घरफिचर्सबाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे

बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे

Subscribe

बाळाजी बाजीराव यांनी छत्रपतींना दरसाल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारान्वये ठरले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने बाळसे धरले.

बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचा आज स्मृतिदिन. बाळाजी बाजीराव हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्यानंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी पुणे येथे झाला. लहानपणापासूनच बाळाजी बाजीरावांना घरातील लोक व खुद्द छत्रपती नानासाहेब म्हणून बोलवू लागले. छत्रपतींची त्यांच्यावर मर्जी होती. थोरल्या बाजीरावांच्या निधनानंतर शाहू छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांना दिली. बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले.

शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले. १७४९ साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा राज्याचे सर्वसत्ताधीश झाले. शाहूंचा वारस रामराजा हे सातारा येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतींच्या गादीवर होते तरीही बाळाजी यांनी छत्रपतींच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला. त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात २५ सप्टेंबर १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले.

- Advertisement -

बाळाजी बाजीराव यांनी छत्रपतींना दरसाल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारान्वये ठरले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने बाळसे धरले. मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी ताकद होती. परंतु १७६१ च्या तिसर्‍या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. त्याच पराभवाच्या धक्क्याने २३ जून १७६१ रोजी बाळाजी बाजीरावांचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -