कवी, तत्वचिंतक रवींद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ टागोर हे चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. त्यांंचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे पिरालीनामक ब्राह्मणांच्या ठाकूर उपनावाच्या कुटुंबात झाला. ११ व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ कोलकाता सोडले.

रवींद्रनाथ टागोर हे चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. त्यांंचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे पिरालीनामक ब्राह्मणांच्या ठाकूर उपनावाच्या कुटुंबात झाला. ११ व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ कोलकाता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली. इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान, कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले.१८७७ मध्ये प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापतीप्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. त्यांनी ‘संध्या-संगीत’ (१८८२), बंगाली भाषेतील पहिली लघुकथा ‘भिकारिणी’ व सुप्रसिद्ध कविता ‘निर्झरेर स्वप्नभंग’ आदी रचना लिहिल्या.

१९०१ मध्ये रवींद्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता. या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली. या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे आधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. ‘नैवेद्य’ (१९०१) व ‘खेया’ (१९०६) या रचना या काळात प्रकाशित झाल्या. १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने ‘सर’ ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.

१९२१ मध्ये रवींद्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी ‘श्री-निकेतन’ ही संस्था स्थापन केली. श्री-निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उद्देशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकार्‍यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले. १९३० पासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा या महान तत्वचिंतकाचे 7 ऑगस्ट १९४१ रोजी निधन झाले.