घरफिचर्सऑपरेशन विजय

ऑपरेशन विजय

Subscribe

अटलजी मैत्रीचा हात पुढे करत असताना पाकिस्तानी लष्कर प्रत्यक्ष ताबारेषेजवळ जमवाजमव आणि घुसखोरी करीत होते. दहशतवाद्यांना संरक्षण देत होते. दुर्दैवाने राजनैतिक पातळीवर भारताचे प्रयत्न असे विफल होत असतानाच भारताचे हेरखातेही सपशेल अपयशी ठरले. द्रास, कारगिल, बटालिक, कक्कार या काश्मीरमधील सीमावर्ती भागात ऐन थंडीत दोन्ही बाजूनी चौक्या खाली करायच्या, मागे हटवायचे आणि थंडी कमी झाली की पुन्हा त्या चौक्यांचा ताबा घ्यायचा, असा अनेक वर्षाचा क्रम होता.

अटलजी मैत्रीचा हात पुढे करत असताना पाकिस्तानी लष्कर प्रत्यक्ष ताबारेषेजवळ जमवाजमव आणि घुसखोरी करीत होते. दहशतवाद्यांना संरक्षण देत होते. दुर्दैवाने राजनैतिक पातळीवर भारताचे प्रयत्न असे विफल होत असतानाच भारताचे हेरखातेही सपशेल अपयशी ठरले. द्रास, कारगिल, बटालिक, कक्कार या काश्मीरमधील सीमावर्ती भागात ऐन थंडीत दोन्ही बाजूनी चौक्या खाली करायच्या, मागे हटवायचे आणि थंडी कमी झाली की पुन्हा त्या चौक्यांचा ताबा घ्यायचा, असा अनेक वर्षाचा क्रम होता. पण पाकिस्तानी सैन्य, घुसखोर, आणि निमलष्करी दलांनी १९९९ मध्ये ऐन थंडीत स्वतःच्या चौक्यांवर सैनिक ठेवलेच; पण भारतीय सैन्याने थंडीमुळे खाली केलेल्या चौक्याही बळकावल्या. फेब्रुवारीत अटलजी आणि शरीफ लाहोरमध्ये दोस्तीच्या आणाभाका घेत होते, तेव्हाही ही घुसखोरी बिनदिक्कत चालू होती. बंकर, बोगदे खोदले जात होते.काश्मीरमध्ये अशीच घुसखोरी करण्याची तयारी पाकिस्तानी लष्कराने याआधीही एकदा केली होती.

विमान अपघातात मरण पावलेले लष्करशहा जनरल झिया-उल-हक यांची काश्मीर भारतापासून तोडण्याची मोहीम होती, “ऑपरेशन टोपाक”. मात्र १९८८ मध्ये काश्मिरात बेछूट हिंसाचार घडवूनही ते साधले नव्हते. पुढे बेनझीर भुट्टो पंतप्रधान झाल्या, तेव्हा लष्करप्रमुखांनी त्यांच्याकडे काश्मीर भारतापासून तोडण्याचा प्रयत्न म्हणून घुसखोरीची अनुमती मागितली. पण यातून सर्वंकष युद्धाचा भडका उडू शकतो, अशी भीती वाटल्याने बेनझीर यांनी लष्करप्रमुखांना आवरले. तेव्हाच लष्कर आणि आयएसआयने बेनझीर यांचा काटा काढावा लागणार, याची खूणगाठ पक्की केली असावी.

- Advertisement -

८ ऑक्टोबर १९९८ ला लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचा काश्मीरवर डोळा होता. तशा हालचाली त्यांनी पदावर येताच वाढवल्या. यातूनच ३ मे १९९९ रोजी कारगिल भागात तीन मेंढपाळांना पहिल्यांदा या भागात काहीतरी गडबड आहे, याचा वास आला. त्यांनी सूर्यास्ताला घरी परतताना लष्करी अधिकार्‍यांच्या कानावर शंकास्पद हालचाली असल्याची खबर दिली.
त्यानंतर कॅप्टन सौरभ कालिया यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी कारगिल भागात पाठवण्यात आलाय. टेहाळनी करणार्‍या या तुकडीतील सौरभ आणि इतर पाचही जवानांची अनन्वित छळ करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. सौरभ तसेच इतरांचे डोळे काढण्यात आले. त्यांची जननेंद्रिये कापून टाकण्यात आली. नखे खेचून उपसण्यात आली. तोंडात एकही दात शिल्लक ठेवण्यात आला नाही. हा सारा छळ होता, तो भारतीय सैन्याच्या ठाण्यांची तसेच तयारीची माहिती मिळावी, यासाठी. पण या बहादूर जवानांनी तोंडातून चाकर शब्द न काढता हा अपार छळ सोसला. १५ मे रोजी या जवानांना पकडण्यात आले. त्यानंतर जूनमध्ये त्यांचे मृतदेह मायदेशी पाठवण्यात आले, तेव्हा जवानांना सुलतानी छळाच्या खुणा पाहून सारेजण हादरले. उभी हयात लष्करात घालवलेल्या अधिकार्‍यांनाही ते विदीर्ण देह पाहवले नाहीत. हा घाव जबर होता. ते आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघनही होते.

सौरभ आणि इतरांच्या छळाची कहाणी ऐकूण अटलजी हेलावले. पुढे सौरभचे आईबाबा त्यांना भेटायला आले, तेव्हा अटलजींची सारी शब्दसंपती काही क्षण मूक झाली. ‘मानवी अधिकारांचे हे उल्लंघन केल्याचा जाब आपण पाकिस्तानकडे जरूर मागू’ असे सांत्वन अटलजींनी केले. पाकिस्तानकडे त्यांनी हा छळाचा मुद्दा लावून धरला. सौरभ आणि त्याच्या तुकडीला जिवंत घेण्यात आल्यानंतर घुसखोरीचे आव्हान सोपे नाही आणि उशीर करून तर बिलकुल चालणार नाही, हे संरक्षणदलांना समजले. घुसखोरांनी 200 चौरस किलोमीटर इतका प्रचंड परिसर पादाक्रांत केला होता. घुसखोरी केवळ कारगिलपुरती नसून द्रास, कक्सार, बटालिक या भागातही झाली होती. प्राणवायू विरळ असलेल्या या भागातील तापमान हिवाळ्यात उणे 40 अंश सेल्सियस इतकेही घसरते आणि जनजीवन स्तब्ध होते. येथे रुळल्यानंतरही काही जवानांना श्वसनाचा त्रास होतोच. अशा भौगोलिक प्रदेशात वेगाने हालचाली करावयाच्या होत्या. अटलजींनी संरक्षणमंत्र्यांना ‘कोणत्याही स्थितीत सैन्यदलांची एकही विनंती अनुत्तरित राहता कामा नये,’ अशी स्पष्ट सूचना दिली. अटलजी मनातून खोलवर दुखावले होते. दोन शेजार्‍यांची वाटचाल संवाद, विश्वास, व्यापार आणि मैत्री या चतु:सूत्रीवर व्हावी, हे अटलजींचे स्वप्न हिमस्खलनात क्षणात लुप्त होणार्‍या गावांप्रमाणे पृथ्वीच्या पोटात गाडले गेले.

- Advertisement -

मग पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ‘ऑपरेशन विजय’ची आखणी करण्यात आली. 10 मे नंतर भारतीय लष्कराने क्रमाक्रमाने आक्रमक प्रतिचढाई सुरू केली. 26 मे रोजी तर हवाई दल युद्धात उतरले आणि घुसखोरांना टिपू लागले. छावण्या उद्ध्वस्त करू लागले. नौदलाने कराची बंदराची नाकेबंदी करण्यासाठी कंबर कसली. 6 जूनला लष्कराने कारगिलवर तुफान हल्ला चढवला. तीन दिवसांत दोन ठाणी परत मिळवली. अजूनही पाकिस्तान ‘यात आमचा काहीच हात नाही, ते काश्मिरी स्वातंत्र्ययोद्धे आहेत,’ हीच रेकॉर्ड वाजवत होते. यातच मग भारताने परवेझ मुशर्रफ यांनी चीनमधून लेफ्टनंट जनरल महंमद अझीझ यांच्याशी दूरसंपर्क यंत्रणेवरून केलेला संवाद जगासमोर ठेवला. यात ‘काश्मिरी दहशतवाद्यांच्या बंदुकांचा चापही आपल्या हाती आहे. आजवर खेळी यशस्वी झाली. पुढेही यश मिळेल, हा विश्वास शरीफनाही वाटतो आहे.’अटलजींनी जगातील अनेक नेत्यांशी संवाद साधण्याबरोबरच सावध भूमिकाही घेतली होती. ती म्हणजे केवळ आक्रमण मोडून काढायचे. पण प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडायची नाही किंवा ती मागे रेटायची नाही. तसे केल्यास संयुक्त राष्ट्रसंघात ते अडचणीचे ठरले असते. युद्ध सुरू झाल्यानंतर पाकिस्तान बेचिराख करण्याचे सूर निघू लागले, पण अटलजींनी घुसखोरांना हाकलण्याची व प्रत्यक्ष ताबा रेषा न ओलांडण्याची भूमिका सोडली नाही. त्यामुळे जागतिक लोलक भारताच्या बाजून झुकले.

24 मे रोजी रात्री साडेदहाला अटलजींना पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा दूरध्वनी आला. शरीफ यांच्याशी बोलताना अटलजींचा सूर कधी नव्हे इतका कठोर व तीव्र लागला. ‘कारगीलमध्ये जे काही चालले आहे, तो लाहोर कराराचा भंग आहे आणि शेवटचा घुसखोर परतल्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही.’ असे अटलजींनी शरीफना सुनावले. भारताची तिन्ही संरक्षण दले सज्ज झाली होती. वॉशिंग्टनमधून क्लिंटन या हालचाली बारकाईने पाहत होते. त्यांनी अणुयुद्ध भडण्याची भीती वाटत होती. 16 जूनला अमेरिकेचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार सँडी बर्गर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्र यांना दिल्लीत भेटले. तेवा मिश्र यांनी बर्गर यांना वाजपेयींचा निरोप स्पष्ट शब्दात सांगितला. ब्रजेश मिश्र म्हणाले, ‘सध्याचा आमचा संयम फार ताणता येणार नाही. युद्धाच्या या भडक्यात सैन्यदलांना आम्ही एका मर्यादेपलिकडे नियंत्रणात ठेवू शकणार नाही’ त्यानंतर अमेरिकेने भारताची बाजू उचलून धरली. स्वातंत्र्यानंतर कधीही अमेरिकेने इतक्या स्वच्छपणे भारताची बाजू घेतली नव्हती. भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही हा धक्का होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -