पाणंद

Subscribe

कोकणातल्या लालमातीतून पाणंदीतून जाताना अनोखा आनंद होत असतो. दोन घरांच्या मधून जाणारा बारीक अरूंद रस्ता म्हणजे पाणंद. या पाणंदीना रंग, रूप, स्पर्श कळतो. कारण त्यांचा संबंध हा सतत त्या मातीशी आलेला असतो. या पाणंदीचा एकमेकांशी किती गोड संवाद होत असेल. पाणंदी या अगदी घरच्या माणसासारख्या. कारण रस्त्याचा आणि पाणंदीचा सहसंबंध असतो, पण त्यांचा वेगळेपणा नेहमी लक्षात राहतो. रस्ता आपल्याला अर्ध्यावर सोडतो, जिथे रस्ता आपल्याला सोडतो तिथे पाणंदीचा प्रवास सुरू होतो. पाणंदी या आपल्याला घरापर्यंत सोडतात. त्यामुळे रस्त्यापेक्षा पाणंदी माणसाच्या लक्षात जास्त राहतात.

पाणंद म्हणजे कोकणातल्या गावांचा एक अविभाज्य भाग. तसं पाहिलं तर दोन घरांना जोडणार्‍या किंवा दोन घरांमध्ये पुसट अंतर निर्माण करणारी, पण पाणंदी या गावच्या शोभिवंततेत भर घालतात. या पाणंदी माणसाशी गुज साधतात. त्यांना आपल्याशी बोलावेसे वाटते. त्यांना आपल्याशी संवाद साधायचा असतो. फक्त त्यांचा संवाद ऐकण्यासाठी आपल्याला कान आणि डोळे उघडे ठेवायला हवे.

कोकणातल्या लालमातीतून पाणंदीतून जाताना अनोखा आनंद होत असतो. दोन घरांच्या मधून जाणारा बारीक अरूंद रस्ता म्हणजे पाणंद. या पाणंदीना रंग, रूप, स्पर्श कळतो. कारण त्यांचा संबंध हा सतत त्या मातीशी आलेला असतो. या पाणंदीचा एकमेकांशी किती गोड संवाद होत असेल. पाणंदी या अगदी घरच्या माणसासारख्या. कारण रस्त्याचा आणि पाणंदीचा सहसंबंध असतो, पण त्यांचा वेगळेपणा नेहमी लक्षात राहतो.

- Advertisement -

रस्ता आपल्याला अर्ध्यावर सोडतो, जिथे रस्ता आपल्याला सोडतो तिथे पाणंदीचा प्रवास सुरु होतो. पाणंदी या आपल्याला घरापर्यंत सोडतात. त्यामुळे रस्त्यापेक्षा पाणंदी माणसाच्या लक्षात जास्त राहतात. या पाणंदीची मजा खरी तर तारुण्यात. डॉ. महेश केळुसकर यांनी अशीच एक पाणंदी साहित्यात अजरामर करून ठेवली आहे. त्यांच्या सुप्रसिद्ध ‘झिनझीनाट’ या मालवणी कवितेत पहिल्या ओळीतच त्यांनी तारुण्यात फुलणारी सुलभ अवस्था विशद करताना

पाणंदीत भेटलस आंगाक खेटलस                                                                                काळोखकीन्नाट हातात हात घेतलस झालो झिनझीनाट.
त्यामुळे या पाणंदीचे महत्त्व तसे अबाधितच. कुठल्याही ऋतूत या पाणंदीतून जा, या पाणंदी तशा टवटवीत दिसतात. पाणंदी कधी कोमेजून स्वस्थ पडल्या आहेत असं वाटतच नाही. पावसाळ्यात या पाणंदीतून जाताना रस्त्यावरचा एक आवाज या पाणंदीतून जाताना ऐकू येतो. रपरप करत कोणी गावकरी या रस्त्यावरून जात असला की, पाणंद जणू त्या तालावर आपली सोबत करते की, काय असं वाटत, पण ती वाट तुडवत असतो. पाणंदीना दोन्ही बाजूच्या घरातली गुपितं माहीत असतात.

- Advertisement -

दोन्ही बाजूच्या घरातल्या सुख दुःखाच्या एकमेव साक्षीदार म्हणजे या पाणंदी. गावाचा उत्कर्ष आणि गावचा भकास चेहरा पिढ्यानपिढ्या पाहिलेल्या पाणंदी. अशा प्रसंगी कशा वागल्या असतील. गावात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा गावातल्या शेतकर्‍याबरोबर या पाणंदींनी आपले अश्रू पुसले असतील का ?

काळ बदलला तसं पाणंदीचे स्वरूप बदलले. पूर्वी दोन घरांच्या मध्ये अगदी चिंचोळ्या जागेत या पाणंदी आखडून गेल्या होत्या. दोन्ही बाजूच्या मालकांना वहिवाटीची जमीन जेवढी आत घेता येईल तेवढी घेण्याच्या नादात या पाणंदी रुंदीला अगदी कमी होत्या, पण आता मालकांनी नवीन चार चाकी गाड्या घेतल्या, त्यांच्या गाड्या घरासमोर उभ्या राहिल्या पाहिजेत तर पाणंदीची रुंदी वाढवली पाहिजे, हे मालकांच्या लक्षात आले आणि आपोआप पाणंदीची रुंदी वाढली.
पावसाळ्यात रपरपणार्‍या पाणंदी हिवाळ्यात धुक्याची शाल ओढून बसलेल्या दिसतात. त्यांच्या हालचालीत कमालीचा वेग येतो, जसं जसं उन वाढू लागतं तसं कार्तिकाच्या त्या कुंद वातावरणात आजुबाजूला असणार्‍या भातशेतीचा आनंद घेत, त्या भाताच्या केसरांचा वास नाकात भरून त्या पाणंदीतून जाताना काय मनभावनता येते म्हणून सांगू! या शेताचा आणि पाणंदीत पसरलेल्या केसरांचा वास किती संदिघता निर्माण करतो म्हणून सांगू.

आजुबाजूला कौलारू जांभ्या दगडाची घरं, त्यांच्यासमोर पसरलेलं खळ, त्या खळ्यात सुकत घातलेले आमसूल, पापड, फणसाची साट, झाडाला लगडलेले आंबे आणि समोरची पाणंद असं वातावरण उन्हाळ्यात जेव्हा आपण बघतो तेव्हा उन्हाचा सर्व क्षीण कमी होतो. या पाणंदी अक्षय आहेत. अनंत आहेत. यांना कुठेतरी जीवपणातून सुटून शिवत्वाचा स्पर्श झाला आहे. या सूक्ष्मतेकडून भव्यतेकडे घेऊन जाताना दिसतात. त्यांना शिवत्वाची वेगळी झळाळी आहे. पिंडी ते ब्रम्हांडी हे सत्य सांगण्याची क्षमता या पाणंदीत सामवलेली आहे.

पूर्वी घराच्या बाजूला काट्यांचे कुंपण असायचे, त्या वयीच्या मधून या पाणंदी जाताना दिसायच्या, पण आता घराच्या बाजूने जांभ्या दगडाचे गडगे असतात, त्यांच्या लालीत या पाणंदीच्या लालमातीचा रंग अक्षरश: मिसळून गेला आहे. पाणंदीला रंग, रूप असलं तरी प्रत्येक पाणंद ही वेगळी. एक पाणंद दुसरीसारखी नाही. प्रत्येकीच्या सुखाची भाषा वेगळी, प्रत्येकीच्या ठेवणीची रीत निराळी, प्रत्येकीचा तोरा निराळा.

दोन गडग्यांच्या मधून नदीला जाणारी पाणंद किती वेगळी वाटते. ती पाणंदीचा अवखळपणा देवळाकडे असणार्‍या घरांच्या मधल्या पाणंदीत दिसत नाही. त्या पाणंदी या खूपच सात्विक, आमराईतल्या पाणंदी नेहमी सजग असतात. त्या पाणंदीत कोणाचा पाय पडला की, त्याची सळसळ सगळ्यांना कळते. त्या मनाने शाळेच्या बाजूच्या पाणंदी या खूप निर्मळ कारण त्या पाणंदीच्या आजुबाजूला कोणी विशेष फिरकत नाहीत. पाणंदीतून गुरं आणि त्यांच्या मागे गुराखी जाताना त्या पाणंदी किती उल्हासित होत असतील!, त्यांच्या उल्हासितपणाची कल्पना आपल्याला येणार नाही.

काही पाणंदी मात्र उगीचच बदनाम झाल्या आहेत. म्हणजे नदीच्या वरच्या बाजूला जी पाणंदी आहे, ती देवचाराची पाणंद म्हणून उगाच बदनाम, तिकडे कोणी जायचे नाही. लहान पोरांनी तर त्या पाणंदीच्या वाटेला पण जायचे नाही. हल्ली कधी गावातला बाबी पेडणेकर त्या पाणंदीत भोवळ येऊन पडला आणि तिथेच त्याने जीव सोडला. आता त्या पाणंदीला बदनाम होण्यासाठी तेवढं कारण पुरेसे आहे. गावातली पोरं हल्ली कोणाला भेटायचं असेल तर अमुक एका पाणंदीत जातात. साकवाजवळच्या पाणंदीत मोबाईलला रेंज चांगली येते, त्यामुळे तिन्हीसांज झाली की हल्ली सगळे या पाणंदीत…

या पाणंदीला विशेष महत्त्व प्राप्त झाले याला कारण या पाणंदी मोकळ्या मनाने वागल्या, अगदी आपल्याला हव्या तशा. पाणंदी कधी मुक्या राहिल्या नाहीत. त्या सतत बोलत राहिल्या, सगळ्यांशी हितगुज करत राहिल्या. त्यांनी रस्त्यांना आपलेसे केले. त्यांनी माणसांना आपलेसे केले. त्यांनी आजुबाजूच्या झाडापेडांना नव्हे तर गुरा वासरांना आपलेसे केले. सगळ्या निसर्गाला पाणंदीनी आपलेसे केले म्हणून माणसांनी त्यांना आपलेसे केले.

माणसांनी मुलांना ठेवावी तशी पाणंदीची नावे ठेवली. ही इनामदारांची पाणंद, ही खोतांची पाणंद, ही आमराईची पाणंद, ही रगाड्याची पाणंद, काही पाणंदीची नावं कशी पडली याचे कोडे आहे. आजूबाजूला कोणतेही थडगे नसताना ही थडग्याची पाणंद किंवा गावात इतके पाण्याचे नळ आहेत पण एका पाणंदीला नळाची पाणंद ! , हे खरंतर न समजण्याच्या पलीकडे, पाणंदी या मुद्दाम कोणी निर्माण केल्या नाहीत तर ज्यांना आपली हद्द, मर्यादा समजून घेता आली, त्यांच्या हातून पाणंदी आपोआप निर्माण झाल्या.

पाणंदी या तशा अविनाशी, अक्षय, अचल तसेच त्या चेतनामयी, त्यांनी आपले अस्तित्व स्वतः निर्माण केले आणि आबाधित राखलेसुद्धा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -