घरफिचर्सनातं - काळजीचं

नातं – काळजीचं

Subscribe

आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर अनेक माणसं येतात. सर्वात पहिले जन्माला आल्यानंतर आपल्या आयुष्यात येतात ते आपले आई-वडील. अगदी मोठं होईपर्यंत त्यांना पावलोपावली आपली काळजी असते. पण एका विशिष्ट वयानंतर मुलांना ही काळजी म्हणजे एक प्रकारे आपल्यावरील बंधन वाटायला लागतं.

खरं तर नाती खूप प्रकारची असतात. हे आता आपल्या सदरातून तुम्हालाही एव्हाना कळायला लागलं असेल. आज आपण एका नाजूक नात्याबद्दल बोलणार आहोत. हे नातं आहे काळजीचं. आपल्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीबद्दल आपल्याला मनापासून काळजी असते. कितीही काहीही झालं तरीही ही काळजी दाखवण्याची गरज मात्र नक्की असते. ही काळजी दिसली नाही, तर त्या नात्याला काहीच अर्थ उरत नसतो. पण या नात्याला कोणतंही नाव असण्याची मात्र गरज नसते. अगदी जन्माला आलेल्या मुलापासून ते म्हातार्‍या कोतार्‍या माणसांबद्दल आपल्याला काळजी वाटतच असते. त्यासाठी कोणत्याही रक्ताच्या नात्याचीही गरज भासत नाही.

आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर अनेक माणसं येतात. सर्वात पहिले जन्माला आल्यानंतर आपल्या आयुष्यात येतात ते आपले आई-वडील. अगदी मोठं होईपर्यंत त्यांना पावलोपावली आपली काळजी असते. पण एका विशिष्ट वयानंतर मुलांना ही काळजी म्हणजे एक प्रकारे आपल्यावरील बंधन वाटायला लागतं. पण तरीही आई-वडील आपल्या काळजीपोटी ती काळजी तशीच करत राहतात. ते वय गेल्यानंतर प्रत्येक मुलाला या काळजीची जाणीव होते हे मात्र नक्की. त्यानंतर आपल्या आयुष्यात जागा असते ती, आपल्या शाळेतील मित्र-मैत्रिणींना. त्यांची जागा कदाचित नंतर कोणतेच मित्र घेऊ शकत नाहीत. कारण अगदी मैत्री हा शब्दही माहीत नसताना ते तुमच्या आयुष्यात आलेले असतात. वाढत्या वयातदेखील तुमची ही मनापासूनची मैत्री टिकते आणि प्रत्येक सुखदुःखात तुमच्याबरोबर ते काळजीनं उभे राहतात. त्यांना तुम्ही आयुष्यात काय चांगलं आणि वाईट करता याबद्दल आई-वडिलांइतकीच काळजी असते. बर्‍याचदा आई-वडिलांचं म्हणणं पटत नाही. पण तेच म्हणणं जर आपल्या मित्र-मैत्रिणींनी सांगितलं तर मात्र लगेच पटतं. यामागची मानसिकता जरी वेगळी असली, तरीही सर्व काही घडत असतं ते काळजीपोटी.

- Advertisement -

त्यानंतर आपल्या आयुष्यात कॉलेज आणि ऑफिसमध्ये भेटणारे वेगवेगळे मित्र-मैत्रिणी भेटत असतातच. त्यापैकी काही कलिग्ज राहतात; पण काही अगदी घरगुती मित्रही होतात. त्यांनाही आपल्याबद्दल जे प्रेम वाटत असतं, ती काळजी असते. आपल्या आजूबाजूला असणार्‍या आपल्या मित्र-मैत्रिणींमध्येही मतभेद होतात. अगदी टोकाच्या भूमिका असतात. पण त्या भूमिका तुमच्या काळजीपोटी घेतलेल्या असतात, हे कळण्याइतका समजूतदारपणा आपल्यात असायला हवा.
नाते कोणतंही असो एकमेकांविषयी काळजी आणि प्रेम असणं जास्त महत्त्वाचं आहे. पण जेव्हा या काळजीचं रुपांतर संशय आणि भांडणामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागतं, तेव्हा ही नात्याची धोक्याची घंटा आहे हे समजायला हवं. कोणत्याही गोष्टीमध्ये अतिपणा चांगला नाही. काळजीचं नातं हेदेखील त्याला अपवाद नाही. तर नातं तुटण्यामागे काळजी आणि प्रेमाचा अभाव हेदेखील दुसरं कारण असतं. वास्तविक काळजीच्या नात्याचा समतोल राखता यायला हवा.

अति काळजी करणार्‍या व्यक्तींना सतत आपल्या कार्यावर शंका घेतल्यासारखे वाटते. त्यामुळे आपल्या जवळच्या माणसांना सतत बोलत राहिल्यामुळं लोकही दूर होऊ लागतात. तर काळजी घेणारी व्यक्ती स्वत:च्या हातात सर्व अधिकार घेऊन बसते आणि त्याच्या अधिकारक्षेत्रात समोरच्या माणसानं केलेली लुडबूड त्याला चालत नाही. त्याला सल्ला किंवा मदत नको असते; पण सहकार्य मात्र हवे असते. खरंतर, अंतर्मुख होऊन विचार करून तसेच एकमेकांशी संवाद साधून अनेक प्रश्न सोडवता येऊ शकतात. पण संवाद हा केवळ संवादच असला पाहिजे, त्या संवादात एकमेकांच्या त्रुटींवर बोट ठेवताना खूप काळजीपूर्वक वागले पाहिजे. नाहीतर याचा उलट परिणाम होऊ शकतो. त्यामुळं काळजीचं नातं नक्की कसं असावं हे आपल्या वागण्याबोलण्यातूनच स्पष्ट होऊ शकतं आणि तरच ते व्यवस्थित चिरंतन काळ टिकून राहतं हे मात्र नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -