घरफिचर्सपावनखिंडीतील लढाई

पावनखिंडीतील लढाई

Subscribe

पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते. ही लढाई १३ जुलै १६६० रोजी विशाळगडानजीक पावनखिंड अथवा घोडखिंड येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून शिवाजी महाराज विशाळगडाकडे कूच करत होते. आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व शिवाजी महाराजांच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू झाला. जेव्हा महाराज व त्यांचे साथीदार घोडखिंडीत पोहोचले त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना विनंतीवजा आदेश दिला की, शिवाजी महाराजांनी पुढे गडावर जावे व जोवर महाराज गडावर पोचत नाहीत तोवर बाजी ही खिंड लढवतील व शत्रूला तिथेच रोखून धरतील. ‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे,’ असे बाजीप्रभूंनी महाराजांना विनवले. अशा लढाईला युद्धशास्त्रात लास्ट स्टँड मानले जाते. आदिलशाही फौजेचे नेतृत्त्व सिद्दी जौहरकडे होते. त्याला सिद्दी मसूद व फाजल खान (अफझलखानाचा मुलगा) यांची साथ होती. जौहरची एकूण फौज 10,000 ची होती तर महाराजांसोबत फक्त 300 ते 600 मावळे होते. महाराजांनी पौर्णिमेच्या रात्री गडावरुन उतरून वेढा तोडला व विशाळगडाकडे कूच केले. महाराजांनी आपल्यासारख्याच दिसणार्‍या शिवा काशिद नावाच्या व्यक्तीला पाठीमागे ठेवले. जेव्हा जौहरला शिवाजी महाराज विशाळगडाकडे गेले आहेत, असा सुगावा लागला तेव्हा त्याने सिद्दी मसूदला महाराजांच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. काही वेळाने महाराज व साथीदार घोडखिंडीत पोहोचले तेव्हा पाठलाग करणारे मसूदचे सैनिक जवळच आहेत, याची जाणीव झाली व काही वेळातच ते गाठतील आणि महाराजांसोबत इतरांना पकडतील असा अंदाज होता. घोडखिंडीत अतिशय चिंचोळी वाट होती. एकावेळेस एक-दोन जणच रांगेतून जातील एवढी. बाजीप्रभूंनी महाराजांना स्थिती समजावून विशाळगडावर प्रस्थान करण्याची विनंती केली. शिवाजी महाराजांनी पुढे विशाळगडावर प्रयाण केले. खिंडीत मसूदचे सैनिक पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांच्या आडव्या रांगेचा सामना करावा लागला. मावळ्यांच्या मागील रांगांनी तसेच आजूबाजूच्या कड्यांवर चढून दगड गोट्यांची बरसात चालू केली. अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे केवळ एक दोनच सैनिक मराठ्यांच्या रांगेपर्यंत पोहोचत व मारले जात अशा प्रकारे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली.

बाजीप्रभू, फुलाजी, संभाजी जाधव, बांदल ह्यांनी आपापल्या कमानीतून मसूदच्या सैनिकांना ठार केले. बाजीप्रभूंच्या आवेशाने अनेकांची गाळण उडवली. मसूदने बंदुकधार्‍यांना कड्यावर चढून बाजीप्रभूंवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. बाजींवर गोळ्या झाडण्यात आल्या. बाजीप्रभू जखमी झाले तरी त्यांनी सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत आपली जागा सोडू नका, असे बजावले. काही वेळातच शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले. त्यांनी तोफांचा गजर दिला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूंनी तोफांचा गजर ऐकल्यानंतरच कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपला जीव सोडला. मराठ्यांचे जवळपास सर्वच 300 जण कामी आले, त्याचवेळी मसूदचे प्रचंड नुकसान झाले. जवळपास 3000 सैनिक मारले गेले. बाजीप्रभू व इतर मराठा सैनिकांच्या बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -