Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स ...सांझ की दुल्हन बदन चुराए!

…सांझ की दुल्हन बदन चुराए!

Related Story

- Advertisement -

रजनीगंधा फुल तुम्हारे, महके युं ही जीवन में, युं ही महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन में.योगेशजींनी रजनीगंधाच्या शीर्षकगीतासाठी असे शब्द लिहून आणले होते, पण ‘अनुरागी मन’ असे शब्द लिहिल्यामुळे ते धास्तावले होते. त्यांना ते सिनेमा लाइनीतले प्यार-मोहब्बतसारखे चलनी शब्द वाटत नव्हते. त्यामुळे आपण लिहिलेले हे शब्द बाद होणार असं सारखं वाटत होतं. सिनेमाचे संगीतकार सलील चौधरींनी त्यांना गाण्याची धून ऐकवली होती, दिग्दर्शक बासू चॅटर्जींनी त्यांना अमोल पालेकर, विद्या सिन्हा, दिनेश ठाकूर असलेल्या त्या सिनेमातल्या त्रिकोणी प्रेमाची साधीसरळ कथा ऐकवली होती…आता गीतकार म्हणून तसंच साधंसरळ गाणं लिहायची जबाबदारी त्यांची होती. ‘रजनीगंधा’ची मध्यमवर्गीय कथा ऐकून त्यांच्या मनात विचारचक्र सुरू झालं आणि ते ह्या शब्दांकडे येऊन थांबलं. त्यांनी हे शब्द कागदावर उतरवले आणि सलीलदांकडे ते आले. सलीलदांनी ते वाचले. आपण केलेली ‘रजनीगंधा’ची धून आठवली. त्यात ते अचूक बसले होते. त्यांना ते शब्द फिल्मी संगीताच्या साच्यात बसणारे वाटले. साच्याच्या बाहेरचे वाटले नाहीत. इथे एक लक्षात घ्यायला हवं की सलीलदा हा शब्दांतलं लालित्य पारखणारा माणूस होता. स्वत: गहनगहिरा कवी होता. साहित्यविषयातली कविता आणि सिनेमातलं संगीत ह्यातला फरक समजून घेणार्‍यातला होता, पण योगेशजींच्या ‘रजनीगंधा’ला त्याने त्यांनी लिहिलेल्या ‘अनुरागी मन’सकट ग्रीन सिग्नल दिला होता. आता प्रश्न होता दिग्दर्शक बासू चॅटर्जींचा. त्यांना ‘अनुरागी मन’ हा शब्द खटकणार तर नाही ना, असं प्रश्नचिन्ह योगेशजींच्या मनात डोकावत होतं. नंतर तो कागद सलीलदांनी आपल्याच हातात ठेवला…आणि बासू चॅटर्जींना सरळ त्या शब्दांतलं गाणंच ऐकवून दाखवलं. बासूदांना ते पसंत पडलं आणि योगेशजींच्या मनातली धाकधुक संपली.

योगेशजी ह्या गाण्याबद्दल नेहमी म्हणायचे, ‘अगदी त्या जमान्यातही मला कुणी ‘अनुरागी मन’ वगैरे शब्द लिहू दिले नसते, तू सिनेमाचं गाणं लिहायला आलास की भाषा आणि भाषेतलं सौंदर्य शिकवायला आलास असा जाब विचारला असता, पण सलीलदा आणि बासूदा दोघेही जाणकार होते म्हणून माझ्या ह्या शब्दांना त्यांनी कसली आडकाठी घेतली नाही.’खरंतर सलीलदांचे लाडके गीतकार होते शैलेन्द्र आणि बासूदांनी शैलेन्द्रंची निर्मिती असलेल्या ‘तिसरी कसम’ नावाच्या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. शैलेन्द्र हे शब्दांचा सुरेख सारीपाट सजवणारे प्रतिभासंपन्न कवी होते. अशा माणसाशी साथसोबत केलेल्या सलीलदा आणि बासूदांसोबत काम करताना योगेशजींसारख्या भिडस्त माणसावर दडपण येणं साहजिक होतं, पण ‘आनंद’मधली ‘कहीं दूर जब दिन ढल जाये, सांझ की दुल्हन बदन चुराये, चुप के से आये’ ही योगेशजींची रचना दूर दूर पोहोचली होती आणि त्या शब्दकळेवर सलीलदा आणि बासूदा दोघंही फिदा होते, पण तरीही त्या दोघांशी योगेशजींची कधी ओळखदेख नव्हती. त्याआधी सलीलदांची पत्नी सविताने योगेशजींची गाणी गायली होती. त्यामुळेही सलीलदांकडे जाणं त्यांना कठीण नव्हतं.

- Advertisement -

योगेशजींच्या बाबतीत सांगायचं तर योगशजी हे फिल्मी गाण्यातही कवितेचं अस्तित्व राखलं जावं अशा मताचे गीतकार होते. खरंतर त्यांच्या वाट्याला आलेली बहुतेक सर्वच गाणी ही चालीवर बेतलेली होती. तुम्ही आधी शब्द लिहून दिले आहेत आणि त्या शब्दांना संगीतकाराने चाल दिलेली आहे, असं एखादं गाणं सांगा असं विचारल्यावर योगेशजींना तसं गाणं आठवायचं नाही. चालीवर शब्द लिहिताना त्यात कवितेचं अस्तित्व टिकवणं ही प्रसववेदना काय असते हे गीतकारालाच माहीत असतं. आता ही पार्श्वभूमी जाणून घेतली तर आपल्याला योगेशजींच्या ‘कहीं दूर जब दिन ढल जाये, सांझ की दुल्हन बदन चुराये, चुप के से आये’, ‘कहीं बार युं ही देखा हैं, ये जो मन की सीमा रेखा हैं’, ‘न जाने क्यूं, होता हैं ये जिंदगी के साथ’, ‘जिंदगी कैसी हैं पहेली हाये’ ह्या गाण्यांमधली त्यांच्यातली कवितेची कला कळते. ‘कहीं दूर जब दिन ढल जाये’ ह्या गाण्यात सांझ की दुल्हन म्हणजे संध्याकाळ ह्या प्रहराला दिलेलं नव्या नवरीचं रूपक आपल्या मनाच्या कॅनव्हासवर संध्याकाळचं वेगळंच चित्र रेखाटून जातं. वास्तविक हे गाणं त्यांना आपल्या घराच्या बाल्कनीत बसलेले असताना सुचलं आहे. ह्या गाण्याची सलीलदांनी दिलेली चाल त्यांच्या डोक्यात होती. ती गुणगुणत असतानाच त्यांच्या घराच्या बाल्कनीतून त्यांना मावळतीचे बदलत जाणारे रंग दिसू लागले आणि ह्या गाण्याचे इतके तरल शब्द त्यांच्या मनात जमा झाले.

सलील चौधरींनी त्यांना एकदा अशीच एक चाल ऐकवली. ते तेव्हा ‘अग्नीपरीक्षा’ नावाचा सिनेमा करत होते. ती चाल तशी भावगंभीर, उदासवाण्या मुडची होती. ती चाल ऐकली आणि योगेशजी त्या चालीच्या प्रेमात पडले. ह्या गाण्याचा भाव ओळखून त्याला साजेसे शब्द सुचले तर ते गाणं खूप लोकांपर्यंत पोहोचेल असं योगेशजींना वाटत होतं. म्हणूनच खूप चिंतन करून ते गाणं त्यांनी लिहिलं. त्यासाठी त्यांच्या मनात शब्द आले –
आज कोई नही अपना,
किसे गम ये सुनाए.
तडप तडप कर,
युं ही घुंट घुंट कर
दिल करता हैं मर जाये.
लता मंगेशकरांनी हे गाणं गायलं आहे. सलीलदांनी गाण्याची सुरूवात होण्याच्या आधी जो गूढ संगीताचा तुकडा वाजवला आहे तिथपासून हे गाणं आपल्याला दोन घटका जिथल्या तिथे खिळवून ठेवतं. पण गाण्याचं दुर्दैव असं की ह्या गाण्याची दखल फारशी घेतली गेली नाही. योगेशजींना ह्या गाण्याची आठवण करून दिली की ते फक्त हसायचे. त्या हसण्यात खंत असायची. पण ती तेवढ्यापुरतीच. सिनेमातलं गाणं लिहितानाही त्यात कवितेचा अंश ठेवणारा असा हा कवी आज राहिला नाही. पण त्याच्या गाण्यातली कविता मात्र त्यांनी लिहिलेली सांझ की दुल्हन ऐकताना मावळणार नाही.

- Advertisement -