आयदान

Subscribe

एखाद्या यंत्रासारखा हात वळवत ही माणसे आयदान बनवताना आढळायची. पण एवढी कलाकुसर अंगी असूनदेखील हा समाज उपेक्षित होता. कोणी त्यांच्या कलेची हवी तशी किंमत केली नाही. आयदान बनवणे म्हणजे लग्नसमारंभात उपयोगात येणारी एक वस्तू. आणि त्या वस्तू आपल्याला हव्या त्या किमतीत बनवणारी ही माणसं, एवढाच काय तो लोकांचा या समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन.

चारपाच दिवसांपूर्वी ठाण्याला एका ग्रामोद्योग देणार्‍या संघाचं प्रदर्शन बघण्यासाठी गेलो होतो. अनेक वस्तूंची मांडणी करून बाजारभावापेक्षा कमी भावात वस्तू उपलब्ध होत होत्या. मी सहज एका विक्रेत्याकडे विचारपूस केली. या वस्तू त्यांना कुठे मिळतात? पाहिल्या पाहिल्या त्या वस्तू कोण बनवते किंवा कुठे मिळतात हे सांगायला तो विक्रेता नकार देत होता. त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. मीसुद्धा जास्त चौकशी न करता पुढे गेलो.

- Advertisement -

प्रदर्शन बघताबघता मी एका दुकानापाशी थांबलो. त्या दुकानापाशी माझे पाय खिळून राहिले. बघतो तर बांबूपासून बनवलेल्या वस्तूंचं छान प्रदर्शन लागलं होतं. अनेक दुर्मीळ वस्तू बघायला मिळाल्या. हल्ली या वस्तू ग्रामीण भागातदेखील बघायला मिळत नाहीत. बांबूची चटई जिला तळकोकणात डाळी म्हणतात. त्याशिवाय सूप, रोवळी, तसेच बांबूपासून बनवलेला वारा घालायचा पंखा. अशा अनेक वस्तू. वस्तू त्याच होत्या; पण त्यांना रंगरंगोटी करून त्या नव्या स्वरुपात ग्राहकांसमोर विकायला आणल्या होत्या. मला या वस्तू कोण बनवतं हे जाणून घ्यायचं होतं. मी एका संयोजकाला पकडलं आणि त्याला या वस्तूंचा स्त्रोत कुठे आहे याची चौकशी केली. तेव्हा कळले की, या वस्तू ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग म्हणजे मुरबाड, जव्हार या भागातील आदिवासी बनवत असतात. त्या लोकांकडून या वस्तू आणून त्या वस्तूंना शोभिवंत करून इथे प्रदर्शनात ठेवले आहे.

या वस्तूंचा कर्ताकरविता जो कोण असेल त्याला माहीत तरी असेल का की, आपल्या वस्तू एवढ्या मोठ्या प्रदर्शनात विकायला ठेवल्या आहेत. तो बिचारा आपल्या कुडाच्या भिंती असलेल्या घरात दोन वेळच्या जेवणासाठी ढोर मेहनत करत असेल. या देशात कष्टकरी आणि अंगी कसब असणारा माणूस संधी मिळाली नाही तर मागे रहातो हे नव्याने सांगायला नको. कष्टकरी शेतकरी आपल्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून उगाच का टाहो फोडतो. ही व्यवस्था किती चुकीची वाटते नाही का? समाजातल्या दुर्बल घटकाने आपल्या अवगत कलेच्या योगे अनेक उत्तम वस्तू बनवायच्या आणि त्याचं संबंधित लोकांनी मार्केटिंग करून बक्कळ नफा कमवायचा ही आजची वस्तुस्थिती अनेक ठिकाणी आढळते.

- Advertisement -

मी त्या प्रदर्शनात बांबूपासून बनवलेलं सूप आणि एक रोवळी घेतली. थोडं पुढे आलो तेव्हा त्या संयोजकांनी माहिती दिली ती ऐकून मी उडालोच. मुंबईसारख्या शहरात मर्तीकासाठी, तिरडी बांधायला जी बांबूची चटई लागते तीदेखील लोक मोठ्या प्रमाणावर तिथून घेऊन येतात. हे ऐकलं आणि मी विचार करू लागलो या सर्व वस्तू म्हणजे एकेकाळी जीवनावश्यक वस्तू होत्या. आज आपण त्या वस्तू शोपीस किंवा दुर्मीळ वस्तू म्हणून घरात ठेवू. पण या बनवणार्‍या न दिसणार्‍या हातांचं काय? या कलेची किंमत कोणी करावी?या सर्वांची आठवण होताना मला आमच्या गावी आयदान बनवणारा दलित समाज आठवला. गावर्‍हाटीत सर्व बांबूच्या वस्तू बनवण्याची कामं, म्हणजे बांबूची डाळी, सूप, रोवळी, टोपली, डालग्या म्हणजे मोठी टोपली अशाप्रकारच्या गृहोपयोगी वस्तू किंवा साधनं बनवण्याचं काम हा समाज करत होता. काही ग्रामीण भागात आजही करत आहे. प्रसिध्द साहित्यिक उर्मिला पवार यांच्या ‘आयदान’ या त्यांच्या आत्मचरित्रात या समाजातील स्त्रियांची दु:खं, त्यांनी भोगलेल्या यातना याचं प्रत्ययकारी वर्णन आलं आहे.

गावी कोणाकडे लग्न समारंभ असेल तर यजमानी गावातल्या या वस्तीकडे जाऊन लग्नासाठी आयदान बनवण्याची सूचना करून येत असे. त्याबदल्यात पाच बांबू आणि काही पैसे द्यावेत हा गावचा रिवाज ठरलेला. मग कोणतरी आक्का नाहीतर तायडी घराजवळचे चार पाच बांबू तोडून ते बांबूचे तुकडे करून कोयत्याने तासत बसे. या क्षणापासून आयदान बनवायला सुरुवात होई. आयदान बनवताना ही मंडळी अंगभूत कला सादर करताना दिसत. आयदान तयार करणे म्हणजे केवळ उपजीविकेचं साधन होतं असं नसून आपली कला समाजापर्यंत पोचवण्याचा तो लहानसा प्रयत्न होता.तसं बघितलं तर उपेक्षित समाजाकडून या वस्तू बनवून घेऊन त्या वस्तू सण-समारंभात मिरवत असत. पण त्यावेळी हा समाज मात्र समाजासाठी नगण्य होता. वेळप्रसंगी मात्र लोकांना यांची आठवण होई. घरातली रोवळी फाटली नाहीतर सराईच्या दिवसात डालगी फाटली की, मग तांब्याचो गणो दिसलो तर त्याका याक डालग्या बनवून देवक सांगा हा, असा घरमालकीनीचा हुकूम सदरेवर आला की, खोत घराकडून निघून थेट दलितवस्ती गाठायचे आणि गण्याला शोधून कायव कर पण माका चार दिसात याक डालग्या बनवून दी. खोताने सांगितलं म्हणजे चार काय, दोन दिवसात गण्या डालग्या बनवून द्यायचा. कारण खोताची मर्जी त्याला राखनं त्याच्या गावात सुखाने राहण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. खोत मग त्याला दोन बांबू देऊन गप्प करायचा.

आयदान ही तेव्हा एक जीवनावश्यक गोष्ट होती, असेच म्हणावे लागेल. कारण साठवणीच्या वस्तू या तेव्हा बांबूच्या बनत असत. आयदान बनवणं ही एक कलाच होती. लहानपणी आमच्या आंब्याच्या बागेत जाताना मध्ये दलितवस्ती लागे. आंब्याच्या बागा वर होत्या, ती घाटी चढताना दम लागायचा मग मी त्या वस्तीकडे थांबून राही. तेव्हा कोणतरी घराच्या मांडवात आयदान बनवत बसलेला असे. तेव्हा ती कलाकुसर बघायची संधी मिळे. टोपली नाहीतर झाप बनवण्यासाठी खालची रिंग बनवताना किती कलाकुसर लागे ती ही मंडळीच जाणो. तोंडात एक टोक घेऊन दुसर्‍या बाजूने बांबू ओढताना बनवणार्‍याची अक्षरशः तारांबळ उडे. पण ती गोष्ट संपली की, एखाद्या यंत्रासारखा हात वळवत ही माणसे आयदान बनवताना आढळायची. पण एवढी कलाकुसर अंगी असूनदेखील हा समाज उपेक्षित होता. कोणी त्यांच्या कलेची हवी तशी किंमत केली नाही. आयदान बनवणे म्हणजे लग्नसमारंभात उपयोगात येणारी एक वस्तू. आणि त्या वस्तू आपल्याला हव्या त्या किमतीत बनवणारी ही माणसं, एवढाच काय तो लोकांचा या समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन. तेव्हा या अंगभूत कलेची किंमत तरी कोणी करावी?रात्रभर जागून आयदान बनवून दुसर्‍या दिवशी आठवडी बाजारात विकणार्‍या अनेक दलित स्त्रिया दिसायच्या. माल खपायचा; पण त्यांच्या किमतीला नाही तर गिर्‍हाईक म्हणेल त्या किमतीला. आज बांबूच्या छोट्या टोपल्या किंवा फ्रुट बास्केट म्हणून बाजारात मिळणार्‍या टोपल्या भरमसाट किमतीत मिळताना पाहून मनात एक प्रश्न हमखास येतो, यापैकी रात्रभर मेहनत करून बाजारात विकणार्‍या या बायाबापड्यांच्या वाट्याला यातले किती आले असतील. उत्तरं खूप कठीण आहे; पण डोळे उघडून बघितले की कळतं, यांच्या मुलांना पोटभर जेवण मिळत नाही. आदिवासींपैकी कोण आजारी पडला की, उपचार कसे करावे हा प्रश्न त्यांच्या डोक्यावर अजूनही आहे. त्या मुलांना शाळा नाही. इतरांसारखी ही मुले टीव्ही बघू शकत नाहीत. सुख आणि चैन या गोष्टी त्यांच्यापासून खूप लांब आहेत.

एखादा दलाल येऊन यांनी बनवलेली आयदानं प्रदर्शनात विकायला घेऊन जातो तेव्हा त्याच्या दृष्टीला ही मुलं दिसत नाहीत. या स्त्रियांच्या अंगावर जीर्ण झालेले कपडे दिसत नाहीत. त्या कामाचे पैसे देताना त्या कामगाराच्या हाताला पडलेल्या भेगा दिसत नाहीत, त्याला समोर दिसतो तो फक्त बक्कळ नफा….या कामगारांच्या कष्टावर मिळवलेला. कोकणातला आयदान बनवणारा समाज काय किंवा पाड्यावरचा आदिवासी समाज काय. हातात कलाकुसर आहे; पण समाजाला ते हात नकोत. त्याला त्या वस्तू हव्यात, ती सुपं, टोपल्या हव्यात; पण त्या समाजाच्या विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणं जिकिरीचं वाटतं. हाच सामाजिक दृष्टीकोन ठेऊन हा समाज जगत असतो, नव्हे तर क्षणाक्षणाला मरत असतो.

– वैभव साटम .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -