चतुरस्त्र लेखक अनंत काणेकर

‘गणूकाका’ हे त्यांच्या लघुनिबंधातील कल्पित पात्र आपल्या पुराणवादी वादप्रियतेने संस्मरणीय झाले आहे. रुढ संकेतांना धक्के देणारी चतुर वैचारिकता, नाट्यपूर्ण शैली व आटोपशीरपणा हे त्यांच्या लघुनिबंधांचे विशेष गुण आहेत.

अनंत आत्माराम काणेकर यांचा आज स्मृतिदिन. अनंत काणेकर हे आधुनिक मराठी कवी, चतुरस्त्र लेखक व वृत्तपत्रकार होते. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.ए. एल.एल.बी. झाल्यावर हायकोर्टाची वकिलीची सनदही त्यांनी मिळविली. मुंबईतील ‘नाट्यमन्वंतर’ (१९३३) या प्रयोगशील नाट्यसंस्थेचे ते संस्थापक होते. १९३५ ते १९३९ या काळात मुंबईच्या ‘चित्रा’ या साप्ताहिकाचे ते संपादक होते. १९४१ ते १९४६ पर्यंत मुंबईच्या ‘खालसा महाविद्यालयात’ ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर मुंबईच्याच ‘सिद्धार्थ महाविद्यालयात’ ते विभागप्रमुख होते. ‘चांदरात व इतर कविता’ (१९३३) हा त्यांचा एकमेव काव्यसंग्रह. तत्कालीन काव्यसंकेतांना टाळून लिहिलेल्या त्यांच्या कवितांमधून प्रादेशिक लोकगीतांचे, विडंबन काव्याचे, पुरोगामी सामाजिक आशयाचे आणि प्रेमभावनेच्या प्रसन्न आविष्काराचे वैशिष्ठ्यपूर्ण दर्शन घडते.

‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेमुळे काहीशा संक्रमणकालातील प्रयोगशील मराठी रंगभूमीशी त्यांचा संबंध आला. ‘निशिकांतची नवरी’ (१९३८), ‘घरकुल’ (१९४१) व ‘फांस’ (१९४९) ही त्यांची रुपांतरित नाटके प्रयोगशील रंगभूमीला उपकारक ठरली. ‘धूर व इतर एकांकिका’ (१९४१) यात त्यांच्या एकांकिका आहेत. ‘पिकली पाने’ (१९३४) हा काणेकरांचा पहिला लघुनिबंधसंग्रह होय. १९२५ पासून मराठीत अवतरलेला हा नवीन गद्य साहित्यप्रकार सुस्थिर व संपन्न करण्याचे कार्य फडके-खांडेकरांबरोबरच काणेकरांनीही केले.

‘गणूकाका’ हे त्यांच्या लघुनिबंधातील कल्पित पात्र आपल्या पुराणवादी वादप्रियतेने संस्मरणीय झाले आहे. रुढ संकेतांना धक्के देणारी चतुर वैचारिकता, नाट्यपूर्ण शैली व आटोपशीरपणा हे त्यांच्या लघुनिबंधांचे विशेष गुण आहेत.‘शिंपले आणि मोती’ (१९३६), ‘तुटलेले तारे’ (१९३८), ‘उघड्या खिडक्या’ (१९४५) व ‘विजेची वेल’ (१९५६) हे त्यांचे अन्य लघुनिबंधसंग्रह आहेत. ‘धुक्यातून लालतार्‍याकडे !’ (१९४०), ‘आमची माती आमचे आकाश’ (१९५०), ‘निळे डोंगर तांबडी माती’ (१९५७), ही त्यांची प्रवासवर्णनपर पुस्तके आहेत. अशा या चतुरस्त्र लेखकाचे 4 मे 1980 रोजी निधन झाले.