घरट्रेंडिंगबचत -गुंतवणुकीचा समतोल महत्वाचा !!

बचत -गुंतवणुकीचा समतोल महत्वाचा !!

Subscribe

बचत की गुंतवणूक ? ही काय अंड आधी की कोंबडी आधी ? इतकी काही बिकट समस्या नाही. तरीदेखील आपल्याला बचत करा !! बचत करा !! असे अनेक पद्धतीने सांगितले जाते. उदाहरणार्थ आपल्या म्हणी आठवा -थेंबे थेंबे तळे साचे! त्यामानाने ‘गुंतवणूक’ या शब्दाकडे जरा सावत्र भावनेनेच बघितले जाते. भावनिक आणि प्रेमाची गुंतवणूक इतकेच ठावूक ! पण बदलत्या जमान्यात आपण दोन्ही गोष्टी करायला हव्यात.नेमके काय अर्थ आहेत? दोघांत काय साम्य आणि फरक आहे? हे जाणून घेवूया. जशी दिवाळी संपल्यावर आपल्यापैकी बर्‍याच जणांना ‘डाएटिंग आणि पथ्य’ यांची अगदी प्रकर्षाने जाणीव होते,तसे खर्च करून मोकळे झाल्यावर थोडी बचत आणि जमल्यास गुंतवणूक करुया ! असे आपले मार्च महिन्याआधी कर-बचतीचे धोरण असते.आणि जमा-खर्चाची तोंडमिळवणी करण्याची कसरत ‘यशस्वी’ करायची असते.

बचत – आपण जे काही पैसे कमावतो,पैकी काही भाग खर्च न करता बाजूला काढून ठेवणे,शिल्लक ठेवणे! म्हणजेच ‘बचत’ आज किंवा उद्या आपल्या आकस्मिक खर्चासाठी किंवा काही निश्चित कारणांसाठी खर्च करण्यासाठी पैसा आणायचा कुठून? अशावेळी आपलाच पैसा आपल्याला उपयोगी पडू शकतो.कोणाकडे हात पसरायला नको की ऋण काढायला नको. आधीच्या पिढीचा बचतीवर अधिक विश्वास होता.कारण कर्ज घेणे -उसना पैसा घेणे म्हणजे कर्जबाजारी होणे. कर्ज न करता जगणे ! हीच पूर्वीच्या काळाची जगण्याची रीत होती. मात्र पुढे काळ बदलला,कर्ज घेणे हे गरजेचे आणि सोयीचे ठरू लागले. तरीही स्वतःच्या पैशाची बचत करण्याचे महत्व कमी झाले असा अर्थ होत नाही.कारण पर्सनल लोन एकवेळ सरळ मिळू शकते, पण गृह-कर्ज किंवा अन्य कारणांसाठी स्वत:चे काही पैसे हाताशी लागतात ,तरच उर्वरित टक्क्यांसाठी बँक कर्ज देते. आज खिशात डेबिट आणि क्रेडीट कार्डसारख्या सुविधा असल्याने घरी पैसा ठेवावा.

- Advertisement -

तातडीने वापरायला पैसे असावेत ! ही संकल्पनाच बाद झालेली आहे.पण हे तसे चुकीचे आहे कारण घरात रोकड असणे हे केव्हाही सोयीचे असतेलिक्विडीटी म्हणजेच रोकड-सुलभता हा मोठा गुणधर्म. कारण कार्ड असले तरीही बुथ बंद असणे,एटीएम चालू नसणे किंवा त्यात पैसे अपुरे असणे ! किंवा काहीही तांत्रिक बाबी उदभवू शकतात. आमचे एक मित्र असेच गाफील राहिले.पहाटे इंद्रायणी पकडून पुण्याला जायचे,त्याआधी घराच्या नाक्यावर असलेल्या एटीएम बंद निघाले आणि खिश्यात कार्ड असूनही ‘बिना पैश्याने’ प्रवास करावा लागला आणि कर्जतला वडा न खाताच पुढे जावे लागले आणि पुण्यात उतरल्यावर कार्डाने पैसे काढता आले,तेव्हा त्याला हायसे वाटले.

बचत करण्यासाठी समर्थन करणारी अनेक कारणे आपल्याला माहित असतात पण तरीही खर्च अनेक असतात.त्यातून पैसा वाचवायचा कसा ?खिश्याला लागलेली गळती थांबवायची कशी? म्हणून बँक -पोस्ट किंवा तत्सम अर्थ-संस्था अनेक पद्धतीने ‘बचत-मार्गा’कडे आपल्याला वळवण्याचा प्रयत्न करीत असतात.

- Advertisement -

उदाहरणार्थ- सेविंग खाते – आपल्या सोयीने काही पैसे आपण ठेवावेत अशी अपेक्षा असते,आणि प्रोत्साहन म्हणून काही टक्के व्याजही दिले जाते

रिकरिंग खाते– प्रत्येक महिन्याला विशिष्ठ रक्कम नित्य-नेमाने टाकण्याची संवय लागावी म्हणून बँका अशी सुविधा देत असतात.

मुदत ठेवी – आपल्याकडे साठलेले काही शेकडा किंवा पटीत असलेली रक्कम आपल्याला अल्प किंवा दीर्घ मुदतींसाठी आपण ठेवू शकतो आणि त्यावर सध्या सेविंग खात्यात पैसे ठेवण्यापेक्षा अधिक व्याज कमावता येते.
बँकिंग व पोस्ट व्यवस्थेव्यतिरिक्त अनेक प्रकारचे बचतीचे मार्ग उपलब्ध असतात.

गुंतवणूक म्हणजे काय ? आपण पैसे गुंतवतो म्हणजे नेमके काय करतो? ते पैसे आपल्याला हवे तेव्हा ,हवे तितके वापरण्याची मुभा-स्वातंत्र्य मिळत नाही.त्याबदल्यात आपल्या पैश्याच्या म्हणजे मुद्दलाच्या बरोबरीने व्याजरूपी उत्पन्न मिळते. पैसे म्हणजे चलन हे गुंतवणूक करण्याचे साधन आहे.

पैसे आपण खालील बाबतीत गुंतवू शकतो-
1 बँक / पोस्ट
2 शेअरबाजार
3 कंपनी ठेवी
4 जमीन-जुमला रिअल इस्टेट/ जागा / फार्म-हाऊस
5 सोने- चांदी आणि मौल्यवान धातू
6 म्युचुअल फंड
कुठे गुंतवू नका ! सावध गुंतवणूक करा !!
1 बोगस योजना / डब्बल-स्कीम्स
2 अनधिकृत योजना
3 अविश्वसनीय लाभ देणारी नवीन योजना
गुंतवणूक कां व कश्यासाठी करायची ?
1 गुंतवणे म्हणजे बचत करणे
2 भांडवल-वृद्धी
3 चलनवाढीशी सामना करण्यासाठी
4 भविष्यकालीन तरतूद म्हणून

गोंधळ ,गैरसमज आणि संभ्रम :-
मुळात बचतीला गुंतवणूक म्हणणारे अनेक असतात ,तसेच गुंतवणूक म्हणजेच बचत असे छातीठोकपणे सांगणारेदेखील असंख्यच असतात.आपण आर्थिक साक्षरता म्हणून असा गोंधळ मनात कदापीही ठेवू नये म्हणून पुढील माहिती.
बचत -म्हणजे पैसे वाचवणे आणि त्यासाठी जे काही केले जाते ते म्हणजे बचत

उदाहरणे

1 पैसे घरात ठेवणे
2 पैसे खर्च न करणे
गुंतवणूक – म्हणजे पैसे कसे वाढतील ?त्यापद्धतीने गुंतवणे आणि अधिक पैसे कमावणे.
उदाहरणे – 1 अमुक योजनेत गुंतवून व्याज कमावणे
2 ज्यात पैसे गुंतवल्यावर मुद्दल वाढू शकते, व्याज-लाभांशरूपी उत्पन्न मिळते

दोहोंतील फरक जाणून घेवूया –
जोखीम ठळीज्ञ –
बचत – घरात पैसे ठेवल्यास तितकी आर्थिक जोखीम नसते.चोरी वगैरेची जोखीम ही घरातील दाग-दागिने आणि चीजवस्तूसंदर्भात देखील असतेच कि !
गुंतवणूक – अनेक प्रकारची जोखीम उचलण्याची मानसिकता असावी लागते

गुंतवणुकीचे फायदे –
1 मुद्दल तशीच राहते -वाढू शकते
2 वाढत्या गरजा आणि खर्चांशी मुकाबला करण्यासाठी
3 अधिक उत्पन्नाची निर्मिती
4 संपत्ती निर्माणास हातभार
5 स्वप्ने वास्तवात आणण्यासाठी
गुंतवणूक केल्याने होणारे तोटे/नुकसान –
1 चुकीची गुंतवणूक केल्यास फटका पडू शकतो
2 जिथे पैसे गुंतवले असतात ,तीच योजना बुडाल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते
3 एकाच योजनेत भरपूर किंवा सर्व पैसे गुंतवल्यास मोठा फटका बसू शकतो.
बचत ही इमर्जन्सीची सोय म्हणून नक्की हवी म्हणून बँकेच्या बचत खात्यात अधिक रक्कम ठेवू नका ,कारण तिथे व्याज कमी मिळते कि जणू न मिळाल्यासारखेच ! पण खरा फोकस हा पैसे गुंतवण्यावर अधिक हवा ! कारण बचतीला न वाढण्याचा शाप असतो आणि गुंतवणुकीला वाढीचे वरदान असते. बचत केल्यास पैसा ‘शिल्लक’ राखल्याचे समाधान मिळते,तर गुंतवणुकीने ‘कमाई’केल्याचा आनंद मिळू शकतो. बचत असेल यात गुंतवणूक आणि गुंतवणुकीतून बचत ! असे हे ‘अर्थ-चक्र’ आहे.

-राजीव जोशी

(लेखक अर्थ-बँकिंग अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -