घरफिचर्सथोर क्रांतिकारक बाबाराव सावरकर

थोर क्रांतिकारक बाबाराव सावरकर

Subscribe

बाबाराव सावरकर यांचा आज स्मृतिदिन. बाबाराव हे महाराष्ट्रातील एक स्वातंत्र्यप्रेमी, थोर क्रांतिकारक व हिंदुमहासभेचे निष्ठावान कार्यकर्ते. त्यांचा जन्म १३ जून १८७९ रोजी दामोदर व राधाबाई या सुशिक्षित दाम्पत्यापोटी भगूर (नाशिक जिल्हा)या गावी सनातन वैदिक कुटुंबात झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते ज्येष्ठ बंधू होते. त्यांचे पूर्ण नाव गणेश दामोदर सावरकर होते. पण ‘बाबाराव’ या नावानेच ते सुपरिचित होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाले, तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नाशिक येथे झाले. आईच्या मृत्यूच्या वेळी (१८९२) ते तेरा वर्षांचे होते, तेव्हा दामोदरपंतांनी बाबांचे लग्न करण्याचे ठरविले आणि यशोदा या मुलीबरोबर ते विवाहबद्घ झाले (१८९६). वडिलांच्या मृत्यूनंतर (१८९९) घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणात खंड पडला.

विनायकराव व नारायणराव या धाकट्या भावांचा त्यांनी सांभाळ केला आणि त्यांना उच्च शिक्षणही दिले. त्यांच्या देशकार्यातही त्यांनी तेवढाच सहभाग घेतला. नाशिक येथे स्थापन झालेल्या ‘मित्रमेळा’ या क्रांतिकारी व स्वातंत्र्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेचे ते कार्यवाह होते (१९००). सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणार्‍या ‘अभिनव भारत’ या संस्थेतही त्यांनी हिरिरीने भाग घेतला. क्रांतिकारकांचे संघटन करण्यात ते कुशल होते. बाबारावांनी अबोलपणे अनेक क्रांतिकारकांशी संधान बांधून त्यांना प्रेरणा व उत्तेजन दिले. क्रांतिकारकांना स्फूर्ती देणारी कवितांची एक पुस्तिका प्रसिद्घ करून त्यांनी ब्रिटिशांविरुद्घ युद्घ पुकारले आहे, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ हा प्रश्न विचारणारी सुप्रसिद्घ कविता या पुस्तिकेत होती. त्यांना ८ जून १९०९ रोजी जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. येरवड्याच्या (पुणे) तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. तिथे त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. ते आजारी पडले. पुढे त्यांची रवानगी अंदमानातील तुरुंगात झाली.

- Advertisement -

अंदमानच्या तुरुंगातून या बंधूद्वयांची १९२१ च्या मे महिन्यात सुटका झाली. बाबारावांना प्रथम विजापूरच्या तुरुंगात व नंतर साबरमती येथील तुरुंगात हलविण्यात आले. तिथे त्यांना भयंकर आजाराने पछाडल्यानंतर १९२२ च्या सप्टेंबरमध्ये त्यांची सशर्त सुटका करण्यात आली तथापि त्यांच्या गुप्तबैठका, विनायकरावांच्या कार्यास मदत इ. कार्य चालू होते. औषधोपचारासाठी बाबा बनारसला जात असत. बनारसच्या बाबारावांच्या मुक्कामात तेथील विद्यापीठातील गोळवलकर गुरुजी, भय्याजी दाणी, तात्या तेलंग वगैरे दिग्गज मंडळी भेटत असत. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांची भ्रमंती चालू होती. त्यांनी महात्मा गांधींची १९३० मध्ये भेट घेऊन सुखदेव, भगतसिंग व राजगुरू या क्रांतिकारकांची फाशीची शिक्षा कमी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी विनंती केली होती. मुंबईला एंपायर चित्रपटगृहात बाँबस्फोट झाला. त्याच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून बाबारावांना अटक झाली (१० एप्रिल १९३३). या बाँबस्फोटाशी त्यांचा कसलाही संबंध नव्हता हे सिद्घ होऊनही त्यांना नाशिक येथे स्थानबद्घ करण्यात आले. १८ मे १९३७ रोजी बाबांची बिनशर्त सुटका झाली पण व्याधिग्रस्त शरीरामुळे त्यांना अखेरपर्यंत वेदनांशी सामना करावा लागला. अखेर १६ मार्च १९४५ रोजी सांगली येथे त्यांचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -