परिवर्तनाचा कलात्मक प्रवास

नाटक

परिवर्तन आकस्मिक असते, कल्पनेच्या पलीकडचे असते. कारण परिवर्तन हे तर्कसंगत व वास्तववादी असते. विचार परिवर्तन ही एक स्व-परिवर्तनाची प्रक्रिया आहे. आपल्याकडे, स्वतःच्या विचारांकडे तटस्थपणे पाहण्याची सुरुवात म्हणजे परिवर्तन.

स्वपरिवर्तनाच्या मार्गावर मी 6 वर्षांपूर्वी निघाले “थिएटर ऑफ रेलेवन्स” या तत्वज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये मी सुरुवात एक अभिनेत्री म्हणून केली. सुरुवातीला मला केवळ नाटक करायचे, अभिनय करायचा हेच ध्येय होते; पण ध्येयापलीकडे ध्येय असते हे इथे आल्यावर कळाले. खरंच आपण काम करतो, पण ते का करतो, कशासाठी करतो याचे अवलोकन करतो का? माझेही असेच काहीसे होते. नाटक तर करायचे पण ते रंगमंचावर आणि आधी जीवनातील नाटक बंद करायचे, ही विचारांची दृष्टी मला या स्वपरिवर्तनाच्या मार्गावर मिळाली. विचारांची ताकद, चिंतनाची सर्वव्यापकता आणि कलेची सात्विकता मला मिळाली.

जमिनीवर बसून आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न “थिएटर ऑफ रेलेवन्स” मध्ये साकार झाले. एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा. आकाशात उंच ढगांवर स्वार होऊन प्रवास करण्याचा आनंद वेगळाच…स्वतःचा उदय करून, सूर्योदय पाहण्याचा अनुभव वेगळाच..

एक असे दिवास्वप्न जे कधीच पाहिलं नव्हतं, हे स्वप्न पूर्ण झाले आणि माझ्या कलेच्या जोरावर मी चार देशाचे भ्रमण केले. हा अनुभव आहे युरोप दौर्‍याचा! पाण्याच्या खाजगीकरणाच्या विषयावरील नाटक (ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर – लेखन व दिग्दर्शन मंजुल भारद्वाज) घेऊन आम्ही युरोप खंडातील चार देशात गेलो, तिथे 66 दिवस राहिलो. युरोपमधील प्रत्येक शहरात, खेड्यापाड्यात मी नाटकातून माझी गोष्ट सांगत होते, माझ्या देशाची भारताची गोष्ट सांगत होते आणि सोबत अखंड जगाची ही गोष्ट सांगत होते. कारण खाजगीकरण हा अख्ख्या जगाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा आम्ही आमच्या नाटकातून मांडत होतो. युरोपमध्ये नाटकाच्या प्रयोगासाठी, कार्यशाळांसाठी भ्रमण केले.

एक असते की परदेशी जाऊन आपण तेथील हॉटेलमध्ये राहतो; पण ते किती वरवरचे असते, आपण ना नीट त्या जागेला अनुभवत, ना तेथील जीवनशैली समजत, तिथलं आयुष्य अनुभवतच नाही. पण आम्ही युरोपमध्ये तेथील स्थानिक लोकांच्या घरी राहिलो. त्यामुळे ते कसे राहतात, त्यांची संस्कृती काय, हे खूप जवळून अनुभवता आले, त्यांच्यासोबत संवाद करता आला आणि आपली भारतीय संस्कृती, आपले जीवन, आपली कला यांच्या गोष्टी त्यांच्यासोबत share ही करता आल्या. तेथील संस्कृती, जीवनशैली, वास्तुकला म्हणजे तेथील लाल रंगांची कौलारू घरे, घरासमोरील फळा-फुलांनी बहरलेल्या बागा, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली शेती पाहिली आणि हे जाणवले की युरोपमधील गावे शहरांपेक्षा खूप समृद्ध आहेत. तेव्हा मला प्रकर्षाने जाणवले की आपण भारत इतक्या जवळून कधी अनुभवला नाहीच, भारताची राज्य, छोटी छोटी खेडी तेथील जीवन आपण पाहायला हवे. म्हणजे भारत भ्रमण करायला हवे ही इच्छा जागृत झाली. आपला देश किती विविध आहे आणि सर्व संपन्न आहे हे युरोपात जाणवले.

आणि पुन्हा प्रवास सुरू झाला भारताचा !
भारत भ्रमण केवळ फिरायला जाणे म्हणून नाही तर स्वतःच्या कामासाठी भ्रमण. नाटकांच्या प्रयोगांसाठी, कार्यशाळांसाठी आम्ही संपूर्ण भारतभर प्रवास केला. एखाद्या पुस्तकाच्या पानाप्रमाणे एक पान उलटावे आणि एक अनुभव मिळावा असा प्रवास. भारताचे विशाल रूप या राष्ट्रीय कार्यशाळांमधून-प्रयोगांमुळे पहावयास मिळाले.

जेव्हा पालमपूर हिमाचल प्रदेश येथे “राजनैतिक दृष्टी संपन्नता” कार्यशाळा एका राजकीय पक्षाने आयोजिली होती, तेव्हा तिथे 16 राज्यांतून युवक-युवती आले होते. प्रत्येकाची भाषा वेगळी तरीही ध्येयं एक. इथला अनुभव हिमालयातील बर्फासारखा शीतल आणि प्रगल्भ होता. Learning process एक आणि अनुभव अनेक होते. इथे मी असे युवा पाहिले जे राजनैतिक प्रक्रियेला समजून देशाच्या व्यवस्थेबद्दल मनन आणि चिंतन करत आहेत… देशात घडत असणार्‍या आणि घडलेल्या घटनांना उलगडून त्यांच्या मुळापर्यंत जाण्याचा विचार करत आहेत. या कार्यशाळेत युवांनी राजनैतिक आत्मबोध प्रक्रियेत आधी स्वतः वैचारिक मंथन केले आणि आधी स्व-परिवर्तन मग देश परिवर्तन हा मार्ग अवलंबला.

नंतर देशाची राजधानीपासून अखंड भारत पाहिला आम्ही. मग भारतातील छोट्या खेड्यात-गावात आम्ही गेलो, प्रत्येक गावाची रचना वेगळी, भाषा वेगळी, चव वेगळी एवढी भिन्नता असूनही आपुलकी आणि सहवास तोच भारतीय. वास्तुशिल्प तर इतके सुंदर आणि विलोभनीय की काय सांगावं.

असाच एक अनुभव आम्ही हरियाणा रेवाडी येथे एका राजकीय पक्षाच्या कॅडर ट्रेनिंग workshop साठी गेलो होतो तेव्हा घेतला. तिथे आमची राहण्याची व्यवस्था एका भल्या मोठ्या हवेलीत केली होती. नजरेतही सामावणार नाही एवढी मोठी हवेली, पण ओसाड.”एका जुन्या हवेलीमध्ये workshop आहे.. हे आम्ही ऐकले आणि माझ्या मनात हिंदी movie मधल्या हवेल्या समोर यायला लागल्या, पण असे प्रत्यक्षात किती जण अनुभवतो. आपण tour ला जातो. शहरे किंवा त्या शहरातील विशेषता बघतो, पण त्या गावात असणार्‍या जीवन चक्राशी नाते नाही जोडत. हरियाणामधील रेवाडी जिल्ह्यात पिथडावास गावातील ही एक हवेली. आपल्या भारतात तळागाळात अशी कित्येक घरं असतील जी आपल्या भारतीय तत्वाचे दर्शन घडवतात. आपण किती वंचित असतो यांना जाणून घेण्यास, पण थिएटर ऑफ रेलेवन्सच्या माध्यमातून आम्ही इथे पोहोचलो आणि या प्रक्रियेने ही दृष्टी दिली.

ह्या हवेलीत कधी काळी पाय ठेवायला जागा नाही एवढ्या व्यक्ती वावरत होत्या. एक भला मोठा परिवार नांदत होता, पण आज ही रिकामी आहे. सगळे शहरात गेले आहेत का ? एवढी भली मोठी जागा रिकामी ठेऊन शहरातील कोंदटपणाला आपलेसे केलंय. इथल्या मोकळेपणाला सोडून पिंजर्‍याची कोंडी जवळ केलीये.. इथल्या शुद्ध हवेचा त्याग करून प्रदूषणाच्या विळख्यात बसले आहेत.. आजारपणाच्या कुशीत आहेत सगळे का ? हा प्रश्न सतत मला भेडसावत राहिला. या हवेलीला असंख्य दारे,खिडक्या आहेत,जे दर्शवतात मोकळेपणाची मानसिकता. गाय गुरांसाठी असलेली वेगळी जागा, झाडांच्या सान्निध्यात या घराला सतत विसावा मिळतो. आजची आपली भारताची स्थिती दर्शवत आहे ही हवेली ! हिच्या ओसाडपणाशी भारताचे भविष्य जोडले आहे. अशा हवेल्या जेवढ्या ओसाड बनत जातील तेवढे भारताचे भविष्य धोक्यामध्ये आहे हे जाणवते. कारण ही हवेली, ही गावं भारताचा पाया आहेत. या गावाच्या जोरावर आपण आर्थिक मंदीतही तग धरला होता, कारण आपली गावं स्वयंभू आहेत. पण आज या गावांच्या स्थितीने भारताचा पाया डळमळीत होतोय.

जागतिकीकरणाच्या विकासाच्या खोट्या आश्वासनात भारताचा कणा मोडून पडतोय. शहराच्या खोट्या चमकधमकमध्ये खर्‍या सुखाची आपण वेस ओलांडतोय…हे या प्रवासात अनुभवले.

या राष्ट्रीय कार्यशाळांमध्ये एखादा विषय अजून सखोलतेने शिकवायचा असेल तर तो विषय आम्ही नाटकाच्या माध्यमातून सहभागींसमोर प्रस्तुत करायचो आणि मग त्याचे विश्लेषण व्हायचे. असाच एक अनुभव ‘Gender Sensetisation’ या विषयाला अनुसरून आम्ही मंजुल भारद्वाज लिखित “मैं औरत हूँ” या नाटकाची प्रस्तुती करायचो. हे नाटक ‘कलाकार आणि प्रेक्षकां’ साठी आत्ममुक्ततेचं माध्यम आहे. नाटकात अभिनय करताना ‘जेंडर समानता’च्या संवेदनशीलतेशी कलाकार एकरूप होतात आणि नाटक बघताना ‘प्रेक्षक’ ‘जेंडर बायस’ या अविर्भावापासून मुक्त होतात. एकदा झाले असे की, नाटकाच्या प्रयोगानंतर दाढी मिशी असलेले पुरुष सहभागी या नाटकाच्या प्रस्तुती नंतर ओक्साबोक्शी रडले. त्यांचे मनोगत त्यांनी व्यक्त केले की, “आतापर्यंत आम्ही स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली. अगदी बाहेर समाजकार्य करून घरातील स्त्रीची कुचंबणा केली” पण आताच्या क्षणापासून आम्ही पितृसत्तात्मक भारतीय समाजाची मानसिकता नाकारतो.

राजनैतिक दृष्टी संपन्नता हा विषय असल्यामुळे विचारधारा आणि राजनीतीची पवित्र बाजू मांडण्यासाठी आम्ही “राजगती” या नाटकातील छोटे छोटे अंश प्रस्तुत करायचो. या नाट्य प्रस्तुतीतून आम्ही त्यांच्यासमोर विचार तर मांडायचो, पण त्याही पलीकडे एक महिला म्हणून जिथे स्त्रीकडे पाहण्याची एक कट्टर मानसिकता आहे अशा गावांमध्ये आम्ही एक माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. प्रत्येक स्त्रीचा एक संघर्ष आहे की तिला तिच्या शरीरापलीकडे एक व्यक्ती, एक माणूस म्हणून पाहावे आणि आम्ही माणूस आहोत ही स्पंदने सहभागींना जाणवली ही पावती आम्हाला या कार्यशाळांमध्ये मिळाली.
प्रवासाने आपण अधिकाधिक समृद्ध होत असतो. जेवढा प्रवास आपण बाहेर कैक मैल सर करून करतो तेवढाच प्रवास आपल्या बुद्धीचा होत असतो आणि आपण प्रगल्भ होत असतो. TOR रंगदर्शनच्या या नाट्य कारकिर्दीत मी अगदी खेड्यापाड्यांपासून शहरापर्यंत , मुंबईपासून विश्वंभरात माझ्या नाट्य कार्यासाठी प्रवास केला आणि या प्रवासाने मला व्यापक दृष्टिकोन दिला व मी कलात्मकतेसाठी – परिवर्तनासाठी जगणार हा निश्चय कायम केला.

-सायली पावसकर.