Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स ...तो जलता हैं दिल!

…तो जलता हैं दिल!

किशोरकुमार तिथून निघाले. आपल्या कारमध्ये जाऊन बसले, पण त्यांच्या मनातल्या त्या गाण्याने त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. त्या गाण्याची चाल त्यांच्या मनात अजूनही घोळत होती. त्या गाण्याचा तो विशिष्ट अंतरा तर त्यांच्या मनात राहिला होता...तुम्हें कोई और देखे तो जलता हैं दिल, बडी मुश्किलों से फिर संभलता हैं दिल, ही कोणती अशी भावना मजरूह सुलतानपुरींनी लिहिली आहे, हा त्यांना प्रश्न पडला होता.

Related Story

- Advertisement -

‘कुदरत’च्या गाण्याचे शब्द लिहिलेला कागद आर.डी.बर्मनच्या हातात आला होता. शब्द मजरूह सुलतानपुरींचे होते. त्या शब्दांना कशी चाल लावायची हा विचार आर.डी.बर्मनच्या डोक्यात घोळू लागला होता. एखादा कवी जसा चिंतनशील असावा तसा हा चिंतनशील संगीतकार. त्यांच्या डोक्यात ते शब्द घोळू लागताच हळुहळू त्या शब्दानुरूप चाल आकार घेऊ लागली. एक सुरेल सुंदर चाल त्यांनी त्यांच्या हार्मोनियमवर वाजवली. आपल्या सहकार्‍यांना ऐकवली. नाकावर आलेला चष्मा थोडा वर केला, पण चष्म्याचा वापर न करता मान किंचित खाली करून आपल्या सहकार्‍यांकडे त्यांनी पाहिलं. सहकार्‍यांनी त्या चालीला पसंती दिली आणि मजरूह सुलतानपुरींच्या त्या शब्दांना ती चाल आर.डी. बर्मननी नक्की करून टाकली.

गाणार कोण हा प्रश्नसुध्दा त्यांना अजिबात भेडसावला नाही. त्यांनी किशोरकुमारच्या नावावर मनोमन शिक्कामोर्तब करून टाकलं. यथावकाश किशोरकुमारना तसा निरोप पोहोचला. तोपर्यंत मजरूह सुलतानपुरींचे गाण्याचे अंतरे लिहून झाले होते. आर.डी.बर्मनना त्या गाण्याच्या मुखड्यालाही अगदी शोभेल अशी चाल सुचली. किशोरकुमार आले. त्यांना गाण्याची चाल समजावून सांगण्यात आली. किशोरदांनी ती चाल आर.डी.बर्मनकडून अगदी भक्तिभावाने ऐकली. मुखड्याची चाल ऐकली. लगोलग अंतर्‍याची चाल ऐकली.
अंतर्‍यातले मजरूह सुलतानपुरींनी लिहिलेले शब्द होते –

- Advertisement -

तुम्हे कोई और देखे
तो जलता है दिल,
बडी मुश्किलों से फिर
संभलता हैं दिल…

तो जमाना एकेका गाण्यासाठी चाळीस-पन्नास रिहर्सल्स करण्याचा होता. किशोरदांनी आर.डी.बर्मनसमोर त्या गाण्याची थोडी रिहर्सलच केली. मुखडा आणि अंतरा नीट गाऊन पाहिला. गळ्यात गाणं रुजवण्याचाच तो प्रकार होता. आर.डी.बर्मननी त्यांना गाता गाता थोड्या सूचना केल्या. एखाददुसरी सूचना किशोरकुमारकडूनसुद्धा आली. गाणं गंभीर प्रकृतीचं होतं. त्यामुळे किशोरकुमारनी आपला नेहमीचा हंसीमजाकचा स्वभाव बाजूला ठेवला होता. ते आर.डी.बर्मनकडून गाणं नीट ऐकत होते. नीट शिकत होते. ऐकता ऐकता, शिकता शिकता ते या पहिल्या अंतर्‍याजवळ आले. त्यांनी त्या अंतर्‍याची चाल मान खाली घालून, कान देऊन ऐकली आणि ती चाल, ते शब्द ते स्वत:शीच गुणगुणू लागले.

- Advertisement -

आता ती चाल, ते गाणं त्यांच्या गळ्यात पुरतं उतरलं होतं. बर्‍याच अंशी त्यांच्या कवेत आलं होतं. त्यांचं होऊ लागलं होतं. त्या खुशीत त्यांनी आर.डी.बर्मनना टाळी दिली आणि ते म्हणाले, ‘पंचम, ठीक हैं, आज के लिए मैं ये गाना समझ गया हूँ.’
किशोरकुमार तिथून निघाले. आपल्या कारमध्ये जाऊन बसले. पण त्यांच्या मनातल्या त्या गाण्याने त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. त्या गाण्याची चाल त्यांच्या मनात अजूनही घोळत होती. त्या गाण्याचा तो विशिष्ट अंतरा तर त्यांच्या मनात राहिला होता…तुम्हें कोई और देखे तो जलता हैं दिल, बडी मुश्किलों से फिर संभलता हैं दिल, ही कोणती अशी भावना मजरूह सुलतानपुरींनी लिहिली आहे, हा त्यांना प्रश्न पडला होता.

त्या एका क्षणी हा प्रश्न त्यांच्या मनातून जाता जाईना. मजरूहजींनी त्या शब्दांतून लिहिलेली ती भावना तशी त्यांना कळली होती, पण आपण ती याआधी आपल्याच कोणत्या गाण्यातून कधी गायली आहे का, याचा ते अंदाज घेत होते, पण तसं कोणतं गाणं त्या क्षणी तरी त्यांना आठवलं नाही. त्यांनीही मग ते फारसं मनावर घेतलं नाही. तो विषय त्या दिवशी त्यांनी सोडून दिला.

काही दिवसांनी ते पुन्हा आर.डी.बर्मनकडे आले. ते आज पुन्हा त्या गाण्याची रिहर्सल करणार होते. थोड्या वेळात काही मोजक्या वादकांबरोबर त्यांची रिहर्सल सुरू झाली. त्यांनी पुन्हा ‘हमे तुम से प्यार कितना…’ गायला सुरुवात केली. मुखडा सरला आणि ते त्या दिवशीच्या त्याच त्या अंतर्‍याकडे आले. तो अंतरा त्यांच्या गळ्यातून छान उतरला. अगदी त्या शब्दांतली ती भावनाही सही सही उतरली.

..पण तो परवाचा प्रश्न किशोरकुमारच्या मनात पुन्हा उसळी घेऊन वर आला. तुम्हें कोई और देखे तो जलता हैं दिल, बडी मुश्किलों से फिर संभलता हैं दिल, ही या गाण्यातली भावना आपण याआधी जशीच्या तशी कोणत्या गाण्यात गायलो आहे का?…गाण्याची रिहर्सल करता करता मध्ये त्यांना काही वेळ विश्रांती मिळाली.

…आणि मनात हा थोडा अस्वस्थ विचार सुरू असतानाच त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.
अचानक वीज चमकावी तसं एक जुनं गाणं त्यांना आठवलं. ते गाणं त्यांचं नव्हतं. ते होतं मुकेशचं. शब्द होते –

तुम अगर मुझ को न चाहो तो कोई बात नही,
तुम किसी और को चाहो तो मुश्किल होगी.

मुकेशच्या त्या गाण्यातल्या मुखड्यातले शब्द त्यांनी आपल्या या गाण्यातल्या अंतर्‍यातल्या शब्दांशी ताडून पाहिले. शब्द निराळे असले तरी भावना तीच होती. तद्दन पुरुषी प्रेमाची. हे प्रिये, तू आपली झाली नाहीस तर एक वेळ ठीक आहे, पण दुसर्‍या कुणाची नजर तुझ्यावर पडली तर मात्र माझा मी राहणार नाही, हेच सांगणारी ती भावना. किशोरकुमारच्या लक्षात आलं – ही अशी भावना मुकेशदा खूप पूर्वी गाऊन गेले आहेत…आणि त्यानंतर ती आपण गात आहोत!
…तर किशोरकुमार असेही होते. दुसर्‍याच्या गाण्याकडे, गाण्यातल्या भावनेकडे लक्ष देणारे.

- Advertisement -