एका न सुचणाऱ्या दिवशी…

एसडींच्या त्या एका काळात त्यांचा मुलगा राहुल त्यांना हरतर्‍हेची मदत करत होता. कारण पुढे त्याला संगीतदिग्दर्शक व्हायचं होतंं. एसडींनी त्याला जरा रागानेच फर्मावलं, म्हटलं, आताच्या आता त्या शैलेन्द्रकडे जा आणि त्याच्याकडून गाणं घेऊनच ये, एक तर त्याला तरी घेऊन ये, नाहीतर गाणं तरी घेऊन ये. पडत्या फळाची आज्ञा मानत आरडी बाहेर पडला. त्याने तडक शैलेन्द्रंचं घर गाठलं. आरडीला पहाताक्षणी शैलेन्द्रंनी जाणलं की एसडींनी त्याला गाण्याचा तगादा लावण्यासाठी पाठवलं आहे. शैलेन्द्रंनी इतर कसली कारणं न सांगता सरळ सरळ सांगून टाकलं की आपल्याला अजून त्या गाण्यासाठी शब्दच सुचू शकले नाहीत.

कलाकार हा तसा लहरी…आणि कवी-गीतकार हा प्राणी त्यातून जरा जास्तच लहरी असतो असं मानण्याचे ते दिवस. आता जसं अर्जंट म्हटल्यावर इस्टन्ट मिळतं तसे ते दिवस नव्हते. कवी-गीतकारांना गाणं लिहिण्यासाठी पुरेसा अवधी द्यायची प्रथा होती, तसंच त्यापेक्षा जास्त अवधी मागून आपले लाड पुरवून घेण्याचीही प्रथा होती. कधी कधी एखाद्या कवी-गीतकाराला काहीच न सुचण्याचा काळ यायचा.

एकदा असं कवी शैलेन्द्रंच्या बाबतीत घडलं. ‘काला बाजार’ नावाच्या सिनेमाचं काम सुरू होतं. संगीताची बाजू एस.डी.बर्मन सांभाळणार होते…आणि गाणं लिहायला सांगितलं होतं एस.डी.बर्मनचा लाडका गीतकार शैलेन्द्रना. एस.डी.बर्मननी सिनेमाच्या दिग्दर्शकाकडून त्या गाण्यासाठी दृश्य समजावून घेतलं होतं. शैलेन्द्रनाही ते दृश्य त्यांनी कसं असेल याची गाणं लिहिण्यासाठी सांगोपांग कल्पना दिली होती, पण पुरेसा वेळ देऊनही शैलेन्द्र त्या दृश्यासाठी गाणं लिहिलेला कागद घेऊन एसडींकडे आले नव्हते. एसडींना त्या दृश्यासाठी शैलेन्द्रंकडूनच गाणं लिहून हवं होतं. त्या गाण्याला शैलेन्द्रच न्याय देतील असं एसडींना मनोमन वाटत होतं.

शेवटी एसडी कंटाळले. त्यांनी शैलेन्द्रंना बराच वेळ देऊन झाला होता. आता त्यांना कोणत्याही परिस्थितीत शैलेन्द्रकडून गाण्याचा कागद हवाच होता. एसडींच्या त्या एका काळात त्यांचा मुलगा राहुल त्यांना हरतर्‍हेची मदत करत होता. कारण पुढे त्याला संगीतदिग्दर्शक व्हायचं होतंं. एसडींनी त्याला जरा रागानेच फर्मावलं, म्हटलं, आताच्या आता त्या शैलेन्द्रकडे जा आणि त्याच्याकडून गाणं घेऊनच ये, एक तर त्याला तरी घेऊन ये, नाहीतर गाणं तरी घेऊन ये.

पडत्या फळाची आज्ञा मानत आरडी बाहेर पडला. त्याने तडक शैलेन्द्रंचं घर गाठलं. आरडीला पहाताक्षणी शैलेन्द्रंनी जाणलं की एसडींनी त्याला गाण्याचा तगादा लावण्यासाठी पाठवलं आहे. शैलेन्द्रनी इतर कसली कारणं न सांगता सरळ सरळ सांगून टाकलं की आपल्याला अजून त्या गाण्यासाठी शब्दच सुचू शकले नाहीयत.

शैलेन्द्रना वाटलं की आरडी थोडा वेळ आपल्याकडे बसेल आणि वेळ झाली की निघून जाईल, पण आरडी काही निघून जाईना. आरडी आपल्या वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानूत शैलेन्द्रंकडे आला होता. तो शैलेन्द्रना किंवा त्यांचं गाणं घेतल्याशिवाय परतणार नव्हता.

शेवटी शैलेन्द्रना आरडीपुढे झुकावंच लागलं. गाणं लिहून देतो मान्य करावंच लागलं. त्याप्रमाणे ते गाण्याचा विचार करू लागले, पण तो दिवस त्यांचा नव्हताच. त्यांना गाण्याचे शब्द सुचतच नव्हते….पण आरडी मात्र वडिलांच्या आज्ञेपासून हटायला तयार नव्हते. बर्‍याचदा शैलेन्द्र टेबलावरच्या कागदापर्यंत पेन नेत आणि तिथून माघारी फिरत. असं करता करता रात्र झाली, पण गाण्याचे शब्द काही शैलेन्द्रंच्या मनात डोकावत नव्हते.

शेवटी आरडी तिथून हटत नाहीत हे बघून शैलेन्द्र आरडीला म्हणाले, चल आपण जुहू चौपाटीवर जाऊ. तिथे काही होतंय का पाहू?
….आणि खरंच शैलेन्द्र आरडींना घेऊन जुहू चौपाटीवर निघाले.
जुहू चौपाटीवर तेव्हा छान मंद रात्र पसरली होती. वातावरण नीरव होतं. दूर दूर अर्धा झाकोळलेला चंद्र दिसत होता. इकडे तिकडे पहात असताना शैलेन्द्रंचं लक्ष सहज त्या अर्ध्या झाकोळलेल्या चंद्रावर गेलं…आणि त्यांच्यातल्या कवीप्रतिभेला पालवी फुटली. त्यांनी लगबगीने कागद हातात घेतला आणि त्यावर शब्द लिहिले…..
खोया खोया चांद,
खुला आसमान,
आँखों मे सारी रात जायेगी,
तुम को भी कैसे निंद आयेगी.
शैलेन्द्रंनी हे शब्द आरडीला दाखवले. वाचूनही दाखवले. नवतरुण वयातला, उमेदवारीच्या काळातला आरडी ते शब्द ऐकून हरखून गेला. आरडीची इतका वेळ थांबल्याची तपश्चर्या फळाला आली होती. शैलेन्द्रंनी त्या गाण्यासाठी लावलेली समाधी संपन्न झाली होती. आपल्या वडिलांच्या हुकुमाची ताबेदारी आपण सुफळ संपूर्ण केली आणि शैलेन्द्रंकडून गाणं आपण घेऊनच आलो, आता वडील आपल्याला शाबासकी देतील हा विचार आरडींच्या मनात आला आणि विजयी मुद्रेने तो कागद घेऊन आरडी निघण्याच्या बेतात होते….
पण इतके सुंदर शब्द सुचल्यावर आता शैलेन्द्र तिथेच थोडेच थांबणार होते? तेही आरडीबरोबर एसडींकडे आले. एखाद्या देखण्या मुलीच्या पाहताक्षणीच प्रेमात पडावं तसं शैलेन्द्रंनी लिहिलेल्या त्या शब्दांच्या प्रेमात एसडी ते शब्द ऐकताक्षणी पडले.

खरंतर शैलेन्द्रंनी ते शब्द जेव्हा जुहू चौपाटीवर लिहिले तेव्हाच आरडींनी त्या शब्दांना चाल लावून खिशातल्या काडीपेटीवर ठेका धरला होता. पुढे महंमद रफींच्या आवाजातलं गाणं सदाबहार देव आनंदवर चित्रित झालं…आणि त्या एका काळात धमाल करून, धुमाकूळ घालून गेलं!