घरफिचर्सपंचम आणि प्रणयपटांचं वर्ष

पंचम आणि प्रणयपटांचं वर्ष

Subscribe

१९८१ हे वर्ष प्रणयपटांचं होतं. याच वर्षी ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार या दोन मित्रांनी त्यांच्या मुलांना संजय आणि गौरव यांना हिंदी पडद्यावर रॉकी आणि लव्ह स्टोरीतून दाखल केलं. हे दोन्ही चित्रपट रोमँटिक म्युझिकल हीट ठरले. पंचम म्हणजेच आरडींचं संगीत हा हुकमी एक्का या दोन्ही चित्रपटांसाठी महत्त्वाचा ठरला. दुसरीकडे एक दुजे के लिए या शोकांतिकेने प्रेमपटांची परिमाणं बदलली. मनोज कुमारचा यशस्वी ठरलेला क्रांती हा अखेरचा देशभक्तीपट याच वर्षी रिलिज झाला. अमिताभच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब करणारे याराना, लावारिस, नसीब आदी अ‍ॅक्शन, इमोशनपट याच वर्षी रिलिज झाले.

या वर्षी पुढे कित्येक दशके लक्षात राहतील अशी गाणी देणार्‍या आर. डी. बर्मन म्हणजेच पंचमसाठी हे वर्ष खूप महत्वाचं होतं. १९८१ मध्ये दोन महत्वाचे मल्टीस्टारपट आले. ज्यात मनोज कुमारचा क्रांती आणि मनमोहन देसाईंचा नसीब हे दोन महत्त्वाचे सिनेमे होते. क्रांतीचा विषय भारत कुमारपटातील देशप्रेमाचा होता. क्रांती रिलिज होण्याआधी हा सिनेमा सीप्पी फिल्मच्या शोलेलाही मागे सारेल, अशी जाहिरातबाजी केली होती. अभिनयसम्राट दिलीप कुमार, स्वतः मनोज कुमार, शशी कपूर, हेमामालिनी, शत्रुघ्न सिन्हा, परवीन बाबी, ओम पुरी, प्रेम चोप्रा आणि इतर खलनायक मंडळी अशी मोठी स्टारकास्ट करून मनोज कुमारने क्रांती बनवला. मनोजच्या देशप्रेमपटातील क्रांती हा सगळ्यात महागडा सिनेमा होता. थिटराच्या तिकिटावर पिक्चरचं पोस्टर येण्याचा प्रकार क्रांतीमुळे पुन्हा सुरू झाला. पूरब और पश्चिम, उपकार असे यशस्वी देशप्रेमपट बनवल्यानंतर क्रांती हा त्याचा कळस होता. इंग्रजी सत्तेविरोधात एकमेकांपासून दूर गेलेल्या बाप आणि मुलामधील संघर्ष हा क्रांतीचा विषय होता.

मनोज कुमारचा मुलगा कुणाल गोस्वामी पडद्यावर क्रांतीमधूनच बालकलाकार म्हणून दाखल झाला. जिंदगी की टूटे लडी, मेरा चना है अपनी मर्जी का ही गाणी कमालीची गाजली. क्रांतीनंतर मात्र मनोज कुमारने कलयुग और रामायण, क्लर्क असे भरकटलेले सिनेमे बनवले. ८० च्या दशकात बहुतांशी सिनेमांवर मनमोहन देसाईंच्या कथानकाचा परिणाम होता. अमिताभ, शत्रुघ्न सिन्हा, ऋषी कपूर, प्राण आदी मंडळी एका बाजूला होती. व्हिलन मित्र मंडळात कादरखान, अमजद खान, शक्ती कपूर, अमरिश पुरी, प्रेम चोप्रा अशी फौज होती. मनमोहन देसाईंच्या अमर अकबर अँथनीसारखंच इथेही हरवलेले भाऊ, परिस्थितीने गुन्हेगारी मार्गावर फेकला गेलेला हतबल बाप असं कथानक होतं. इथंही हे काम प्राणसाहेबांनी नामदेवच्या व्यक्तीरेखेत चोख बजावलं होतं.

- Advertisement -

प्रेक्षकांच्या धर्मभावनेला हात घालण्याचं कसब मनमोहन देसाईकडे होतंच. अमर अकबर अँथनीमध्ये हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती नायकांचा फार्म्युला नसीबमध्येही देसाईंनी वापरला. अमर अकबर अँथनीच्या मातोश्री निरुपा रॉयला शीर्षकातील तीनही मुलांकडून रक्तदान केले जात असताना नायकांकडून दिलं जाणारं रक्त वर अडकवलेल्या बाटलीत गुरुत्वाकर्षणाचे नियम मोडून कसं जातं, आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलमध्ये एका दिग्दर्शक मित्राने विचारलेल्या या प्रश्नावर मनमोहन देसाईंनी दिलेलं उत्तर मजेशीर आणि तेवढंच खरंही होतं. ते म्हणाले, आमच्या देशातील प्रेक्षक भावनिक आहेत. ते देशाला भारतमाता मानतात, चित्रपटातील रक्तदान घेणारी आई ही त्याच भारतमातेचं प्रतिक आहे आणि अमर अकबर अँथनी हे तिची मुले या देशातील देशभक्त नागरिक आहेत. इथं भावना महत्त्वाची आहे. त्यामुळे विषय रक्तदानातल्या गुरुत्वाकर्षणाचा नाही. मनमोहन देसाई यांचं उत्तर त्या मुलाला पटलं आणि तसंच झालं. प्रेक्षकांनी अत्यंत भावनिकतेने या प्रसंग पडद्यावर पाहिला गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडणा-या गॅललिओला माफ केलं. देसाईंनी नसिबमध्येही हाच धार्मिक भावनेचा फार्म्युला वापरला. प्राणसाहेबांच्या हाताच्या बोटातील देवप्रतिकांच्या अंगठ्यांचा वापर यावेळेस यशस्वीपणे केला गेला. नसीब हा तद्दन मसालेदार व्यावसायिक मूल्यांचा चित्रपट होता. गाणी, चित्रिकरण, संवाद, हाणामारी, इमोशन, ड्रामा असं सगळं काही चित्रपटात होतं. मात्र अमर अकबर अँथनी इतकं व्यावसायिक नशीब, नसीबचं नव्हतं.

याच वर्षी जितेंद्र, हेमा मालिनी परवीन बाबीचा मेरी आवाज सुनो पडद्यावर दाखल झाला होता. कादरखानचे दमदार संवाद होते तर राजेंद्र सिंग बाबूंचं दिग्दर्शन होतं. मनोज वाजपेईंच्या शूल, चिरंजीवीच्या प्रतिबंध अशा व्यवस्थेपुढील हतबल पोलिसाच्या कुटुंबाची फरपट मेरी आवाज सुनोमध्ये होती. या चित्रपटाचं परिक्षक आणि प्रेक्षकांनीही कौतूक केलं.या वर्षी प्रकाश मेहरांचा महत्वाकांक्षी चित्रपट लावारिसही प्रदर्शित झाला होता. अमिताभसोबत मेहरांनी त्याआधी मुकद्दर का सिकंदरचं यश पाहिलं होतं. लावारिसमध्ये अमिताभ, अमजद खान, झीनत अमान, बिंदू, राखी, सुरेश ऑबेरॉय, रंजीत अशी दिग्गज मंडळी होती. प्रकाश मेहरांनी मनमोहन देसाईपटांसारखा लावारिस बनवला होता. हिंदी पडद्यावरील संवादलेखनाचा बादशहा असलेल्या कादरखानचे संवाद लावारिसमध्ये होते. त्यावेळी लावारिसने नऊ कोटींचा व्यावसाय केला होता. १९८१ हे वर्ष खर्‍या अर्थाने अमिताभचं होतं. टिनू आनंद यांचा कालियाही याच वर्षी रिलिज झाला होता. टीनू आणि अमिताभची मैत्री जंजिरपेक्षाही आधीपासून जुनी होती. एका प्रसंगात टिनूने अमिताभसाठी शायरीवजा संवादांची रचना केली होती. या ठिकाणी टिनूला टाळ्या अपेक्षित होत्या. मात्र अमितने ही शायरी वगळून संवाद म्हटल्यावर टिनू कमालीचा नाराज झाला आणि सेटवरून निघून गेला. अमिताभला या ठिकाणी संवादात शायरी नको होती, तर टिनू दिग्दर्शक होता. या मुद्यावरून सेटवर तणाव निर्माण झाल्यावर अखेर अमिताभने माघार घेत टिनूने सांगितलेले संवाद स्क्रीप्टप्रमाणे म्हटले आणि खरंच या संवादाला टिनूच्या म्हणण्याप्रमाणे थेटरात टाळ्या पडल्या.

- Advertisement -

अमजद खानसोबत कायम विरोधक म्हणून उभा राहाणारा अमिताभ यारानामध्ये त्याचा जीवलग मित्र झाला होता. शोले, मुकद्दर का सिकंदर, याराना, नसीब, मिस्टर नटवरलाल असे अनेक सिनेमे या दोघांनी एकत्र केले. यारानाचं दिग्दर्शन राकेश कुमारांचं होतं तर संगित राजेश रौशनचं होतं. या दोघांचा याराना कमाल चालला आणि तिकीटबारीवर या मैत्रीचंही मोठं कौतूक झालं. पिता राजेंद्र कुमार यांनी मुलगा कुमार गौरवसाठी लव्ह स्टोरी याच वर्षी बनवला होता. आर.डीचं संगीत होतं. यातली गाण्यासोबत चित्रपटही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. लव्ह स्टोरीमुळे कुमार गौरव एका रात्रीत सुपरस्टार झाला. कहो ना प्यार है मुळे रितीक रोशनला जसं यश मिळालं तसंच कुमार गौरवलाही लव्ह स्टोरीने दिलं होतं. कौटुंबिक मसालेपटांना कंटाळलेल्या प्रेक्षकांनी काश्मीर, कुलू मनाली, शिमल्यात चित्रिकरण झालेल्या लव्ह स्टोरीला पसंद केलं. लव्ह स्टोरीला यश मिळवून देण्यात पंचमच्या संगिताचा मोठा वाटा होता.

याच वर्षी एक दुजे के लिएही रिलिज झाला होता. या चित्रपटाने प्रेमपटांची जुनी संकल्पनाच निकालात काढली. आजच्या सैराटसारखा नायक नायिकेचा अखेरीस होणारा मृत्यू या शोकांतिकेला एक दुजे के लिएने सुरूवात केली. तिचं आणि त्याचं संपूर्ण प्रेम हे मृत्यूमुळेच यशस्वी होतं, असा अविचार या चित्रपटानं दिला. कमल हासन, रती अग्नीहोत्री अशी नवखी जोडी एक दुजे के लिएमध्ये होती. या चित्रपटाचा इतका प्रभाव त्यावेळी प्रेक्षकांवर झाला होता की प्रेमी युगुलांच्या आत्महत्येत वाढ होण्याची भीती तत्कालीन समाज अभ्यासकांमध्ये निर्माण झाली होती. यातील गाणीही कमालीची गाजली. के. बालचंद्रांचं दिग्दर्शन असलेल्या एक दुजे के लिए वर साऊथच्या भडक सादरीकरणाचा प्रभाव होता. मात्र हिंदी पडद्यावरील इतर कुठल्याही प्रेमकथेला एक दुजे के लिए इतकं भावनिक यश मिळालं नाही. अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर पडलेल्या आपल्या मुलासाठी सुनील दत्त यांनी मित्र राजेंद्र कुमारांच्या सल्ल्यावरून रॉकी बनवला. हे वर्षातल्या बहुतेक प्रेम, प्रणयपटांसाठी पंचमचंच संगीत होतं. रॉकीमधून संजय दत्तच्या पडद्यावरील कारकिर्दीला सुरुवात झाली. राजेंद्र कुमारांचा सल्ला योग्य ठरला आणि रॉकीनेही बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. राजेंद्र कुमार आणि सुनील दत्त या दोघांनी १९८१ मध्ये आपल्या दोन्ही मुलांना पडद्यावर आणलं. संजय आणि गौरव हे पुढे महेश भट्टच्या नाम मध्ये एकत्र झळकले ही मैत्री पुढे संजय गुप्ताच्या काँटेमधूनही समोर आली. एकूणच १९८१ हे वर्ष अमिताभ सोबतच या दोघांसाठीही खूप महत्त्वाचं ठरलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -