Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स Appsवर बंदी - धोरणात्मक कि राजकीय 

Appsवर बंदी – धोरणात्मक कि राजकीय 

Related Story

- Advertisement -
देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक चीनी अॅपमधील माहितीचा बेकायदा वापर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येत आहे. ही चिंताजनक आणि गंभीर बाब असल्याचे केंद्रिय प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्राच्या गृहमंत्रालयाने सूचना केल्यानंतरच संबंधित अॅप बंद करण्यात आल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जर असे असेल तर ही बंदी आधीच का नाही केली गेली. त्यासाठी गलवान संघर्षाची वाट पाहिली गेली का, असा प्रश्न निर्माण होत आहे. या शिवाय करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे अपयश लपवण्यासाठीच चीनविरोधाचा राग आळवला जात आहे. करोनामुळे जागतिक मत हे चीनच्या विरोधात गेले आहे. सोबतच गलवान संघर्षामुळे त्याला बळ मिळाले असल्याने देशभक्तीचा सूर आळवून करोनाविषयावरून आपले धोरणात्मक अपयश लपवण्याचे हे राजकारण आहे का, हे तपासायला हवे.  
भारतात वापरल्या जाणा-या चीनमधील ५९ अॅपवर बंदी घातल्यानंतर चीनने घेतलेली सावध भूमिका ही चीनचे औद्योगिक धोरण आणि व्यापाराविषयीचे धोरण स्पष्ट करणारी आहे. कुठल्याही परिस्थितीत चीनमधील मालासाठी जागतिक बाजारपेठेची दारे बंद होता कामा नयेत, हे चीनचे धूर्त धोरण स्पष्ट आहे. अॅपबंदीनंतर चीनने व्यक्त केलेली चिंता ही स्वार्थ आणि धूर्तपणाची कबुली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी मत व्यक्त करताना स्पष्ट केले की अॅपबंदीचे भारताने उचलेले पाऊल चीनची चिंता वाढवणारे असून याबाबतच्या परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. यातील परिस्थितीच माहिती घेणे म्हणजे काय, तर भारताने चीनमधील अॅपवर बंदी घातल्यास त्याचे काय परिणाम चीनवर होतील, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट आहे. जगाची बाजारपेठ गिळंकृत करण्यासाठी चीनी ड्रॅगन आसूसलेला आहेच. मात्र हा धोका एवढाच नाही. कुशल आणि धूर्त शिकारी आधी शांतपणे जाळे लावतो, ते जाळे दूरपर्यंत कसे जाईल, याची काळजी घेतो.
या जाळ्यात पक्षांसाठी दाणे असतात, या दाण्यांच्या सुवासाने पक्षी जाळ्यात अडकतात. अडकलेला पक्षी जाळ्यात पुरेपूर अडकल्याची खात्री झाल्यावर शिकारी जाळे ओढून काढतो. देशातील भांडवलदारी यंत्रणा अशाच पद्धतीने आपल्या उत्पादनाचे आमिष दाखवून आपले जाळे फेकत आहेत. चीनही असेच करतो आहे. मात्र त्यापुढे साम्यवादाचा मुखवटा असल्याने या ड्रॅगनचा भेसूर भांडवलदारी चेहरा लपवला जातो. चीनमध्ये बनवलेल्या अॅप्सला भारतात पर्याय आहेत का, याची चर्चा आता सुरू झाली आहे. ही चर्चा उशिराने सुरू होण्यामागे आपल्या साळसूद देशभक्तीची संकल्पना ही प्रमुख कारण आहे. जे स्वस्त, आकर्षक ते विकत घेण्याकडे भारतातील बाजारपेठेचा कायम कल असतो. ही कमजोरी चीनी कंपन्यांनी पुरती ओळखली होतीच. त्यामुळेच आपल्याकडील सणवारासाठी दिवाळीतील दिव्यापासून ते आकाशकंदिलपर्यंत आपली सण परंपरा चीनच्या अजस्र ड्रॅगनने कधी गिळून टाकली आपल्याला समजलेच नाही.
आपल्या गावागावातील कुंभारवाड्यात बनवले जाणारे दिव्याखाली आपणच केलेला अंधार आपल्याला दिसला नाही. हे दिवे विझत असताना चीनच्या घुसखोरीमुळे भारतातील लघुउद्योग बंद पडत होते. चीनच्या अॅप्सचा विषय हा खूपच अलिकडचा आहे. ज्यावेळी आपल्याकडे स्वस्तातले मोबाईल फोन दाखल झाले, तो काळ १९९७-९८ चा होता. या काळात मोबाईल फोन ही महागडी आणि चैनीची गोष्ट होती. पोलिसांच्या वाॅकीटाॅकीसारखा काळ्या, निळ्या रंगाचे मोठे अवजड फोन राजकारणी, उद्योगपतींच्या हातातच दिसत होते. त्यावेळी चीनमधून अतिशय स्वस्त किंमतीत स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल झाले होते. हे फोन आकर्षक रंगात होतेच. त्याची किंमत साध्या फोनच्या तुलनेत कमालीची कमी होती. या फोनला दूरदर्शनचे नेटवर्कही जोडता येत होते. भारतातील बलाढ्य कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्येही अशा सुविधा नव्हत्या ज्या चायना मेड फोनमध्ये त्यावेळी होत्या. तंत्रज्ञान विक्रीसाठी आसुसलेल्या भारतातील बाजारपेठांच्या त्यावर उड्या पडणार होत्या. चीनच्या घुसखोरीच्या इतिहास त्याआधीचा आहे. तीस वर्षापूर्वी आपल्याकडे असलेल्या शाईच्या पेनच्या निप चीनमध्ये बनवल्या जात असल्याचे आनंद आणि अभिमानाने काहीशा माजोरीने सांगितले जात होते. अशा अनेक वस्तू होत्या. ज्यावर नेलकटर, पेन्सिल, पेन्सिल बाॅक्स, किचेन अशा अनेक छोट्या किरकोळ वस्तूही चीनमध्ये बनल्याचा आम्हा भारतीयांना अभिमान होता.
चीनच्या लोकसंख्येच्या प्रमाणातच तेथील उत्पादनक्षमता आहे. लघु उद्योगांचे जाळे आहे. आपल्या देशातील जास्त असलेल्या मनुष्यबळाचा पुरेपूर वापर हा साम्यवादी चीनचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे लोकसंख्या हे त्यांचे बलस्थान त्यांनी औद्योगिक धोरणातून आणखी मजबूत केले आहे.  तर आपल्या देशातील आणि लोकसंख्या आणि त्यातही तरुणांची सर्वाधित संख्या पुरेशा प्रमाणात उत्पादक उर्जेत रुपांतरीत करण्यात आपण चीनच्या तुलनेत कमी आहोत. जगातील सर्वात तरुण देश असे कौतूकाने सांगणे आणि त्या सळसळत्या तरुणाचा धोरणात्मक देशसेवेसाठी उपयोग करून घेणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उत्पादन, निर्मिती आणि वाढलेल्या उद्योगांमुळे चीनमधील स्थानिक उत्पादकांमध्ये कमालीची स्पर्धा आहे. या स्पर्धेतून उत्पादनाच्या किंमती कमी होत असल्याने जगातल्या बाजारपेठा काबीज करत त्याचा गैर-फायदा घेतला जात आहे.
चीनमधील अॅपवर बंदी हे हिमनगाचे टोक त्यामुळेच आहे. देशभक्तीच्या नावाखाली अशा अॅप्सवर बंदीचे स्वागत करतानाच आपल्याकडे त्यासाठी कोणते पर्याय आहेत. याचे उत्तर आपल्याकडे नसल्यास आपला निर्णय भावनिक राजकारणाचा एक वेडगळपणाच ठरण्याची शक्यता आहे. खेळणी, फटाके, इलेक्ट्राॅनिक्स, इलेक्ट्रीकल्स, मोटार अभियांत्रीकी, स्टेशनरी, शालेय वस्तू, माहिती तंत्रज्ञानातील साधनांचे सुटे भाग, कपडे, शूज, गाॅगल्स, छत्र्या अशा जवळपास सर्वच वस्तूंची निर्मिती आणि उत्पादन चीनमध्ये घेतले जाते. चीनमधील अनेक उत्पादनांच्या जोडणीचे काम केवळ आपल्या देशात केले जाते, चीनमधील वस्तू निर्मितीमुळे आपल्या देशात वस्तू जोडणीचे अनेक व्यावसाय आधारलेले असल्याचे आपल्या माहितीत नसते. त्यामुळे चीनमध्ये निर्मित केलेल्या वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा देणे आणि त्यावर अंमल करणे यात फार मोठी तफावत आहे.
भारत आणि चीनमध्ये झालेल्या युद्धसदृश्य स्थितीचे कारणाबाबत आंतरराष्ट्रीय मुत्सदेपणाने त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. चीनी अॅपवरील बंदी हा त्याचाच परिणाम आहे. मात्र ही बंदी याहीपुढे कायम राहिल असे समजणे त्यामुळेच चुकीचे आहे. देशभक्तीचा युद्धज्वर वाढवून आपले राजकीय उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न नवा नाही. त्यासाठी पाकविरोधाचा तर कधी चीनविरोधाचा उपयोग केला जात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर वुहान प्रकरणामुळे चीनला विरोध करणे आणखी सोपे झाले आहे. कोवीड १९ बाबत चीनने दाखवलेला बेजबाबदारपणा हा जागतिक टीकेचा आणि आंतरराष्ट्रीय आरोपांचा विषय आहे. त्याची उत्तरे चीनला द्यावी लागणार आहेतच. मात्र आपल्या देशात करोना पसरण्यात आपल्याकडील सरकारी धोरणांचे अपयश हे महत्वाचे कारण आहे. या विषयावरून सरकारला जाब विचारण्याची वेळ येताच पुन्हा सरकारवर विश्वास व्यक्त करण्यासाठी देशभक्तीची साद घातली जात आहे.

यंदाचा विषय गलवान खो-यातील संघर्षाचा आहे. सरकारी धोरणांवर टीका होण्याची वेळ आल्यावर पाकिस्तानविरोधाचा राग आळवण्याचा अनुभव आपल्या देशात नवा नाही. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीने चीनविरोधाला पुरेशी सकस जमीन मिळवून दिलेलीच होती. त्यामुळेच करोनाच्या फैलाव आणि उपचाराबाबत देशाला उत्तर देण्याची वेळ येताच त्याच चीनवर गलवानच्या निमित्ताने आगपाखड करून आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याची ही पद्धत घसरलेल्या राजकारणाचे चिन्ह आहे. चीनी अॅपवर बंदी घातल्यास खरेच त्यातून चीनवर विजय मिळवल्याचा आनंद फसवा असणार आहे. चीनी अॅप्सवर बंदी घालताना देशातील महत्वाच्या माहिती चोरीला जाण्याची भीतीचे कारण दाखवले जात आहे. टिकटाॅक किंवा शेअर इट आदी अॅप्स वर्षाधीपासूनच आपल्याकडे सक्रीय होती. त्यावेळी आपल्याला ही भीती नव्हती का, केवळ गलवान खो-यातील संघर्षानंतर आपल्याकडील सरकारी आणि सुरक्षा यंत्रणांना या अॅपचा धोका अचानक जाणवू लागला…या प्रश्नाचे उत्तर सरळ आहे. देशातील सुरक्षा यंत्रणा चीनच्या मुजोरीला उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत. प्रश्न आहे तो त्याचा वापर करणा-या राजकारणाचा. वैद्यकीय क्षेत्रातील जीवरक्षक किट्स तसेच इतर महत्वाची काही साधनेही चीनमध्येच बनवली जातात. ही उत्पादने करण्याची क्षमता आपण अद्याप निर्माण करू शकललो नाही. आपल्याला इतरांनी तयार केलेल्या उत्पादनांची गरज आहे. ती आपली सवय आहे. ही सवय मोडण्यासाठी आपण पहिल्या प्रथम निर्मितीक्षम होण्याची गरज आहे.

- Advertisement -