घरफिचर्सभाजप विरोध वरवरचा...

भाजप विरोध वरवरचा…

Subscribe

विरोधक गाफील राहतात आणि आपण भाजपच्या चुकांमुळे निवडून येऊ या भावनेने पारंपरिक पद्धतीने निवडणुका लढवतात.हा मुद्दा निवडणुका लढविण्याच्या आणि जिंकण्याच्या पद्धतीसाठी फार महत्त्वाचा आहे.भाजप निवडणुकांना काँग्रेस-राष्ट्रवादी इतके सोपे समजत नाही. विरोधकांना अजूनही त्यांच्या चुका होतील आणि आपण सत्ता मिळवू अशीच अपेक्षा आहे.

स्थळ : बोरिवली- मी राहत असलेली १२० घरांची सोसायटी. त्यापैकी १०० घरे ही गुजराती, जैन आणि अन्य भाषिकांची. मराठी दहा बारा. आमची सोसायटी एका कुटुंबासारखी. सर्व सुख-दुःखे एकत्र साजरी करणारी. राजकीय, सामाजिक विषयावर भरभरून बोलणारी माणसे. एके दिवशी एका कार्यक्रमात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी बाजू (चांगली बाजू सगळेच सांगतात) सांगण्याचा प्रयत्न केला. त्यात अर्थातच नोटाबंदी, विकासाचे खरे-खोटे रूप, समाजाच्या शेवटच्या घटकाला वाटणारी असुरक्षितता, भाजपच्या आडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आणि बरेच काही. मी बोलून झाल्यानंतर कोणीच काही प्रतिक्रिया दिली नाही… मी काहीतरी भयंकर बोललो, असे माझे मलाच वाटले. त्यानंतर एका युवा महिलेने बोलायला सुरुवात केली आणि मोदींचे गुणगान गाताना थेट ती राहुल गांधींवर घसरली. त्यांना ‘पप्पू’ म्हणत तिने ‘पुढील सरकार हे भाजपचे असेल’, असे जाहीर करून टाकले…तिच्या या व्यक्त होण्याला तुफान टाळ्या पडल्या.काय समजायचे होते ते मी समजून घेतले!

स्थळ : खालसा कॉलेज, माटुंगा-कॉलेज बॅचचे सर्व मित्र जमलेलो. चहापाणी आणि एकमेकांची विचारपूस झाल्यानंतर अर्थातच विषय भाजप आणि मोदींचा.आमच्या मित्रांमध्ये अन्य भाषिक मोठ्या संख्येने. मोदींच्या नोटाबंदी आणि जीएसटी निर्णयावर सर्वांनी जोरदार तोंडसुख घेतले. अर्थातच मित्रांमध्ये नोकरी करणार्‍यांपेक्षा व्यवसाय धंदे करणारे अधिक असल्याने त्यांचे हे बोलणे अपेक्षित होते. मात्र यूपीएच्या दहा वर्षांच्या भ्रष्ट कारभारापेक्षा मोदींचा कारभार उत्तम, असा अंतिम निष्कर्ष आणि पुढचे सरकार २०१४ इतके बहुमतात नसेल; पण भाजपचेच असेल असा वर शेरा. आणि वर अशीही पुस्ती की मोदींना कुठे मुलेबाळे आहेत, की त्यांना काँग्रेशी नेत्यांप्रमाणे सात पिढ्या बसून खातील इतकी माया जमवायची आहे! चार वर्षांत मोदी सरकारचा एक मोठा घोटाळा सांगा! माझी दुसर्‍यांदा बोलती बंद झालेली.

- Advertisement -

स्थळ : कुडाळ – आम्ही सर्व कोकणातील मित्र एकत्र जमलेलो. या सर्व मित्रांनी कोकणातच शिकून मुंबईची वाट न धरता आपल्याच जिल्ह्यात उद्योग व्यवसाय उभारलेला आणि भूमिपुत्रांना मदतीचा मोठा आधार दिलेला. मोदींची सर्व धोरणे यापैकी बहुतेकांना मान्य नाहीत, मात्र देशाच्या विकासाबाबत त्यांचे सर्वांचे एकमत दिसले. हे सरकार विकासाची भाषा बोलते आणि करून दाखवते म्हणून. विकास म्हणजे नेमके काय झाले, या माझ्या प्रश्नावर गेली अनेक वर्षे बांबूवर काम करणारा संजीव कर्पे म्हणाला, बाकीचे सोड. साधे बांबूंचे उदाहरण देतो. बांबू हे झाड नसून ते गवत या प्रकारात मोडते, हे या विषयातील जाणकार काँग्रेस सरकारला इतकी वर्षे ओरडून सांगत असताना कधी ऐकले नाही. मोदींनी हा निर्णय घेतला आणि पूर्वांचल राज्यांसह जेथे बांबू होतो, तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भविष्यात बांबू हे रोजगाराचे देशव्यापी साधन बनेल, यावर काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रात विदर्भ, कोकणात बांबूचा मोठा उद्योग होईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संजीव कर्पे आणि मित्र परिवाराच्या कोनबॅक या बांबूवर काम करणार्‍या संस्थेत एक तपाच्या अथक मेहनतीनंतर आज अडीचशे जणांना प्रत्यक्ष आणि दीडशे लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे.

बांबूनंतर अर्थातच मुंबई-गोवा चौपदरीकरण, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, मुंबई-गोवा जलवाहतूक हा विकासही बाकीच्या मित्रांनी नीट समजावून सांगितला. माझ्या तोंडावर पट्टी! आणि या तीन प्रसंगांवर कळस म्हणजे सांगली आणि जळगाव महापालिकांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मिळवलेले बहुमत. सांगलीत साखर सम्राट, सहकार सम्राट, दूधसम्राट यांची त्यांच्याच बालेकिल्ल्यात कमळाने धूळधाण केली. तर दुसरीकडे जळगावात ४० वर्षांची सुरेशदादा जैनांची हुकूमशाही मोडीत काढली. समृद्ध लोकशाहीचा विचार करता वर्षोनुवर्षे खुर्च्यांना चिकटून बसलेल्या सत्ताधार्‍यांना खाली खेचणार्‍या सांगली आणि जळगावमधील मतदारांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. पण, मोदी आणि फडणवीस यांच्याबाबतचा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा विरोध गेला कुठे? प्रसारमाध्यमे, सोशल मीडियामधून भाजपच्या हुकूमशाहीचे चित्र जाणकार रंगवत असताना हा विरोध मतदानाच्या वेळी जातो कुठे? हा लाखमोलाचा सवाल आहे. याचे सध्यातरी उत्तर एकच दिसते आणि ते म्हणजे हा विरोध वरवरचा असून तो खालपर्यंत झिरपलेला नाही. मतदारांचा अजूनही ४ वर्षांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरचा राग कमी झालेला नाही. ‘आताची ५ आणि पुढील ५ अशी १० वर्षे काँग्रेसला सत्तामुक्त करून धडा शिकवायचा’,असा निर्धारच जणू मतदारांनी केलेला दिसतोय, असे निवडणूक निकालांचे आकडे सांगतात.

- Advertisement -

‘काँग्रेसमुक्त भारत’हा साथी जॉर्ज फर्नांडिस यांनी तीन दशकांपूर्वी दिलेला नारा यावेळी प्रकर्षाने आठवतो. आपले सारे आयुष्य कामगार, शोषित, मागास भागाच्या विकासासाठी वेचणार्‍या, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी काँग्रेसला संसदेत जेरीस आणणार्‍या, नाथ पै, मधू लिमये, मधू दंडवते या प्रामाणिक साथींच्या रांगेतील मानाचे पान म्हणजे फर्नांडिस! जॉर्ज यांना बेड्या ठोकणार्‍या आणि त्यांना फक्त ठार मारायचे बाकी ठेवणार्‍या काँग्रेस राजवटीची तिथपासून खरी घसरण सुरू झाली. खरेतर आणीबाणीनंतर जनता पक्षाला लोकांनी पहिली पसंती दिली आणि सत्तेवर बसवले. मात्र फाटाफुटीचा जन्मजात शाप घेऊन आलेल्या समाजवादी मंडळींना लोकांचा काँग्रेसमुक्त भारताचा हा आतला आवाज त्यावेळी नीट ऐकता आला नाही. मात्र तो शेवटपर्यंत जॉर्ज यांनी घुमवत ठेवला. सतराशे अठरा शकले झालेल्या आणि लालू, पटनाईक, देवेगौडा अशा स्वतंत्र चुली मांडणार्‍यांना जॉर्ज यांचा भविष्याचा वेध कधी दिसला नाही.बिहारमध्ये नितीशकुमार यांना तो दिसतोय आणि त्यांनी आपल्या नेत्याचा जॉर्ज यांचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. सतराशे साठ शकले झालेल्या जनता पक्षांपेक्षा भाजपलाच जॉर्ज काय म्हणत होते ते नीट कळले, त्यामुळेच त्यांना सत्तेचा मार्ग दिसला.

संघर्ष आणि आंदोलनाचा रस्ता सत्तेच्या मार्गाकडे जात असेल तर त्याला नाके मुरडण्यात काय अर्थ आहे?जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी सर्व समाजवाद्यांना एकत्र करत निवडणुकांना सामोरे जाऊया, असे दहावेळा कानीकपाळी ओरडून सांगितले; पण प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशा आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या राजापूर मतदारसंघातून उभ्या राहाव्यात, असे नारकर यांना मनापासून वाटत होते; पण मेधा कधी तयार झाल्या नाहीत. ‘हे आपले काम नाही’,असे त्यांचे मत होते. पण मेधा उभ्या राहिल्या असत्या तर एकेकाळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला असलेला राजापूर नाथ पै, मधू दंडवते यांच्यानंतर पुन्हा एकदा जनता दलाच्या हाती आला असता. पण तसे झाले नाही. मात्र योगेंद्र सिंह यांच्या सांगण्यावरून गेल्या लोकसभेत ईशान्य मुंबईतून मेधा आम आदमी पार्टीकडून उभ्या राहिल्या आणि पराभूत झाल्या.असो, हे सारे मुद्दामहून सांगण्याचे कारण म्हणजे भाजपसमोर या घटकेला काँग्रेस हा सक्षम असा पर्याय दिसत नाही. आणि जेव्हा केव्हा तो दिसेल तेव्हा लोकशाहीवर श्रद्धा असणारा मतदार तो देणारच. दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे सरकार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. वातावरण बदलतेय, वारे फिरलेत…आता काही भाजपचे खरे नाही,

मात्र निवडणुका आल्या की, असे काय होते की मतदार भाजपच्याच बाजूने कौल देताना दिसतात? याचा अर्थ असा आहे का, की लोक भाजपवर नाराज आहेत. मात्र मतदार खूश आहेत? म्हणजेच वर दिसणारा विरोध खाली झिरपत नाही, हेच त्याचे मुख्य कारण आहे. ईव्हीएममध्ये होणारा घोळ आणि प्रचंड पैसा यामुळे भाजप जिंकत आहे, असेही आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. मात्र पैसे आणि दलित, मुस्लीम समाजाला खोटी आश्वासने देऊन कायम निवडणुका जिंकत आलेल्या काँग्रेसवर विश्वास ठेवायला पुढची काही वर्षे मतदार तयार होणार नाहीत, हेच खरे सत्य आहे. अन्यथा ५८ सकल मराठा समाजाचे मोर्चे निघाले असताना आणि मूक मोर्चा हिंसक झाला असताना सांगली आणि जळगावात लोकांनी भाजपला धूळ चारली पाहिजे होती. पण तसे झाले नाही. या दोन्ही ठिकाणी मराठ्यांची मते खूप बदल करणारी होती, पण ते मतदानात दिसले नाही.मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे भाजपला काहीही राजकीय नुकसान होत नाही? किंवा मराठा समाज समजतो तितकीही त्यांची राजकीय ताकद नाही?असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. मात्र महाराष्ट्रातील राजकारणात आजही मराठ्यांचा प्रभाव आहे आणि तो राहणार. मात्र प्रत्येक गावचे राजकारण गावातील ३-४ प्रस्थच करत असतात. त्यांच्या मागे विखुरलेल्या अवस्थेत समाज उभा असतो. त्यामुळे प्रस्थांपैकी २-३ लोकं मॅनेज करायची, हे भाजपचं राजकारण आहे आणि हा फंडा यशस्वी होतोय.पारंपरिक निवडणूक प्रचारयंत्रणा कालबाह्य होत आहेत.त्या पद्धतीत बदल आजची गरज आहे.२०१४ पासून झालेल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या निवडणुकीत वेगवेगळ्या मुद्यांवरून जनसामान्यांमध्ये भाजपबद्दल नाराजी असतानाही भाजपला यश मिळते आणि त्याचे कारण म्हणजे नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा. पण विरोधक गाफील राहतात आणि आपण भाजपच्या चुकांमुळे निवडून येऊ या भावनेने पारंपरिक पद्धतीने निवडणुका लढवतात. हा मुद्दा निवडणुका लढविण्याच्या आणि जिंकण्याच्या पद्धतीसाठी फार महत्त्वाचा आहे.भाजप निवडणुकांना काँग्रेस-राष्ट्रवादी इतके सोपे समजत नाही.

सोबतच एककेंद्री नेतृत्व असल्याने अंतर्गत कलहाचे प्रमाणही तुलनेत कमीच. विरोधकांना अजूनही त्यांच्या चुका होतील आणि आपण सत्ता मिळवू, अशीच अपेक्षा आहे. भाजप संघटनेत असणारा उत्साह, नव्या नेतृत्वाला दिली जाणारी संधी या गोष्टी निवडणुका जिंकण्यासाठीचा उत्तम फॉर्म्युला ठरताहेत. या उलट दोन्ही काँग्रेसमध्ये तुलनेने मरगळ देखील जास्तच आहे. सोशल मीडीयात केलेल्या आणि कधी-कधी न केलेल्या कामाचेही जोरदार मार्केटिंग करणे आणि विरोधकांना उत्तरे देत बसण्यापेक्षा केलेल्या आणि केल्या जाणार्‍या किंवा कधीच न होणार्‍या कामांची देखील वारंवार प्रसिद्धी करण्याचा भाजपच्या सोशल सेलचा ‘ट्रोलिंग’फंडा देखील मतपरिवर्तन करण्यासाठी आजही महत्त्वाचा ठरतोय. याउलट विरोधकांकडून विकासाच्या मुद्यावर कमी आणि सरकारवर केवळ टीकेची झोड करणार्‍या पोस्ट अधिक येतात. शिवाय, त्याही तितक्या दमदार नसतात. त्यातून वाचणार्‍यांचे मतपरिवर्तन होत नाही. या चित्रात बदल होत नाही तोवर भाजप जिंकत राहणार..!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -