निसर्गग्रस्तांच्या हाती आधी रोख रक्कम द्या!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळकळीचे आवाहन...

‘मायबाप सरकार, आम्हाला आता मदतीची घोषणा नको. या घडीला आमच्या हातात रोख रक्कम द्या. घरावर पत्रे, कौले घालू. पावसाला थोपवून धरू. वीज नसेल तर मेणबत्ती पेटवू आणि तात्पुरता अंधार दूर करू. लाकडे भिजली आहेत, रॉकेल हवे आहे. पावसाळ्याची चार महिन्यांची बेगमी करण्यासाठी दारातले नारळ, सुपारी, आंबे, काजू, चिंच विकून जगायचे ठरवले होते. पण, हे आमचे उत्पन्न आज उद्ध्वस्त झाले आहे. आम्हाला सरकारच्या दरबारी हात पसरायची कधी सवय नाही. आपले दुःख आपल्यापाशी. आपल्या रक्तामासाची आणि रक्ताची नसलेली माणसे, मुंबई-ठाणे-पुण्याची माणसे नेहमी आम्हाला मदत करतात, शांतपणे! पण, करोनाने त्यांचे हातपाय बांधले आहेत आणि तोंडाला मास्क लावून बोलती बंद केली आहे. त्यांच्याच जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. दुःखाचा बाजार करून घ्यायला आम्हाला कधीच आवडत नाही. तांदळाची पेज खाऊन दिवस काढू… पण पेज खायला घरावर छप्पर तर हवे. ते कुठून आणणार? म्हणूनच आता हे छप्पर घालायला २०-२५ हजार रुपयांची रोख मदत तातडीने द्या’’. कोकणच्या लोकांची ही आर्त हाक ऐका.

करोनाचे संकट सुरू असल्याने निसर्ग वादळाने कोकणाचे केलेले प्रचंड मोठे नुकसान झाकले जात आहे आणि पुन्हा एकदा कोकणी माणसाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. १ हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान रायगड आणि रत्नागिरीत झाले असताना उद्धव ठाकरे सरकार दीडशे दोनशे कोटींची मदत जाहीर करून मोकळे झाले आहेत. पंचनामे सुरू आहेत. ते होऊन मदत कधी मिळेल, हे आता सांगता येणार नाही. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नुकसानग्रस्त भागांचे दौरे केले. तेथील लोकांशी, प्रशासनाशी, लोक-प्रतिनिधींशी चर्चा करून लोकांना तातडीने मदत करण्याची सूचना केली. मात्र, या घडीला लोकांना मदतीचे आकडे, आश्वासने, बोलाचा आधार, बोलाच्या सूचना नको आहेत. पाऊस सुरू झाला आहे. वादळाने सताड उघड्या केलेल्या घरांवर टाकायला पत्रे हवे आहेत, कौलांची गरज आहे, प्लास्टिक हवे आहे. वीज नसल्याने दिवे जाळायला रॉकेल हवे आहे, ते नाही तर मेणबत्या हव्या आहेत. झाडपाड उद्ध्वस्त झाले, नारळ पोफळी मातीत मिळाली, घरातले किराणा धुळीत पडलंय.. सांगा आता जगायचे कसे? म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोकणवासीय कळकळीची विनंती करत आहेत…‘‘मायबाप सरकार, आम्हाला आता मदतीची घोषणा नको.

या घडीला आमच्या हातात २०-२५ हजार रुपये द्या. घरावर पत्रे, कौले घालू. पावसाला थोपवून धरू. वीज नसेल तर मेणबत्ती पेटवू आणि तात्पुरता अंधार दूर करू. लाकडे भिजली आहेत, रॉकेल हवे आहे. पावसाळ्याची चार महिन्यांची बेगमी करण्यासाठी दारातले नारळ, सुपारी, आंबे, काजू, चिंच विकून जगायचे ठरवले होते. पण, हे आमचे उत्पन्न आज उद्ध्वस्त झाले आहे. आम्हाला सरकारच्या दरबारी हात पसरायची कधी सवय नाही. आपले दुःख आपल्यापाशी. आपल्या रक्तामासाची आणि रक्ताची नसलेली माणसे, मुंबई-ठाणे-पुण्याची माणसे नेहमी आम्हाला मदत करतात, शांतपणे! पण, करोनाने त्यांचे हातपाय बांधले आहेत आणि तोंडाला मास्क लावून बोलती बंद केली आहे. त्यांच्याच जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांचा किराणा संपला असून बँक खात्यावरचे पैसे संपत आलेत. ते फाटके आम्हाला काय उघड्यांना मदत करणार? त्यांचेच आभाळ फाटले असताना ते तरी कुठे कुठे ठिगळ लावत फिरणार आहेत? म्हणून तुम्हीच आमचे मायबाप सरकार होऊन रोख मदत द्या. दुःखाचा बाजार करून घ्यायला आम्हाला कधीच आवडत नाही. तांदळाची पेज खाऊन दिवस काढू… पण पेज खायला घरावर छप्पर तर हवे. ते कुठून आणणार? म्हणूनच आता हे छप्पर घालायला २०-२५ हजार रुपयांची रोख मदत तातडीने द्या. कोकणच्या लोकांची ही आर्त हाक ऐका.

माझ्या परिचयाचे श्रीवर्धनमध्ये उत्तम फुटाणकर आहेत. त्यांची बागायती शेती आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारी, आवळा असे दर वर्षाचे लाखोंचे उत्पन्न आहे. त्यांच्या बागेमुळे मोठ्या संख्येने स्थानिकांना रोजगार मिळतो. त्यांची बाग आज होत्याची नव्हती झाली. सगळे मातीमोल झाले. पण, या माणसात मुळात समाजासाठी काही तरी करण्याची मोठी दानत आहे. त्यांनी आधी कशीबशी मुंबई गाठली आणि जमेल तेवढे किराणा सामान, मेणबत्त्या, प्लास्टिक घेऊन ते पुन्हा गावाकडे गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा पुतण्या नितीन फुटाणकरही मुंबईवरून गाडीभर मदत घेऊन श्रीवर्धनला पोहचला आहे. फुटाणकर यांनी त्यांच्या मित्रांना आवाहन करत दोन चार लाख जमवले असून आज ते गावागावात फिरून लोकांना किराणा सामान, मेणबत्त्या, थोडी रोख रक्कम देत फिरत आहेत. हीच आता खरी गरज आहे. फुटाणकर काय सांगतात ते पाहा, ‘असं वादळ कधीच बघितलं नव्हतं. होत्याचं नव्हतं झालं. मी आज रस्त्यावर आलोय. मी जगेन कसा बसा. माझा मुंबईत आधार आहे. पण, माझ्या आजुबाजूला आधार नसलेली माणसे आहेत, त्यांनी कसे जगायचे? सांगा… आता लोकांना घरावर घालायला छप्पर आणि कौले हवी आहेत. लोकांच्या गाठीशी पैसे नाहीत. हातात पैसे नाहीत. माझ्या परिचयाच्या लोकांनी आता दागिने विकायला काढले आहेत. रोजंदारीवर काम करणारी ही माणसे असून त्यांच्याकडे गळ्यातील छोट्या मंगळसूत्राशिवाय काही नाही. पण, आता काहीच आधार नसल्याने मंगळसूत्रे गहाण ठेवून थोडे पैसे घेण्यापेक्षा २०-३० हजार मिळतील, असा विचार करून आपले सौभाग्य लेणे विकायला काढले आहे. मी स्वतः उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी संपर्क करून तातडीने पत्रे द्या, अशी मागणी केली आहे. ती मदत आली तर खूप मोठे काम होईल.’

आमचा दहिसरला व्हीपीएम स्पोर्ट्स क्लब आहे. गेले तीन दशके अ‍ॅथलेटिक्स खेळात कार्यरत असणार्‍या या क्लबचे मुख्य प्रशिक्षक संतोष आंब्रे असून त्यांच्याकडे आम्ही मदतीची मागणी केली. क्लब छोटा आहे, पण आंब्रे दादा यांचे मन मोठे आहे. त्यांनी तातडीने १० हजार दिले. सोबत काही निसर्गग्रस्तांना चहा पावडर आणि साखर यांची छोटी छोटी पॅकेट वाटा, असे सांगत क्लबचे सचिव नितीन फुटाणकरच्या हाती मदत दिली. देताना म्हणाले: १० हजार छोटी मदत आहे. पण, २० कुटुंबांच्या हाती प्रत्येकी ५०० रुपये द्या. मेणबत्ती घेतील, प्लास्टिक घेतील, थोडा आसरा होईल. अशी दानत आज मुंबई-पुणे-ठाण्यात सामाजिक संस्था, मंडळे, दानशूर व्यक्ती यांच्यात दिसायला हवी. त्यांनी अशी मदत अलिबाग, श्रीवर्धन, दापोली तालुक्यात गावोगावी पोहचवली तरी रायगड आणि रत्नागिरी थोडे सावरू शकेल. मी स्वतः लालबागच्या गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव आणि राष्ट्रीय खोखोपटू स्वप्नील परब तसेच चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते संदीप परब यांना फोन करून मदतीचे आवाहन केले. ते मदतीसाठी सकारात्मक दिसले. मला विश्वास आहे की लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी, सिद्धिविनायक ट्रस्ट, साईबाबा विश्वस्त मंडळ यांनी पुढाकार घेतल्यास कोकणाला तातडीने मदत मिळेल.

२००९ साली झालेल्या ‘फयान’ वादळाने कोकणाला हादरवले होते. त्यामधून सावरत गेली दहा वर्षे पुन्हा हा भाग सावरत असताना ‘निसर्ग’ वादळ मुळाशी आले आणि पुन्हा एकदा होत्याचे नव्हते करून कोकणाला या वादळाने एक दशक मागे ओढून नेले. नारळ, आंबा, सुपारी, कोकम, फणस, आवळे अशी नगदी पिके या भागात घेतली जातात. येथील शेतकरी आणि बागायतदार यांचे सर्वांचे आर्थिक गणित याच पिकांवर अवलंबून असून या सर्व पिकांच्या वाढीसाठी आणि त्यामधून येणार्‍या उत्पन्नासाठी किमान १० वर्षांचा कालावधी लागत असल्याने आधी फयान आणि आता निसर्ग यामुळे कोकणचे शेतकरी एकूण २० वर्षे मागे फेकले गेले आहेत. निसर्गचे तांडव फक्त दोन तास चालले. या दोन तासांत मुलाबाळांसारखी वाढवलेली हजारो झाडे मुळांसकट उन्मळून पडली. काही झाडे घरांवर पडली असून बर्‍याच लोकांच्या डोक्यावर आता छप्परही उरलेले नाही. आयुष्यभर काबाडकष्ट करून उभे केलेले वैभव डोळ्यासमोर भुईसपाट होताना त्या शेतकर्‍याच्या काय भावना असतील, ते येथे शब्दात व्यक्त करता येणार नाही. या वादळामुळे सहा एक माणसे या जगात उरली नसतील, पण मागे जी हजारो माणसे राहिली आहेत त्यांचे दुःख अपरिमित असे आहे. आज उद्ध्वस्त झालेल्या झाडांनी तीन पिढ्या पाहिल्या होत्या. ४०-५० वर्षे उत्पन्न देणारी ही झाडे दोन तासांत नाहीशी होतात, ही काळीज चिरणारी गोष्ट धीराच्या दोन शब्दांनी कशी भरून येईल? ही झाडे आज या भागातील शेतकरी कुटुंबाच्या जीवनाचा एक भाग होती.

शेतकर्‍याचे कष्ट निसर्गने मातीत घातले असताना मच्छीमारांची घरे उघड्यावर पडली आहेत. उडालेली कौले, मोडलेले पत्रे, ढासळलेल्या भिंती यामुळे आता पावसात राहायचे कुठे, असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या घडीला शाळा, समाज मंदिर, देवळे अशा ठिकाणी ते मुलाबाळांसकट आसर्‍याला आले आहेत, पण जेव्हा धो धो पावसाला सुरुवात होईल त्यावेळी ते पुढचे चार महिने राहणार कसे, जगणार कसे? कोकणातला पाऊस हा एकदा कोसळायला लागला की दोन तीन दिवस धो धो ओतत असतो, अशा वेळी डोक्यावर छप्पर नसेल तर जगणे कठीण होऊन बसेल. किनार्‍यांवर असलेल्या घरांबरोबर मासेमारी करणार्‍यांच्या होड्या, जाळी आणि वाळत घातलेले मासे सर्व नष्ट झाले आहे. घरांबरोबर जगण्याची त्यांची सर्व साधने वार्‍याने समुद्रात भिरकावून दिली असताना ते सुद्धा शेतकर्‍यांबरोबरच दहा वर्षे मागे गेले आहेत. गेली काही वर्षे कोकणातील शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमारांनी आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळून पर्यटन व्यवसायावर भर दिला होता. रायगड तसेच रत्नागिरीमधील अलिबाग, रेवदांडा, चौल, काशिद, मुरुड, श्रीवर्धन तसेच रत्नागिरी येथील हरिहरेश्वर, आंजर्ले, कोलथरे, हर्णे-मुरुड, वेळास, आंजर्ले हे समुद्र किनारे देशी पर्यटकांनी गजबजून गेले होते. आपली घरे, घरांसमोरील जागा निवासस्थाने करून आणि घरगुती लज्जतदार कोकणी जेवणाने पर्यटकांचे तन मन कोकणी बांधवांनी जिंकले आहे. विशेषतः यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन आपल्या घरी पर्यटन केंद्र उभारली. कोकणी माणूस फटकळ, त्याला धंदा व्यवसाय करता येत नाही, वाढवता येत नाही या सार्‍या जुन्या शिक्क्यांना पुसून काढताना कोकणी भगिनींनी काबाडकष्ट करून उभारलेली पर्यटन घरे आज वादळाने नाहीशी केली आहेत. हा खिशात हमखास दोन पैसे देणारा व्यवसाय मोडून गेला आहे. करोनामुळे आधीच अडीच महिने पर्यटकांनी पाठ फिरवली होती, त्यात आता निसर्ग मुळावर आल्याने कोकण मुळासकट हादरले आहे. भाजपसारख्या पॅकेजच्या कोटी कोटींच्या घोषणा करून प्रत्यक्षात लोकांच्या पदरी काही पडणार नसेल तर आधी छोटी छोटी मदत करत नंतर ती गरज पडेल तशी वाढवत नेणे कधीही चांगले. करोनाच्या काळात आत्मनिर्भरतेचे २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर करताना मोदी सरकारने देशातील मजूर, श्रमिक, कष्टकर्‍यांच्या खिशात किती पैसे आहेत, याचा विचार केला नव्हता. त्यांनी गाठीशी असलेले नसलेले फुकून गाव गाठला होता. आताही त्यांच्याकडे पैसे नाहीत. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मजुरांकडे आता त्यांच्या गावी जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोदी सरकार आता त्यांच्यासाठी काय करणार आहे, हा खरा प्रश्न आहे. जगायला पॅकेज नाही, आधी थोडी मदत लागते. माणसे सुरुवातीला त्यामधून सावरतात. कारण पंचनाम्यांसारखा हा पॅकेज प्रकार आहे. ते मिळेल तेव्हा मिळेल, आता जगायचे कसे ते सांगा. म्हणूनच कोकणाला आधी छोटी रोख रकमेची मदत हवी आहे.

मुळात एखाद्या घटनेकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन खरा असायला हवा, आकड्यांच्या खोट्या खेळाने तो बुद्धीभ्रम करणारा नसावा. उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ठाकरे सरकारचे आधार शरद पवार हेसुद्धा रायगड दौर्‍यावर गेले होते. इतक्या वर्षांचा दांडगा अनुभव तर त्यांच्याकडे आहेच. पण, अनेक नैसर्गिक आपत्ती पवार यांनी जवळून पाहिल्या आहेत. ते निसर्ग वादळाने केलेल्या नुकसानीचा नीट अंदाज घेऊन उद्धव यांच्याशी बोलतील आणि रायगड-रत्नागिरीतील लोकांना त्यांच्या पायावर पुन्हा एकदा उभे करण्यासाठी पुढचे पाऊल टाकतील, अशी आशा आहे. आता या घडीला उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील लोकांना घरांवर छप्पर घालण्यासाठी पत्रे, कौले याची तातडीने गरज आहे. दुसरीकडे युद्धपातळीवर विजेचे खांब उभे केले पाहिजेत. वादळानंतर या भागातील वीज गेली असून अंधारात दिवस काढावे लागत आहेत. घरात केरोसीन आणि मेणबत्त्यासुद्धा नाहीत. काळ्या बाजाराला चाप लावून आधी पत्रे, केरोसीन आणि मेणबत्त्या दिल्यास भर पावसात लोकांना आपल्या घरात राहता येईल. शिवाय तातडीने पंचनामे झाल्यास निसर्गग्रस्तांच्या खिशात दोन पैसे येतील आणि बेफाम पावसात जगण्यासाठी त्यांना आधार मिळेल. कोकणातील लोकांच्या जगण्याच्या खूप मोठ्या अपेक्षा कधीच नव्हत्या. प्रतिकूल परिस्थितीत कसे जगायचे याचे त्यांना उपजत ज्ञान आहे. पण, आता त्यांचे सर्वस्व नाहीसे झाले असताना सरकारबरोबर सामाजिक संस्था, मंडळे, दानशूर व्यक्ती आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरात राहणार्‍या माणसांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. तुमची एक मेणबत्ती रायगड-रत्नागिरीच्या लोकांच्या जीवनात अंधार दूर करायला मदत करेल…