घरफिचर्ससत्तेची रस्सीखेच!

सत्तेची रस्सीखेच!

Subscribe

जनतेने विधानसभा निवडणुकीचे निकाल सत्ताधारी आणि विरोधकांना जाग आणणारे लावले आहेत. त्यामुळे निकाल लागल्यानंतर पाच दिवसांनी दिवाळी असूनही आणि महायुतीची सत्ता येऊनही भाजप आणि शिवसेनेला पुन्हा एकदा आपले सरकार आल्याचा आनंद मिळवून दिलेला नाही. दुसर्‍या बाजूला पंधरा वर्षे बेबंदशाही कारभार करणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला दुसर्‍यांदा विरोधकांमध्ये बसवले आहे. आघाडी विरोधकांच्या खुर्चीवर बसणार हे अपेक्षित होते, पण त्यांचे अस्तित्व दिसणार नाही, असे भाजपचे नेते सांगत होते तसे काही झाले नाही. राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेसला ४४ असे मिळून आघाडीच्या पदरात ९८ जागांचे देणे टाकताना लोकशाही जिवंत ठेवली. हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे या सार्‍या आकड्याच्या खेळात आता सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. १०५ जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी स्वबळावर ते सत्ता स्थापन करू शकणार नाहीत आणि महायुती करून सरकार बनवायचे ठरवले तरी शिवसेना आता किंग मेकरच्या भूमिकेत गेली आहे.

मातोश्रीला आता अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा हवा आहे. महत्त्वाची खाती समसमान वाटून घेतली पाहिजेत, अशी आता शिवसेनेची भूमिका आहे आणि ती सध्या शिवसेनेचे नेते संजय राऊत चांगली रंगवत आहेत. गावात असे काही अस्थिर असेल तर या चाणक्य नेत्याला भलतेच महत्त्व येते. आगीत तेल ओतून ते आणखी खळबळ माजवून देतात. आपला हा आवडता खेळ खेळायला त्यांनी आता जोरात सुरुवात केली आहे. इस्लामाबादला शिवसेनेचे फलक झळकले यामागे राऊत होते, असे आणि पक्षाबरोबर आपले महत्त्व वाढवण्यात ते तरबेज आहेत. कदाचित ते सिल्वर ओकच्या इशार्‍यावरूनही दिवाळीच्या वातावरणाचा फायदा घेऊन फटाके लावत असतील. राजकारणात काही होऊ शकते. ‘जर तर’ याला काहीच महत्त्व नसते, असे राजकीय नेते कितीही वरचा सूर लावून सांगत असले तरी या ‘जर तर’च्या मधल्या ओळीत राजकारण फिरत असते. आम्हाला सत्तेसाठी दुसर्‍या पर्यायाचा विचार करायला भाग पाडू नका, असे सांगत राऊत यांनी मोठा फटका लावल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तो आवाज सहन झालेला नाही. शिवसेनेच्या मुखपत्रातून निकाल लागल्यानंतर जी काही फटाकेबाजी सुरू आहे, त्यामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत आणि ही नाराजी शंभर टक्केे असल्याचे ते म्हणत आहेत.

- Advertisement -

आम्ही सोबत आहोत तर असे लिहिण्याची गरज नाही. एवढ्या ताकदीने कधी काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधातही लिहून दाखवावे, असा टोला देखील फडणवीस यांनी हाणला आहे. हा टोला मारताना त्यांनी एक मोठे विधान केले आहे ते म्हणजे पाच वर्षे मुख्यमंत्री मी आणि मीच असणार आहे. आमदार आणि शिवसैनिकांच्या माध्यमातून ठाकरे घराण्यातील पहिले आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याची घाई मातोश्रीला झाली आहे. तसे फलक आणि आमदारांच्या बैठकीतील मागणी सर्वत्र पोहचली पाहिजे, हे ठरवून केले जात आहे. भाजपही काही धुतल्या तांदळासारखी नाही. शिवसेनेच्या दबावामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नाराज असून यामुळे त्यांनी बुधवारची मुंबई भेट रद्द केली ते शिवसेनेचे ४५ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत, असे खासदार संजय काकडे यांच्या तोंडून बोलायला भाग पाडण्यापर्यंत डावपेच खेळायला सुरुवात झाली आहे. मुख्य म्हणजे पडद्यामागे वेगाने घडामोडी घडत आहे. या कामी माहीर असलेले मिलिंद नार्वेकर आणि प्रसाद लाड यांनी आपल्या आवडत्या भूमिका रंगवायला सुरुवात केली आहे. २८ अपक्ष आमदारांपैकी अधिकाधिक आमदार आपल्या बाजूने वळवून आपण किती ताकदवर आहोत, हे दाखवले जात आहे.

सत्तेसाठी रस्सीखेचचा हा प्रयोग आणखी काही दिवस रंगणार आहे. हा प्रयोग बघताना प्रेक्षकात बसूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनाही महत्वाकांक्षेचे धुमारे फुटले आहेत. शिवसेनेला हवा देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी शिवसेनेने आता गप्प बसून चालणार नसल्याची ‘हीच ती वेळ’ असल्याचे सांगितले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेताना शिवसेना आमचा पाठिंबा मागत असेल तर दिल्लीत आमच्या नेत्यांबरोबर आम्ही बोलायला तयार आहोत, असे सांगून थोरातांनी सत्तेच्या खेळात आणखी रंगत आणली आहे. खरेतर त्यांनी या उचापत्या करण्यापेक्षा आपला पक्ष पुढे कसा वाढेल, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आता शांत बसले असले आणि आम्ही विरोधकांच्या बाकावर बसून सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवू, असे म्हणत असले तरी ते स्वस्थ बसणार्‍यातील नाहीत. अजून सत्तेचा हा खेळ बराच रंगायचा असल्याने पवार त्यात रंग हा भरणारच. २०१४ मध्ये न मागताही आपला भाजपला पाठिंबा असल्याचे सांगत राष्ट्रवादीने आपला सत्तालोलूप रंग दाखवला होता.

- Advertisement -

निवडणुकीच्या प्रचार काळात कोसळणार्‍या पावसात हा रंग निघून सक्षम विरोधी पक्षाचे दान जनतेने त्यांच्या पारड्यात टाकले आहे आणि हे दान म्हणजे पुढची पाच वर्षे सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी जनतेने दिलेला कौल आहे, हे ध्यानात ठेवून काम केले तरच भविष्य उज्ज्वल असेल, असे यातून सूचित होते. तसाच इशारा भाजप आणि शिवसेनेला दिला आहे. या इशार्‍यातून समजून त्यांनी सरकार स्थापन करून मागच्या पाच वर्षांत केलेल्या चुका सुधारायला हव्यात. मात्र, तसे होण्यापूर्वी रस्सीखेच करून आपल्या पदरात जास्तीत जास्त मोठे दान कसे पडेल यासाठी साठमारी सुरू झाली आहे. २०१४ साली सत्तेत बसताना ६३ जागा मिळूनही शिवसेनेला दुय्यम खाती मिळाली होती. यावेळी मात्र सेनेच्या ७ जागा कमी झाल्या आहेत, पण भाजपच्या १८ जागा वजा झाल्यात. या वजा जागा आपल्याला सत्तेत समान वाटा देतील, असे सेनेला वाटते. किमान मुख्यमंत्रीपद नाही तर उपमुख्यमंत्रीपद आणि कॅबिनेट मधील महत्त्वाची खाती आपल्या पदरात पडतील, यासाठी त्यांनी ही रस्सीखेच सुरू केली आहे.

हरयाणातही सरकार बनवताना भाजपला जननायक जनता पक्षाची मदत घ्यावी लागली आणि या पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे लागले. पाच वर्षांपूर्वी सत्तेत सहभागी होऊन दुय्यम वागणूक मिळालेल्या शिवसेनेला लोकसभेतही भाजप नंतर सर्वाधिक १८ जागा मिळूनही अवजडसारखे महत्त्व नसलेले खाते मान खाली घालून घ्यावे लागले होते. ही मानहानी, जागावाटपात कायम छोटा भाऊ राहून मिळतील त्या जागा घेऊन मानावे लागणारे समाधान या सर्वांवर यावेळच्या निकालाने सत्तेत समान वाटा या वाटेवर शिवसेनेला आणून सोडले आहे. याआधी आम्ही गप्प बसलो होतो, पण आता नाही असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे आणि तसा सत्तेचा रस्सीखेच खेळ रंगायला सुरुवात झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -