घरफिचर्सबारामतीचा कृष्ण आणि पार्थ

बारामतीचा कृष्ण आणि पार्थ

Subscribe

महाभारतातल्या कृष्णाप्रमाणे या पार्थाच्या मागे देखील पवार आजोबा उभे आहेत. कदाचित हे खरंही असू शकेल. राम मंदिर उभारून कोरोना जाणार नाही, असे आजोबा सांगत असताना नातू ‘जय श्री राम’ करत असेल, तर आजोबाचा त्याला समजवण्याचा हक्क बनतो. आता ही समजूत घरात काढायची की चारचौघात, हा त्यांचा कौटुबिंक प्रश्न आहे. मात्र पुढच्या काही काळात याकारणावरुन अजित पवारांचा नवा शपथविधी होऊन महाविकास आघाडी सरकार पडले, तर मग ‘पवार कुटुंबियात आलबेल नाही’ ही लाईन खरी ठरेल. 

सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपचा उदय झाल्यानंतर ज्या गोष्टी जाहीर बोलता येत नाहीत त्या सोशल मीडियावर टाकण्याचा प्रघात सुरु झाला. नेत्यांना अतिशयोक्ती विशेषणे लावणे असो किंवा त्यांची येथेच्छ बदनामी करणे असो.. सोशल मीडिया सगळ्या कामाला उपयुक्त ठरतो. याच माध्यमावर अधुनमधून ‘बारामतीचे कृष्ण’ अशी पोस्ट व्हायरल होते. शरद पवारांनी राजकारणात विरोधकांना धोबीपछाड दिल्यानंतर त्यांची कृष्णनीती कशी बिनतोड आहे, याची स्तुती करणाऱ्या या पोस्ट असतात. याचा अर्थ पवारांची काही देवासोबत तुलना करणे नसतो तर महाभारताच्या युद्धातील भगवान श्रीकृष्णाची मुत्सद्देगिरी, धोरण आणि नीतीचा उल्लेख पवारांशी जोडायचा असतो. अर्थात ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. तर असा हा बारामतीचा कृष्ण नेहमीच चर्चेत असतो. यावेळी मात्र त्याच्यासोबत पार्थाचीही चर्चा होते. हा पार्थ देखील बारामतीचाच…तोही कुरुक्षेत्रातील पार्थासारखा कन्फ्युज वाटतो. आता श्रीकृष्णरुपी शरद पवार म्हणजे पार्थचे आजोबा नातवरुपी पार्थला विश्वरुप दाखवणार की दिवसाचे तारे दाखवणार…? हे नेहमीप्रमाणेच आपण पवार यांच्यावरच सोडत आहोत. कारण त्यांच्याबाबतीतला अंदाज चुकण्यापेक्षा तो अंदाज न लावलेलाच कधीही बरा.

- Advertisement -

तर शरद पवार आणि पार्थ पवार या आजोबा-नातवाची नव्याने चर्चा करण्याचे कारण म्हणजे पवारांचे ताजे वक्तव्य. ‘माझ्या नातवाच्या मताला मी कवडीची किंमत देत नाही, तो इममॅच्युअर आहे’, असे वक्तव्य पवार यांनी केले. यानंतर साहजिकच याचा संबंध अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील संबंध, महाविकास आघाडी सरकारची स्थिरता, भाजपच्या मनात होत असलेल्या गुदगुल्या आणि अशा अनेक विषयांशी जोडला जाऊ लागलाय. तर काहींनी सालाबादप्रमाणे पवारांची यामागे मोठी खेळी असू शकते, असा गुळगुळीत झालेला ओपन सिक्रेट मुद्दा मांडला. आता कुणाचा बाण नेमका लागतो हे तर भविष्यात कळेलच. पण पवारांच्या वक्तव्याचे टेन्शन धनुष्य-बाणाला आले हे मात्र नक्की. शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार्थबद्दल वक्तव्य केले. त्याआधी याच ठिकाणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून होत असलेले राजकारण आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयने हाती घेतल्यामुळे सरकारची झालेली नाचक्की याबद्दल दोघांत चर्चा झाली असल्याचे कळते. गृहखाते राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. महाविकास आघाडी मुंबई पोलिसांच्या समर्थनार्थ असताना गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांना पार्थ पवार भेटतात आणि तपास सीबीआयकडे देण्याची विनंती करतात, हे सर्वांसाठीच अनाकलनीय होते. सध्या तपास सीबीआयकडे असला तरी त्याचा अंतिम निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे. पण एकूणच ‘घर का भेदी’ झाल्याची भावना राऊत यांनी पवारांसमोर व्यक्त केली.

महतप्रयासाने पवारांनी महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात उतरवले होते. मात्र सरकारला तीन महिने होतायत तोपर्यंत कोरोनाचे आगमण झाले. सरकारच्या कामकाजाला खीळ बसवली. मागच्या सहा महिन्यांपासून सरकार कोरोनाशी झगडत आहे. कोरोनावर मात करावी तर मध्येच सुशांतचे प्रकरण घडले, जे आता सरकारवर शेकवले जात आहे. सर्वाधिक कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यू यामुळे आधीच पुरते गाळात अडकलेल्या सरकारचा पाय सुशांत प्रकरणात आणखी खाली खेचण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. या सर्वांचा परिपाक म्हणजे शरद पवारांना नातवाने केलेल्या सीबीआयच्या मागणीबाबत विचारले असता पवारांनी नातवाचे जाहीर वाभाडेच काढले. हे वाभाडे पार्थचे निघाले असले तरी वेदना मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच झाल्या असतील हे नक्की.. कारण या वेदनेची सुरुवात झाली होती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून.

- Advertisement -

भाऊबंदकीचे वाद हे भारतासारख्या देशात नवीन नाहीत. पवार यांच्या कुटुंबात काही वाद नसतील असे म्हणणे भाबडेपणाचे ठरु शकते. राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना हा भाबडेपणा शोभू शकतो. मात्र इतर लोक त्यातून काढायचा तो अर्थ काढतात. अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची मनिषा २००४ पासून लपून राहिलेली नाही. शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबातील अजित पवार हे एकमेव असे राजकारणात सक्रिय होते. पण २००४ सालच्या अजित पवार यांच्या पहिल्या बंडानंतर २००६ साली अचानक सुप्रिया सुळे यांची राजकारणात एंट्री झाली. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात केंद्र आणि राज्य अशी विभागणी करुन पेल्यातले वादळ पेल्यातच ठेवण्यात पवार यशस्वी झाले. त्यानंतर २०१७ साली शरद पवार यांचे सर्वात मोठे बंधू अप्पासाहेब पवार यांचे नातू रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून आले. शरद पवार यांच्या चौथ्या पिढीने राजकारणात प्रवेश केला. या सगळ्या कोलाहलात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार कुठेही नव्हते. पक्षाच्या मंचावर ते पहिल्यांदा आले २६ जानेवारी २०१८ रोजी. राजू शेट्टी यांनी काढलेल्या संविधान बचाव मोर्चामध्ये पार्थ पवार यांनी भाग घेतला आणि राजकारणात येण्याचे संकेत दिले. २०१७ साली रोहित पवार यांनी स्वबळावर विधानसभेत जाण्याची चाचपणी सुरु केली. त्यासाठी बारामतीपासून जवळ असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघाचा अभ्यास सुरु केला. विधानसभेच्या खूप काळ आधीपासून रोहित पवार यांनी पद्धतशीरपणे कर्जत-जामखेडमध्ये काम सुरु केले होते. हे होत असताना २०१९ ची लोकसभा जाहीर झाली आणि पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी देखील आपल्या मुलाला तिकीट मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. शरद पवार यांनी माढातून निवडणूक लढविणार हे जाहीर केले असतानाही पार्थ पवारसाठी अजितदादांनी आपला रेटा सुरुच ठेवला. परिणामी एका घरातून किती लोकांनी निवडणूक लढवावी? या मुद्द्यावरुन शरद पवारांना माघार घ्यावी लागली.

लोकसभेत पार्थ पवार यांना पराभव पत्करावा लागला. तेव्हा देखील शरद पवारांनी, ‘ती जागा पडणारच होती’ असे विधान केले होते. तयारीविना राजकारणात उतरू नये, असा संदेश कदाचित पवारांना द्यायचा असेल. कारण पार्थ यांचा पराभव पवारांच्या कुटुंबातील पहिला राजकीय पराभव होता. पार्थबाबत पवारांची एक भूमिका असताना रोहित पवार यांच्याबाबत मात्र पवारांमधला मवाळ आजोबा दिसून येतो. मग ते राज्यव्यापी दौऱ्याबाबत रोहितला सोबत घेऊन जाणे असो किंवा आमदार झाल्यावर ‘विधानभवनातल्या ग्रथांलयात जास्तीत जास्त वेळ घालव’ असा सल्ला देणे असो. या गोष्टी आपल्याला बाहेरून दिसत असतात. या सगळ्या उदाहरणावरुन ‘पवार कुटुंबियात आलबेल नाही’, असा निष्कर्ष सहज काढता येतो. मात्र हे देखील पुर्णपणे सत्य नाही.

सुशांतच्या प्रकरणानंतर नेपोटिझम हा शब्द आता रोजचा झालाय. मागचे दोन महिने नेपोटिझमवर बरीच चर्चा झाली. राजकारणात देखील नेपोटिझम आहे. मात्र पवार कुटुंबियात नेपोटिझमला जागा नाही. शरद पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे, अजित पवार यांनी राज्यसभा सोडली तर लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर जिंकत आले आहेत. मतदारसंघ राखून ठेवण्यासाठी ते काय मेहनत घेतात. हे स्थानिक पत्रकार चांगले सांगू शकतील. त्याचप्रकारचा झंझावात रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये दाखवला आहे. अपवाद फक्त होते पार्थ पवार. ज्यांनी मावळमध्ये तळ ठोकून बसणे गरजेचे होते. मात्र ते पहाटेच्या शपथविधीची जुळवाजुळव करत असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्र सांगातात. त्यामुळे एका नातवाबाबत मवाळ असलेले आजोबा दुसऱ्या नातवासोबत कणखर झालेले पाहायला मिळतायत, असाही एक निष्कर्ष काढला जाऊ शकतो. पवारांनी पार्थबद्दल केलेले वक्तव्य हे त्याला राजकारणात आणखी पुढे जायला मदतच करेल, अशी आशा राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते व्यक्त करतायत. महाभारतातल्या कृष्णाप्रमाणे या पार्थाच्या मागे देखील पवार आजोबा उभे आहेत. कदाचित हे खरंही असू शकेल. राम मंदिर उभारून कोरोना जाणार नाही, असे आजोबा सांगत असताना नातू ‘जय श्री राम’ करत असेल, तर आजोबाचा त्याला समजवण्याचा हक्क बनतो. आता ही समजूत घरात काढायची की चारचौघात, हा त्यांचा कौटुबिंक प्रश्न आहे. मात्र पुढच्या काही काळात याकारणावरुन अजित पवारांचा नवा शपथविधी होऊन महाविकास आघाडी सरकार पडले, तर मग ‘पवार कुटुंबियात आलबेल नाही’ ही लाईन खरी ठरेल.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -