घरफिचर्सभांबवली वजराई धबधब्याचा थरारक अनुभव..!

भांबवली वजराई धबधब्याचा थरारक अनुभव..!

Subscribe

थोड्या अंतरावर गेल्यावर आम्हाला विशाल पांढरा शुभ्र अतिशय उंचावरून फेसाळणारा उत्तुंग धबधबा दिसला आणि आम्ही समोरचा नजराणा पाहून जोरजोराने ओरडत आनंद व्यक्त केला. धबधब्याच्या आणखी जवळ जाण्यासाठी आम्ही आता अंतिम टप्प्यावर होतो. रस्ता जंगलातून नव्हता. पण मोठमोठ्या दगडांच्या खालून वाट काढत आम्हाला जायचं होतं. रस्ता घसरणीचा होता. शेवटी धबधब्याच्या मुख्य ठिकाणी पोहचलो.

पावसाळ्यात ट्रेकिंगची मजा काही औरचं असते. चिंब भिजत,रम्य निसर्गात भटकत कुठल्याही गड आणि किल्ल्यावर वा डोंगरावरील ट्रेकिंगचा आनंद धुंद करत जाणारा असतो. पाऊस आणि भटकंती बरोबरचं निसर्गाचं मनोहारी सौंदर्य बघणे,स्वच्छ हवा,तणाव विरहित दिवस,मित्र सवंगड्यांबरोबर धमाल आणि मस्ती असा सर्व वातावरण सामान्य निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे. त्यातच धबधबा बघणे, वा त्यात चिंब भिजणे एखाद्या गड-किल्यावर ट्रेकिंगसाठी जाणे. दर्‍या-खोर्‍यात भटकणे हे तर आलंच. असाच अनुभव घेण्याची संधी मला मिळाली. माझा मित्र मिलिंद पानपाटीलमुळे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील आर्य क्रीडा मंडळाच्यावतीने एकदिवसीय वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले होते. वरजाई धबधबा हे ठिकाण मंडळाच्यावतीने सहलीचे ठरविण्यात आले. जवळजवळ ४० जणांचा ग्रुप मोठ्या बसमधून सातार्‍याकडे निघालो.

तांबी गावात पोहचलो. गाव उंचावर आहे. खाली 3 कि.मी भांबवली आहे. तांबी गावात बस थांबवून आम्हाला पुढे पायी जायचे होते. कारण बस मोठी असल्यामुळे खाली घेऊन जाणे शक्य नव्हते.आम्ही जिथे उतरलो तिथून धबधब्याचे ठिकाण पायी जवळजवळ तासभर अंतरावर होते. म्हणजे तिथपर्यंत जाताना ट्रेकिंगचा अनुभव येणार होता. तेथील स्थानिक लोकांकडून धबधब्यापर्यंत जाण्याचा रस्ता विचारून घेऊन आमचा कंपू रमतगमत निघाला. वाट दगडधोंड्यातून, ओढ्यातून, शेताच्या बांधावरून अशी जात होती. परंतु, बराच वेळ झाला तरी धबधबा दृष्टीस पडत नव्हता. आमच्या आधी अनेक मंडळी त्याच रस्त्यावर येत होती. त्यांना विचारले तर अनेकजण हेच म्हणायचे, अजून 20 मिनिटे लागतील. त्यामुळे आम्ही पुढची वाट धरत असू. दरम्यान,वाटेत भेटणारी पुढील व्यक्ती तेच सांगत असे. पायी चालून थकवा येत होता. धबधबा पाहण्याच्या उत्सुकतेने थकव्यावर मात करून पुढे निघालो. काही अंतरावर गेल्यानंतर आमच्या समोर सातार्‍याची काही तरुण मुले धबधबा पाहून पुन्हा परतीला निघाली होती. त्यांना विचारले, त्यांनी एकदम जवळ आहे म्हटल्यानंतर आमच्या चेहर्‍यावर एकदम हसू आले. पण त्या मुलांनी जाताना आम्हाला सांभाळून जा रस्त्यात झाडीत जळवं आहेत. जळवं म्हणजे किडा. चावला की रक्त काढतं. ते समजणारी नाही व रक्त थांबतही नाही असे सांगून पुढे गेले. आम्हाला भीती वाटत होती. जळव किड्याला भीत वाट काढत पुन्हा निघालो.

- Advertisement -

थोड्या वेळाने आम्हाला पाणी पडण्याचा आवाज येत होता.आम्हाला खात्री झाली. आपण धबधब्याच्या अगदी जवळ आहोत. थोड्या अंतरावर गेल्यावर आम्हाला विशाल पांढरा शुभ्र अतिशय उंचावरून फेसाळणारा उत्तुंग धबधबा दिसला आणि आम्ही समोरचा नजराणा पाहून जोरजोराने ओरडत आनंद व्यक्त केला. धबधब्याच्या आणखी जवळ जाण्यासाठी आम्ही आता अंतिम टप्प्यावर होतो. रस्ता जंगलातून नव्हता. पण मोठमोठ्या दगडांच्या खालून वाट काढत आम्हाला जायचं होतं. रस्ता घसरणीचा होता. शेवटी धबधब्याच्या मुख्य ठिकाणी पोहचलो. मोबाइल फोन भिजणार म्हणून अनेकजण बसमध्ये थांबले होते. मी आवर्जून फोटो काढण्यासाठी मोबाइल घेतला होता. यामुळे अनेकांनी फोटो काढले..पण धबधब्याखाली भिजण्याची संधी नव्हती.

पाणी खोल दरीतून जवळच्या धरणात जात होते. तेथे जाणे अतिशय धोकादायक तर होतेच, शिवाय रस्ताही नव्हता. पण विशाल व अद्भूत धबधब्यातून पडणारे पाण्याचे भव्य रुप डोळ्यांनी बघून धन्य झालो. लांबच लांब पसरलेले हिरवेगार ओथंबून खाली आलेले काळे ढग, खळाळणारे निर्झर आणि मधूनच डोकावणारे छोटे धबधबे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले. पावसाळ्यात तयार होणारे इथले पाण्याचे काही प्रवाह शांतपणे डोंगरावरून खाली येतात तर काही धबधबे डोंगरावरून अक्षरश: कोसळत खाली येतात. वळणा वळणावर नयनरम्य, विहंगम देखावे जणू काही आपली वाटच पाहात असतात. पावसाळी धुक्यात जणू काही डोकी हरवलेल्या टेकड्या आकाशात उंच झेपावत आहेत, असे वाटते. टेकड्यांच्या या भल्या-थोरल्या उभतीवर अलगद उतरणारे ढग वातावरण भारावून टाकतात. काळ्या ढगांभोवती चालणारा हा ऊन-पावसाचा खेळ जणू काही दिव्याची ज्योत थरथरावी असा भासतो. हा मनोहारी खेळ पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो. भांबवली वजराई धबधबा स्वर्गीय सुखाचा अनुभव देतो. पावसाळ्यामध्ये खूप धमाल, मज्जा, मस्ती करायची असेल तर तुम्ही

- Advertisement -

भांबवली वजराई धबधबा एक दिवसाच्या पावसाळी सहलीचा नक्कीच बेत करा .बघता बघता परतीची वेळ झाली. बस असल्या ठिकाणी येण्यास उशीर झाला. सकाळी फक्त नाष्टा केला होता. निघताना पोटात कावळे ओरडत होते. सायंकाळी ५ वाजता घरातून आणलेले डबे उघडून त्यावर मस्त ताव मारला आणि पुन्हा सातारा मार्गाने पुण्याला निघालो. पण भांबवली वजराई धबधबा थरारक व सहनशक्तीची परीक्षा घेणारा अनुभव आयुष्यभर स्मरणात राहिला.


-धोंडपा नंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -