घरफिचर्ससत्तातुरांतील अनाकलनीय कज्जा !

सत्तातुरांतील अनाकलनीय कज्जा !

Subscribe

मराठी मुलखाचा कारभार सलग दुसर्‍यांदा चालवण्यासाठी भाजप-शिवसेना युतीमधील कलगीतुर्‍याने सध्या बिगर पैशांचे मनोरंजन चालवले आहे. निवडणूकपूर्व युती झाल्यावर ‘आमचं ठरलंय’ म्हणून ढोल वाजवणार्‍या या पक्षाच्या म्होरक्यांनी निवडणूक निकाल लागताच बदललेली भूमिका जितकी आश्चर्यजनक आहे, तितकीच ती धक्कादायक म्हणता येईल. कारण शिवसेना आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीचा दाखला देत राज्यात सत्ता आल्यास अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद सेनेला देण्याचा वायदा केल्याचे सांगितले. सेनेचे वाघ बैठकीबाहेर आल्यानंतर दोघा-तिघांनी डरकाळी फोडत भाजपला शब्दाला जागण्याची आठवण करून दिली. तथापि, असा कोणता शब्द दिल्याचा थेट इन्कार करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहा-ठाकरे भेटीत जर काही वेगळे ठरले असेल तर आपण त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट केले. उध्दव आणि मुख्यमंत्र्यांची वेगवेगळी विधाने पाहता वैचारिक गोंधळ असल्याचेही म्हणता येईल. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केल्याने सत्तातुरांच्या या कज्जेने अवघ्या मराठी मनांचा ठाव घेतला.

मुळात निवडणूक निकालावर दृष्टीक्षेप टाकला तर भाजप आणि शिवसेनेला मतदारराजाने ‘जागते रहो’चा संदेश दिला आहे. भाजपने डझन-दीड डझन बड्या नेत्यांना पक्षात घेऊनही म्हणावा तेवढा जनाधार वाढला नाही. पंकजा मुंडे, राम शिंदे, डॉ. अनिल बोंडे यांच्यासारखे दिग्गज मंत्री पराभवाचे धनी झाले. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विभागात पक्षाच्या यशाचा आलेख कमालीचा घसरला. शिवसेनेलाही आत्मपरीक्षण करायला लावणारा म्हणूनच निकालाचे वर्णन करता येईल. ठाकरे घराणे पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरले असताना राज्यभरात शिवसैनिकांच्या उत्साहाला उधाण येऊन मोठ्या संख्येने जागा मिळणे अपेक्षित होते. तथापि, शिवसेनेला जागांची साठीही गाठता आली नाही. दोन्ही पक्षांना संयुक्तरित्या सत्तास्थापन करण्याची संधी राज्यातील जनतेने दिली असली तरी पदरात टाकलेले दान सूचक म्हणावे लागेल. ही पार्श्वभूमी बघता दोन्ही पक्षांतील कारभार्‍यांनी एकत्र बसून चिंतन करण्याची गरज असताना माध्यमांना वादग्रस्त टीका-टिप्पणीचा खुराक देऊन आपापल्या बौध्दिक दिवाळखोरीचे प्रदर्शन घडवण्यात मर्दमुकी मानली. वस्तुत:, राज्यात समस्यांचा डोंगर आहे.

- Advertisement -

बिघडलेले अर्थकारण, तद्नुषंगिक जाणवत असलेली मंदी, लघु व मध्यम उद्योगांचा वाजलेला बोजवारा, वाढती बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांचे न थांबणारे सत्र आदींमुळे जनता हैराण असताना उद्या सत्तेवर बसणारे दोन पक्ष जाहीररित्या कज्जा करत असल्याचे सत्य सर्वांना पचवावे लागत आहे. वाड्निश्चयानंतर भांडण्यास प्रारंभ करणार्‍या वाग्दत्त वर-वधूचा संसार सुखाने चालण्याची खात्री देण्याचे कारण नाही. त्याच धर्तीवर पाच वर्षे राज्याचा गाडा हाकण्यासाठी जनादेश मिळालेल्या दोन प्रमुख पक्षांमध्ये शपथविधीपूर्वीच वाद होऊ लागल्यावर भविष्यात चित्र काय असेल, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज पडू नये. ‘पार्टी विथ डिफरन्स’चे लेबल लावून तत्वाधिष्ठित राजकारणाचे अवडंबर माजवणारा भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ‘नॅचरली करप्टेड पार्टी’ म्हणून हिणवायचा, मात्र त्याच पक्षातील नेत्यांना पायघड्या घालून आणि निवडणुकीत सन्मानाने उमेदवार्‍या देऊन भाजपने सोयीचे राजकारण केले म्हणण्याला पुरेसा वाव मिळतो. जी गोष्ट भाजपची, तीच शिवसेनेची. ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के समाजकारण करणार्‍या शिवसेनेला आज समाजकारणाशी कमी आणि राजकारणाशी अधिक घट्ट मैत्री करण्याची बुध्दी सुचली आहे असे म्हटल्यास काहीही वावगे वाटू नये. बरं, दोन पक्ष म्हटले की तात्विक मतभेद होणार.

पण त्यासाठी माध्यमांचे व्यासपीठ वापरण्यातून काय निष्पन्न होणार आहे? या बाबी एकत्र बसून चर्चेच्या माध्यमातून सुटू शकण्यावरील दोन्ही पक्षांचा विश्वास उडाला असाच त्यामधून अर्थ अभिप्रेत होतो. निवडणुकीपूर्वी सुरांत सूर मिसळून एकोप्याच्या गप्पा मारणारे सत्ता वाटपाची वेळ येताच कोणत्या थराला गेलेत हे सर्वश्रुत आहे. राजकारणात कोण्या एका व्यक्ती वा पक्षाचा प्रभाव सातत्याने राहात नाही, हे गेल्या काही वर्षांत सिध्द झाले आहे. खांद्यावर अथवा डोक्यावर घेणारी जनता-जनार्दन वेळप्रसंगी पायाखाली घेण्यासही मागेपुढे पाहात नाही, याचे प्रत्यंतर राजकारणात अनेकदा येते. या सत्याचा आताच्या सत्ताधार्‍यांना विसर पडला की काय अशी शंका यावी. ज्या राज्याचा गाडा पुढील पाच वर्षे हाकायचा आहे, तेथे समस्यांचा ढीग आहे. त्यावर काय उपाययोजना असाव्यात त्याबाबत सत्ताधार्‍यांना गंभीर राहावे लागेल. महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष मिळून जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची बांधिलकी या मंडळींना जपावी लागेल. केवळ आकडेवारी आणि कागदावर योजनांना मिळणार्‍या यशाच्या जंजाळात न पडता व्यवहार्य दृष्टीने मिळालेले यश जनतेसमोर ठेवण्याचे कर्तव्य सत्ताधार्‍यांना पार पाडावे लागेल. आपण जे काही आहोत, ते केवळ जनतेमुळे आहोत आणि त्यांचे क्षेम हेच आपले अंतिम लक्ष्य आहे, याचे भान या मंडळींना राहणेही गरजेचे आहे.

- Advertisement -

शेवटी एकत्र येण्याचा कितीही बनाव केला तरी मने दुभंगलेली असतील तर ईप्सितप्राप्ती होत नाही. मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरून सुरू झालेला हा कलगीतुरा राज्याच्या दृष्टीने हितावह नाही. आधी जनतेचा विश्वास जिंकण्याचे प्राथमिक उद्दिष्ट्य दोन्ही पक्षांना ठेवावे लागेल. जनतेसोबतचा एकजिनसीपणा सिध्द करण्याचे मोठे आव्हान उद्याच्या सत्ताधीशांपुढे असेल. सत्तेमध्ये भागीदार असूनही विरोधी पक्षाची भूमिका बजावणारा म्हणून गेली सतत पाच वर्षे झालेल्या टीकेचा कलंक शिवसेना पक्षाला पुसावा लागेल. आपल्या मुखपत्रातील अग्रलेखांची जागा जनतेच्या समस्या मांडण्यासाठी असावी, तथापि, सत्तेची छत्र-चामरं उपभोगणार्‍यात आपल्या मंत्र्यांचाही समावेश आहे, याचा विसर शिवसेनेला पडता कामा नये. ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून त्याच्या पूर्ततेसाठी केवळ गप्पांचे फड पुरेसे नसतात तर त्यासाठी कर्तव्यपूर्ती महत्त्वाची असते. जनतेला असेच गृहीत धरणार्‍या देशातील महत्तम काँग्रेस पक्षाची आज झालेली दूरवस्था भाजपसारख्या देशभरांतील अनेक राज्यांना सत्तेच्या पंखाखाली घेणार्‍या पक्षापुढे पथदर्शी ठरावी.

‘उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका’ या शब्दप्रमेयाला अनुसरून कारभार करण्याची आण घेत भाजप-शिवसेनेने एकत्र येण्याचे शहाणपण दाखवावे. कृषी, उद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि तत्सम क्षेत्रांत बरेच काही करण्यायोग्य संधी असलेल्या महाराष्ट्राच्या क्षितीजावर समृध्दीची पहाट आणण्याची कमान दोन्ही पक्षांनी सांभाळण्याची गरज आहे. सुदैवाने कामचलाऊ का होईना, दोन्ही पक्षांना सत्तेत बसण्याइतपत बहुमत मिळाले आहे. त्या शिडीच्या सहाय्याने राज्याला विकासाच्या क्षितीजावर पोहचवण्याची इतिकर्तव्यता पार पाडावी लागेल. निवडणुकीत मिळालेल्या यशापयशावर, मुख्यमंत्री अथवा इतर मंत्रीपदांवर नाहक ऊर्जा घालवत बसण्यापेक्षा प्राप्त सत्तेचा जनहितार्थ उपयोग व्हावा. अन्यथा वैविध्यपूर्ण अडचणीच्या फेर्‍यात सापडलेल्या या राज्याला आणखी संकटात नेण्याचा काळिमा सत्ताधारी म्हणून दोन्ही पक्षांना लागण्यास अवधी लागणार नाही. भाजप आणि शिवसेनेने या वस्तुस्थितीचे भान ठेवत पुढील काळात राज्यकारभार करावा. सत्तेत येण्यापूर्वी चाललेले जाहीर मतभेदांचे प्रदर्शन थांबवून जनहितैषि निर्णयांद्वारे उत्तम प्रशासन, यशस्वी राज्यकर्ते आणि दूरदृष्टी असणारे म्हणून स्वलौकिकात भर टाकावी, एवढीच दोहोंकडून अपेक्षा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -