घरफिचर्सआयनाड बाबा!

आयनाड बाबा!

Subscribe

त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने चंद्रप्रकाश सर्वत्र लख्ख दिव्यासारखा पसरला होता. बॅटरीची गरज नव्हती. आमचा वाडा जवळ येत असताना बाबाच्या घरातून कोणी तरी धावत बाहेर पडला आणि काही कळण्याच्या आत दारातील तुळशीला जोरात लाथ मारून पुन्हा घरात गेला. एक क्षण काळजात चर्रर्र झाले... पण आम्ही एकमेकांना सावरत अंदाज घेतला, तो माणूस आयनाड बाबा होता.

लेखाचे शीर्षक थोडेसे वेगळे वाटेल. पण वेंगुर्ल्यात परबवाडा गावात आयनाड नावाचे एक बागवजा ठिकाण आहे. ते मृत्यूच्या शेवटपर्यंत सांभाळणारा बाबा नावाचा एक अवलिया होता. बायो, बेबी, बाळू तसे त्याचे नाव बाबा. बाबाचे मूळ नाव काय होते ते विचारण्याच्या भानगडीत कोणी कधी पडले नाही. कोकणात मूळ नावापेक्षा टोपण नावाने हाक मारण्याची एक सर्रास पद्धत रूढ आहे. घरातल्यांनी बेबी, बाळू म्हटले नाही तर दारातले त्याचे मूळ नाव बदलणार. संजयला संज्या किंवा मालतीला मालग्या अशा नावाने हाक मारणार. हाक मारणार्‍याला त्यात काही वावगे नसते आणि त्या माणसालाही आपला अपमान झाल्याचे कधी मनाला लागत नाही… कोकणच्या लाल मातीचा तो गुण असावा!रांडेच्या किंवा मायझया या शिव्याही तशाच एखाद्याशी संवाद साधल्यासारख्या किंवा सन्मान केल्यासारख्या दिल्या जातात. आई पोरीला सहज म्हणून जाते, गो, रांडेच्या गेलंय खुय. रात झाली घराकडे येवक कळना नाय. तुका बोलवक तुझ्या आवशीचो घो येतोलो. किंवा बापही पोराला, मायझया दिसभर मळ्यात क्रिकेट खेळतस. अभ्यास कोण तुझो बापुस करतलो…

आयनाड म्हणजे आंब्याची एक छोटी बाग होती. आताही ती आहे, पण पडझड झालेली. त्यात हापूस, पायरी, रायवळ आंब्याची झाडे. तिची मालकीण परब, पण तिला सगळे आयनाडकरीण म्हणत. चारी बाजूंनी आंब्याची झाडे आणि मध्ये कौलारू घर. आयनाडच्या आजूबाजूला भाताचे मळे. सर्व खुली जागा असल्याने चारी भागातून सुसाट वारा. दुपारच्या वेळेला नुसते एका झाडाखाली डोके टेकले तरी स्वर्ग सुख झोप लागलीच समजा…या आयनाडकरणीने खालच्या परबवाड्यातही एक नंतर घर बांधले. मूळ वाड्यापासून थोडे दूर राहण्यापेक्षा भावकीच्या साथीने राहणे कधीही बरे, असा पुढचा विचार करून ती राहते घर सोडून या घरात राहायला आली आणि आयनाडातल्या घराची पडझड झाली. घराचे घरटण झाले. कौले उडाली, लाकडाच्या रिपा चोरून नेल्या. मातीच्या भिंती कोसळल्या. तुळशीची पडझड झाली.आंब्याची बाग मात्र थोडे पैसे मिळतात म्हणून मजूर घालून बघितली जात होती. आयनाडकरणीची वर्षभराची बँक ही बाग होती. पण, आधीसारखे लक्ष नसल्याने आंबे चोरण्याचे प्रमाण वाढत चालले होते. याच दरम्यान आयनाडच्या कथा सुरू झाल्या. दुपार तापार, रात्री अपरात्री आयनाडात भुता दिसतत म्हणून बोंब उठली आणि पोरेटोरे एकट्या दुकट्याने तेथे जाण्यास टरकू लागली. या अफवेचा फायदा आयनाडकरणीला झाला. चोरीचे प्रमाण कमी झाल्याने दोन पैसे तिच्या गाठीला जमा होऊ लागले.

- Advertisement -

आयनाडकरणीला दोन मुली मंजुळा आणि वासंती. काळ पुढे सरकत होता. दोन्ही मुली दिसायला बर्‍या. मंजुळाचे लग्न झाले. ती खात्यापित्या बर्‍या श्रीमंत घरात गेली. मंजुळा गोरी, तर वासंती सावळी. मात्र उंचपुरी आणि शेलाट्या अंगकाटीची. घरादारातल्या कामात चटपटीत. कोणाच्या घरात गेली असती तर सोन्यासारखा संसार केला असता, पण तिने लग्न केले नाही. कदाचित ठरवून असेल. आपल्या घराचा पुढे वारसा सुरू ठेवण्यासाठी. आयनाडकरणीच्या घरात पुरुष माणसे तशी सुरुवातीपासून कमी होती. होती ती लौकर जग सोडून गेलेली. वासंती घरदार सांभाळत असली तरी शेतीभाती आणि माडझाड सांभाळणे तिला कठीण जात होते. तिच्या मदतीला बाबा दिवसाच्या मजुरीवर येत होता खरा, पण वासंतीला त्याची अपेक्षित मदत होत नव्हती. त्याने दिवसभर आपल्या घरी राहून काम करावे असे तिला वाटत होते, पण तो तयार नव्हता. एकत्र कुटुंबात त्याची छोटी खोली होती, एक भाऊ होता.

विजय नाव त्याचे. चाळीस एक वर्षांपूर्वीचा तो मॅट्रिक. त्याला चांगली नोकरी मिळून तो स्थिरावेल, आपलं पुढे बघू, असा विचार करणार्‍या बाबाला धक्का बसला तो भावाच्या डोक्यावर परिणाम झालेला पाहून. फारसा कोणाशी न बोलणारा विजय आणखी आपल्या कोशात गेला आणि एके दिवशी तो गाव सोडून गेला तो पुन्हा आलाच नाही… काही दिवस त्याला बाबाने शोधला खरा, पण तो सापडला नाही. कोकणात गावातच नव्हे तर, वाडीतही दोन तीन घरे सोडली की एक तरी वेडसर माणूस मिळतोच, असे पूर्वी बोलले जायचे. जयवंत दळवी, चि. त्र्यं. खानोलकर यांच्या कथा कादंबर्‍यांमधून अशी वेडी माणसे हमखास सापडायची… विपरीत परिस्थिती असो की आजूबाजूचे निराश वातावरण, अधिक विचार करणारा माणूस खोल गर्तेत जाणारच. किंवा काही वेगळे करत असेल तर त्याला लोक वेडा ठरवणार… खानोलकर ऊर्फ आरती प्रभूंनाही त्याचा अनुभव आलेला. कुडाळला खानावळ चालवता चालवता लिहिणार्‍या प्रभूंना लोक खुळावलो, असे सांगत तेव्हा त्यांच्या हातून ‘दोन डोळे, दोन काचा, अन दोन खाचा. येथे प्रश्न येतो कुठे आसवांचा!’ असे शब्द कागदावर झरझर उतरत आणि म्हणूनच मनात साचलेले ते निराशपण ‘सामना’ सिनेमात काळीज चिरून काढे. ‘कोणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. कोण मेले कुणासाठी रक्त ओकून, कशासाठी उतरावे तंबू ठोकून!’

- Advertisement -

विजय अचानक निघून गेल्यानंतर बाबाला मोठा धक्का बसला. आता आपले कोण आहे, असा विचार करत त्याने राहते घर सोडले आणि तो वासंतीकडे कायमचा राहायला आला. तिलाही मोठा आधार झाला. बाबा अंगाखांद्याने मजबूत होता. उंचापुरा धिप्पाड नसला तरी लहानपणापासूनच्या कष्ठामुळे त्याची देहकाठी भक्कम होती आणि तो जात्याच बिनधास्त होता. भीती ही त्याच्या मनात नव्हती. रात्री अपरात्री कुठेही एकटे जाण्याची, राहण्याची तयारी. कितीही उंच झाडावर चढून काम करायला तो तयार असायचा. यामुळे त्याला कामाची आणि दोन पैशांची कधीच ददात नव्हती. याचबरोबर पैशाला गाठ मारून ठेवणार्‍यातलाही तो नव्हता. बाजारात गेला की सोबतच्या दोन तीन माणसांना रेडकराची फेमस भजी, चहा खाऊ घालताना त्याचा हात कधी आखडला नाही… आणखी एक म्हणजे त्याच्या कमरेला दोन गोष्टी कायम असत. एक पानाची चंची आणि कमरेला गुंडालेल्या आकड्यात धारदार कोयता कायम लटकत असायचा. चायपाणी झाले की, रे मधू, बस मरे. पान खा. असे सांगत तो चंची सोडायचा आणि खास पान बनवून तो समोरच्याला खायला द्यायचा. किंवा काम करता करता तंबाखूची गोळी तोंडाच्या कोपर्‍यात दाबलेली.

बाजारात गेला की हमखास सिगारेट उजव्या हाताच्या मुठीत धरून छाती भरून आपल्याच नादात झुरके ओढणार! दिवसभर उंच झाडावर चढून काम करणारा बाबा दमलाय असे मला कधी दिसले नाही. कायम उत्साही. रात्री बारानंतर देवळाकडे सुरू झालेल्या पार्सेकरांचे दशावतार बघायलाही त्याचे डोळे सताड उघडे. नाही हा शब्द त्याच्या तोंडी नव्हता. गणपतीच्या दहा दिवसात भजनाची पेटी कायम त्याच्या डोक्यावर. ती पेटी दुसरा कोण घेईल, याची त्याने कधी वाट पाहिली नाही. आपल्या वाड्याचे काम आहे, असे समजून मान अपमान याच्या पलीकडे जाऊन त्याने हे काम केले. सोबत रात्री बेरात्री अडल्या नडलेल्याला साथ असायची बाबाची. बाबाला हाक मारली आणि तो आला नाही, असे कधी झाले नाही…

आता वासंतीच्या घरची सर्व जबाबदारी बाबाच्या खांद्यावर आली. आधी बाजाराला बाहेर पडणारी वासंती आता त्या कामाला बाहेर पडेनाशी झाली. माझ्या गावच्या दोन्ही काकांबरोबर बाबाची दोस्ती होती. पानाची पेटी सोडून आपल्या मनातील गोष्टी तो सांगायचा. तोंड लालभडक होईपर्यंत त्यांच्या गप्पा रंगायच्या तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेलेले असायचे. वासंती आणि बाबाचे बरे चालले असताना, वासंती हे जग लौकर सोडून गेली. ती खूप आजारीही नव्हती. विजय निघून गेल्यानंतरचा बाबाला हा दुसरा धक्का होता. आता त्या मोठ्या घरात तो एकटा उरला होता. मंजुळा वर्षभरात येऊन जात होती, पण वासंतीसारखी तिला घरदार आणि बाबाबद्दल आस्था नव्हती. एकट्या बाबाला आता दिवस कामात जात असले तरी रात्री खायला उठू लागल्या होत्या.

आणि अचानक एके दिवशी बाबाचा बुवा झाला. त्याच्या अंगात येऊ लागले. तो जोरजोरात घुमू लागला. आता त्याने अंगमेहनतीची कामे पूर्ण बंद केली होती. सकाळ, संध्याकाळ आणि रात्री बेरात्री त्याच्या अंगात देव संचारू लागला. आधी वाड्यातील लोक त्याच्याकडे अडीअडणीतून मार्ग काढण्यासाठी जाऊ लागले आणि हळूहळू पंचक्रोशीत बाबाचा संचार गाजू लागला. त्याने दिलेले अंगारा-धुपारा, धागे-दोरे याची आता चर्चा होऊ लागली. बाबाकडे गेले की अडचण सुटणार किंवा कमी होणार,असा विश्वास लोकांना वाटू लागला. लोक आता ग्राम देवतेच्या देवळात कमी आणि बाबाकडे जास्त दिसू लागले. बाबाने आता मोठा देव्हारा तयार केला होता. त्याच्या समोर बसून तो घुमायला लागला की तासनतास हे काम सुरू असायचे. बाबाला खायची प्यायची कशाची आठवण नसायची.

घरात शांती नाही, पोरीचे लग्न होत नाही, बाजूचो करणी करता, झिलाक नोकरी नाय, शेती बागेत यश नाय, घरकारीण वरचेवर आजारी असता, मुंबईच्या भावाक यश मिळना नाय अशी एक ना शंभर गार्‍हाणी घेऊन लोक बाबाकडे येत होते आणि आपल्या दैवी शक्तीच्या जोरावर ती आपण सहज सोडवत आहोत, असा समज करत बाबाचे बुवापण दिवसेंदिवस विस्तारत चालले होते. आता देवपणाशिवाय त्याला कशाचीच शुद्ध राहिली नव्हती. आपले काम झाले की लोक बाबाच्या देव्हार्‍याच्या समोर ठेवलेल्या एका टोपलीत पैसे, वस्तू तसेच काहीजण ऐपतीप्रमाणे नारळ, तांदूळ, आंबे, काजू, सुपारी आणून ठेवत होते. बाबाने कधीच या मायेकडे बघितले नाही. उलट अडल्या नडलेल्याला हातात मिळेल तो ते देत होता. हे सारे देवाचे आहे, ते आपले नाही.’ मी साठवून काय करतलंय. कोण हा माझो. माझे डोळे उघडे असापर्यंत माझा,माझा.

मी गेल्यार कोण खातलो या खाजा’, अशी गंमत करत बाबा माझ्या काकाला (त्याला आम्ही भाऊ म्हणतो) बर्‍याच वेळेला टोपलीतील पैसे घेऊन जायला सांगायचा. पण,भाऊने एका पैशाला कधी हात लावला नाही. उलट भाऊ बाबाला म्हणायचा, ’ रे मेल्या, बाबा पाना, तंबाखू कमी खा आणि पोटाक बरा खा मरे’. त्यावर पान खाल्लेला बाबा हसायचा,’ काय करूचा हा जगान. पेज आणि दूध खावन जगतय. चांगला चुंगला कशाक व्हया’. बाबाकडे आलेल्या भक्तांपैकी कोणी तरी चुलीवर पेज ठेवत होता आणि गोठ्यातील म्हशीचे दूध काढून देत होता.

बाबाच्या देवपणाचा बोलबाला वाढत होता. आता त्याला स्वतःकडेही लक्ष द्यायला वेळ नव्हता. सकाळ संध्याकाळ देव्हार्‍यासमोर बसून त्याला अंगात देव आणायला लागायचा. त्याची सगळी शारीरिक आणि मानसिक ताकद देव उभा करण्यात जात होती. आता त्याचे केस वाढून पाठीवर आले होते आणि दाढी गळ्यापर्यंत. पूर्वीचे कष्टाने मिळवलेले सुदृढ शरीर आता मावळतीकडे झुकत चालले होते. रात्रीच्या सततच्या जागरणांमुळे आधीच मोठे असलेले त्याचे डोळे आता खाचा सोडून बाहेर आल्यासारखे दिसत होते. त्यातच सतत पान तंबाखू खाऊन लालभडक पिवळे पडलेले तोंड आता लोंबल्यासारखे दिसत होते. ओठ दोन्ही बाजूंनी पांढरे पडलेले. शरीर आता बाबाच्या हातातून सुटत चालले होते, पण त्याचे मनही आता त्याच्या ताब्यात राहिलेले दिसत नव्हते… ते त्याच्या देहबोलीतून जाणवत होते. आता तो जंगलातून उठून आल्यासारखा कोणी तरी हटयोगी वाटत होता.

आता त्याच्याविषयी वाटणारी आपुलकीची जागा भीतीने घेतली होती. गावातील पोरेटोरे, बायामाणसे तर त्याच्यापासून दूर राहू लागली. वाईट म्हणजे तो आता आपल्याला देवापेक्षा मोठा समजू लागला होता. माणूस आणि देव यांच्यातील सीमारेषा त्याने आपणहून पुसून टाकली होती. तो ग्रामदेवतांपेक्षा आपणच श्रेष्ठ आहोत, असे समजून लोकांना देवळात जाऊ नका, आपल्या घरी या, असा आदेश देऊ लागला… आणि मी देवळात जावचय नाय, देवाक व्हयो तर माझाकडे येऊ दे. वर्षाला सोमवती अमावस्येला सागरेश्वर समुद्रकिनारी जाणारे देव हे आपल्या दारातून गेले पाहिजे,असा हटवाद तो करू लागला. लोकांच्या छोट्या मोठ्या अडीअडचणी सोडवताना आलेल्या मोठेपणाची जागा बाबाच्या अहंकारात रूपांतरित झाली होती. तो माणसांनाही जुमेनासा झाला… त्याच्यातील दैवीशक्तीने आता अघोरी रूप धारण केले होते. मी एकदा गावी आमच्या सातेरी देवीच्या जत्रेला गेलो होतो. रात्री बारा वाजता देवाची पालखी निघाल्यानंतर एक तासभर दशावतार बघून मी आणि माझा चुलत भाऊ बोलत पौर्णिमेच्या रात्री घरी चालत येत होतो.

त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने चंद्रप्रकाश सर्वत्र लख्ख दिव्यासारखा पसरला होता. बॅटरीची गरज नव्हती. आमचा वाडा जवळ येत असताना बाबाच्या घरातून कोणी तरी धावत बाहेर पडला आणि काही कळण्याच्या आत दारातील तुळशीला जोरात लाथ मारून पुन्हा घरात गेला. एक क्षण काळजात चर्रर्र झाले… पण आम्ही एकमेकांना सावरत अंदाज घेतला, तो माणूस बाबा होता. केस दोन्ही हाताने पिंजारून स्वतःशी बडबडत तो बर्‍याच वेळा देव्हारा ते तुळस असा आतबाहेर धावत होता. सकाळी मी भाऊ काकांच्या कानावर ही गोष्ट घातली. भाऊ काही बोलले नाही, पण त्यांनी सांगितलेली बाबाची दुसरी गोष्ट आणखी भयानक होती… क्षणभर विश्वास बसत नव्हता. भाऊ रात्री जेवण झाले की बाबाकडे जायचे. दोघेही एकमेकांशी गप्पा मारत आणि एके दिवशी रात्री बारा वाजल्यानंतर बाबा भाऊंना म्हणाला, तू आता निघ. त्याची येवची वेळ झाली. भाऊंना काही समजेना. कोणाची वेळ, बाबा. तुका काय ता कळाचा नाय. आता नाग येतलो. इच्छाधारी असा. मी बोलतंय त्याच्या वांगडा. माझा आणि तेचा कनेक्शन आसा. तुझ्यासाठी काय मागू काय. भाऊंनी बाबाला हात जोडले आणि पुन्हा कधी ते रात्री त्याच्या गजालीला गेले नाहीत…

बाबाचा देवपणापासून सुरू झालेला प्रवास आता अघोरीपणाकडे गेल्याने आमच्या वाड्यातून फारसे कोणी त्याच्याकडे जात नव्हते… बाहेरची माणसे देवाच्या कामासाठी त्याच्याकडे येत होती. याच दरम्यान हळूहळू त्याचा आवाज बंद होत गेला. त्याला काही खायलाही जमेना. त्याला तोंडाचा कॅन्सर झाला होता, पण तो आपल्यावर उपचार करून घ्यायला तयार नव्हता… देव काय ते बघून घेईल, असे तो भाऊंना म्हणालाही आणि शरीराचे बरेच हाल झाल्यानंतर एके दिवशी त्याने कोणाशी न बोलता जगाचा निरोप घेतला…! भाऊंनी पुढे होऊन आपल्या छोट्या भावासारखे त्याचे पुढचे क्रियाकर्म केले. त्याची भयानक जखम पाहून कोण पुढे येत नसताना भाऊंनी एखाद्या डॉक्टरसारखी भूमिका निभावली. मेल्यानंतर त्याचे आणखी हाल होऊ दिले नाही.

काही दिवसांनंतर मुंबईहून मंजुळा आली आणि घरभाट तिने विकायला काढले. आधी वाड्यात आमच्या भाऊंसह कोणाला हवे आहे की नाही, ते तिने विचारले. पण निर्वशाचे (ज्या घरात कोणी पुरुष माणूस शिल्लक राहिला नाही, असे घरदार किंवा शेतीभाती घेतली की ती घेणार्‍याला लाभत नाही. त्याचाही निर्वंश होतो, असा कोकणात आजही समज आहे) घर नको म्हणून कोणी भावकीने बाबाचे घर आणि शेती घेतली नाही. पण काही महिन्यानंतर ते घर विकले गेले. विकत घेणार्‍याला खूप त्रास होतो, रात्री कोणी तरी मोठ्याने ओरडत बाहेर येतो, अशा अफवाही उठल्या. पण, कालांतराने त्याही थांबल्या. घर आणि त्याची आजूबाजूची जागा गेली तरी आयनाड मात्र खूप प्रयत्न करूनही मंजुळाला विकता आले नाही. कदाचित बाबा हे घर सोडून आयनाडात गेला असावा आणि आयनाडकरणीच्या जग सोडून गेलेल्या पुरुष माणसांच्या सोबतीने गार वारा खात आंब्याच्या झाडावर बसला असावा…!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -