घरफिचर्सएक प्रश्न विचारू ?

एक प्रश्न विचारू ?

Subscribe

जसजसे हे मूल मोठे होते तसतसे समाजाची व्यवस्था, मानसिकता त्याला चौकटीत बांधायला सुरवात करते .. आणि समाजाला प्रश्न विचारलेले आवडत नाही, कारण समाज उत्तरे द्यायला तयार नसतो… कारण उत्तरे देणे म्हणजे जबाबदारी … जी घेण्याची समाजाची तयारी नसते … म्हणूनच आपली व्यवस्था प्रश्नांना खोडते. जिज्ञासा ही प्रकृती आणि प्रवृत्तीचे मूळ आहे … जे सतत प्रगत होणे गरजेचे आहे … थिएटर ऑफ रेलेवन्स कार्यशाळेत हे सतत कसे वाढेल याकडे लक्ष ठेवले आहे.

‘गप्प बस जास्त प्रश्न विचारू नकोस’ ‘अरे तुझ्या प्रश्नांना काही अंत आहे का ?’ ‘असे प्रश्न मुलांनी विचारायचे नसतात, तुम्हा लहान मुलांना काय कळतंय,’ असा संवाद आपण प्रत्येक वेळी ऐकतो, अनुभवतो .. आपल्या लहानपणापासून हा संवाद आपल्या घरोघरी, शाळेत आपण अनुभवतो … खरच ह्या प्रश्नांनी आपल्या आयुष्यात नेमके घडते काय याचा आपण विचार करतो का? प्रश्न पडणे हेच मुळात उत्तरे शोधण्याचे मूळ आहे .. आणि हाच गुण मुलांमध्ये उतरवण्यासाठी थिएटर ऑफ रेलेवन्स प्रतिबद्ध आहे …

- Advertisement -

कार्यशाळेत आम्ही ह्याच प्रश्नाने सुरवात करतो की विद्यार्थ्यांचा सर्वोत्तम गुण कोणता? … बरीच उत्तरे येतात जसे शिस्तबद्ध असणे, साहस, मोठ्यांचे ऐकणे, अभ्यास करणे इत्यादी … पण सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे प्रश्न विचारणे याची आम्ही नव्याने ओळख करून देतो …

प्रश्न हे सगळ्यांशी निगडित असतात मग स्वतःचे आयुष्य असो, समाज, देश आणि हे विश्व असुदे. मुळात आपल्याला प्रश्न पडतात का? हेच का? असेच का? कशासाठी? की आपली मानसिकता बोथट झालीये .. समाजात किंवा आपल्या देशात जे घडतंय ते घडताना मनात प्रश्न उभे राहतात का? जर असे घडत नसेल तर खरंच आपण संवेदनहीन तर होत नाही आहोत ना याचा विचार करणे भाग आहे. आपण नेहमी सोल्युशनची वाट बघतो, पण सोल्युशन मिळण्याच्या प्रक्रियेला बघत नाही. सोल्युशन मिळवण्यासाठी किंवा मिळण्यासाठी सर्वप्रथम प्रश्न उपस्थित करणे महत्वाचे असते … प्रत्येक आव्हानाला संकटाला का? आणि उपाय काय ? हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात … पण आजच्या काळात प्रश्न विचारणे अक्षरशः गुन्हा ठरतोय …

- Advertisement -

जगात प्रत्येक लहान मूल जिज्ञासा घेऊन जन्माला येते.. आपल्या मनात एक जिज्ञासा घेऊनच मोठे होत असते. जन्म झाल्यानंतर कळेपर्यंत आपल्या भोवतालचे जग ते पाहत असते. या जगातील प्रत्येक गोष्टीचे त्याला आकर्षण असते, प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल असते… मुलांच्या या जिज्ञासेतूनच त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. आपल्या जवळच्या थोरल्या व्यक्तींना, आई बाबांना याच अनेक अनभिज्ञ गोष्टी जाणून घेण्यासाठी ते अनेक प्रश्न विचारत असतात.

मुलांच्या लहानपणात त्यांचे निरागस प्रश्न हे त्यांच्या वाढीचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या प्रश्नांची पृष्टभूमी म्हणजे जिज्ञासा, कुतूहल …आणि जिज्ञासा म्हणजे शोध … हा शोध अविरत सुरू असतो … शोध घेत असते ती निरागसता स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी… स्वतःला चाचपडण्यासाठी.. आणि या जगाला पहिल्यांदाच अनुभवण्यासाठी… पण जसजसे हे मूल मोठे होते तसतसे समाजाची व्यवस्था, मानसिकता त्याला चौकटीत बांधायला सुरवात करते .. आणि समाजाला प्रश्न विचारलेले आवडत नाही, कारण समाज उत्तरे द्यायला तयार नसतो… कारण उत्तरे देणे म्हणजे जबाबदारी … जी घेण्याची समाजाची तयारी नसते … म्हणूनच आपली व्यवस्था प्रश्नांना खोडते. जिज्ञासा ही प्रकृती आणि प्रवृत्तीचे मूळ आहे … जे सतत प्रगत होणे गरजेचे आहे … थिएटर ऑफ रेलेवन्स कार्यशाळेत हे सतत कसे वाढेल याकडे लक्ष ठेवले आहे … जसे सतत मुलांना नवनवीन प्रश्न विचारून त्यांच्या विचारांना चालना दिली आहे… हे कार्यशाळा कुणाची ? या प्रश्नाने त्यांना कार्यशाळा माझी आहे आणि माझा हक्क आहे हे जाणवले … कार्यशाळा त्यांची तर निर्णय कोण घेणार? या प्रश्नाने निर्णयक्षमता वाढीस लागली … अशीच शाळा त्यांची असते का? शाळेत काय घडणार हा विद्यार्थ्यांचा निर्णय असतो का? हा समाज त्यांचा होतो का ? प्रश्नांनी एक नाते तयार होते … अपेक्षा निर्माण होतात … आणि बदलण्याची आशा निर्माण होते… माणसाची विचार करण्याची एक प्रक्रिया म्हणजे डोक्यात प्रश्नांची मालिका तयार होणे आणि प्रत्येक प्रश्न हा सकारात्मक निर्माणासाठी असणे….

आजची शिक्षणपद्धती ही बाजारीकरणात अडकली आहे. प्रश्न उपस्थित करतात पण त्या प्रश्नांची उत्तरे A, B, C, D या चार ऑपशन्समध्ये दिली जातात. म्हणजे स्वतःहून उत्तरे शोधण्याच्या प्रक्रियेला उध्वस्त करतात. चार ऑपशन्सच्या चौकटीत विद्यार्थी अडकतात. शिक्षण हे ज्ञान न राहता केवळ सूचनेपर्यंत मर्यादित होऊन जाते. या बाजारीकरणाचा संताप पालकांना असूनसुद्धा ते एकही प्रश्न न विचारता त्याच रटाळ चक्कीत पिसले जातात. आपल्या आदीकाळात गुरू शिष्य परंपरेत गुरू शोध घेण्याच्या प्रवृत्तीला बळकट करत होते, परंतु आजची शिक्षण पद्धत विचारहीन दिशाविहिन गर्दीला तयार करते आणि इथेच थिएटर ऑफ रेलेवन्स आपली भूमिका ठामपणे बजावते. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्यासाठी उत्प्रेरीत करते …त्यांच्या कुतुहलाला योग्य दिशा देतो जेणेकरून मुले आपल्या आजूबाजूचे जग बघतात, समजतात, अनुभवतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन जगाला जाणून घेण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये निर्माण होते. त्याचे माध्यम, हत्यार, ऊर्जा म्हणजे प्रश्न मुलांमध्ये एक उत्तम गुण असतो ते जसेच्या तसे कधी स्वीकारत नाहीत. जसं मुले पुस्तकातले धडे पुस्तकी शब्दात न शिकता त्यांच्या अनुभवाच्या कसोटीवर पारखतात. म्हणजेच जी यांत्रिक रटाळ पद्धत आहे त्याला मुले खोडतात. उदाहरणार्थ, कुठलेही खेळणे आहे तसे न खेळता त्याचा प्रत्येक भाग वेगळा करून बघतात. त्याच्या मुळाशी जातात.

कुतूहल म्हणजे डोक्याचे, मेंदूचे काम … कुतूहल म्हणजे शोधाची सुरवात … नवीन मार्गावर चालण्याचे धाडस… नवीन आव्हानांना स्वीकारण्याची क्षमता… कुतूहलाचा मुख्य गाभा म्हणजे प्रश्न… प्रश्न विचारण्याने व्यक्ती उलगडत जातो .. आणि त्याची बौद्धिक पातळी वाढत जाते. कारण प्रश्न विचार करण्यास प्रेरित करतात … अभिव्यक्ती म्हणजे शेत नांगरणे आणि प्रश्न विचारणे म्हणजे त्यात बीजारोपण करणे… प्रश्नांनी आपल्या विचारांना योग्य दिशा मिळते …

आपल्या भारतात संस्काराच्या आणि परंपरेच्या नावाखाली माणसाच्या प्राकृतिक स्वभावाला म्हणजे जिज्ञासेला खोडले जाते .. जसे मोठ्यांना प्रश्न विचारायचे नाही … जास्त बोलायचे नाही, जास्त चर्चा करायची नाही आणि सर्वात महत्वाचे मोठ्यांना खोडायचे नाही … जे परंपरेने चालत आले आहे ते बस पाळत राहायचे …जे सांगितले आहे त्यावर विश्वास ठेवायचा … पण ते का करत आहोत? कशासाठी करत आहोत? हे प्रश्न उपस्थित करायचे नाही … पण प्रश्न उपस्थित करणारा हा बंडखोर असतो … बदल करणारा असतो … संस्कार म्हणजे या संसाराला (दुनियेला) चालवण्याचे सूत्र हे संस्कार कधीच आपल्याला बाधित करत नाही, कधीच अडकवून ठेवत नाही… आणि संस्कार कधीच परिवर्तनासाठी अडथळा निर्माण करत नाही. उलट संस्कार आणि विचारांची सांगड परिवर्तन घडवून आणते.

थिएटर ऑफ रेलेवन्स कार्यशाळेत लहान मुलांना, मोठ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित केले जाते .. कारण मोठ्यांकडे अनुभव असतो … चर्चा होणे हा एक संवाद आहे …लहानांचे कुतूहल आणि मोठ्यांचे अनुभव एकत्र येणे गरजेचे आहे. एका सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी… प्रत्येकाने प्रत्येकाचे ऐकून घेणे हे नितीगत आणि लोकतांत्रिक पद्धत आहे … संवैधानिक आहे … प्रश्न विचारून आपल्या विचारांची किंवा कोणत्याही व्यवहाराची, मानसिकतेची नवीन दृष्टिकोनांची चाचणी करणे आवश्यक आहे जेणेकरून आपली तर्कबुद्धी सतत प्रगत होते … प्रश्नांनी आपण समग्र बाजूचा विचार करायला लागतो … प्रश्नांनी प्रश्न वाढतात तेवढाच शोध वाढतो आणि आपण योग्य दिशेकडे वळतो… जसे आपल्या समाजात घडणार्‍या अंधश्रद्धे विरुद्ध प्रश्न उचलल्यावर आपण त्यातील वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विचार करतो.
काळाला घडवण्यासाठी युक्तीची आवश्यकता असते आणि युक्ती शोधणे म्हणजे प्रश्न निर्माण करणे .. प्रश्न म्हणजे आत्मबोध… स्वतःचा शोध …

क्यों? से प्रेम करो – मंजुल भारद्वाज

क्यों से भागिए मत
क्यों? से प्रेम करो
क्यों आपके अंतर्द्वन्द्व को
अंतर्ध्वनि से जोड़ता है
प्रकाशित करता है चेतना
चेतना उड़ान भरती है
अंधेरों को उज्ज्वलित करने के लिए
अज्ञात को खोजते हुए
आपके भीतर तंत्र का निर्माण करती है
जिससे घूमता है ‘काल’ का चित्र
चित्र बदलता है नए चित्र का निर्माण करते हुए ,
काल को गढ़ते हुए
आप सुनते हो अपना सृजन संगीत
एक बेहतर और मानवीय
विश्व का सृजन करते हुए !

सतत स्वतःला प्रश्न विचारतात ते जग घडवतात … मला कार्यशाळेत एक प्रश्न विचारला गेला की मी का जगते ? माझे जीवन कशासाठी? या प्रश्नाने माझे आयुष्य बदलले … मी माझ्या आयुष्याबद्दल ध्येयाबद्दल गंभीरपणे विचार करू लागले …. एका प्रश्नाने बुद्ध घडला … त्याला प्रश्न पडलेच नसते तर ….तर जगाच्या शांततेचा दूत घडला नसता …त्याला स्वतःला पडलेल्या प्रश्नांनी त्याची संवेदना, चेतना जागृत झाली … ती चैतन्य दृष्टी घेऊन तो शांतीमय सृष्टीचा निर्माण करण्यास निघाला ….प्रश्न पडल्याशिवाय आपण बुद्ध होत नाही. बुद्ध होणे म्हणजे स्वतःच्या विश्वाचे निर्माण करणे आणि नवनिर्माणाचे सूत्र म्हणजे प्रश्न विचारणे, पण आजची स्थिती याउलट आहे.. आज मुलं बुद्धाऐवजी बुद्धू होत चालली आहेत. आणि त्यासाठी सर्व पूरक संसाधनांचा बाजार सहज उपलब्ध आहे. याच्या आहारी जाणार्‍या मुलांची संख्या आज वाढत चालली आहे आणि हीच आपल्यासमोर खूप मोठी समस्या उभी ठाकली आहे. यात मुलांचे मानसिक स्वास्थ्य, रात्री उशिरापर्यंत जागणे, त्यांच्या दृष्टीवर परिणाम होणे आणि जीवघेणे प्रकार हे जागतिकीकरणाच्या बाजाराचे प्रतिफल आहे. या आव्हानांसमोर, मुलांना पुन्हा एकदा विचार करण्यास, प्रश्न विचारण्यास, त्यांची क्षमता वाढवण्यासाठी आम्ही रंगकर्मी प्रतिबद्ध आहोत .. यात आपली भूमिका काय ?

– अश्विनी नांदेडकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -