन टक्के गंभीर रोगी सोडले तर उरलेल्यांना त्याचा फार काही धोका नाही. तीन तीन महिने झाले तरी तुमच्याकडे खात्रीलायक माहिती नाही, उपचार नाही आणि लसही नाही. सगळंच अनिश्चित! करोनाचा फैलाव आणि लॉकडाऊनही! करोना कधी संपणार, माहीत नाही. लस कधी येणार, माहीत नाही. लॉकडाऊन कधी संपणार, माहीत नाही. मग लोकांनी जगायचं तरी कसं?
आणि आता तर खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीच जाहीर कबुली दिलेय, आपल्याला करोनाला सोबत घेऊनच पुढची वाटचाल करावी लागणार. जशी आपण इतर हजारो जीवजंतूंसोबत राहून करतो आहोत. आरोग्यमंत्र्यांच्या या स्पष्ट निवेदनानंतरही कसली वाट बघत बसलाय. तुम्ही जनता कर्फ्यू लावला, जनता गप्प बसली. तुम्ही देश लॉकडाऊन केला, जनतेनं सहन केला. तुम्ही लॉकडाऊन वाढवला, जनतेनं संयम पाळला. मात्र, तुम्ही पुन्हा लॉकडाऊन वाढवला, लोकांचा संयम संपला. लोकं रस्त्यावर उतरून चालू लागली. वाट फुटेल तिकडे लोंढे धावू लागलेत. बहुतेक हा इशारा आहे आत्मनिर्भर होणे तर दूर राहिले. कारण २० लाख कोटी देऊन ( ही सुद्धा फेकाफेकी होती का हे नंतर समजेलच) परिणाम कधी दिसतील हे काहीच सांगता येत नाही.म्हणूनच लॉकडाऊन उठवला नाही तर भारतीय रस्त्यावर येतील आणि सरकारलाच सळो की पळो करून सोडतील.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -